Login

प्रेमा तुझा रंग कसा...

Deception in Love"
चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदकथा लेखन

प्रेमा तुझा रंग कसा...भाग १

©® सौ.हेमा पाटील.

" हाय"

" हॅलो"

" तुमचा लेख खूप छान होता."

"कुठला?"

"कालचा. गुलकंद कसा बनवायचा?"

" यात छान काय होते? साधी गुलकंद बनवण्याची कृती तर सांगितली होती."

" हो, पण ती किती व्यवस्थितपणे सांगितली होती. फोटोसहित प्रात्यक्षिक दाखवले होते."

" हे पहा, कामाचे बोला. माझ्यापाशी अशा फालतू गप्पांसाठी वेळ नाही. यासाठी मी मेसेंजरचा वापर करत नाही."

" तुम्हांला काय मी गुळपाड्या संघटनेचा सभासद वाटलो का?"

हे वाचल्यावर अन्वी दचकली. समोरचा माणूस कुणीतरी प्रतिष्ठित असू शकतो. तिने त्याच्या प्रोफाईलवर जाऊन चेक केले. ठीकठाक वाटत होता.

"तुम्हाला बनवायचा आहे का गुलकंद?" तिने विचारले.

" मुळीच नाही. मी गोड खात नाही. वाचताना मला तुमची लेखनाची पध्दत आवडली, म्हणून सांगितले."

" धन्यवाद सर. "

त्यानंतर दोन दिवस मेसेज आला नाही. त्यामुळे तिच्या मनातील शंका दूर झाली. खरंच कौतुक करण्यासाठी मेसेज केला असेल, असे तिला वाटले.

दोन दिवसांनी पुन्हा मेसेज आला.

"दोन दिवसांत काही लिहिले नाही?"

"नाही, बिझी होते. "

" एकदा उपवासाच्या लिंबाच्या लोणच्याची रेसिपी लिहा. मला हवी आहे. "

" करणार आहात? "

" नाही, वीणाला पाठवीन. ती करेल. तिच्या हातचे लिंबाचे लोणचे मला अजिबात आवडत नाही. माझी आई खूप छान बनवायची. तिच्यानंतर आता मला तसे लोणचे खायलाच मिळाले नाही."

" वीणा कोण? "

" माझी पत्नी."

त्यानंतर त्याने दोघांचा एकत्र असलेला फोटो तिला पाठवला. सुंदर होती त्याची पत्नी. खूप माॅडर्न वाटत होती.

आजचे बोलणे आणि तो फोटो पाहिल्यानंतर तिला तो सभ्य आहे असे वाटू लागले. अधूनमधून ती त्याच्यासोबत बोलू लागली. अवांतर गप्पाच असत. एकदा त्याने विचारले,

"तुमच्या मिस्टरांची मजा असेल नाही?"

"का? "

" तुम्ही एवढ्या सुगरण आहात. इतके छान छान पदार्थ बनवता. तुम्हाला माहित आहे, माझी आई नेहमी म्हणायची, पुरुषाच्या हृदयात शिरायचा मार्ग पोटातून जातो."

" तुमची बायको बनवत नाही का स्वयंपाक? "

"बनवते ना, पण मला खात्री आहे, तुमच्या हाताला खूप चव असेल."

अप्रत्यक्षपणे त्याने केलेले कौतुक ऐकून ती खुश झाली.

त्यानंतर ती त्याच्याशी अधिक मोकळेपणाने बोलू लागली. प्रत्येक पुरुष हा नर यादृष्टीने स्त्रीकडे पहातो असे नसते असे तिला वाटले. आजपर्यंत त्याने फक्त तिच्या गुणांचेच कौतुक केले होते. तिच्या एकाही फोटोबाबत त्याने चकार शब्द काढला नव्हता.

त्याच्याशी बोलताना आता ती स्वतःहून आपले प्राॅब्लेम त्याच्याशी शेअर करू लागली. घरात कामामुळे होणारी दमणूक, तिची कुणालाही नसणारी पर्वा, नोकरीच्या ठिकाणी होणारे वाद इत्यादी गोष्टी ती त्याच्याशी बोलू लागली.

प्रत्येक प्राॅब्लेमसाठी त्याच्याकडे सोल्युशन असायचे. तो जे काही सुचवायचा ते तिला पटायचे. असा एखादा मित्र असावा असे तिला वाटून गेले. आता ती त्याच्याशी अगदी पर्सनल विषयावरही बोलू लागली. तिला त्याचा मानसिक आधार वाटू लागला.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.


काय होते पुढे? ही सोशल मीडियावरची मैत्री टिकून रहाते की यात बदल होतो? हे जाणून घेण्यासाठी पुढील भागाकडे चला.
0

🎭 Series Post

View all