प्रेमा तुझा गंध कसा? भाग 2

एक अलवार प्रवास उलगडत जायची सुरुवात .

प्रेमा तुझा गंध कसा? भाग 2


मागील भागात आपण पाहिले सुधाकर आणि सुमती.सुखी निवृत्त जीवन जगत आहेत. त्यांची नात शर्वरी आईबरोबर भांडण करुन निघून येते आणि अचानक पोलीस चौकशीला येतात. आता पाहूया पुढे.


" सुधाकर जोशी कोण आहेत?" पोलीस कॉन्स्टेबल पुढे येत म्हणाले.

" मी आहे सुधाकर जोशी. बोला काय झाले साहेब?" सुधाकर पुढे येत म्हणाला.

" शर्वरी कुलकर्णी तुमची कोण?" त्याने विचारले.


" नात आहे माझी. काय झाले साहेब?" सुमती आता घाबरली होती.


" शर्वरी तुमच्याकडे आलेली आहे असे तिच्या आईने सांगितले. कुठेय ती?" कॉन्स्टेबल पुढे येत म्हणाले.


" अहो ती आताच कॉलेजला गेली अर्ध्या तासांपूर्वी." सुधाकर कसेबसे म्हणाला.
" हे बघा साहेब,नक्की काय झाले सांगाल का?" सुमती हात जोडून म्हणाली.


" शर्वरीची मैत्रीण डॉक्टर अंजली कालपासून गायब आहे. तिच्या घरच्या लोकांनी तक्रार दिली आहे. म्हणून आम्ही चौकशी करतोय. तुमची नात शर्वरी आता कॉलेजात नाही." कॉन्स्टेबल दोघांना समजावत म्हणाले.


" साहेब,आता शरू घरातदेखील नाही. ती आली तर आम्ही स्वतः कळवू . " सुधाकर आश्वासन देत म्हणाला.


" ठीक आहे. गरज पडल्यास पुन्हा चौकशीला येईल."


कॉन्स्टेबल निघून गेले आणि सुमती मटकन खाली बसली. पोलीस आल्याचा तिला चांगलाच धक्का बसला होता.



" सखू,पाणी घेऊन ये."
सुधाकर सुमतीला आधार देत म्हणाला.


" काय केले असेल हो ह्या पोरीने? सकाळी आली आणि तशीच निघून गेली."
सुमती डोळ्यात पाणी आणून बोलत होती.


" सुमा,पाणी घे. शरू अत्यंत हुशार मुलगी आहे. ती काहीही वावगे करणार नाही." सुधाकर धीर देत होता.


" तुम्ही तिला फोन लावा आधी." सुमती म्हणाली.


सुधाकरने फोन लावला परंतु फोन बंद येत होता.


" सुमती फोन बंद आहे. आता ती घरी येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे." सुधाकर शांतपणे म्हणाले.


" देवकीला अजिबात काही सांगू नकोस सुमती. आधी शरू घरी येऊ देत. मग आपण ठरवू."
सुधाकर तिला धीर देताना स्वतः मात्र काळजीत होते.


" तायसाब थोडी कॉफी करते. बर वाटल तुम्हाला." सखू असे म्हणून आत गेली.


सुमती सुन्न होऊन तशीच बसून होती.


" सुमा, शरूच्या कॉलेजला असलेला शंतनु इनामदार तुझा विद्यार्थी आहे ना?" सुधाकर म्हणाला.

" अरे हो,थांबा मी त्याला फोन लावते." सुमती म्हणाली.


इकडे कॉलेजात डीन शंतनु इनामदार प्रचंड अस्वस्थ होते. फोनवर बाईंचे नाव दिसतात शंतनुने फोन घेतला.

" शंतनु मला खरे सांग काय झाले आहे नक्की?" सुमती आपले रडू कसेबसे आवरून विचारू लागली.

शंतनुने संध्याकाळी घरी येतो असे सांगून फोन ठेवला. आता वाट बघणे एवढेच हातात होते.



संध्याकाळ झाली होती. मयंक त्याला समजले तसा लगेच घरी आला होता. देवकी आणि तिचे मिस्टर दोघेही आले होते. अजूनही शरूचा फोन बंदच होता. सगळेजण प्रचंड काळजीत होते. बंगल्याबाहेर कार थांबली आणि मयंक पटकन बाहेर गेला.


गाडीतून डॉक्टर शंतनु इनामदार उतरले. त्यांनी डोळ्यांवर गॉगल घातला आणि बंगल्याच्या दिशेने निघाले. सुमती आणि सुधाकर त्यांची वाटच बघत होते.


" शंतनु काय झाले नक्की? ही अंजली कोण आहे? शरू कुठेय?"

एकापाठोपाठ एक प्रश्न विचारत सुमती रडू लागली.


" मॅडम तुम्ही शांत व्हा. अंजली पाटील म्हणजे हिंदुराव पाटील यांची नात. ती आणि तिचा पाच जणांचा ग्रुप गायब आहे. अंजलीचा उद्या साखरपुडा आहे."

शंतनु एका दमात बोलून मोकळा झाला.


" एक मिनिट,हिंदुराव पाटील म्हणजे पूर्वी मंत्री होते तेच ना?" सुधाकर म्हणाला.


" हो,आता त्यांची माणसे ह्या पोरांना शोधत आहेत."
सगळी हकीकत सांगून शंतनु बाहेर पडला.



रात्रीचे बारा वाजत आले होते. सगळे अजूनही जागेच होते. तेवढ्यात मागच्या दारावर टकटक झाली. मयंक पळतच गेला. त्याने दरवाजा उघडला आणि समोर पाच जण उभे. त्याने गुपचूप सगळ्यांना आत घेतले. देवकी काही बोलणार इतक्यात सुधाकरने तिला थांबवले.


" आता खूप रात्र झाली आहे. आपण सकाळी काय तो सोक्षमोक्ष लावू."
सगळेजण आपापल्या खोलीत गेले.


हे पाचजण आणि मयंक हॉलमध्ये होते.

" दादया सगळ सांगते पण उद्या." शरूने विनवणी केली.



कधी एकदा सकाळ होते याची वाट बघत देवकी आणि सुमती जाग्या होत्या. काहीही झाले तरी आता शर्वरीला जाब विचारायचा होता. शर्वरी आणि तिचे मित्रमैत्रिणी देखील जागेच होते. शरू समोर बसून असलेल्या आई आणि आजीला पाहून समजून गेली आता सगळे ऐकल्यावरच ह्या शांत होतील. ती समोर शांत बसलेली बघून देवकी प्रचंड चिडली.


" आता बोल शरे,हुशार म्हणून तुझे कौतुक करत आलो तेच चुकल आमच."
देवकी ताडताड बोलत होती.


" आई,आधी माझे सगळे ऐकून तर घे."
शरू बोलायचा प्रयत्न करू लागली.


" ऐकून घेऊ? अग पोलीस आलेले शरे,शिवाय अंजलीच्या बाबांची माणसे शोध घेत आहेत. तुमच्यात अंजली कोण आहे? की पळवून लावली तिला कोणाबरोबर?"
देवकी परत सुरू झाली.


" काय यार आई,म्हणजे हिचे कुठेतरी लग्न लावायला पळून गेलो होतो का आम्ही?"
शर्वरी चिडली.


" वर तोंड करून आम्हाला काय विचारतेस? आज साखरपुडा आहे."
सुमती ओरडली.


मग अंजली शांतपणे पुढे आली.

" आजी,यात शरू आणि ह्या सगळ्यांची काहीही चूक नाहीय. खरतर मला एम डी झाल्यावर मग लग्न करायचे होते. तेदेखील राजकारणी मुलाबरोबर नाही. मला माझ्या भावना,करिअर समजून घेणारा मुलगा हवा होता. परंतु घरी कोणीच माझे ऐकत नव्हते. मग मनाविरुद्ध आयुष्य जगण्यापेक्षा मेलेले बरे असे ठरवून मी निघाले होते."
अंजली थांबली.


" काय? अग डॉक्टर आहेस तू? जरा आईचा तरी विचार करायचा?" देवकी चिडून बोलली.


" काकू,आईसाठीच इतके दिवस गप्प होते. पण मग शरूला हे सगळे समजले. ती म्हणाली आपण साखरपुड्याचे दिवशी गायब होऊ. मग पुढचे पुढे पाहू."
अंजली रडत बोलत होती.

तोपर्यंत मयंक आणि सुधाकर मागे येऊन उभे राहिले होते.


हे सगळे ऐकून सुमती आणि देवकी अवाक झाल्या.


" आता पुढे काय करायचे?" देवकी शरू आणि तिच्या मित्रांना विचारत होती.


" शरू सोशल मीडियावर कालपासून हे सगळे गाजत आहे. तुम्ही कुठे होतात दिवसभर?"
मयंक पहिल्यांदाच बोलला.


" दादा,आम्ही कॉलेज होस्टेलमध्ये लपलो आणि रात्री आमच्या मित्रांनी आम्हाला बाहेर पडायला मदत केली. तिकडे पोलीस आले होते."
शरूने उत्तर दिले.


" अंजली,तुझ्या घरी फोन करून तू सुरक्षित असल्याचे आधी कळव. मग आपण तुझ्या आजोबा आणि बाबांशी बोलू." सुधाकर शांतपणे म्हणाला.


"पण आजोबा ते तिला जबरदस्ती घेऊन गेले तर?" शरू म्हणाली.


" तसे काही होणार नाही."
सुधाकर फोन समोर धरत बोलला.


अंजलीने घरी फोन केला. ती सुरक्षित असल्याचे तिने सांगितले आणि सुधाकरने फोन घेतला.


" तुमची मुलगी आणि नात माझ्या घरी सुखरूप आहे. तुम्ही स्वतः जर इथे आलात तर बरे होईल."
सुधाकरने फोन ठेवला.


अंजलीचे आजी आजोबा आणि आई बाबा येत होते.




पुढचे तीन चार तास अत्यंत तणावाचे होते. सखू आणि देवकी दोघींनी मुलांसाठी खायला आणि चहा आणला.


" खाऊन घ्या. कालपासून काय खाल्ले असेल काय माहित?" सुमती प्रत्येकाला खायला देत म्हणाली.


सुधाकर देवपुजेला गेले. सुमती आणि देवकी स्वयंपाक घरात होते.

" शरे, पप्पा मला मारतील आणि घरी घेऊन जातील."
अंजली रडू लागली.


" आंजे रडायच बंद कर आधी. पुढे आयुष्यभर रडायचे नसेल तर तुला लढायला लागेल."
शर्वरी तिला समजावत होती.



" सुजय,प्रिया,शरद तुम्ही तिघे कॉलेजला जा. तिकडे काही वेगळा इश्यू व्हायला नको."
शर्वरी पटपट निर्णय घेत होती.


तिघेही तिकडून निघाले. आता शर्वरी आणि अंजली दोघीच होत्या. अंजली प्रचंड घाबरली होती. सुधाकर देवपूजा आटोपून आला.


" अंजली घाबरु नकोस,असा प्रसंग आम्ही पन्नास वर्षांपूर्वी पार पाडला आहे." सुधाकर हसून म्हणाला.


" अहो प्रसंग काय? शरे आम्ही मोठी माणसे समजावू त्यांना. तुम्ही फक्त शांत रहा." सुमती गंभीर होती.


एका मोठ्या राजकारणी घरातील ही मुलगी. ते लोक हे सगळे समजून घेतील का? उद्या ह्यातून काही निर्माण व्हायला नको. सुमातीच्या मनात नकोनको त्या शंका येत होत्या. ह्यातून शर्वरीला काही धोका व्हायला नको. हा सगळा प्रसंग नीट निभावला जाण्यासाठी सुमती मनोमन गणपतीचा धावा करत होती.


अत्यंत तणावाचे वातावरण असताना अचानक बेल वाजली आणि शांतता भंग झाली. अंजलीच्या घशाला कोरड पडली होती आणि हातांना कंप सुटला होता. कधी नव्हे ते शर्वरी थोडी घाबरली होती. मयंक दरवाजा उघडायला गेला. घरात प्रचंड शांतता होती. जे काही होईल त्याला तोंड द्यायला सुमती आणि सुधाकर तयार होते.


अंजलीच्या घरचे कसे वागतील?

शर्वरी ह्या प्रसंगात काय शिकेल?

सुधाकर म्हणाला त्या प्रसंगाचा ह्याच्याशी काय संबंध असेल?


वाचत रहा.

प्रेमा तुझा गंध कसा?

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all