चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदकथा लेखन
जलदकथा लेखन
प्रेमा तुझा रंग कसा...
भाग २
भाग २
©® सौ.हेमा पाटील.
सोशल मिडिया वर जुळलेल्या मैत्रीबाबत आपण पहात आहोत. आता पुढे...
आज अन्वीचे आणि तिच्या नवऱ्याचे विशालचे जोरात भांडण झाले होते. त्या भांडणात त्याने तिच्या माहेरचा उद्धार केला होता, त्यामुळे अन्वी जास्त चिडली होती.
तणतणतच ती घराबाहेर पडली होती. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिने मोबाईलवर त्याचा गुड माॅर्निंगचा मेसेज पाहिला. तिने उत्तर दिले नाही. थोड्यावेळाने पुन्हा मेसेज आल्याचे समजले म्हणून तिने मोबाईलवर पाहिले. तिला वाटले नवऱ्याचा साॅरी म्हणून मेसेज आला असेल, पण त्याचाच मेसेज आला होता. "काय झाले?"
मग तिने मोबाईल हातात घेतला व विचारले,
"कुठे काय झालेय?"
यावर पलीकडून उत्तर आले,
" नक्कीच काहीतरी बिनसले आहे. सांगायचे नसेल तर सांगू नका."
हे वाचून ती ढेपाळली. मघापासून तिने स्वतःच्या भावनांना आवर घातला होता, तो बांध फुटला. तिने टाईप करून सगळे लिहिले.
ते वाचून तो म्हणाला,
"शांत व्हा आधी. रडू तर अजिबात नका. तुमचे बरोबर आहे. माहेरचे नाव मध्ये घेण्याची काहीच गरज नव्हती. आता त्यांनी साॅरी म्हटल्याशिवाय त्यांच्याशी अजिबात बोलू नका."
तिला याक्षणी त्याचा खूप आधार वाटला. ती म्हणाली,
"तुम्ही किती चांगले आहात. स्त्रियांशी किती आदराने वागता. सगळेच पुरुष असे नसतात."
यावर तो म्हणाला,
" मी योग्य तेच बोललो. कुठलाही शहाणा माणूस असाच वागतो." हे वाचून तिला वाटले,' विशाल असा असता तर? आज भांडण झाले नसते.'
मग तिने विचारले ,
"तुमचे तुमच्या पत्नीशी भांडण होते का?"
" नाही. का भांडायचे? ती तिचे बेस्ट देत असते." हे ऐकून तिला भारी वाटले. 'असेही नवरे आहेत या जगात, नाही तर आपला नवरा. आता बोलायचेच नाही त्याच्याशी.' असा तिने निश्चय केला. यावेळी त्यांचा अबोला तब्बल आठवडाभर टिकला. सासुबाई आल्या त्यामुळे नाईलाजाने तिला विशालशी बोलावे लागले, पण तिच्या मनात सूक्ष्म अढी निर्माण झाली.
मी गुरुवारी पुण्यात येणार आहे. तुमच्या ऑफिसच्या जवळच येणार आहे." त्याचा मेसेज झळकला.
" वाॅव! तुमच्याकडे वेळ आहे का? लंच ब्रेक मध्ये भेटू शकतो आपण." तिने मेसेज केला. नंतर तिला आपल्या वागण्याचे आश्चर्य वाटले. कधीही न पाहिलेल्या, भेटलेल्या व्यक्तीला आपण असे भेटायला कसे काय तयार झालो?
"मला जमेल असे वाटत नाही, पण त्यादिवशी वेळ मिळाला तर मी फोन करेन." हे वाचून तिची खात्री पटली की हा इतर पुरुषांसारखा नाही. नाही तर एखादी स्त्री स्वतःहून भेटायला येते म्हटल्यावर हुरळून गेला असता. हा जमेल की नाही म्हणतोय. तिने लगेच आपला मोबाईल नंबर सेंड केला.
त्यानंतर तिला वाॅटसअपवर एका अनोळखी नंबरवरून "हाय"आले. खाली त्याने त्याचे नाव लिहिले होते, राजन दळवी.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
काय होते पुढे? सोशल मिडियावरची मैत्री आता अधिक गहिरी होत चालली आहे. तो भेटतो का तिला? हे पाहूया पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा