प्रेमाचा रंग एक असाही भाग १०

आईचे काळीज नेहमी आपल्या मुलांसाठी धडधड करत असते. कोणत्याही परिस्थितीत ती आपल्या मुलांना कधीच एकटं सोडत नाही.
प्रेमाचा रंग एक असाही भाग १०


" काय केलं त्यांनी अभयसोबत?" अंतरा रडत असताना किशनने तिला आधार दिला. 

" ज्यावेळी त्यांना अभय आणि अक्षराच्या नात्याबद्दल कळाले तेव्हा त्यांनी आईलाच जास्त दोष दिला. नात्याचा अपमान केला तुझ्या मुलाने, नात्याने बहिण लागते त्याच बहिणीवर त्याने डोळा ठेवला. अक्षराला मुद्दाम स्वतःच्या जाळ्यात ओढले. तिला स्वतःच्या नादाला लावले त्याने असे घाणेरडे आरोप त्यांनी अभय वर लावले. आमच्या वरचे संस्कार, आमचं घराणं सगळ्यांना नावे ठेवली. आमच्या डोळ्यांदेखत त्यांनी अभयला घरातून हाकलून लावले. अभय असाच गावाबाहेर कितीतरी दिवस भटकत होता. मी आणि आईने त्याला खूप शोधला परंतु तो कुठेच भेटला नाही. त्यानंतर चार दिवसांनी घरातून अक्षरा देखील अचानकच गायब झाली. त्यावेळी देखील सूर्यवंशींनी माझ्या आईला वेठीस धरले. तुझ्याच मुलाने तिला पळवून नेले असणार नाहीतर काही तरी तिचे बरेवाईट केले असणार असे आरोप परत लावले. पोलिसांमध्ये देखील अभय विरुद्ध त्यांनी खोटी तक्रार दिली. आमच्या घरातून पैसे चोरून तो पळून गेला अशी तक्रार दिली. गावातले पोलीस त्यांच्यातच सामील होते. त्यांनी त्याला एक फरार गुन्हेगार म्हणून घोषित केले. त्यानंतर मात्र आई पूर्णपणे कोलमडून गेली. सूर्यवंशी जसे म्हणतील तशीच ती राहू लागली. माझ्यासाठी, माझ्या भल्यासाठी. मी आईसाठी शांत राहत होती आणि आई माझ्यासाठी. आमचं आयुष्य असंच तुरूंग बनून राहिले नुसतं. मी तरी घराबाहेर पडते परंतु आईला सुटका नाही त्या नरकामधून. बाबांचे पैसे तर मिळालेच नाही आम्हाला शिवाय आमचं घर, जमीन सगळेच सूर्यवंशीने लुटले. त्यात अभय देखील कुठे गेला हे देखील कळाले नाही. आम्हां मायलेकीला त्यांच्या तुकड्यावर जगण्याशिवाय दुसरा पर्यायच ठेवला नाही त्यांनी. किशन, तू भेटण्याच्या आधी मी स्वतःला खूप एकटं फील करत होते. बाबा गेल्यापासून जणू हसणं विसरले होते. ते हसणं, तो आनंद तुझ्यामुळे माझ्या जीवनात परत आला. आणि महत्वाचे म्हणजे तुझ्या येण्याने आई देखील खुश राहू लागली. तुझ्या मधली आपुलकी, तिच्यासाठी तुझ्या मनात असलेला आदर, प्रेम हे तिला खूप समाधान देत होते आणि ते पाहून मला मनापासून बरं वाटत होतं. तू जेव्हा मला सांगितले की तू माझ्यावर प्रेम करतोस त्यावेळी मला वाटलं सूर्यवंशींची मुलगी समजून तू माझ्यावर प्रेम करत असेल. पंरतु जेव्हा तू म्हणालास की तुला सगळं माहित आहे. सूर्यवंशी माझे जन्मदाते वडील नाहीत, सूर्यवंशी आणि माझा काहीच संबंध नाही तरी देखील मी तुला आवडते त्याच वेळी तू देखील मला आवडू लागला होता. हो किशन माझं देखील तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मला खात्री आहे तू माझी साथ कधीच नाही सोडणार. असाच मला कायम जपत राहशील तू. हो ना?"

अंतरा आज मनापासून त्याला तिच्या मनातलं सर्वकाही सांगत होती. तिच्या तोंडून प्रेमाची कबुली मिळताच किशनला खूप आनंद झाला. तिच्या हातावर हात ठेवून त्याने तिला कधी न सोडून जाण्याचे वचन दिले.

थोडावेळ सोबत घालवल्यानंतर किशन आणि अंतरा घरी परतले. आधी अंतरा घरात गेली त्यानंतर अर्ध्या तासांनी किशन गेला. किशन जसा त्याच्या खोलीत गेला तसं त्याच्या मागोमाग अरूंधती त्याच्यासाठी चहा घेऊन आली.

" किशन, मला खूप आनंद झाला. अंतराने मला सगळं काही सांगितले. तुझ्या आणि तिच्या बद्दल. मी खूप खुश आहे बघ." अरूंधतीने मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

" तुम्हाला सगळं मान्य आहे? म्हणजे तुम्हाला माहित आहे ना मी, मी बिहारी आहे माझी जात, धर्म सगळंच वेगळं आहे. सूर्यवंशींना कधीच मान्य नसणार तरी तुम्हाला काहीच आपत्ती नाही आमच्या नात्याबद्दल?" किशनला धक्का बसला होता.

" खरं सांगू, जेव्हा तू अंतराला सांगितले होतेस की तुझं प्रेम आहे तिच्यावर त्याच दिवशी घरी आल्यावर तिने मला ती गोष्ट सांगितली. आधी मला पटलं नाही परंतु तुझा स्वभाव पाहता तू काहीच वेडंवाकडं करणार नाही याची खात्री वाटत होती. तुझं मन तुझ्या स्वभावासारखेच निर्मळ आहे. तुझ्या सोबत माझी अंतरा सुखात राहील याची खात्री आहे मला. मी कधीच या नरकातून बाहेर पडू शकणार नाही. काही पैशांसाठी ही लोकं माझ्या अंतराचा देखील कोणासोबत ही लग्न लावून देऊन बळी देतील त्या पेक्षा तू तिला इथून पळवून घेऊन जा." अरूंधतीने त्याला समजावले.

" नाही आई, तुम्हाला असं एकटं इथे सोडून आम्ही कुठेच नाही जाणार. आमच्या माघारी हे लोक तुम्हाला जास्त त्रास देतील. मला अंतराने अभयबद्दल सांगितले. तो तुम्हाला एकटं सोडून गेला आणि काय झालं ते पाहत आहातच ना तुम्ही. आम्ही नाही जाणार कुठे. गेलो तर आपण तिघांनी हे घर सोडायचे नाही तर बघू एखादा मार्ग काढू या यातून." किशन विचार करू लागला.

" कोण म्हणाले अभय मला एकटं सोडून गेला. किशन, अक्षरा आणि अभय प्रेम देखील तुमच्या प्रेमासारखे पवित्र आणि खरे होते. मला माहित होते या घरात राहून त्यांना त्यांचं प्रेम कधीच भेटणार नाही म्हणुन मीच त्यांना इथून पळवून लावले. अभय कुठे आहे ते मला देखील माहित नाही आणि मला माहित करून घ्यायचे देखील नाही. इथे जर का कोणाला कळाले तर मला त्रास देऊन माझ्याकडून सर्व काढून घेतील म्हणून मीच नाही विचारले त्याला. फक्त इथून दूर जा कुठे ही असेच सांगितलं. आता तुम्हाला देखील तेच सांगतेय मी. तू आणि अंतरा पळून जा लवकर इथून." अरूंधती कळकळीने त्याला विनवणी करत होती.

" अच्छा! म्हणजे तूच होतीस जे आमच्या घराण्याची अब्रू अशी मातीला मिळवली. आणि आता राहिलेला मान सन्मान देखील मातीमोल करायचा डाव आहे तुझा. पण आम्ही असं होऊ देणार नाही."

किशनला समजावत असताना तिथे सूर्यवंशी यांचा मोठा मुलगा राजीव तिथे आला आणि त्याने अरूंधतीचे सगळं बोलणं ऐकले.

काय करतील आता सूर्यवंशी अरूंधती सोबत? किशन आणि अंतराचे काय असेल भविष्य?

क्रमशः


🎭 Series Post

View all