प्रेमाचा रंग एक असाही भाग ५

अंतराबद्दल वाटणारी ओढ किशनला काय काय करायला लावेल अंतरा समजून घेईल का त्याच्या भावनेला
प्रेमाचा रंग एक असाही भाग ५

अंतराच्या डोळ्यांत त्याची नजर अडकली होती.

" दादा, त्या पेनचा बॉक्स मागत आहे." छोटूच्या आवाजाने तो भानावर आला. त्याने बॉक्स तिच्या हातावर ठेवताच ती पैसे देऊन निघून गेली. तो मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक बघत तसाच उभा होता. छोटूने पुन्हा त्याला धक्का देऊन भानावर आणले.

त्याच्या मनाला एक बरं वाटलं की अंतरा याच कॉलेजमध्ये आहे म्हणजे त्याला ती किमान रोज डोळ्यांसमोर तरी दिसत राहील. संपूर्ण दिवस दुकानात घालवल्यानंतर संध्याकाळी तो अभ्यास करण्याकरिता लायब्ररीमध्ये गेला. लायब्ररी तशी थोडी जुनी होती. ब्रिटिश काळातील एक मजली ती इमारत कॉलेजच्याच बाजूला होती. तळमजल्यावर कॉलेजचा स्टाफ बसला होता. तिथेच कॉलेज विद्यार्थांना देण्यात येणारी पुस्तके ठेवली होती. वरच्या मजल्यावर मुलांना बसायला टेबल खुर्च्या होत्या. लायब्ररीत जशी शांतता अपेक्षित असते अगदी तशीच शांतता तिथे होती. किशनला तिथे आल्यावर प्रसन्न वाटले. मुळात अभ्यासू वृत्ती असलेला तो, जिथे शांतता आणि पुस्तके मिळतील तिथे तो अभ्यास करत बसायचा. बारावीला देखील तो स्वतःच्या मेहनतीवर जिल्ह्यात पहिला आला होता. मात्र पुढच्या शिक्षणाची तिथे सोय नसल्याने त्याला स्वतःच गाव सोडावे लागले.

लायब्ररीमध्ये गेल्यावर त्याने सगळीकडे एक नजर टाकली. सगळ्यात शेवटी एका कोपऱ्यात त्याला छान अशी मनासारखी जागा दिसली. तो जाऊन तिथे बसला. स्वतःची काही पुस्तके त्याने आधीच स्वतःसोबत आणली होती. तीच पुस्तके घेऊन तो मन लावून अभ्यास करू लागला.

पुस्तकात लक्ष असतानाच त्याच्या कानावर परत तोच मंजुळ आवाज पडला. त्याने वर नजर करून पाहिले तर अंतरा त्याच्याच समोरच्या खुर्चीवर येऊन बसली होती.

" हाय..." अंतराने किशनला हात हलवून हाय करताच किशन मागे पुढे बघू लागला.

" तुम्ही मला म्हणालात का?" किशन तिच्याकडे अवाक् होऊ पाहू लागला.

" इथे तुमच्या माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी दिसतंय का तुम्हाला? आहे का इथे?" अंतरा पहिल्यांदाच त्याच्याशी बोलत होती. ती आपल्याशी बोलतेय यावर त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता. तो तसाच तिला एकटक पाहतच राहिला.

" नाही म्हणजे? काही काम होतं का माझ्याकडे तुमचं?" किशन थोडा ऑकवर्ड झाला होता. 

" हो म्हणजे, ते सूर्यवंशी यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून तुम्हीच आलात ना राहायला?" अंतरा हळू आवाजात बोलली.

" हो. पण तुम्ही इतक्या हळू आवाजात का बोलत आहात?" किशन देखील तिच्या सारखेच हळू आवाजात बोलू लागला.

" एक विनंती होती तुम्हाला. म्हणजे, तुम्ही प्लिज इथे कोणाला सांगू नका की मी त्या घरात म्हणजे सूर्यवंशी यांच्या घरात राहत आहे ते. प्लिज." अंतराने आजूबाजूला बघत त्याला विनवणी केली.

" ठीक आहे. नाही सांगणार पण तुम्ही देखील माझी एक मदत कराल का? मी इथे नवीन आहे. त्यात माझं शिक्षण गावाकडे म्हणजे आमच्या बिहारमध्ये झाले आहे तर, तुम्ही मला अभ्यास करायला मदत कराल का? म्हणजे, तुम्हाला जमत असेल तर हं. विनंती म्हणून बाकी काही जबरदस्ती नाही तुमच्यावर." आपल्या बोलण्याचा तिने चुकीचा अर्थ काढू नये म्हणून  त्याने आधीच क्लिअर करून सांगितले.   

" ठीक आहे करेल मी मदत तुम्हाला पण, कॉलेज किंवा घरामध्ये नाही. तुम्हाला हवं असेल तर इथे कॉलेज संपल्यावर लायब्ररी मधेच आपण बोलूया. चालेल का तुम्हाला?" अंतराचा होकार मिळताच किशन खुश झाला.

" हो, चालेल ना. माझी काहीच हरकत नाही." किशनने हात मिळवण्यासाठी हात पुढे केला. अंतराने त्याच्या हाताकडे पाहिले. थोडा विचार करून तिने देखील शेवटी त्याच्या हातात हलकेच हात देऊन हात मिळवला.

संध्याकाळी सूर्यवंशी निवासी. 

" किशन, आलास तू? मग, कसा होता तुझ्या  कामाचा पहिला दिवस?" किशन घरी येऊन नुकताच फ्रेश झाला होता की तेवढ्यात अरुंधती त्याच्या खोलीत त्याच्यासाठी चहा घेऊन आली होती.

" मस्त होता. खूप छान काम आहे स्टेशनरी दुकानात आणि कॉलेजची लायब्ररी देखील एकदम मस्त आणि शांत आहे. खूप आवडली मला.  मनासारखी शांतता आहे तिथे, बसण्याची व्यवस्था देखील प्रशस्त आहे." बोलता बोलता किशनने चहा एका घोटातच संपवला.

" अरे! हळू, एकाच घोटात संपवलास की चहा तू!" अरुंधती हसू लागली तसं किशन लाजला.

" ते, सवय झाली होती ना मुंबईमध्ये, तिथे राहिल्या पासून असंच पटकन चहा पिण्याची, पटकन जेवायची सवय झाली. तिथे सगळे असेच पटकन खातात पितात. आणि सगळं वेळेवर हवं असते तिथल्या लोकांना." किशन जुन्या गोष्टी आठवत बोलला.

" हम्म! बरं रात्री जेवण बनवून झाले की तुझ्या खोलीतच आणून देते तुला, आणि आता काही खायचं असेल तर सांग मला देते लगेच?" अरुंधतीने विचारताच त्याने सवयीप्रमाणे मान नकारार्थी हलवली.

' बरं ' बोलून अरुंधती खोलीतून बाहेर जाताच तो देखील दरवाजा जवळ आला. त्याने तिथेच उभे राहून सर्वत्र नजर फिरवली अंतरा कुठे दिसते का ते पाहण्यासाठी. त्याला ती कुठेच दिसली नाही. निराश होऊन तो परत खोलीत आला. 

असंच काही दिवस अंतरा त्याला कधी कॉलेजमध्ये दिसायची तर कधी लायब्ररीमध्ये पण, घरात मात्र कमी दिसायची. कधी कधी अंतरा त्याला अभ्यासात मदत करायला लायब्ररीमध्ये यायची. परंतु, जास्त वेळ न थांबता लगेच निघून जायची त्यामुळे त्याला तिच्यासोबत जास्त बोलताच येत नव्हते. त्याचे तिच्या बाबतीतले कुतूहल वाढत जाऊन आता एक प्रकारची ओढ निर्माण झाली होती. अंतराबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायची इच्छा त्याच्या मनात दिवसेंदिवस वाढतच चालली होती.

किशनला अंतराबद्दल काही कळेल का? त्यांचे ऋणानुबंध जुळतील का?

क्रमशः


🎭 Series Post

View all