Login

प्रेमा तुझा रंग कसा... भाग ३

"Deception in Love"
चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदकथा लेखन

प्रेमा तुझा रंग कसा...
भाग ३

©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, राजन पुण्यात येणार होता. चिनू भेटायची अपेक्षा व्यक्त केली आहे. एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली आहे. आता पुढे...

अन्वीला आलेला मेसेज वाचून तिने तो नंबर सेव्ह केला. आता दोघांचे बोलणे वाॅटसअपवर होऊ लागले. गुरुवारी तिने दिवसभर खूप वाट पाहिली, पण त्याचा मेसेज आला नाही. संध्याकाळी त्याचा मेसेज आला,

"साॅरी. मला वेळ मिळाला नाही." ती हिरमुसली.

त्यानंतर दोघांमध्ये रोज बोलणे होऊ लागले. एखाद्या दिवशी उत्तर द्यायला उशीर झाला तर ती बेचैन होऊ लागली. त्यानंतर पंधरा दिवसांनी त्याने पुन्हा एकदा पुण्यात येणार आहे हे सांगितले. आता दोघांमधील औपचारिकता संपून दोघे अरे-तुरे वर आले होते.

"यावेळी नक्की थोडा वेळ काढ. आपण नक्की भेटायचे." अन्वीने हट्टच धरला.

" खरं तर अवघड आहे, पण बघतो." राजन म्हणाला.

गुरुवारी अन्वी ठेवणीतला ड्रेस घालून छान तयार होऊन ऑफिसला गेली. लंच ब्रेकमध्ये ती त्याला भेटणार होती. त्याच्यासाठी तिने उपवासाचे लिंबाचे लोणचे पॅक करून आणले होते. खाण्यासाठी अळूवडी आणि ढोकळा बनवून आणला होता.

त्याचा मेसेज आला,

"पंधरा मिनिटांत गोल्डन कॅफेमध्ये ये."

तिने पटकन आवरले आणि ती ऑफिसमधून बाहेर पडली. गोल्डन कॅफेच्या बाहेरच तो उभा होता. फोटो पाहिल्यामुळे तिने त्याला लगेच ओळखले. दोघे आत गेले. त्याने विचारले,

"काय घेणार?"

ती म्हणाली,

" सॅन्डविच."

त्याने दोन इटालियन सॅन्डविच मागवले. तोपर्यंत तिने ढोकळ्याचा डबा काढला व त्याच्या पुढ्यात सरकवला. त्याने एक घास खाल्ला आणि म्हणाला,

"अमेझिंग ! तू बनवलाय?"

तिने होकारार्थी मान हलवली.

" बघ, मी म्हणालो होतो की तुझ्या हाताला खूप चव असेल."

ती त्याचे बारकाईने निरीक्षण करत होती. गव्हाळ वर्ण होता त्याचा. फोटोत दिसत होता त्यापेक्षा आकर्षक होता, फक्त डोक्यावरचे केस थोडेसे विरळ झाले होते. त्याने तिच्याकडे पाहिले, पण ती नजर तिला बोचली नाही. स्त्रियांचा सिक्स्थ सेन्स जागृत असतो. पुरुषांची नजर शरीरावर कुठे फिरते, कुठे स्थिरावते हे त्यांना बरोबर कळते. तशी वासना तिला त्याच्या नजरेत दिसली नाही, आणि ती त्याच्या प्रेमातच पडली.

असा पुरूष आपल्या आयुष्यात आला याचा तिला आनंद झाला. आता ती त्याच्याशी अधिक मोकळेपणाने बोलू लागली. महिन्यातून दोनदा त्याला पुण्याच्या कंपनीत यावे लागते हे तिला समजले. जमेल तसे दोघे भेटू लागले. प्रत्येक भेटीत ती मनाने त्याच्या जवळ येऊ लागली. आता नवऱ्याच्या कुचकट बोलण्याचा तिला त्रास होईनासा झाला.

एका गुरुवारी तिने त्याला आपल्या घरी जेवायला येण्याचे आमंत्रण दिले. तो म्हणाला,

"नको. कुणी पाहिले तर तुला प्राॅब्लेम होईल. अर्थात तुझ्या हातचे सुग्रास जेवण जेवण्याच्या मोह मला होतोय, पण नको. मला तुला अडचणीत आणायचे नाही." यावर तिने त्याला " मग मी डबा आणू का?" विचारले.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

काय उत्तर दिले त्याने? की तो आढेवेढे घेत तिच्या घरी यायला तयार झाला? हे पाहूया पुढील भागात....

0

🎭 Series Post

View all