Login

प्रेमा तुझा रंग कसा... भाग ५

"Deception in Love"
चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदकथा लेखन

प्रेमा तुझा रंग कसा...
भाग ५

©® सौ.हेमा पाटील.

अन्वीला वीणाचा मेसेज येतो. मी राजनची पत्नी आहे अशी ओळख सा़ंगून ती अन्वीला लोणच्याची रेसिपी विचारते. अन्वी सटपटते. आता पुढे...


" फक्त लोणच्याची रेसिपी नको आहे मला. दुसऱ्या बाईचा नवरा आपलासा कसा करायचा याच्या नोटस् ही हव्या आहेत." आता मात्र अन्वीला दरदरून घाम फुटला. तिने काहीच उत्तर दिले नाही. मोबाईल स्वीच ऑफ केला आणि घटाघटा पाणी पिले.

मोबाईल कायमचा बंद करणे तर शक्य नव्हते. थोड्यावेळाने तिने मोबाईल सुरू केला तर त्या नंबरवरून खूप सारे मेसेजेस येऊन पडले होते. त्यात पैशाची मागणी केली होती. पैसे दिले नाहीत तर तुमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी पण दिली होती. आता काय करायचे असा तिच्यासमोर प्रश्न पडला. ती भीतीने थरथरत होती.

तिची ही अवस्था मीनूच्या लक्षात आली. मीनू उठून तिच्याजवळ आली.

"काय झाले आहे? एवढी का घाबरली आहेस?" याक्षणी तिला बुडत्याला काठीचा आधार वाटला. दोघीजणी कॅ़टीनमध्ये गेल्या. तिने मिनूला अथपासून अंतापर्यंत सगळे सांगितले. ते ऐकून मीनू म्हणाली,

"अशी कशी वाहवत गेलीस?"

"तसा नव्हता वाटला गं तो. त्याच्या डोळ्यात कधीच वासना दिसली नाही मला."

" तो सापळा होता तुला फसवण्यासाठी रचलेला. सोज्वळतेचा मुखवटा चढवला होता त्याने. असे सोज्वळ पुरूष असतात, नाही असे नाही, पण हा नव्हता. त्याने तुला घरी येणे टाळून रूमवर बोलावले तेव्हा तुला शंका यायला हवी होती."

" तोपर्यंत मी त्याच्या चांगुलपणावर फिदा झाले होते. डोळे झाकून मी त्याच्यावर विश्वास ठेवला." असे म्हणून अन्वी रडू लागली.

तिचे सांत्वन करत मिनू म्हणाली,

"काळजी करू नकोस. माझे मिस्टर पोलिस निरीक्षक आहेत. मी त्यांच्या कानावर हे घालते. ते दोन्ही नंबर आणि त्याच्यावरचे चॅट मला पाठव. ते नक्की तुला यातून बाहेर काढतील.

आपला नवरा जरी भांडला तरी तोच आपला असतो. असे पळत्याच्या मागे धावायचे नसते. त्याच्यात आणि तुझ्या नवऱ्यात वेगळेपण काय आहे? पुरुषाकडे जे जे असायला हवे ते ते तुझ्या नवऱ्याकडे आहेच की.

एक गोष्ट सांगते, आपण बायका ना भावनिकदृष्ट्या प्रेम करतो पुरूषावर. आपण मनाने गुंततो. पुरूष मात्र मनाने गुंतत नाही. त्याचे आकर्षण शरीराभोवती असते. हे दोघांमधील बदल नैसर्गिक आहेत. यात आपण बदल करू शकत नाही. क्वचितच बायकोचे मन जाणणारे संवेदनशील नवरे असतात, पण हाताच्या बोटावर मोजावे इतकेच. त्यामुळे आपण माझ्या हृदयीच्या भावना त्याने जाणाव्या ही अपेक्षा त्याच्याकडून ठेवतो तिथेच चुकतो. तो जसा आहे तसेच त्याला स्वीकारले पाहिजे." हे ऐकून अन्वी अंतर्मुख झाली.

चार दिवसांनी मीनू तिला घेऊन कॅन्टीनमध्ये गेली. तिथे तिने जे सांगितले ते ऐकून तिचा कानावर विश्वास बसेना. हा जो राजन होता त्याचे खरे नाव वेगळेच होते. फेसबुकवर त्याचे वेगवेगळ्या नावाने अनेक अकाऊंट होते. त्याचे लग्न झाले नव्हते. वीणा या नावाने मेसेज आले, ते त्याचेच मोबाईल सिम कार्ड होते. त्याला पोलिसांनी पकडले होते. याआधीही त्याच्याविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या होत्या. आत्ता तो सापडला होता.

"महिलांशी सभ्यपणे बोलून त्यांचे मन जिंकायचे आणि मग त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे असा त्याचा धंदा होता. काळजी करू नकोस. आता तो तुझे काहीच बिघडवू शकत नाही. इथून पुढे मात्र पुन्हा अशी कुठल्या सापळ्यात अडकू नकोस." अन्वीने तिचे, तिच्या यजमानांचे आभार मानले आणि निःश्वास सोडला. एका मोठ्या संकटातून तिची सुटका झाली होती.
समाप्त.
©® सौ.हेमा पाटील.

कथा कशी वाटली हे कमेंट्स द्वारे नक्की सांगा ही वाचकांना विनंती.