Login

प्रेमाचा रंग भाग 2

Premacha Rang Bhag 2


प्रेमाचा रंग -  भाग 2.



कथामालिका
ईरा राज्यस्तरीय करंडक



जान्हवीची फाईल डॉक्टरांकडे राहिली हे तिच्या बाबांना कळाले होते.
जान्हवीचे बाबा दत्ता कुलकर्णी काळजीपोटी म्हणाले," जानू, अग मी त्या डॉक्टर मल्हार कडे जातो. आणि तुझी फाइल घेऊन येतो. तू मुलाखतीची तयारी कर. जाण्यात - येण्यात तुझा वेळ जाईल, दगदग होईल. मी काय रिटायर्ड आहे माझा वेळ ही जाईल आणि नवीन ओळख ही होईल. त्यांची फाईल देऊन येतो. "

जान्हवी बाबांना म्हणाली "काही नको कशाला हवी ओळख. तेवढ्या पुरते तेवढेच बरे. अनोळखी लोकांशी संपर्क नकोच आपल्याला."

इकडे व्यस्त असून डॉक्टर जान्हवीची फाईल वेळात वेळ काढून नीट पहात होते. शिक्षण, जन्मतारीख, आवडनिवड सगळे तोंड पाठच झाले डॉक्टर साहेबांना. फाईल मध्ये पासपोर्ट फोटो बरेच होते. हळूच डॉक्टरांनी एक घेतला आणि शंभर वेळा त्याला चोरून पाहत होते. तो आता स्वतः च्या जवळ ठेवून घ्यायला हवा असा विचार केला.

डॉक्टरांच्या मनात आले की माझी फाईल घेऊन ती येईल. आणि तितक्यात कॅबीनच्या दारावर आत येऊ का? आवाज आला. डॉक्टरांनी पटकन जान्हवीचा पासपोर्ट साईझ फोटो टेबलाच्या ड्रॉवरमध्ये टाकला.


डॉक्टर - "या. या.."


जान्हवीचे बाबा एकटेच आत आले.

"डॉ. मल्हार साहेब मी आपल्याशी फोन वर आता बोललो होतो. माझ्या मुलीची फाईल आपल्या कडे आणि आपली फाईल तिच्याकडे चुकून आली होती. त्यात तिची उद्या मुलाखत आहे त्यामुळे तिला ही फाईल लागणार आहे. म्हणून तातडीने आलो."


" सर ,कुठे आहे मुलाखत , कधी आहे ? म्हणजे किती वाजता?


जान्हवीचे बाबांनी कंपनीचं नाव सांगितलं. वेळ आणि ती एच. आर.पोस्ट साठी मुलाखत देतीय हे सांगितलं.


मल्हार "अच्छा.... "

फोन वर आत कॅबीन मध्ये पाणी व दोन चहा पाठवण्याची सूचना दिली.


जान्हवीचे बाबा - नको.. नको.. कशाला उगाच, असू द्या असं म्हणत होते.


मल्हार "घ्या ना सर लांबून आला आहात. "

"आपणास कसे कळाले?"


"अहो असं काय? या फाईल मध्ये बायोडेटा मध्ये घरचा पत्ता आहे. "

" हो.. हो.. !"

दोघेही आणलेलं चहा आणि पाणी घेतात.


डॉक्टर मल्हार म्हणाले "माफ करा. तुम्हाला यावे लागले. थोड्या वेळाने लगेच सिझेरियन आहे. सर त्यामुळे मी नाही येऊ शकलो."


" मी पण निवृत्त झाल्यावर फ्री आहे. तुम्ही व्यस्त आहात. काही हरकत नाही डॉक्टर साहेब."


"अॅक्चुअली मला दुसऱ्या दवाखान्यातही मला जावे लागते. म्हणून मी.. "


" अहो काही हरकत नाही डॉक्टर साहेब. "


"सर एक सांगू का? आपण मल्हार असं एकेरी म्हणालात तरीही आवडेल मला. मी वयाने खूप लहान आहे."


"बरं .. चालेल ,हरकत नाही , चालेल. आणि
आपणही मला जान्हवीचे बाबा म्हणाले तर चालेल. "

फाइलची अदलाबदल करून व निरोप घेऊन दत्तात्रय कुलकर्णी निघाले.





जान्हवीच्या वडीलांना डॉक्टर मल्हार फाईल पाहून, व प्रत्यक्ष भेटून मनोमन आवडले होते.

डॉक्टर मल्हारांना मात्र जान्हवी सोबत न आल्याने थोडे वाईट वाटले होते.


दुसर्‍या दिवशी मुलाखतीचा दुसरा राऊंड झाल्यावर त्याच वेळी, त्याच स्टेशन वर जान्हवी भेटेल अशी आशा मल्हारला वाटली.
त्यांनी आपण त्यावेळी फ्री आहोत का लगेच चेक केले.
फ्री आहे म्हणून खुश झाले . आता कंपनी चे नावही माहीत झाले यामुळे डॉक्टर साहेब खुश झाले.


दुसर्‍या दिवशी ते त्याच वेळी स्टेशन वर पोहोचले. खूप वेळ वाट पाहिली पण जान्हवी कुलकर्णी दिसत नाही.

शेवटी आता वेळ झाली, हॉस्पिटलमध्ये निघावे लागेल या विचारात असताना पहिला पाऊस जोरदार यायला लागला.
त्याचवेळी प्लॅटफॉर्मकडे धावत आलेली, ओली झालेली जान्हवी दिसली.
अचानक जान्हवी डॉक्टर साहेबांच्या जवळच येऊन उभी राहिली.


जान्हवी टेन्शन मध्ये होती, अंधार पडायला लागला होता, त्यात पाऊस आला.
मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली. पावसात फोल्डर, सर्टीफिकेट भिजले तर काय करावे. घरी कधी पोहचणार या विचारात होती.


इकडे डॉक्टर साहेब पावसाचे आभार मानत जान्हवीकडे एकटक बघत होते.


जान्हवी ओली असल्याने थंडी वाजायला लागली. नेमकी छत्री, किंवा रेनकोट काही आणलं नाही याचा पश्चाताप झाल‍ा.

डोके भिजून सर्दी होईल की काय, या विचाराने तिने थोडेसे केस झटकले.
तेच शिंतोडे मल्हारच्या तोंडावर उडाले.

मल्हारच्या आनंदाचा पारावार राहिला नाही. त्याच्या मनात गाणे वाजायला लागते.
मल्हारचे लक्ष जान्हवीवर होते.
जोरदार धोधो पाऊस कोसळत होता अन डॉक्टर मल्हारच्या मनात मोठ्याने गाणे चालू होते.


गारवा... वार्‍यावर भिरिभर पारवा... नवा नवा...
प्रिये... नभात ही... चांदवा नवा नवा... गारवा...

गवतात गाणे झूलते कधीचे...
हिरवे किनारे हिरव्या नदीचे...
गवतात गाणे झूलते कधीचे...
हिरवे किनारे हिरव्या नदीचे...
पाण्यावर सर सर सर काजवा... नवा नवा...
प्रिये... मनात ही ताजवा... नवा नवा...

आकाश सारे माळून तारे...
आता रुपेरी झालेत वारे...
आकाश सारे माळून तारे...
आता रुपेरी झालेत वारे...
अंगभर थर थर थर नाचवा... नवा नवा...
प्रिये... तुझा जसा गोडवा... नवा नवा...



जान्हवीच्या अचानक लक्षात आले की तो माणूस तिच्याकडे बघतोय.
टक्कर झाली त्या दोन मिनिटाच्या भेटीतला चेहरा जान्हवी विसरून गेली होती. त्यावेळी जान्हवी साठी डॉक्टर मल्हार अनोळखी माणूसच होता.


शेवटी न राहून जान्हवी मल्हार च्या जवळ आली व त्याला रागावली - " काय पहात आहात तुम्ही? अनोळखी मुलींना असे पहातात का? आई, बहिण नाहीय का तुम्हाला?"


तेवढ्यात रेल्वेची सूचना आली की पुढची लोकल ,जान्हवीची गाडी 15 मिनीटे उशिरा येणार आहे.


मल्हार धीर एकवटून जान्हवीला म्हणाला - " अनोळखी? मॅडम तुम्ही मला ओळखले नाही का? आपली फाईल फोल्डर अदलाबदल झाले होती. तुमचे वडील आले होते काल."


जान्हवी म्हणते - " ओह अच्छा.... तुम्हीच का ते ?


इतक्यात जोरात वीज कडाडली व लाईट गेले. अंधार झाला म्हणून जान्हवी घाबरून गेली.

तिने पटकन मल्हारचा हात चुकून धरला. पण त्याचवेळी विजेचा लखलखाट झाला व तिने पटकन हात सोडला.

परत पाऊसाचा जोरदार आवाज यायला लागला. जान्हवी आता खूपच घाबरली .


क्रमशः


- सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®


राज्यस्तरीय कथा मालिका