Login

प्रेमाचा चकवा भाग -१३

ही एक सामाजिक कथा आहे


प्रेमाचा चकवा भाग- १३

विषय- कथामालिका


ठरल्याप्रमाणे अखेर पंकजच्या घरी जायचा दिवस उजाडला. निशा व्यतिरिक्त बाकी सगळे त्यांच्याकडे जाणार होते कारण त्यांना तिथे गेल्यानंतर एक छोटासा कार्यक्रम करून लग्नाची तारीख ठरवायची होती.


घर बघायला जाणे हे फक्त निमित्त होते. तसं त्यांनी पंकजच्या घरी पूर्वकल्पना दिली होती, ते पण तयारी करत होते. पंकजची आई तर निशाला पण घेऊन यायला सांगत होती जेणेकरून तिला तिची भावी सासुरवाडी बघता येणार पण लग्नाआधी बरोबर दिसणार नाही म्हणून तिच्या बाबांनी नकार दिला. निशा रोज नितीनचा फोन ट्राय करीत होती पण व्यर्थ.


सकाळी सगळे लगबगीने तयारी करीत होते, अकराच्या सुमारास सगळे जेवण करून तयार होऊन पंकजच्या घरी जायला निघाले. ते गेले आणि निशाच्या मनात चलबिचल सुरू झाली. तिने पुन्हा एकदा नितिनला कॉल करून बघावं म्हणून मोबाईल हाती घेतला आणि नितीनला फोन लावला. यावेळेस तिच्या प्रयत्नांना यश आले, नितीनचा फोन लागला म्हणून ती खूप खुश झाली. तीन- चार रिंगमध्ये नितीनने कॉल उचलला.


"हा बोल." फोन उचलताचं नितिन म्हणाला. त्याचा आवाज ऐकून तिच्या जीवात जीव आला.


"नितीन मला तुला भेटायचं आहे, तू आहेस का दुकानात?" निशाने विचारले.


"हो आहे , रात्री भेटू ना." तो म्हणाला.


" नाही मला आताच भेटायचं आहे तेही कुणाच्या घरी नको." ती म्हणाली.


"इतकं काय महत्वाचं काम आहे जे रात्र होईपर्यंत थांबू शकत नाही तू?" त्याने जरा तिरसटपणे विचारले.


"आहे एक भेटल्यावर सांगते." ती म्हणाली.


"ठीक आहे. अर्ध्या तासात कॉलेज जवळच्या गार्डनमध्ये भेट तोपर्यंत मी गिऱ्हाईक सांभाळतो." तो काहीसा विचार करत म्हणाला.


\"ठीक आहे चालेल." ती म्हणाली आणि तिने कॉल ठेऊन दिला आणि ती तयारीला लागली.


ती खूप खुश होती. नितीन अगदी वेळेवर आला होता. आता त्याच्यासोबत लग्नाचं बोलून सगळं क्लिअर करून टाकूया असा ती विचार करू लागली. ती मनातल्या मनात त्यांच्या सुखी संसाराचे मनोरे रचत होती आणि गालातल्या गालात स्वतःशीच हसत होती.


ती काय बोलायचं? कसं बोलायचं? त्यावर नितिन कसा उत्तर देणार? माझं प्रॉब्लेम त्याच्या समोर मांडल्यावर तो नक्की आपल्याला समजून घेणार आणि चल आपण लग्न करूया असं बोलून तो आपल्याला मिठीत घेणार या कल्पनेने तिच्या अंगावर गोड शिरशिरी आली.


तिने आपल्याचं तंद्रीत तयारी केली आणि ती नितीनला भेटायला गार्डनमध्ये गेली. जातांना पण तिचं मन त्याच्याकडे झेप घेत होते. कधी एकदा तो तिला भेटतो असं तिला वाटत होतं. गार्डनमध्ये जाऊन ती नितीनची वाट बघत बसली होती.


ती वेळेआधी पोहचल्याने तो अजून आला नव्हता. ती आजूबाजूला बघत होती, दुपारची वेळ असल्याने गार्डनमध्ये कुणीच नव्हते.


पंधरा मिनिटानंतर नितिन गेटमधून आत येताना दिसला.
त्याला बघून तिची कळी खुलली, तो झपाझप पावलं टाकत तिच्याजवळ आला. ती तो जवळ येताचं  त्याला बिलगली, त्याने इकडे तिकडे बघत तिला त्याच्यापासून दूर केले.


"काय करत आहेस, कुणी पाहतील ना?  आपण कुठे आहोत याचं भान ठेव." तो थोडा वैतागून बोलला.


"सॉरी , खूप दिवसांनी तुला बघितले ना म्हणून." ती स्वतःला सावरत बोलली.


"बरं बोल , कोणतं काम होतं जो इतक्या तातडीने बोलावलंस?" त्याने डायरेक्ट मुद्यावर हात घातला.

" माझ्या घरचे माझं लग्न ठरवायला गेलेत." इतकं बोलून ती त्याच्या रिअँक्शनची वाट बघू लागली.


त्याचा चेहरा मात्र निर्विकार होता, त्याचं असं थंड रिस्पॉन्स बघून तिला आश्चर्य वाटले.


"छान झालं ना मग, तुला तुझा जोडीदार मिळतो आहे." तो बेफिकिरीने म्हणाला.


"काय? तुला वेड लागलं काय? तू हे काय बोलतो आहेस?" तिला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता, ती शॉक झाली होती.


"मला काही वेड लागलं नाही, बरोबर तेच बोलतोय." तो तुसडेपणाने म्हणाला.


"अरे पण आपलं एकमेकांवर प्रेम आहे ना मग मी कशी काय दुसऱ्यासोबत लग्न करू शकते." त्याच्या अनपेक्षित बोलण्याने ती कावरीबावरी झाली.


"जसे आधी केलेस तसे आता पण कर." तो बेफिकरीने म्हणाला.


"तू मस्करी करतो आहेस ना माझी?" ती त्याच्याकडे आशेने बघत होती.


"मला माहीत आहे तू मस्करी करीत आहेस." तिचे डोळे कोणत्याही क्षणी वाहू लागतील अशी स्थिती झाली होती.


" मी मस्करी नाही करत आहे निशा." बोलतांना तिने पकडलेला हात झटकत तो म्हणाला.


"अरे पण आपल प्रेम, त्याचं काय? तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे, आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आपल्याला लग्न करायचं आहे मग प्रॉब्लेम काय आहे? चल ना आपण लग्न करूया नितिन, चल ना. घरी काय सांगायचं ते मी बघून घेईन, चल ना रे आपण लग्न करूया." ती हट्टाला पेटली.


ती नितीनला गदागदा हलवून बोलत होती.


" मला नाही करायचं आहे तुझ्यासोबत लग्न निशा." त्याने तिचे हात झिडकारले आणि वैतागून तिच्याकडे बघू लागला.


"का नाही करायचं आहे तुला माझ्यासोबत लग्न? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर." निशाला हे सगळं अनपेक्षित होते त्यामुळे ती बिथरली होती, हे सगळं काय होत आहे हे तिला समजत नव्हते.


तिने काय विचार करून घरातून आली होती आणि इथे तर नितिन वेगळचं काहीतरी बोलत होता म्हणून ती काही समजण्याच्या पलीकडे गेली होती.


"माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं." तो ओरडून म्हणाला.


"काय? काय बोलला तू?" तिला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता.


"हेच की माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं."  यावेळेस तो थोडा मोठ्याने बोलला.


" प्रेम नव्हतं ? मग हे जे तू गेल्या तीन वर्षापासून करत आला आहे माझ्यासोबत ते काय होतं?" तिने त्याची कॉलर पकडून विचारले.


"मजा..." तो तिच्याकडे बघून मिश्किलपणे हसत म्हणाला आणि तिच्या हातून कॉलर सोडवून घेतली.


निशाला हे ऐकून तिच्या अंगावर सरसरून काटा आला.


"अरे मजा करण्यासाठी तू माझ्या भावनांशी खेळलास, माझे स्वप्न, माझ्या प्रेमाला तू पायदळी तूडवलंस, तूझ्या मजेसाठी तू माझं आयुष्य उध्वस्त केलंस, का केलंस असं तू?  का असा वागलास? तुला काहीच कसं वाटल नाही रे हे करतांना? आणि असं निर्लज्जासारखं मला सांगतांना." ती पुन्हा त्याची कॉलर पकडून बोलली.


"ए ....हे बघ, मी कुणाच्या भावनांशी खेळलो नाही, गरज तुलाही होती आणि मलाही. तुलाही मजा यायची ना म्हणूनच तू पण यायचीस." तो निर्लज्जासारखा बोलत होता.


तिला मात्र स्वतःचीचं लाज वाटली, तिचे डोळे वाहू लागले.


"मजा करायचीच होती तुला तर एखाद्या वेश्याकडे जायचं ना, तुला मीच भेटले काय? निदान माझं आयुष्य तरी खराब नसतं झालं." ती आता रागात त्याला बोलू लागली.


" वेश्याकडे गेल्यावर पैसे लागतात ना, जेव्हा फ्रीमध्ये मला जेव्हा गरज असेल तेव्हा माझ्या सोयीने सगळं मिळतं असतांना कोण जाणार ना वेश्याकडे?" तो तिला डोळा मारत बोलला.


"नितीन ssss" तिने त्याच्यावर हात उगारला पण त्याने तो हवेमध्येच पकडला.


"अजिबात प्रयत्न करायचा नाही हा, नाही तर तुला महागात पडेल.  मला ऐरागैरा समजू नकोस हा जो तू हात उगारशील आणि मी मूकाट्याने  मार खाऊन घेईल आणि तू काय स्वतःला सती सावित्री समजत आहे काय? अरे जी मुलगी पहिल्याच दिवशी माझ्या बेडवर येऊ शकते ती आणखी किती मुलांसोबत नसेल कशावरून? लग्नाआधी नवऱ्याने पण उपभोगली असेल म्हणून त्याला तुझ्यात इंटरेस्ट उरला नसेल. अशा चारित्र्यहीन मुलीसोबत लग्न करून मी आपले आयुष्य खराब करणार काय? आज तुझ्या घरचे ज्याच्या गळ्यात तुला बांधायला निघाले, तो बिचारा पश्र्चाताप करेल समोर जाऊन. मी मूर्ख नाही जो तुझ्यासारख्या चारित्र्यहीन मुलीला आपली बायको करेन.
तू माझ्यासाठी फक्त एक टिशु पेपरसारखी आहेस, युज आणि थ्रो. झालं आता वापरून आता माझ्या कुठल्या कामाची नाही तू." असं बोलून तो जायला वळला. दोन पाऊलं समोर टाकल्यावर तो पुन्हा मागे वळला.


"बाय द वे पाच दिवसाआधी माझं लग्न झालं माझ्या मामाच्या मुलीसोबत." तो छद्मीपणे हसत निघून गेला.


निशा सुन्न होऊन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहली.


ज्याला तिने आपलं सर्वस्व अर्पण केलं त्याच्या लेखी तिची किंमत एका वेश्यापेक्षा कमी होती, घरच्यांना झुगारून ज्यावर तिने अतोनात प्रेम केलं त्यानेच तिला आज चारित्र्यहीन म्हटले होते. तिच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहू लागले.


नितीनच्या शब्दांनी निशाच्या मनावर इतके घाव केले की तिचं मन त्या जखमेने रक्तबंबाळ झाले होते, कानात कुणीतरी तप्त तेल ओतावं इतके त्याचे शब्द तिला लागले होते. ती सुन्न झाली होती, इतके दिवस ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केले त्याच्यासाठी ती बस एक उपभोगाची वस्तू होती.


तिच्या डोळ्यासमोरून तीन वर्ष गेली. तिला प्रत्येक गोष्ट आठवत होती, आपण किती मोठी चूक केली, घरच्यांना आपण फसवलं. तिला त्या गोष्टीचे वाईट वाटत होते पण वेळ निघून गेली होती.


ती पाय ओढत - ताणत तिथून निघाली. तिचे डोळे अखंड वाहत होते. येणारे - जाणारे तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होते पण तिला त्याचे काहीच भान नव्हते.


ती एका जिवंत लाशेप्रमाणे चालत होती. ती कशीबशी घरी पोहचली आणि तिने दरवाजा उघडला. ती बेडरूमध्ये गेली आणि तिने दरवाजा लोटून घेतला.






इकडे पंकजच्या घरी खूप आनंदी वातावरण होते. निशाच्या घरच्यांना त्याचे घर  खूप आवडले. छोटंसं पण छान नीटनेटकं घर होतं. सगळ्या सुखसोयी होत्या.


लग्न ठरवून लगेच लग्नाची डेट काढण्यात आली. साखरपुडा लग्नामध्येच करायचं ठरलं. पंकजच्या आग्रहाखातर लग्नात जास्त तामझाम न करता मोजक्या लोकांमध्ये साध्या पद्धतीने लग्न करायचं ठरलं.

लग्न ठरलं म्हणून  पंकजच्या घरचे  त्यांना जेवण करून जायचे आग्रह करू लागले.


ताईने निशाला कॉल करून सांगावं म्हणून कॉल लावला तर ती कॉल उचलत नव्हती.


ताई नंतर स्वयंपाकाला लागली म्हणून निशाला कॉल करायचं राहून गेलं.


सायंकाळी सगळे आनंदामध्ये घरी निघून आले. मुलीचं लग्न ठरलं म्हणून आईने बाबांना तेव्हाच मंदिरात जाऊन प्रसाद चढविण्याचा हट्ट केला म्हणून आई- बाबा आणि आजी मंदिरात निघून गेले तर ताई आणि भाऊजी घरी आले. ते आले तेव्हा हॉलचा दरवाजा उघडा होता, घरात सर्वत्र अंधार पसरलेला होता.


" निशा... ए निशा..." ताईने आवाज दिला पण निशाचा काहीच रिस्पॉन्स आला नाही.


मग तिने स्विचची बटण चाचपडून पाहून लाईट लावले, भाऊजीने किचनमध्ये जाऊन किचनचे लाइट्स लावले.
ताई निशाच्या रूममध्ये गेली तर तिला तिथे पण अंधार दिसला.


तिने लाइट्स लावले तर समोरच दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली.


"निशु sss " तिने एक हंबरडा फोडला.