प्रेमाचा रंग एक असाही भाग ११ अंतिम

प्रेमात कितीही अडथळे येऊ देत. कितीही शत्रू बनू देत प्रेम शेवटी जिंकतेच.
प्रेमाचा रंग एक असाही भाग ११ अंतिम

" बाबाsss बाबाsss तुमच्या मुळे ही ब्याद आपल्या घरात आली आणि आपल्या घराची पूर्ण वाट लावली."

राजीव अरूंधतीच्या हाताला धरून जबरदस्तीने हॉलमध्ये घेऊन आला. त्याच्या आवाजाने सगळेच तिथे जमले. सकाळीच राजीव आणि संजीव सुट्टी लागली म्हणून घरी परतले होते. सूर्यवंशीनी किशनबद्दल राजीवला सांगितले म्हणून राजीव त्याला भेटायला त्याच्या खोलीत गेला होता. तिथे त्याने अरूंधतीचे बोलणे ऐकले.

" येsss माझ्या आईचा हात सोड." अंतरा राजीवला ओरडली.

" तुझ्या आईलाच काय तुझ्या या प्रियकराला देखील सोडणार नाही आता आम्ही. आमच्या बहिणीला पळवून लावून तुला आणि तुझ्या आईला काय वाटते आम्ही तुम्हाला असंच सोडून देऊ. बाबा यावेळी तुम्ही मध्ये पडायचे नाही समजलं ना.‌ तुमचं ते प्रेम बीम काय असेल ते नंतर आधी हा आमच्या स्टेटसचा प्रश्न आहे. आणि तू रे, तुझी लायकी तरी आहे का रे आमच्या पायदानाशेजारी राहण्याची आणि तू आमची बरोबरी करायला जातोस. परगावातून आलेला भिकारी तू आम्हाला नसतो काय? नाही तुझी हाडं खिळखिळी केली तर सूर्यवंशीचा वारस म्हणून नाव नाही लावणार. संज्या, माझी हॉकी स्टिक आण रे जरा. खुप दिवस झाले हात साफ नाही केला मी."

राजीवने सांगताच संजीव त्याची हॉकी स्टिक आणायला आतमध्ये गेला. अरूंधती त्याला विनवणी करू लागली.

" नका मारू त्याला. त्याने काही नाही केले." अरूंधती रडत होती.

" ये राजीव, त्याला हात नाही लावायचा समजलं ना. दूर हो त्याच्यापासून." अंतराने पुढे जाऊन त्याला धक्का दिला.

" नालायक, मला धक्का देतेस." धक्क्यामुळे तोल गेलेला राजीव स्वतःला सावरत तिच्या जवळ आला आणि त्याने तिला कानाखाली लगावली. त्याचा प्रहार इतका जबरदस्त होता की ती डायरेक्ट बेशुद्ध पडली.

काही वेळाने अंतरा शुध्दीवर आली. ती स्वतःच्या खोलीत बेडवर झोपली होती. अरूंधती तीच्या बाजूलाच डोक्याला हात लावून बसली होती.

" आई, किशन.... किशन कुठे आहे?" अंतरा बेडवरून उठून जाऊ लागली तसं अरूंधतीने तिला थांबवले

" खुप मारलं गं त्याला त्या नराधमांनी. खुप मारलं. नुसता रक्तबंबाळ झाला होता पोरगा. असा कुठलाच अवयव शिल्लक राहीला नाही ज्यातून रक्त येत नव्हते. खुप मारला त्याला ह्या लोकांनी." अरूंधती रडू लागली. ते ऐकून अंतरा सुन्न पडली.

दोन दिवसांनी अंतरा कॉलेजमध्ये आली. राजीवने तिला घराबाहेर न जाण्याची तंबी दिली होती. परंतु कॉलेजच्या प्रिन्सिपॉलने बोलावलं त्यामुळे तिला जावेच लागले.

" ताई. इथे या." छोटूने तिला प्रिन्सिपॉलच्या केबिन बाहेरच अडवले.

" अरे छोटू तू इथे काय करतोयस?" तिने हळूच त्याला विचारलं

" किशन दादाचा निरोप आहे तुमच्या साठी." छोटूने इकडे तिकडे पाहिले

" काय... किशनचा ? कसा आहे तो? कुठे आहे? मला भेटायचे आहे त्याला, मला घेऊन चल त्याच्या जवळ. प्लीज छोटू." अंतरा खुप भावूक झाली होती. ती छोटूच्या हातापाया पडू लागली.

" अहो ताई असं काही करू नका. मी तेच सांगतोय तुम्हाला. त्या दिवशी राजीव आणि संजीव दादांनी किशनला दादाला मारून रस्त्यावर फेकला होता. मी ते पाहिले आणि लगेच किशन दादाला हॉस्पिटलमध्ये आणले. त्यांच्या भावाला देखील मुंबईहून बोलावून घेतले. किशन दादा काल रात्री शुध्दीवर आले. त्यांनी त्यांच्या भावाला सर्व हकीकत सांगितली आणि त्यांच्या भावाने तुम्हाला भेटायला बोलावले आहे आता लगेच."

छोटूचा निरोप ऐकून अंतरा लगेच त्याच्या मागे गेली. किशनचा भाऊ अंतराला भेटला. त्या दोघांमध्ये बोलणे झाले आणि किशनचा भाऊ निघून गेला.

अंतरा घरी आली. घरातील इतर लोकांचा कानोसा घेऊन तिने अरूंधतीला किचनमध्ये गाठले.

" आई. माझं काम आहे तुझ्याकडे." अंतराने अरूंधती कडून गेल्या दोन वर्षांपासूनची माहिती मिळवली.

" सूर्यवंशी साहेब कुठे आहेत." संध्याकाळी घरात चार पाच ऑफिसर माणसे घरात आली होती.

" मी आहे सूर्यवंशी. काय काम आहे तुमचं? आणि कोण आहात तुम्ही?" सूर्यवंशी त्यांना पाहून अचंबित झाले.

" आम्ही सीबीआय कडून आलो आहोत. तुम्ही मागील दोन वर्षांपासून जे काही घोटाळे केलेत त्यांचे पुरावे आहेत आमच्याकडे. त्यासाठी तुम्हाला अटक करण्यात येत आहे." त्यातील एकजण सूर्यवंशी यांना म्हणाला आणि त्यांच्या हातात बेड्या घातल्या.

राजीव आणि संजीव त्यांना अडवू लागले तर त्यांनी त्या दोघांना देखील कारवाईमध्ये अडथळा आणला या कारणास्तव अटक करून घेऊन गेले.

" आई चल लवकर. आपल्याला इथून जायचे आहे." ते सगळे बाहेर जाताच अंतरा घाईघाईत स्वतःची आणि अरूंधतीचे सामान पॅक करून लागली.

" आपण कुठे जातोय? आणि का जातोय?" अरूंधती तिला विचारू लागली.

" आपण अभयकडे जातोय. हो आई आपला अभय भेटला. किशनच्या भावाने त्याला शोधून काढले. आता जे सीबीआयवाले आले होते ते नकली आहेत. आपण घर आणि गाव सोडेपर्यंत ते त्या तिघांना असंच गाडीतून फिरवत राहतील. किशन आणि त्याचा भाऊ आपली वेशीवर वाट बघत आहेत. चल लवकर. ही एकच संधी आहे आई इथून बाहेर पडायला." अंतराच्या डोळ्यांत अश्रू होते. अरूंधतीने ते पुसले आणि मायलेकी तिथून पळाल्या.

मुंबईमध्ये आल्यावर किशनचा भाऊ जिथे राहतो त्याच्या जवळच अभय देखील राहायला होता. ज्यावेळी किशनने अभयचा फोटो पाहिला त्याच वेळी त्याला सत्य कळाले होते. त्याने लगेच त्याच्या मोठ्या भावाला कळवले देखील होते. किशनला मारला समजल्यावर किशनचा भाऊ अभयला घेऊन पुण्यात आला होता.

आई आणि मुलाची, बहिण आणि भावाची पुन्हा एकदा गाठभेट झाली होती. अक्षरा आणि त्याचा सुखी संसार बघून अरूंधती भरून पावली होती. काही दिवसांत किशन आणि अंतराचे देखील लग्न झाले. सगळे सुखात, आनंदात एकत्र राहत होते.

या सगळ्यांपासून अनभिज्ञ सूर्यवंशी कुटुंब या सगळ्यांचा शोध अजूनही घेत होते.

समाप्त

🎭 Series Post

View all