Login

प्रेमाचा चकवा भाग - १

सध्याच्या तरुणाईमध्ये प्रेमाची परिभाषा बदलत चालली आहे. प्रेम म्हणजे फक्त शारीरिक जवळीकता असं वाटतं आणि अशातच अनेक मुली मुलांच्या खोट्या आमिषाला बळी पडतात. ही कथा अशाच एका मुलीची आहे जी मुलाच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली.
प्रेमाचा चकवा भाग १

विषय:- कथामालिका



‌निशाला कळायला लागल्यापासून तिने एकाच मुलावर जीवापाड प्रेम केले, तो म्हणजे नितीन. शाळेत असताना तो दिसावा अशाच ठिकाणी ती बसायची, तिचं हे प्रेम तिने तिच्या ताई आणि आजीसोबत शेअर केलं होतं. ताई आणि आजी तिच्या बेस्टफ्रेंड होत्या. निशाने आपल्या भावना नितीनसमोर मांडल्या नव्हत्या, ती कधी त्याच्यासमोर तो प्रेम व्यक्त करू शकली नाही.



शाळा संपली, आता दोघे कॉलेजमध्ये गेले. निशाने नितीन ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तिथेच तिने पण प्रवेश घेतला. तिचे त्याच्यावरचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच होते पण त्याला त्याची भनक नव्हती. तो तिला कधी भावच देत नव्हता. निशाला आता आपल्या भावना दाबून ठेवणे कठीण जात होते म्हणून तिने सगळा धीर एकवटून त्याला प्रपोज करायचं ठरवलं आणि हिंमत करून  कॉलेज सुटल्यावर त्याच्याकडे गेली.



 "नितीन मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे." निशा नितीनजवळ जात थोडी अडखळत त्याला म्हणाली.

 "हा बोल लवकर, मला जायचं आहे घरी." 
नितीन त्याची बॅग सावरत म्हणाला.



 "नितीन ते.... ते तिने डोळे बंद केले 



माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे नितीनssss." ती असं एका दमात बोलून गेली.


तिने डोळे उघडले तर नितीनचा चेहरा निर्विकार होता.



 "माफ कर पण मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही." नितीन रुक्षपणे म्हणाला.

तिला हे ऐकून आत काहीतरी जोरात तुटल्यासारखं वाटलं. इतक्या दिवसापासून ज्याचे स्वप्न ती बघत होती ते चकनाचुर झाले त्याच्या एका वाक्याने!



 "पण का ? मी इतकी वाईट आहे काय?" ती पूर्ण रडकुंडीला आली होती.



  "नाही, तू वाईट नाही पण तुला तर माहीतीच आहे माझे बाबा मी लहान असतानाच वारले. माझं आणि आईचा सांभाळ माझे मामा करत आहेत. आम्ही त्यांच्याकडे आश्रित आहोत, म्हणून मला ह्या गोष्टीसाठी वेळ नाही. मी तर परीक्षा झाली की कॉलेज सोडणार आहे, मला काम करायचं आहे, असं कुठपर्यंत मामावर ओझं राहू, तर प्लिज तू समजून जा." 

असं म्हणून तो तिथून निघून गेला, ती तो गेलेल्या दिशेने सुन्न होऊन बघत होती.


घरी येऊन तिची नुसती रडारड सुरू होती. ताई आणि आजीला काही समजायला मार्ग नव्हता, ती काही न बोलता फक्त रडत होती. आई बाबा बाहेर गावी गेले होते त्यामुळे घरी ह्या तिघीच होत्या.



"निशू... काय झालं सांगणार आहेस का आम्हाला की नुसती रडतच राहणार आहे आता?" ताई तिला रडताना बघून अस्वस्थ होऊन तिला विचारू लागली.



 "ताई त्याने मला नकार दिला ग! मी नाही राहु शकत ग त्याच्याशिवाय. मी त्याच्याशिवाय आयुषयाचा विचारचं नाही करू शकत. मी स्वतःलाच संपवून टाकते त्यापेक्षा. काय कमी आहे ग माझ्यात आणि माझ्या प्रेमात जो तो मला धुत्कारून गेला, सांग ना? मला आता एकचं पर्याय दिसतो आहे तो म्हणजे मी माझे आयुष्य संपवून टाकते."



तिच्या या वाक्यावर तिच्या ताईने तिच्या थोबाडीत लगावली.



 "व्वा ग व्वा!  काय विचार आहेत तुझे! एका मुलाने नकार दिला म्हणून लगेच मरायला निघाली. ज्याच्यासोबत काही वर्षाची ओळख, ज्याला तुझी, तुझ्या प्रेमाची कदर नाही त्याच्यासाठी आपला अनमोल जीव द्यायचा विचार करू लागली. आमचा विचार नाही का आला तुला आधी? ती आईं जी तुला नऊ महिने उदरात वाढवले, जन्म देताना तेवढ्या कळा सोसल्या, तिचा विचार नाही आला? बाबा, मी, आजी तुझ्यावर इतके प्रेम करतो, त्या तुझ्या प्रेमाच्या व्यक्तींचा विचार नाही आला? आणि ज्याने कशाचाही विचार न करता तुला नाकारलं त्याच्यासाठी जीव द्यायला निघाली? ज्यावर त्याचा नाही तर तुझ्या ह्या सगळ्या प्रेमळ लोकांचा हक्क आहे. खबरदार यापुढे मरण्याची भाषा केली तर." ताई रागारागात बोलत होती.



" ताई माफ कर मला, मी चुकीचा विचार केला." असं म्हणून ती ताईच्या कुशीत शिरली.


ताईने पण तिला प्रेमाने जवळ घेतले आणि ती पण रडू लागली.



"शांत हो पिल्लु, होईल सगळं नीट, थोडा वेळ जाऊ दे हुः" ताई तिला समजावण्याच्या सुरात म्हणाली.



"होsss" तिचं रडणं कमी झालं पण मुसमुसणे सुरूचं होते.







           **********************





ताईच्या समजवल्याने निशा थोडी सावरली होती पण इतक्या दिवसाचे प्रेम असंच कसं विसरणार ना! ती अजूनही रोज त्याच्याकडे बघत होती पण तो लक्ष देत नव्हता.



दिवसामागून दिवस गेले, त्यांची परीक्षा पण झाली. आता नितीन आपल्याला दिसणार नाही म्हणून निशा थोडी हिरमुसली होती.



उन्हाळ्याचे दिवस सुरू होते, तिच्या ताईचे पण लग्न झाले. प्रेम विवाह होते तिचे. निशाने लग्नासाठी ताईला खूप मदत केली होती. त्यांचे पाच वर्षापासून प्रेम संबंध होते. ते दोघेही तिथच राहत होते, निशाचे भाऊजी घरजावई झाले. 



नितीनचे मामा काही श्रीमंत असामी नव्हते त्यामुळे त्यांनी कसतरी जुगाड करून नितीनला मेन रोडवर मोक्याची जागा बघुन पान शॉप टाकून दिले. योगायोग हा की तो दुकान निशाच्या घराच्या जवळ होते.



निशा एकदा अशीच आजीसोबत मार्केट गेली असता परत येताना तिची सहज लक्ष नितीनच्या दुकानाकडे गेली. तिला नितीन दिसताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर ती रोज त्याच्या दुकानासमोर काही तरी निमित्त काढून जायची, बस त्याला एक नजर बघायला पण तो तिला बघूनही न बघितल्यासारखा करायचा. निशाचे आता हे रोजचे झाले. ती त्याला दिवसातून दोनदा तरी बघायची.



अशात एक वर्ष उलटले.







         ******************





दिवसामागून दिवस जात होते पण निशा नितीनने नकार दिला तरी त्याच्यावर अतोनात प्रेम करत होती.


वाढत्या वयानुसार नितीनच्या इच्छा जागृत होऊ लागल्या. त्याला पण वाटू लागलं की आपल्याला आयुष्यात अशी व्यक्ती असावी जी त्याची गरज भागवेल.



एके दिवशी निशा त्याच्या दुकानासमोरून जात असताना त्याचे लक्ष तिच्याकडे गेले, यावेळेस त्याची नजर तिच्या शरीरावर रेंगाळली. त्याने वरुन खालपर्यंत तिला बघितले आणि काही तरी विचार त्याच्या मनात आले.


तो तिच्याकडे बघून गोड हसला. निशाला आश्चर्य वाटले, त्याने पहिल्यांदा तिला स्माईल दिली म्हणून पण त्यापेक्षा जास्त आनंद झाला. ती खुशीतच घरी गेली गाणं गुणगुणत-



'आज मैं उपर, आसमा नीचे
आज मैं आगे जमाना है पीछे'



तिला इतक खुश बघुन तिची ताई तिच्याजवळ आली.



"काय गं निशु, आज इतकी खुश का?" ताईने तिला खूश बघुन विचारले.



"काही नाही गं ताई, सहजचं." ती म्हणाली.



ती नितीनची स्माईल आठवून गालातल्या गालात हसत होती.



इकडे नितीन निशाचा नंबर मिळवण्यासाठी धडपडत होता. तीचे भाऊजी त्याच्या दुकानात रोज यायचे पण त्यांच्याकडून नंबर घेणे त्याला योग्य वाटले नाही. त्याने कॉलेजमधून तिच्या एका मैत्रिणीकडून तिचा नंबर मिळवला आणि दुकानात कुणी नसतांना त्याने तिला कॉल केला.



" हॅलोsss" फोन उचलताच निशा म्हणाली.



"हाय, मी नितीन." नितीन म्हणाला. नितीनचे नाव ऐकून तिला तिच्या कानावर विश्वास होत नव्हता.



 "हॅलो निशा ऐकते आहेस ना?" तिने काही प्रत्युत्तर दिले नाही म्हणून त्याने विचारले. त्याच्या आवाजाने ती भानावर आली.



"हा...हा.. बोल ना." ती कशीबशी बोलली.



" मला तुला काहीतरी सांगायचं आहे." नितीन म्हणाला.



" हा सांग!"  तिला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.



" माझं तुझ्यावर प्रेम आहे निशा." तो एका दमात बोलून गेला.



" काय?" निशाला जबरदस्त शॉक बसला. तिला विश्वास बसत नव्हता.

"हो ग खरंच! मला कळून चुकलं की तूझ्या एवढं प्रेम मला कुणीच करू शकत नाही. मी पण हळूहळू तुझ्याकडे झुकत गेलो आणि आता जाणीव झाली की माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर." नितीन तिला सांगू लागला.



"खरंच ?" तिचे डोळे पाणावले होते.



 "हो ना!" तो म्हणाला.



"थँक्यू नितिन, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे." तिने फोनवर ओठ टेकवले.



"बस फोनवरच किस देणार?" तो मिश्कीलपणे हसत म्हणाला.



"इश्श ! " ती लाजून चूर झाली.



"बरं एक सांग, आपण आता भेटायचं कधी?" त्याने विचारले.



" तू सांग कधी ते?" तिने त्यालाच विचारले.



"आता भेटूया का बाहेर? गिऱ्हाईक पण नाही आता दुकानात." तो आजूबाजूला बघत म्हणाला.



" नाही नको, आता नको. आई बाबा बाहेर गावी गेले आहेत, आता नाही जमणार."



ते ऐकुन नितिनचे डोळे चमकले.



 "ठिक आहे, रात्री गेट उघडून ठेव आणि जागी रहा, मी दुकान बंद झालं की येतो." नितीन गूढ भावाने म्हणाला.



"काही काय? ताई भाऊजी आहेत, आजी आहे." निशा चकित होऊन म्हणाली.



"आजीचं सोड, ताई भाऊजीचं काय करायचं ते मी बघतो, फक्त तू जागी रहा, मी फोन करेन." नितीन म्हणाला.



"ठिक आहे." निशाला काही समजले नाही.



थोडं इकडं- तिकडचे बोलून त्यांनी फोन ठेवला. फोन ठेवून झाल्यावर निशा ताईकडे गेली.



"ताई.. ताई ..ताई... ताई मी आज खूप खुश आहे." ती ताईला गोल गोल फिरवत होती.



"हो.. हो, काय झालं इतकं खुश व्हायला?" ताईने तिला इतक्या आनंदात बघून विचारले.



"ताई, नितिनने होकार दिला आज." तिने खूश होत सांगितले.



"अरे व्वा! मज्जा आहे एका मुलीची, ताईने तिला चिडवलं. आता लवकर लग्नाचा मुहूर्त काढावा लागेल." ताई म्हणाली.



"ताई तू ना! आम्ही नाही जा बाबा." निशा लाजत तिथून निघून गेली, ताई तिला हसत होती.





नितिन निशाच्या भाऊजीची वाट बघत बसला होता. थोड्या वेळाने ते आले, थोडं इकड तिकडचं बोलून नितिनने विषयात हात घातला.

"दादा ते निशा आणि माझं प्रेम आहे रे एकमेकांवर, तुला माहीतच असेल ना?" त्याने निशाच्या भाऊजीला विचारले.



"हो निशाने सांगितले." भाऊजी म्हणाले.



"मग तर सोपंच झालं, मी काय म्हणतो, मी आज रात्र घरी येत आहे." नितीन म्हणाला.



"कशाला?" ते भुवई उंचावून विचारत होते.



"ते.... ते... ते आपल.." त्याला शब्द सुचत नव्हते.



" मज्जा करायला?" त्याने हळूच त्याच्या कानात म्हटले.



नितिन आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघत होता.



" कर कर, मी पण लग्नाआधी तिच्या बहिणीसोबत खूपदा केली आहे मज्जा." भाऊजी त्याला डोळा मारत म्हणाले.


"पण अस सहज नाही ह! तुला मदत करण्याचा मोबदला हवा मला."



"हो हे घे." असं म्हणून त्याने दारूची एक छोटी बॉटल भाऊजींच्या हातात कोंबली.



भाऊजी खुशीत तिथून निघून गेले, त्यांनी निशाच्या बहिणीला पटवले.



नितिन तर आतुरतेने रात्रीची वाट बघू लागला. एक एक गिऱ्हाईक कमी होऊ लागले तशी नितिनची अधीरता वाढू लागली. एकदाचा रस्ता सामसूम झाला आणि त्याने दुकान बंद केले आणि निशाच्या घराकडे आपले पाऊल झपाझप टाकू लागला. घराजवळ आल्यानंतर त्याने निशाला कॉल केला.



तिने हळूच दरवाजा उघडला आणि त्याला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. गेल्या गेल्या त्यांनी मिठी मारली. नंतर बेडवर बसून गप्पा मारू लागले.



थोडा वेळ नितिन शांत होता पण हळूहळू त्याचा हात तिच्या शरीरावर फिरू लागला. पहिल्यांदा पुरुषी स्पर्श होत असल्याने तेही आवडत्या व्यक्तीचा निशाच्या पण भावना उफाळून येत होत्या. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने तिच्या रोमरोमामध्ये करंट वाहू लागला.



थोड्या वेळाने त्यांचे बोलणे बंद झाले आणि फक्त त्याचा हात फिरत होता. निशा त्याने आणखी उत्तेजित झाली आणि तिने स्वःताला त्याच्या स्वाधीन केले. पहाट होईपर्यंत नितिनने निशाचा उपभोग घेतला आणि थोडं अंधार असताना कुणाला दिसू नये म्हणून तो सटकला.



इकडे निशा रात्र आठवून गालातल्या गालात हसत होती. मनाने तर एक झालो आहोत, आज शरीराने पण एकरूप झालो. आता लवकरच लग्न करू, या विचारात ती त्यांच्या सुखी संसाराचे स्वप्न रंगवत झोपी गेली पण ती नितीनच्या कारस्थानपासून पूर्णतः अनभिज्ञ होती.


क्रमशः