प्रेमाचा चकवा भाग - ६
विषय- कथामालिका
निशाच्या लग्नाला आता एक महिना उलटून गेला. आता तिची तब्येत पूर्णतः बरी झाली होती. त्यात नितिन तिला रोज भेटायला बोलावू लागला. त्याने तिच्या घराजवळ एक अशी जागा बघितली होती जिथे रात्रीला निर्मनुष्य असतात आणि लाइट्स पण नसतात. त्यामुळे आता तिला तो रोज रात्री तिकडे फिरायच्या बहाण्याने यायला सांगायचा जेणेकरून त्याला त्याचं काम करता येईल. तिने काही आढेवेढे घेतले तर तो तिला इमोशनल ब्लॅकमेल करायचा.
रोजचे भेटणे असल्याने तिला रोज गोळ्या खाव्या लागत होत्या. बाबाला मात्र एक महिना उलटून गेल्यानंतरही जावई मुलीला न्यायला आले नाही म्हणून टेन्शन आले होते.
त्यांनी अतुलला कॉल केला.
"हॅलो जावई बापू, कसे आहात?" बाबांनी विचारले.
" मी ठीक आहे." अतुल म्हणाला.
" जरा बोलायचं होतं." बाबा थोडे कचरत म्हणाले.
"बोला ना!" तो म्हणाला.
" ते म्हणजे.. आता तुमच्या लग्नाला एक महिना उलटला हो आणि निशाची तब्येत पण आता स्थिरावली आहे.
तर तुम्हाला कधी जमणार यायला ते विचारायचं होतं." बाबांनी विचारले.
तर तुम्हाला कधी जमणार यायला ते विचारायचं होतं." बाबांनी विचारले.
" मामांजी, खरं सांगू तर मला वेळचं मिळत नाही हो, पुन्हा काही दिवस मी शाळेच्या कामानिमित्त बाहेरगावी जाणार आहे, मी कळवतो ना तुम्हाला यायच्या आधी तसं." तो दिलगिरी व्यक्त करू लागला.
" ठीक आहे, चालेल." बाबांनी एक उसासा सोडून फोन ठेवून दिला.
निशा घरी असल्यापासून नितिनने दिलेलं मंगळसूत्र वापरायची. या एका महिन्यात अतुलने एकदा पण तिची विचारपूस केली नाही आणि तिलासुद्धा फरक पडत नव्हता. ना तिने त्याला कॉल केला. तिच्यावर फक्त नितीनच्या प्रेमाचा अंमल चढला होता.
एकाचे दोन महिने होऊन गेले तरी अतुल काही निशाला घ्यायला गेला नाही. निशा आणि नितीनच्या भेटीगाठी रोज व्हायच्या.
दोन महिने उलटून गेले तरी निशा माहेरी असल्याने आता शेजारी पाजारी पण कुजबुज करू लागले.
असंच एक दिवस बाबा घरी येतांना त्यांच्या कानावर स्त्रियांचे शब्द ऐकू आले-
" अहो ही निशा लग्न झालं तेव्हांपासून माहेरीचं दिसते ना?" एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला म्हणाली.
" हो ना ग, काय माहिती लग्नाच्या दुसऱ्याचं दिवशी नवऱ्याने टाकून दिली की काय?" दुसरी स्त्री.
" हो ना, मला पण तसंच वाटतं." पहिली स्त्री.
" असेल बाई काही घोळ मुलीमध्ये म्हणूनच तर असं एका दिवसात टाकून दिली." दुसरी स्त्री.
" असेलच की, तशीही ती खूप चंचल दिसते. मोठी बहीण पण सारखीच ना." पहिली स्त्री.
" हो ना, आई वडिलांचे संस्कार नाहीत त्यांना, मुलींना असं बेलगाम सोडलं आहे तर असं होणारच ना!" दुसरी स्त्री.
"हो ना, मुली कुठं जाऊन शेण खातात ते बघायला नको?" पहिली स्त्री.
" असू दे ग! आपलं काय जातंय? चल आपण आपल्या कामाला जाऊ." दुसरी स्त्री.
" हो हो चल." पहिली स्त्री.
त्या दोघी स्त्रिया निघून गेल्या पण निशाच्या बाबाच्या काळजाला चिरून गेल्या. त्यांनी घरी आल्यानंतर अतुलला कॉल केला पण नंबर नॉट रीचेबल येत होता.
बाबा थोडे अस्वस्थ झाले. काय करावं त्यांना काही सुचत नव्हते, त्यांना तसं विचार करतांना बघून आई तिथे आली.
"काय हो, कसला विचार करीत आहात? तब्येत तर बरी आहे ना?" आईने काळजीने विचारले.
" मला निशाची काळजी वाटते ग!"
"ते तर मला पण वाटते आहे." आई म्हणाली.
"दोन महिने उलटून गेले, जावयाचा पत्ता नाही त्यात आता फोन पण लागेना, काय करावं काही कळत नाही, त्यात आता शेजारी पाजारी पण नको नको ते बोलतात." बाबा हताशपणे म्हणाले.
"तुम्ही त्यांच्या घरी जाऊन बघा ना, समोरासमोर बोलून विचारून बघा, का बरं अजूनही आले नाहीत ते निशाला घ्यायला? घरी बसून इथूनचं तर्क लावण्यात अर्थ नाही." आईने सुचवले.
" बरोबर आहे तुझं, मी उद्या जाऊन बघतो नेमकी भानगड काय आहे?" बाबा म्हणाले.
"ठीक आहे, आता जेवायला चला, जास्त विचार करू नका. सगळं ठीक होणार." आई त्यांना धीर देत म्हणाली.
"हम्म्म.." बाबा हुंकारले.
दोघे जेवायला गेले.
**********************
सकाळी सकाळी बाबा अतुलकडे जायला निघाले. त्यांनी सकाळची न्याहारी करून लगेच बस स्टॉप गाठला. बस आली तसे ते बसमध्ये बसून अतुलच्या गावी निघाले.
ते झपझप पावले टाकत अतुलच्या घरासमोर आले. त्यांचे लक्ष गेटकडे गेले तर गेटला भले मोठे कुलूप लावले होते, त्यांनी आत डोकावून बघितले तर दरवाज्याला पण कुलूप होते.
"अरे देवा! आता काय करायचं? कुठे गेले असणार सगळे?" बाबा डोक्यावर हात मारत म्हणाले.
कुणाला तरी विचारावं म्हणून ते आजूबाजूला बघू लागले.
वाटेत त्यांना कुणीच दिसले नाही, थोड्या अंतरावर एक घर होतं. त्यांनी त्या घराच्या दिशेने पावलं टाकली.
दरवाजा उघडा होता त्यामुळे त्यांनी बाहेरून आवाज देणे पसंत केले.
" कुणी आहे काय घरात?" बाबा आत डोकावून विचारू लागले.
"कोण ssss " आतून आवाज आला.
" अहो थोडे बोलायचे आहे, बाहेर येता काय?" बाबा म्हणाले.
थोड्या वेळात एक मध्यम वयस्कर गृहस्थ बाहेर आला.
त्याने बाबाचे पायापासून डोक्यापर्यंत निरीक्षण केले.
"बोला काय काम आहे?" त्याने विचारले.
" पलीकडे जे घर आहे, ती लोकं कुठे गेलीत काही अंदाज आहे काय तुम्हाला?" बाबांनी बाहेरच्या दिशेने त्यांच्या घराकडे बोट दाखवत विचारले.
"ते मास्तर काय?" त्याने आठवून विचारले.
" हो हो तेच." बाबा म्हणाले.
"अहो त्यांची गावातली शाळा बंद पडली म्हणून तिथल्या सगळ्या स्टाफचे समावलोकन झाले त्यात ते पण होते. गेले बघा सगळं सामान घेऊन पंधरा दिवसाआधी." त्याने माहिती पुरवली.
"काय? कुठं गेले?" बाबांना जबरदस्त शॉक बसला.
" ते नाही माहिती. तुम्ही व्याही ना त्यांचे, तुम्हाला बघितले आहे मी, तुम्हाला नाही माहिती काय?" त्या गृहस्थाने विचारले.
" नाही ते काही दिवसांपासून माझा मोबाईल खराब आहे म्हणून काही कॉन्टॅक्ट नाही." बाबा कसंनुक हसत बोलले.
"अच्छा!" तो गृहस्थ म्हणाला.
"ठीक आहे येतो मी." असं बोलून बाबा तिथून बस स्टॉपकडे जायला निघाले.
जातांना डोक्यात अनेक विचार घोळत होते. काही न सांगता निघून गेले, फोन पण लागत नाही, मुलीला घेऊन पण गेले नाही, आपण फसले तर गेलो नाही ना? तसे असेल तर आपल्या मुलीचे आता कसे होणार? आधीच लोक नको नको ते बोलायला लागले आहेत, आता कुठं शोधायचं आपण? अशा अनेक प्रश्नांनी त्यांचं डोकं भांबावून गेलं.
बस स्टॉप जवळ पोहचता पोहचता त्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली आणि ते धाडकन जमिनीवर कोसळले.
बाजूलाच असलेल्या दुकानातील लोकांनी त्यांच्याकडे धाव घेतली . त्यांना आधार देत दुकानात आणून पंख्याखाली बसवले. एकाने पाणी आणून त्यांच्या चेहऱ्यावर मारले. तेव्हा त्यांची थोडी हालचाल झाली मग एकाने त्यांना पाणी आणून दिले .
बाबांनी पाणी घटाघटा पिऊन घेतले, तेव्हा त्यांना थोडं बरं वाटलं.
" काय हो पाहुणं, बरं वाटतंय ना आता?" दुकानदाराने निशाच्या बाबाला विचारले.
"हो, मी ठीक आहे, धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे." त्यांनी सर्वांना हात जोडून त्यांचे आभार मानले.
" इथले दिसत नाही तुम्हीं, इकडे कुठे आले होते?" दुकानदाराने विचारले.
"इथे थोडं काम होतं त्यासाठी आलेलो. झालं काम आता गावाकडे निघतो." बाबा म्हणाले.
" अहो आराम करा थोडा वेळ, थोडं बरं वाटलं की जा. वाटेत आणखी भोवळ आली तर?" दुकानदार त्यांना म्हणाला.
बाबांना पण ते पटलं. त्यांनी मग थोडा वेळ तिथेच बसण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या, त्यांना शाळेतल्या लोकांबद्दल काही माहिती आहे काय याचा कानोसा घेतला पण अतुलच्या घरचे जास्त लोकांमध्ये मिसळत नसल्याने त्यांच्याविषयी कुणालाच काही माहिती नव्हती ना शाळेतल्या बाकी लोकांबद्दल.
बाबा शेवटी हताश मनाने सर्वांचा निरोप घेऊन तिथून निघाले.
क्रमशः
✍️ अश्विनी कांबळे
ठाणे विभाग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा