प्रेमाचा रंग एक असाही भाग २

किसनच्या आयुष्यात अनेक रहस्य सोबत घेऊन आली ती
प्रेमाचा रंग एक असाही... भाग २

किशनने खोलीत जाऊन स्वतःच सगळं सामान व्यवस्थित लावले. सामानाच्या नावाखाली त्याच्याकडे फक्त एक बॅग कपड्याची आणि एक बॅग पुस्तकाची तेवढीच काय ती होती. त्याला देण्यात आलेली खोली तशी मोठी होती. एका कोपऱ्यात एक पलंग होता, त्याच्या बाजूला एक टेबल आणि खुर्ची, आणि दुसऱ्या कोपऱ्यात लाकडी कपाट आणि त्याच्या थोडं पुढे वॉश रूम होते. मधोमध चारपाच माणसे आरामशीर मांडी घालून बसतील एवढी मोकळी जागा होती. बेडच्याच पुढे एक मोठी खिडकी होती. तिथून बाहेरच संपूर्ण अंगण स्पष्ट दिसत होते. किशनने कपडे कपाटात लावून ठेवले. त्यानंतर पुस्तके टेबलवर व्यवस्थित ठेवली. सगळं आवरून तो खोलीचे निरीक्षण करत फेऱ्या मारत होता. अचानक त्याच्या कानावर मंजुळ आवाज पडला. त्या आवाजाच्या दिशेने जात तो खिडकीतून बाहेर बघू लागला.

खिडकीतून त्याला एक मुलगी पाठमोरी दिसत होती. तिचे ते मोकळे, लांब कंबरेपर्यंत आलेले केस वाऱ्यावर भुरभुर उडत होते. तिचा कमनीय बांधा उन्हाच्या प्रकाशात उजळून येत होता. ती किशनच्या पुढे पाठमोरी असल्यामुळे त्याला तिचा चेहरा दिसत नव्हता. त्याने थोडं उजवीकडे सरकून नंतर डावीकडे सरकून देखील पाहिले, परंतू तिचा चेहरा काही केल्या त्याच्या दृष्टीक्षेपात येतच नव्हता. शेवटी त्याने तिला पाहण्याचा विचार डोक्यातून बाजूला सारला. टेबलवरचे पुस्तक घेऊन ते वाचत तो पलंगावर आडवा पडला.

" आई, मी येईन ना लगेच परत. जाऊ दे ना आता प्लिज." ती मुलगी अरूंधतीला तिचा हात हातात घेईन विनवणी करत होती.

" तारू, तू लवकर येत नाहीस आणि मग इथे साहेबांची बोलणी मला खावी लागतात. त्यापेक्षा तू इथेच थांब, त्यांची कामे झाली की विचार त्यांना आणि कुठे जायचं तिथं जा." अरूंधतीने असं सांगताच रागाने गाल फुगवून ती तडक तिथून निघून गेली.

एव्हाना संध्याकाळ झाली होती. पुस्तक वाचता वाचता किशनला कधी झोप लागली त्याच त्याला कळलं नाही. 

' शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोs स्तुते || '

घरातल्या मंदिरात कोणीतरी गोड आवाजात स्तोत्र म्हणत होते, त्याच आवाजाने किशनला जाग आली.

त्याने आळस देत दरवाजातून बाहेर पाहिले. आता ही त्याला ती मुलगी नीट दिसत नव्हती. तिचा तो फक्त मंजुळ आवाजच त्याला काय तो ऐकू येत होता. त्याने थोडं अजून पुढे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला.

" मंडळीss कुठे आहात तुम्ही?" जिन्यातून खाली उतरत सूर्यवंशींनी अरूंधतीला हाक मारली. त्यांचा आवाज आला तसं त्या मुलीने देवाजवळ दिवा लावला आणि किचनमध्ये पटकन गेली.

" काय ओ.." अरूंधतीने किचनच्या दारातूनच विचारले.

" चहा द्या, आणि त्या मुलाला देखील हाक मारा.." सूर्यवंशी सोफ्यावर बसले.

" हो आणते. हा काय आलाच.." अरुंधती सुर्यवंशींना सांगून किशनला बोलवायला जाणार तेवढ्यात तोच त्याच्या खोलीच्या दरवाजात उभा असताना तिला दिसला.

" अरे! ये, तिथेच काय उभा आहेस. ये असा इथे." सूर्यवंशींनी बोलावताच किशन त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या बाजूलाच उभा राहिला.

अरूंधतीने चहा आणून एक कप सूर्यवंशींना आणि दुसरा साधा कप किशनला दिला. किशनने उभा राहूनच तो चहा पिला. आणि परत त्याच्या खोलीत निघून गेला. यादवने त्याला आधीच सूर्यवंशींबद्दल आणि त्यांच्या रीती परंपरा, त्यांच्या स्वभावाबद्दल माहिती दिली होती.

सूर्यवंशीना त्यांच्या घराणाच्या अब्रूपेक्षा कुठलीच गोष्ट मोठी वाटत नाही. स्वतःचा मोठीपणा आणि गावातला त्यांचा रुतबा याच गोष्टी त्यांच्यासाठी त्यांच्या जिवापेक्षा ही अधिक मौल्यवान होत्या.

किशनने चहा पिल्यावर खोलीत येऊन कपडे बदली केले. बाहेर थोडासा फेरफटका मारून यावा अशी इच्छा मनात आल्यामुळे त्याने लगेच बाहेरचा रस्ता धरला.

बाहेरच अंगण, तिथली झाडे बघून झाल्यावर तो अजून जरासा पुढे फिरत फिरत गेला. गेटच्या बाहेर थोडंसं फिरून तो माघारी घरी परतला. गेटच्या आत प्रवेश करताच त्याला समोरून एक सुंदर तरुणी फोनवर बोलत येताना दिसली. तिचा रंग सावळा, जास्त उजळ नाही की जास्त डार्कही नाही. पण चेहऱ्यावर एक तेज आणि डोळ्यांत थोडासा बालिशपणा. तिचे ते बोलके डोळे कोणालाही सहज तिच्या प्रेमात पाडू शकतात. बोलताना मध्येच जेव्हा ती स्माईल करायची तेव्हा एखादा शर ह्रदयात रुतावा त्याप्रमाणे वाटत होतं. हसताना तिच्या डाव्या गालावर पडणारी ती खळी हळूच हृदयाचा ठोका चुकवत होती. दोन्ही रेखीव भुवयांच्या मध्ये असलेली छोटीशी टिकली तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होती. गळ्यातील ' ए ' नाव असलेलं लॉकेट अस्ताला निघालेल्या सूर्याच्या प्रकाशात चमकत होते. मोकळे सोडलेले केस हवेसोबत उडताना ती हळूच तिच्या लांबसडक बोटांनी कानामागे सारण्याचा प्रयन्त करत होती. तिची ती धांदल किशन मंत्रमुग्ध होऊन पाहत होता.

ती फोनवर बोलत त्याच्या बाजूने निघून गेली. 'कोण होती ती?' ' इथे काय करते होती?' 'सूर्यवंशींची मुलगी आहे का ही?' असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊन गेले. ती गेली त्या दिशेला पाहत तो विचार करत तिथेच उभा राहिला होता. 

कोण होती ती? काय गौडबंगाल आहे सुर्यवंशी घरात? किशन नव्या जागेत रूळेल का?

क्रमशः


🎭 Series Post

View all