चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
जलदकथा लेखन
जलदकथा लेखन
प्रेमा तुझा रंग कसा...
भाग ४
भाग ४
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, अन्वी आणि राजन यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. अन्वीने जेवायला घरी बोलावले. त्याने नकार दिला. डबा आणू का असे अन्वीने विचारले. आता पुढे...
"ठीक आहे, आण डबा. तुझ्या हातच्या सुग्रास जेवणाला कोण नकार देईल? पण कॅफेमध्ये नको आणू. मी ज्या हाॅटेलमध्ये उतरलोय तिथे येशील का? कॅफेमध्ये निवांतपणे तुझ्या हातच्या जेवणाचा आस्वाद घेता येणार नाही."
ती थोडी विचारात पडली. तो आपल्या घरी आला काय आणि आपण तिकडे गेलो काय, सारखेच आहे. आता ती त्याच्या प्रेमात अखंड बुडाली होती. तो जगातील सर्वोत्तम पुरुष आहे असे तिला वाटत होते. तिने होकार दिला.
पुढच्या गुरूवारी तिने पुरणपोळीचा घाट घातला. नवऱ्याने विचारले,
"आज पुरणपोळी? काय विशेष?"
"मैत्रिणीचा वाढदिवस आहे. तिच्यासाठी करून नेतेय." खोटे बोलताना ती जरा अडखळली, पण नवऱ्याच्या लक्षात आले नाही.
व्यवस्थित डबा पॅक करून छान तयार होऊन ती त्याने दिलेल्या पत्त्यावर गेली. तिने आज सुट्टी टाकली होती. तिथे गेल्यावर त्याने तिचे स्वागत केले. थोडावेळ गप्पा मारल्या. मग तिने जेवायला घेतले. तिच्या हाताच्या जेवणाची त्याने तोंड फाटेपर्यंत स्तुती केली. ती अधिकच हुरळून गेली.
जेवण झाल्यावर तो म्हणाला,
"एक विनंती होती."
"काय? बोल ना."
"तुझा हात हातात घ्यायचा आहे. ज्या हातांनी तू एवढे स्वादिष्ट जेवण बनवले त्यांचे आभार मानायचे आहेत."
तिने विश्वासाने हात पुढे केले. त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले. त्यावरून हळुवारपणे बोटे फिरवली. त्यानंतर ते हात आपल्या तोंडापाशी नेऊन त्यांचे चुंबन घेतले व त्यांना थॅंक यू म्हणाला. ती आश्चर्याने पाहू लागली. आजवर अशा पद्धतीने तिच्या जेवणाचे कुणीच कौतुक केले नव्हते, तिच्या नवऱ्याने पण नाही.
त्यानंतर बराच वेळ तिचे हात त्याच्या हातातच होते. दोघेही तशाच अवस्थेत बराच वेळ उभे होते. आता तिचा संयम सुटला व तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवले. त्याने हळूवार हाताने तिच्या डोक्यावर थोपटले व तो म्हणाला,
"काय झाले?"
"आजपर्यंत फक्त बोलणीच खात आलेय. असे कौतुक कधी वाट्यालाच आले नाही. तू किती चांगला आहेस!" तिचे डोळे भरुन आले होते. त्याने हनुवटीला धरून तिचा चेहरा वर उचलला व तिचे डोळे पुसत तो म्हणाला,
"कधीच रडायचे नाही. मी कायम तुझ्या सोबत आहे." हे ऐकून ती त्याला अधिकच बिलगली. त्यानेही तिला जवळ घेतले व तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. लोणी विस्तवाजवळ गेले की पाघळते असे म्हणतात, पण इथे लोण्यानेच अशी परिस्थिती निर्माण केली होती की, विस्तव चालून आपोआप लोण्याजवळ आला होता. त्याला अपेक्षित होते ते सगळे जेव्हा उरकले तेव्हा क्षणभर त्याच्या डोळ्यात आपला उद्देश सफल झाल्याची भावना चमकून गेली.
चार दिवसांनी एका अनोळखी नंबरवरून अन्वीला वाॅटसअपवर मेसेज आला.
"आपल्याशी बोलायचे आहे."
"कोण आहात तुम्ही?"
" मी वीणा. राजनची बायको." अन्वी सटपटलीच.
" मी तुम्हाला ओळखत नाही." अन्वीने टाळण्याचा प्रयत्न केला.
" हो, पण माझ्या नवऱ्याला ओळखता."
आता आणखी काही बोलण्यात अर्थ नव्हता. तिने विचारले,
"बोला, काय काम आहे?"
"ते उपवासाचे लोणचे कसे बनवले होते?" अन्वीच्या जीवात जीव आला. ती म्हणाली,
" ते होय? आवडले का तुम्हाला? रेसिपी पाठवते."
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
काय होईल पुढे? अन्वी नको ते करून बसली आहे. आता आणखी वाहवत जाईल की चूक लक्षात येऊन सावरेल स्वतःला? वीणाचा फोन करण्यामागे काय उद्देश आहे? पाहूया पुढच्या भागात...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा