प्रेमाचा रंग एक असाही

उराशी स्वप्न बाळगून आलेल्या एका तरूणाची प्रेम कहानी
प्रेमाचा रंग एक असाही.. भाग १ 


" सूर्यवंशी साहेब आहेत का?" 

एक चाळीस वर्षाचा माणूस एका पंचवीस वर्षाच्या मुलासोबत गेटवर उभा होता. गेटच्या आत चौकीत बसलेल्या वॉचमनला हाक मारत त्याने त्याच्या हातात एक पत्र दिले.

" हा. साहेब म्हणाले होते तुमच्याबद्दल. तरी एकदा विचारून येतो." वॉचमनने पत्र वाचून त्यांना परत  दिले. निरोप घेऊन तो बंगल्यात गेला.

पुण्यापासून काही अंतर पुढे असणाऱ्या सासवड गावात वसलेला एक मजली बंगला एखादा छोटा वाडा शोभावा असाच दिसत होता. बंगल्याच्या पुढे गार्डन, गार्डनच्या दोन्ही बाजूने रंगीबेरंगी फुलांची झाडे, दाराच्या पुढेच तुळशीचे वृंदावन. एकंदरीत आल्हाददायक वातावरण होते सर्वत्र. 

थोड्याच वेळात वॉचमन बाहेर आला.

" चला, तुम्हाला साहेबांनी आत बोलावले आहे." वॉचमनने सांगताच ते दोघे त्याच्या मागे निघाले.

दारातून आत येताच त्यांना दर्शन झाले ते भल्यामोठ्या गणेश मूर्तीचे. तिथे पाया पडून पुढे जाताच ते एका प्रशस्त हॉलमध्ये पोहचले. हॉल तास मोठा होता, हॉलमध्ये मधोमध बसण्यासाठी सोफे ठेवले होते. ऐसपैस सोफा, त्याच्या लगत तसाच खुर्च्या, बाजूला अजून एक सोफा आणि त्या सगळ्यांच्या मध्ये एक टेबल. सोफ्यावर काही माणसे आधीच येऊन बसली होती. ते दोघे आत जाऊन एका कोपऱ्यात उभे राहिले. हॉलच्या उजव्या बाजूला स्वयंपाकघर होते. तिथे बायकांचा चहा नाश्ता बनवत असताना गोंधळ चालू होता. हॉलच्या डाव्या बाजूला दोन दरवाजे दिसत होते पंरतु सध्या ते बंद होते. एका कोपऱ्यातून एक जिना वरच्या मजल्यावर जात होता. वर तीन खोल्या होत्या. तिथून एक रूबाबदार व्यक्ती जिना उतरत खाली येऊ लागली. ती व्यक्ती जशी खाली येण्यास निघाली तसं खाली बसलेली माणसे आपापल्या जागेवर उभी राहिली.

" नमस्कार सूर्यवंशी साहेब." खाली बसलेल्या माणसाने हात जोडत खाली आलेल्या त्या व्यक्तीला अभिवादन केले.

" नमस्कार, बसा." सूर्यवंशी साहेबांनी इशारा करताच सगळे पुन्हा जागेवर बसले. त्यांच्यात बोलणे चालू होते तो पर्यंत इथे कोपऱ्यात उभा असणारा तो पंचवीस वर्षाचा मुलगा संपूर्ण घर भिरभिरत्या नजरेने पाहत होता. 

सूर्यवंशी आणि त्या आलेल्या मंडळींचे बोलणे संपले तसं ती माणसे निघून गेली. 

" हम्म.. बोला यादव, काय म्हणताय?" सूर्यवंशी त्या चाळीस वयाच्या माणसाला उद्देशून बोलले.

" ते.. साहेब, हा किशन आहे. आमच्या गावचा पोरगा आहे. इथे कामासाठी आलाय ते त्याला राहायला. तुम्ही म्हणाला होता इथे सोय होईल त्याची म्हणून, त्याला इथे आणला." यादव मूळ बिहारचा असल्यामुळे त्याच्या मराठीत देखील त्याच्या भाषेची लयता होती.

" हा.. हो. म्हणालो होतो मी. त्याच काय आहे, आजची मुले आपल्या पेक्षा हुशार असतात. त्यांना एका जागेवर कुठे नीट राहता येत. माझी दोन्ही मुले शिकायला तिथे, दिल्लीला गेली आहेत. ते काही लवकर येणार नाही. निदान चार पाच वर्षे तरी लागतील त्यांना परत यायला. म्हंटल तो पर्यंत त्यांच्या खोल्या रिकाम्या कशाला ठेवायच्या म्हणून राहायला द्यावे असं ठरवलं. हा एकटाच आहे की कोणी सोबत आहे याच्या? नाही म्हणजे, मित्र किंवा मैत्रीण, कोणी नातेवाईक? असेल तर आतच सांग, नंतर घेऊन नाही यायचे." सूर्यवंशी किशन कडे बघत म्हणाले. 

सहा फूट उंच, अंगकाठीने धष्टपुष्ट नसला तरी रूबाबदार दिसत होता. डोळ्यांत आत्मविश्वास दिसून येत होता. ओठांवर हास्य होत त्याच्या. उराशी स्वप्ने बाळगून काहीतरी करूनच दाखवायचे असा निश्चय त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. 

" नाही. म्हणजे, माझे ओळखीचे इथे कोणी नाही. त्यामुळे इथे कोणी येण्याचा प्रश्न नाही आणि गावावरून फक्त भाऊ आला तर येईल कधी मला भेटायला." किशन म्हणाला.

" बरं ठीक आहे, ही खालची खोली आहे तिथे जा, सामान ठेव तुझं. आज पासून तिथे राहा तू. महिन्याला दोन हजार भाडं दे. ठीक आहे."

सूर्यवंशी म्हणाले तसं किशनने होकारार्थी मान हलवत स्वतःचे सामान उचलले. यादव आणि किशनने सूर्यवंशी नमस्कार केला आणि ते त्यांच्या खोलीत निघून गेले.

" अहो मंडळी, जरा इथे येता का?" सूर्यवंशीने किचनच्या दरवाजात उभे राहून हाक मारली.

" हा, बोला ना साहेब." एक मध्यम वयीन बाई साडीच्या पदराला हात पुसत बाहेर आली. दिसायला जितकी साधी होती तितकीच बोलण्यातून गरीब स्वभावाची होती. ती म्हणजे सूर्यवंशी यांची बायको, अरूंधती. मान खाली, नजर खाली करून ती सूर्यवंशीच्या समोर हात बांधून उभी राहिली. 

" या खालच्या खोल्यांमधल्या एका खोलीमध्ये एक मुलगा आलाय राहायला. त्याच्या जेवणाचं बघा. आणि हो, घरात नीट लक्ष द्या. उगाच मागचं पुढं करू नका. एक लक्षात ठेवा, मला माझ्या घराची अब्रू सगळ्यात जास्त महत्वाची आहे. समजलं ना. जावा आता काम करा आता. आणि पोरांना ताब्यात ठेवा." सूर्यवंशी थोडं रागात बोलले.

" हो, हो साहेब, मी लक्षात ठेवीन." अरूंधती घाबरून म्हणाली. 


काय झालं होत मागे? किशनमुळे काय घडेल सूर्यवंशी घरात? 

क्रमश:

🎭 Series Post

View all