प्रेमाचा रंग एक असाही भाग ४

किशनचे कुतुहल क्षणोक्षणी वाढतच चालले होते सोमूकाका कडून माहित घेण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता
प्रेमाचा रंग एक असाही भाग ४

" हम्म; ते पण बरोबर आहे म्हणा. सूर्यवंशी साहेब आणि त्यांच्या घरच्या लोकांबद्दल काय सांगू आता तुम्हाला, म्हणजे अख्ख्या गावाचे भूषण आहेत आमचे सूर्यवंशी साहेब. त्यांच्या मर्जी शिवाय कुठलेच मोठं काम इथे पूर्ण होत नाही. सावकार, राजकारणी, इतकंच काय तर गावातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत आमचे साहेब. गावाच्या जत्रेपासून ते गावात येणारी कोणतीही सरकारी योजना गावात राबवण्यापर्यँत सगळं काही साहेबांना विचारूनच करतात गावातील सगळे. 'प्रतापराव सूर्यवंशी' या नावाचा फक्त गावातच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीत प्रचंड दरारा आहे. जितके साधे आणि शांत तितकेच घराच्या अब्रूसाठी, त्याच्या नावासाठी खतरनाक असे आहेत आमचे साहेब. त्यांचा मोठा मुलगा राजीव देखील त्यांच्या सारखाच स्वभावाला, अगदी बापाचे सगळेच गुण घेतलेत त्यानी त्याच्या अंगी. राग नेहमी नाकावर असतो त्याच्या. स्वतःचेच खरं करणाऱ्यातील आहेत राजीव दादा. आणि धाकटा संजीव. तो कशातच नसतो कधी. त्याच म्हणजे असं की, आपण भले आणि आपलं काम भले. बस! असंच असतंय त्याचे. आता दोघेही दिल्लीला पुढचं शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. सुट्टी लागली की येतात घरला." सोमुकाका सांगताना गप्प झाले.

" आणि मुलगी? म्हणजे, साहेबांची मुलगी तिचे नाव काय आहे? आणि, काय करते ती?" किशनच्या बोलण्यातून त्याला कुतूहल किती आहे ते कळत होते. 

" तिचे नाव देखील घरात घेणं वर्ज्य आहे." सोमुकाका म्हणाले तसं किशन त्यांच्याकडे पाहू लागला.

" हे वर्ज्य म्हणजे काय?" किशन 

" वर्ज्य म्हणजे मनाई. घरात साहेबांच्या मुलीचे नाव देखील घेत नाही कोणी. तसा साहेबांचा आदेशच आहे सगळ्यांना." सोमुकाका हळू आवाजात बोलले 

" का? म्हणजे घरात राहू शकते ती आणि तीचच नाव नाही घेऊ शकत कोणी? असं का?" किशन अजूनच गोंधळाला.

" कोण? कोण राहत घरात? काय बोलताय तुम्ही? कोणाबद्दल बोलत आहात?" सोमुकाकांनी विचारल्यावर किशन जवळ त्या प्रश्नाचं उत्तर नव्हते. तरी त्याच्या मनातली तिच्या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता त्याला शांत बसू देत नव्हती की माघार घेऊ देत नव्हती.

" मी काल एका मुलीला घरात पाहिले.. म्हणजे तिच्याकडे पाहून ती या घरची मुलगीच वाटत होती. मला वाटलं सूर्यवंशी साहेबांचीच मुलगी असावी. म्हणून म्हंटले..." किशन थोडा कचरत म्हणाला.

" अच्छा ती! अहो ती अंतरा आहे. मालकीण बाईंची मुलगी." सोमुकाकांच्या उत्तराने किशन अजूनच बावरला.

" अरुंधती मॅडमची मुलगी? म्हणजे?" किशन आता चालताना थांबला. 

" म्हणजे, तुम्हाला काय आताच सगळं ऐकायचं आहे का? खूप कामे आहेत मला." सोमुकाका देखील थांबले.

" नाही तसं काही. पण मला खूप प्रश्न पडतात मग त्याची उत्तरे हवी असतात. तुम्हाला नसेल सांगायचं तर, राहू द्या. काही हरकत नाही." सोमुकाकांना वेगळं काही वाटू नये म्हणून किशनने विषय तिथेच थांबवला. किमान त्याला मुलीचे नाव तरी कळले. यातच तो समाधानी झाला.

' अंतरा... अंतरा.." मनात दोन तीन वेळा नाव घोळत तो सोमुकाकांचा निरोप घेऊन त्याच्या कामाला निघून गेला.

आज त्याचा कामावरचा पहिला दिवस. यादवने त्याच्यासाठी कॉलेज जवळच्या स्टेशनरी दुकानात हेल्पर म्हणून काम पाहिले होते. आज पासून तो सकाळी तिथे कामाला जाणार होता. संध्याकाळी कॉलेजच्या लायब्ररी मध्ये जाऊन पुढच्या शिक्षणासाठी तयारी करणार होता. गावाकडे बारावी पास झाल्यावर पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो भावाकडे मुंबईला गेला होता पंरतु भावाच्या पगारात भावाचे कुटुंब आणि किशन यांचे भागत नसल्याने यादव त्याला इथे पुण्यात घेऊन आला.

" हे बघ किशन, यादवने सांगितले म्हणून काहीच शहानिशा न करता तुला कामावर ठेवतोय. नीट काम करायचं. कोणाची तक्रार आलेली मला चालणार नाही. कॉलेजची मुले मुली इथे वस्तू घ्यायला येतात, त्यांना व्यवस्थित सगळं द्यायचं. जे देशील ते या वहीत लिहून ठेवत जा. सगळा हिशोब वेळच्या वेळी करून ठेव. आणि हो, महत्वाचे म्हणजे इथे येणारी मुले ही आपल्याच गावातली आहेत त्यांच्याशी जपून बोलायचं. कोणासोबत जास्त सलगी करायची नाही किंवा भांडण करायचे नाही. नाहीतर तू करशील आणि मला निस्तरावे लागेल. समजलं ना तुला सगळं." 

स्टेशनरी दुकानाचा मालक आणि यादवचा मित्र घोरपडे किशनला सगळं समजावून सांगत होते.

" हो समजलं सगळं मालक." किशनने होकारार्थी मान हलवली.

" अरे वाह! तुला तर चांगलं मराठी येते. मला वाटलं की तू तिकडचा आहेस, म्हणजे बिहारचा आहेस तर हिंदीमध्येच बोलावं लागेल तुझ्या सोबत. हे भारी आहे पण. चला; माझी चिंता मिटली आता. आज पासून सांभाळ तू. मी माझ्या दुसऱ्या दुकानात आहे. इथून काहीच अंतरावर आहे ते दुकान. काही लागलं तर मला कॉल कर. ठीक आहे, येतो मी." घोरपडे त्याला नंबर देऊन निघून गेले. किशन सोबत बारा वर्षाचा एक मुलगा छोटू नावाचा त्याच्या मदतीसाठी दुकानात होता. 

कॉलेज सुटलं तसं मुलांचा घोळका दुकानात आला. प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या वस्तू पासून काही खाण्यापिण्याच्या वस्तू देखील घेत मुलांचा गोंगाट चालू होता. ज्याला त्याला ज्या वस्तू हव्यात त्या पटकन किशन देत होता. अशातच एक सुंदर आवाज त्याच्या कानी पडला. 

" मला पेनचा एक बॉक्स हवाय." अंतराने त्याला सांगितले.

त्याने तिच्याकडे पाहिले तसं तो तिला पाहतच राहिला. तिच्या गहिऱ्या डोळ्यात तो हरवून गेला.

होईल का ओळख अंतरा आणि किशनची? काय गौडबंगाल आहे अंतराचे कळेल का किशनला?

क्रमशः


🎭 Series Post

View all