प्रेमरंग-1

प्रेमाचा रंग

रस्त्यावर झालेल्या अपघातात पडलेल्या व्यक्तीची आकृती तिला ओळखीची वाटली तशी तिची धडधड वाढली. तिने पटकन तिची कार बाजूला घेतली आणि धावतच अपघाताच्या ठिकाणी गेली.

समोर किशनला बघून तिचं अवसान गळालं. सगळं भान विसरून ती त्याच्याजवळ धावत गेली. गर्दीला बाजूला करत आत शिरली आणि गूढग्यावर बसत त्याचं डोकं धरलं. डोक्याला मार लागला होता, रक्ताची धार लागली होती. शेजारी त्याची बायको "हेल्प, हेल्प.." म्हणून ओरडत होती.

त्याच्या डोक्यातून वाहणारं रक्त कसेही करून थांबवायचे होते. पण तिच्याजवळ ना रुमाल होता ना ओढणी, तिने एक लांबसडक कुर्ता घातला होता. तिने आजूबाजूला पाहिलं, लोकं फक्त बघत होती..कुणीही मदत करत नव्हतं..

तिने कसलाही विचार न करता कुर्त्याचा खालचा भाग टरकन फाडला आणि त्याच्या डोक्याशी घट्ट दाबून धरलं.

तिचा जीव कासावीस होत होता. किशनची बायको मेघना तिच्याकडे रागाने बघत होती. पण यावेळी ती दुसरा कसलाही विचार करत नव्हती, तिच्या डोक्यात फक्त एकच..किशन वाचला पाहिजे...

दोन लोकं मदतीला आली, ती जिवाच्या आकांताने ओरडली..

"उचला पटकन याला..हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं.."

एकाने पटकन रिक्षा बोलावली, तिने तिचा हाताने किशनचं डोकं घट्ट दाबून ठेवलं होतं, तसाच हात धरत ती रिक्षात बसली..शेजारी मेघना होती...

"चला पटकन..इथल्या सिटी हॉस्पिटलमध्ये चला.."

हॉस्पिटलमध्ये पटकन त्यांनी किशनला ऍडमिट केलं..

वॉर्डबाहेर त्याची बायको एका खुर्चीवर बसून रडत होती. हिला ते पाहवलं नाही...


🎭 Series Post

View all