प्रेमा तुझा गंध कसा?

एक सुंदर गंधांच्या भोवती फुलणारी कथा.
प्रेमा तुझा गंध कसा भाग 1


सकाळचा गजर झाला आणि सुमतीबाई जाग्या झाल्या . पलंगावर शेजारी झोपलेल्या आपल्या कुंकवाच्या धन्याला अजिबात जाणवू न देता त्या समोरील खिडकीजवळ गेल्या आणि त्यांनी हलकेच खिडकी उघडली आणि त्याबरोबर मोगऱ्याचा सुगंध आसमंत व्यापत आत शिरला .


आपले भान हरपून तो सुगंध आणि समोरून येणाऱ्या गंधात हरवून गेल्या . घट्ट बांधलेल्या सोनेरी अंबाड्यातील एक चुकार बट चेहऱ्यावर आली होती .


सुमती बट मागे घेणार तेवढ्यात,
" जेव्हा तुझ्या बटां उधळी मुजोर वारा .
माझा न राहतो मी हरवुन हा किनारा ."


असा ओळखीचा आवाज जवळ येऊ लागला . सुमती मागे वळणार इतक्यात सुधाकरने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला थांबवले .


हळूच तिच्या कानापाशी ओठ नेत म्हणाला,"सुमे काय सुंदर दिसतेस ! "


सुमतीने त्याचे हात हळूच बाजूला केले आणि खिडकी बंद करू लागली .

"खिडकी का बंद करतेस ?"
" समोर बघा ! " सुमती जरा रागाने बोलली .


" अरे ही आपली ती याची नात . "
सुधाकर नाव आठवू लागला .


" ती कोणाची कोण ते माहित आहे मला . पण आता तुम्ही माझ्याजवळ उभे होतात तर आपल्याकडे बघून हसली . "
सुमती अजून रागातच होती .


" हसू देत . बायकोला जवळ घेतले ना !"
सुधाकर परत जवळ जात म्हणाला .


" तुझी ही सवय कधी जाणार रे सुधा ? "
सुमती असे म्हणायला आणि नेमका मयंक आत यायला एकच वेळ झाली .


" सुधा ! काय म्हणालीस आजी?" मयंक परत नक्कल करत बोलला.


" हे बघ पिंट्या आजोबासारखा आगवूपणा करू नकोस . " सुमती चिडून निघून गेली.



" काय मग आजो, तुमचे सरकार रुसले वाटत ? " मयंक चिडवून बोलायला लागला .


" अहो! जरा इकडे या . " आवाज ऐकताच सुधाकर उठला .


" बेट्या,तुलाही समजेल लवकरच ह्या अहो मधली ताकद ." सुधाकर आत जात म्हणाले.


तर आपल्या कथेचे नायक आणि नायिका सुधाकर जोशी आणि सुमती जोशी पूर्वाश्रमीची सुमती हैबतराव जेधे . नाही तुमच्या वाचण्यात काहीही चूक झालेली नाही. जेधे कुळातील कन्या जोशींची सून कशी झाली ? याची ऐतिहासिक गोष्ट तुम्हाला पुढे ह्या कुटुंबात डोकावताना समजत जाईलच .


सध्या सुधाकर आणि सुमतीबरोबर त्यांचा नातू मयंक राहतो आहे. सी. ए.असलेला मयंक अतिशय रुबाबदार आणि देखणा. त्याचे आई बाबा मुंबईला असतात. मयंक हट्टाने पुण्यात राहिला. त्याची कारणे पुढे समजतीलच. तूर्तास आपण जोशी आजी काय म्हणतात ते पाहूया.



" अहो ! या लवकर . मला पूजेची फुले सापडत नाहीयेत. " सुमती परत हाक मारत होती.

" अग आज फुले तोडायला विसरलो . तुझा चेहरा बघून सगळे विसरायला झाले . "

" पुरे , मी आणते फुले तोडून . " सुमती गुडघ्यावर हात ठेवून उठायला लागली आणि मयंक फुले घेऊन आत आला.


" मया, पारोश्याने तोडलेली फुले देवाला चालणार नाहीत." सुमती रागावली .


"आजी काय हे ? तू एका नामांकित कॉलेजात सायन्स शिकवायचीस."
मयंक चिडला .


" हो,पण हिच्या सासूला हिने वचन दिले होते बाबा . " सुधाकर नाटकी आवाजात म्हणाला .


" असू द्या . तसेही आता माझ्यानंतर कोण करणार त्यांची एवढी साग्रसंगीत पूजा."

सुमती फुले घेत आत जायला वळली. सुधाकर आणि मयंक आपापल्या खोलीत अंघोळीला गेले.



सुमतीबाई पूजा आटोपून बाहेर आल्या. तोपर्यंत सखू आली होतीच .

" सखू,भाज्या चिरायला घे . आज मस्त थालीपीठ लावू . " सखुला सूचना देत त्या आत आल्या .


सखू लांब एका कोपऱ्यात उभी होती आणि समोर आजोबा आणि नातू काम करत होते .


" बघा आजी,आता ह्या दोघासनी आंड्याच आम्लेट खायचं हाय. म्या केल असत पर मग तुमासनी भाज्या चिरून द्यायच्या व्हत्या ना?"
सखू चहा पित बोलली.


" मयंक,ताबडतोब बाहेर निघा. तुम्हाला जो धुडगूस घालायचा तो रविवारी."
सुमती रागाने म्हणाली .


" काय हे आजी,जरा सखुच्या हातचे झणझणीत ऑमलेट खाऊन बघ."
मयंक चिडला.


" जोशीबुवा, मी लहानाची मोठी अशा घरात झाले जिथे हंडा भरून मटण शिजायचे. मला आणि आईला वासाने उलटी यायची. "
नाक दाबत सुमती म्हणाली.


" अच्छा,म्हणजे जोशी असले काही खात नसेल म्हणून यांना पसंद केले का तू?"
मयंक परत चिडवत बोलला.


" तुम्ही दोघे आधी किचनमधून बाहेर व्हा."
सुमती चिडली.


" मयंक,चल बाबा. खाऊ आता घासफुस."

सुधाकर आणि मयंक बाहेर आले. कांद्याच्या थालीपीठ भाजण्याचा अप्रतिम सुवास दरवळला आणि दोघे अंडे विसरून तुटून पडले.



मयंक ऑफिसला जायला तयार झाला. तेवढ्यात आजोबा तयार होऊन आले.

" अरे व्वा, आज कुठे ? " मयंक जोरात ओरडला.


" कोण कुठे निघाले मयंक?"
बाहेर येत सुमतीने दृश्य पाहून आपले वाक्य मनात गिळले.


पोलो टी शर्ट, लिविस जीन्स, त्यावर शूज आणि मस्त तयार होऊन निघालेला सुधाकर पाहिला आणि सुमती म्हणाली," काय? कुठे एवढा तामझाम?"


" आजी लक्ष ठेव नीट. नाहीतर ह्यांना पळवून घेऊन जाईल एखादी."


"कोणी बघणार नाही ह्यांना. आमच्या वयात असणाऱ्या सगळ्या आता संसारी आज्या आहेत."
सुमती हसली.


" बघ हा,एकेकाळी कॉलेजात माझ्या मागे पोरींचा घोळका असायचा."
सुधाकर मिश्किल हसला.


" तुम्ही येताना मंडईत जाऊन भाजी आणा . खबरदार बाहेर काही खाल्ले तर. मी सगळीकडे फोन केले आहेत." सुमातीने तंबी दिली.


" मयंक,शिकून घे. आपल्या मित्रांच्या बायकांची ओळख बायकोशी करून द्यायची नाही."
सुधाकर बाहेर पडत म्हणाला.


सुधाकर आणि मयंक बाहेर जाताच सुमती आत आली.


"सखू,आपल्या दोघींना थालीपीठ लाव."
सखू त्यांच्याकडेच दिवसभर काम करायची.


" आजी,आता आणते बगा." सखूने आतून आवाज दिला.


दोघी थालीपीठ खाऊ लागल्या. मस्त थालीपीठ खात असतानाच बेल वाजली.


" सखू जरा बघ कोण आलेय." सखुने दार उघडले.


" वामन भाऊजी तुम्ही? मग आमचे हे कुठेय?"
सुमती काळजीने म्हणाली.


आपण केलेला घोटाळा वामनरावांना समजला होता.


" सुधा आणि माधव जाणार होते सोबत. मी आपला सहजच आलेलो ह्या बाजूला."
वामनराव म्हणाले.


" भाऊजी चहा घेणार?" सुमती हळूच म्हणाली.


सखू चहा करायला आत गेली आणि पुन्हा बेल वाजली. सुमतीने दार उघडले. समोर सुधाकर आणि त्याला चार पोरांनी धरून आणले होते. सुमती घाबरून पुढे झाली.


" आजी,काही नाही झालेय. फक्त सरबत प्यायची पैज जिंकताना आठ ग्लास सरबत प्यायले आणि पोट टम्म फुगले यांचे."
शेजारच्या गुप्त्यांचा नातू म्हणाला. सुधाकरला घरात सोडून पोरे निघून गेली.



सुमती प्रचंड चिडली होती. ती बोलायला तोंड उघडणार इतक्यात तिच्या मुलीचा फोन आला.


" आई, शरू तुझ्याकडे यायला निघाली आहे." देवकी फोनवर रडायला लागली.


" देवू,आधी रडायचे बंद कर. शरू काही लहान नाही आता. " सुमती समजावू लागली.


" लहान नाही त्याचीच तर भिती वाटते." देवकी रडत म्हणाली.

" पण झाले काय असे?" सुमतीने विचारले.


" तुझी लाडकी पोहोचेल आता. विचार तिलाच."
देवकीने फोन ठेवून दिला.


आता हे काय नवीन? असा विचार करत असतानाच शर्वरी आत घुसली.


" सखू मावशी खायला काय आहे?" तिचा दणदणीत आवाज बंगल्यात घूमला.


तेवढ्यात शरूचे लक्ष आजोबांकडे गेले.


" आजो काय झाले? पोट धरून का बसला? डोन्ट वरी डॉक्टर शरू इज हियर."

शरू हसून म्हणाली.


केसांचा बॉयकट,अंगात एक थ्री फोर्थ त्यावर विचित्र रंगाचा टॉप आणि कानात,गळ्यात तसेच हातात काहीच नाही. असल्या अवतारात शरू आलेली पाहून सुमतीने देवकीच्या रडण्याचे कारण न सांगता समजून घेतले. सखू थालीपीठ घेऊन आली.


" शरू,अचानक आलीस?" सुमती म्हणाली.


" तुला बीबीसी कडून फोन नाही आला का ? एक वाया गेलेली डॉक्टर तुझ्या घरी येतेय म्हणून." शरू मोठ्याने हसली.


" शरे काय ही भाषा? डॉक्टर होणार आहेस तू?" सुमती जरा चिडलीच.


" आजी,आता तू नको सुरू होऊ यार. पन्नास वर्षांपूर्वी पुण्यात भूकंप आणणारी तूच आहेस ना?"
शरू संशयाने बघत म्हणाली.


" शरे,आमच्या लग्नाला भूकंप म्हणतेस काय कार्टे. आईला किती त्रास देशील?" सुमती रागावली.


" आजी,तुला संध्याकाळी सांगू का सगळे. आता मला बॉडी कापायला जायचं आहे."
शरू पळतच निघून गेली देखील.


सुमतीबाई शांतपणे सुधाकरला घेऊन आत आल्या .

" अहो आता आपले वय काय ? उद्या तुम्हाला काही झाले तर मी काय करू.?"
सुमतीच्या डोळ्यात पाणी आले.


सुधाकर हळूच तिच्याजवळ आला . तिच्या डोळ्यातले पाणी हलक्या हाताने पुसले आणि खिशातून सोनचाफ्याची दोन फुले बाहेर काढली .


" सुमती माझ्या आयुष्यातला सुगंध आहेस तू . गेली पन्नास वर्षे तारुण्य, प्रौढत्व,वृद्धत्व ह्या सगळ्यात हा प्रेमाचा गंध तसाच टवटवीत आहे. पन्नास वर्षांपूर्वी होता तसाच."


असे म्हणून सुधाकरने तिला जवळ घेईल हलकेच पाठीवर थोपटले.


तेवढ्यात दारावरची घंटा पुन्हा वाजली.

" मेली ही घंटाच फेकून देणार आहे मी . " सुधाकर म्हणाला आणि तेवढ्यात सखू किंचाळली.


" आय्यो पोलीस?"
पाठोपाठ सुमती आणि सुधाकर बाहेर आले. समोर पोलीस उभे पाहून ते दोघेही तसेच स्तब्ध उभे राहिले.


पोलीस कशाला आले असतील ?
शरू काय सांगणार आहे ?
सुमती आणि सुधाकर यांची गोष्ट काय असेल?

वाचत रहा.
प्रेमा तुझा गंध कसा ?
©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all