प्रेमाचा रंग एक असाही भाग ३

तिची एक झलक पाहून तिच्या विषयी जाणून घेण्याची आकांक्षा किशनच्या मनात प्रकर्षाने वाढू लागली.
प्रेमाचा रंग एक असाही.. भाग ३

" साहेब, तुम्हाला आतमध्ये बोलावले आहे." विचारात मग्न असलेला किशन त्या आवाजाने भानावर आला. 

" तुम्ही कोण?" किशनने त्याला प्रश्नार्थक नजरेने पाहत, त्याचा पेहराव न्याहाळत विचारले.

साधारण पन्नाशी पार केलेला, अंगावर पांढरे धोतर आणि थोडा मळका सदरा घातलेला एक इसम त्याच्या समोरच उभा होता.

" मी ह्या घराचा जुना नोकर आहे. सोमनाथ नाव  आहे माझं. पण, सगळे मला सोमु काका नावानेच हाक मारतात. साहेब फक्त सोमू म्हणतात. चला घरात. तुम्हाला बोलावले आहे." सोमू काकांनी स्वतःची ओळख करून देताच किशन त्यांच्या मागे घरात गेला.

" तुझं नाव किशन ना रे?" अरूंधतीने त्याला विचारलं, तशी त्याने होकारार्थी मान हलवली. 

अरूंधतीने त्याच्या हातात अळूच्या वड्या असलेली प्लेट दिली. त्याने एकदा तिच्याकडे तर एकदा तिने दिलेल्या अळूच्या वड्याकडे पाहिले. तिने त्याला इशाऱ्यानेच खा म्हणून सांगितले. त्याने एक वडी तोंडात टाकली. आईच्या हाताचा स्पर्श लाभलेल्या त्या वडीला अमृतासमान चव लागत होती. त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटले. ते अरूंधतीच्या नजरेतून सुटले नाही. 

" काय रे, रडतोस कशाला तू?" अरूंधतीने विचारताच त्याने लगेच डोळ्यांतले पाणी पुसले.

" काही नाही. ते.. आईच्या हाताची चव छान असते असं सगळे म्हणतात. आज प्रत्यक्ष अनुभव आला. म्हणून.. जरा.. खूप छान आहेत हे.. काय हे? अळूच्या वड्या." डोळ्यांत पाणी ओठांवर हास्य ठेवत तो म्हणाला खरा तरी त्याच्या मनातले दुःख अरूंधतीने हेरले होते. तिने मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याने देखील तिच्याकडे पाहून स्मित केलं. 

अरूंधती सोबत काही काळासाठी किशन पूर्णपणे मुलीबद्दल विसरून गेला होता. परंतु खोलीत आल्यावर पुन्हा त्याच्या ते लक्षात आले. 

" अरे यार! मगाशी मॅडमला विचारायला हवे होते त्या मुलीबद्दल. नाही.. नको. ते बरं नसतं दिसलं. पण आता कोण होती ती मला कसं कळणार? पण काहीही म्हणा, दिसायला छान होती ती. असो, कळेल जेव्हा कळायचे ते.. आता तो विचार नको. उद्या कामाला जायचे आहे तर लवकर तयारी करून जायला लागेल. पहिल्याच दिवशी उशीर नको व्हायला." स्वतःशीच बोलत किशन उद्या कामावर जाताना लागणारे साहित्य बॅगेत भरत होता.

रात्रीचे जेवण त्याला अरूंधतीने त्याच्याच खोलीत आणून दिले. त्यामुळे लवकर जेवून तो लगेच झोपी गेला.

" ती कुठे आहे?" जेवण करण्याकरीता सगळे जण एकत्र डायनिंग टेबलवर बसले असताना सूर्यवंशींनी अरूंधतीला विचारले.

" ती आहे तिच्या खोलीत. नंतर जेवण करते म्हणाली ती. तुम्ही घ्या जेवून." अरूंधतीने घाबरत उत्तर दिले. त्यानंतर सूर्यवंशींनी काहीच न बोलता जेवण केले.

" गेले का ते?" सूर्यवंशी जेवण उरकून स्वतःच्या खोलीत गेल्यावर तिने बाहेर येऊन विचारले.

" हम्म, गेले ते. ये जेवायला." अरूंधतीने बोलावताच ती येऊन जेवायला बसली. स्वतःचं ताट वाढून घेत तिने खायला देखील सुरुवात केली. खाऊन झाल्यावर ती निघाली तसं अरूंधतीने तिला थांबवले.

" आपल्या घरात एक मुलगा राहायला आला आहे आजपासून. साहेबांनी सांगितले आहे जरा जपून वागायला. म्हणजे तू.. तू चुकीचं नको समजूस.. ते.." अरूंधती तिला समजावत होतीच की तिने हात दाखवून अरूंधतीला थांबवले.

" त्यांचे विचार आणि त्यांचे मत त्यांना सांग त्यांच्या जवळच ठेवायला. उगाच माझ्या माथी मारू नका म्हणावं." तिने थोडं चिडून सांगितले आणि खोलीत गेली.

दुसऱ्या दिवशी किशन सकाळी लवकर उठला. स्वतःच आवरून त्याने स्वतःसोबत आणलेल्या देवांच्या फोटोला नमस्कार करून तो निघाला.

" किशन, असाच नको बाहेर जाऊस. आज पहिलाच दिवस आहे ना तुझ्या कामाचा, हे घे." अरूंधतीने बाहेर जाणाऱ्या किशनला अडवून त्याच्या हातात नाश्त्याची प्लेट दिली. हातातला नाश्ता संपवून तिचा आर्शिवाद घेऊन तो निघून गेला.

जाताना देखील त्याची नजर त्या मुलीला सर्वत्र शोधत होती. परंतु त्याला ती कुठेच दिसली नाही. शेवटी तो तसाच बाहेर निघून गेला. गेटच्या बाहेर मुख्य रस्त्यावर आल्यावर त्याला सोमू काका बाजाराला जाताना दिसले. त्यांच्याकडून माहिती मिळेल या अपेक्षेने किशन त्यांच्याजवळ गेला.

" नमस्कार सोमू काका. कुठे बाजाराला चालला आहात का?" किशनने चालता चालता त्यांच्याशी संवाद केला.

" हो, संध्याकाळी लागणारा भाजीपाला आणायला बाजारात चाललो आहे." सोमू काकाने थोडक्यात उत्तर दिले.

" चला.. मी देखील मार्केट पर्यंत येतो तुमच्या सोबत. बाकी, सोमू काका किती वर्षे झाली हो तुम्हाला इथे काम करता करता?" किशनने बोलायला सुरुवात करावी म्हणून सहज प्रश्न विचारला.

" माझ्या बाप आजोबांपासून सगळे इथेच काम करत आहेत. सूर्यवंशी साहेबांच्या वडिलांच्या काळात माझे वडील काम करत होते. आणि आता मी करतोय." सोमू काकाने अभिमानाने सांगितले.


" अच्छा. म्हणजे.. तुम्हाला घरचं सगळंच माहित असेल, हो ना?" किशनने असं विचारताच सोमू काकाने थांबून त्याच्याकडे पाहिले.

" तुम्हाला नक्की काय विचारायचं आहे?" सोमू काका प्रश्नार्थक नजरेने त्याला पाहतात.

" अहो काका, तुम्ही प्लिज चुकीचं समजू नका. मी ते.. फक्त.. म्हणजे घरात कोण कोण आहेत? म्हणजे, सूर्यवंशी साहेबांची मुले, ती कुठे आहेत? बस, ते असंच. आता ज्यांच्या सोबत मी राहतो त्यांच्या बद्दल थोडीफार माहिती हवीच ना मला. उद्या माझ्या घरचे मला विचारतील तर त्यांना सांगायला नको का? नाहीतर माझ्या घरच्यांना वाटेल की मी खोटं बोलतोय किंवा मी काही तरी चुकीचं करतोय असंच वाटत राहील त्यांना, म्हणून म्हंटलं तुम्हालाच विचारावं. म्हणजे घरच्यांना सांगता येईल मी चांगल्या घरात राहतोय ते..." किशनला त्या मुलीबद्दल सोमू काकांकडून जाणून घ्यायचे होते परंतु डायरेक्ट तिच्या बद्दल विचारणं त्याला चुकीचे देखील वाटत होते.

------------------------------------
मिळेल का तिची माहिती किशनला? कोण असेल ती?
क्रमशः


🎭 Series Post

View all