प्रेमाचा रंग एक असाही भाग ७

जिथे निस्वार्थी प्रेम असते तिथे अपेक्षा नाही कर्तव्य आधी कळते
प्रेमाचा रंग एक असाही भाग ७ 


" आधी सांगा काय काम आहे ते, त्या नंतरच मी ठरवेन ते करायचं की नाही?" अंतरा त्याच्याकडे पाहू लागली.


" मला नाही वाटत तू असं काही करू शकशील? पण तसं करू शकतेस, पण करशील का नक्की याची खात्री नाही वाटत. नाही तर आधी हो म्हणशील आणि नंतर माघार घेशील." किशन असं बोलताच अंतरा त्याच्याकडे टशन देऊन पाहू लागली.

" एकदा दिलेला शब्द आणि हाती घेतलेले काम मग ते काहीही असो, ही अंतरा कधीच ते अर्धवट सोडत नाही; समजलं ना." अंतरा केसांना एका हाताने झटका देत आत्मविश्वासने बोलली.

" ठीक आहे तर. मग जरा, गालात, छान हसून दाखव बरं. बघूया तरी तुला हसता येत का ते?" किशन गालात हसू लागला.

त्याच ऐकून अंतराचे डोळे मात्र मोठे झाले. नंतर जेव्हा त्याच्या बोलण्या मागचा उद्देश कळला तेव्हा ती मोठ्याने हसू लागली. तिला हसताना पाहून तो एकटक तिच्याकडेच पाहू लागला. तिचे लक्ष त्याच्याकडे जाताच त्याची तिच्यावर खिळलेली नजर पाहून ती लाजली. 

" मी जाते आता, उशीर होतोय." अंतरा उठली तसं त्याने पटकन तिचा हात पकडला.

" ओह्ह सॉरी, म्हणजे थांब ना जरा." किशनच्या लक्षात येताच त्याने लगेच तिचा धरलेला हात सोडला.

" काही काम होतं का?" अंतरा त्याच्याकडे पाहू लागली तसं त्याला काय सांगावे तेच कळत नव्हते. त्याला तिच्या सोबत बोलायचे होते परंतु काय बोलावे आणि कसं बोलावे तेच काही सुचत नव्हते त्याला. बोलायला कारण आणि विषय काहीच नव्हते त्याच्या जवळ सध्या तरी परंतु त्याला तिला थांबवायचे होते.

" काम असं नाही. हा, ते दुपारी काय झालं होतं घरी? म्हणजे थोडा सिरियस मॅटर वाटला म्हणून." त्याला पटकन दुपारचे घरी झालेले भांडण आठवले.

" मी तुला आधीच सांगितले होते ना, त्या घराचा विषय इथे कधीच नाही काढायचा म्हणून." अचानक अंतराच्या बोलण्यात फरक आला. ती चिडली हे तिच्या आवाजावरून त्याला जाणवले. रागाच्या भरात ती किशनला ऐकेरी बोलू लागली होती.

" अगं सॉरी, म्हणजे; तुला राग आला का? सॉरी माझ्या लक्षात नाही राहिले ते. खरंच, आय एम रिअली सॉरी." किशन तिच्या त्या अवताराला पाहून थोडा घाबरला.

" नाही. इट्स ओके. खरंतर माझं चुकलं मी तुम्हाला पटकन असं बोलायला नको हवं होतं. आय एम रिअली सॉरी. आपण नंतर बोलू या. प्लिज, बाय." अंतरा तिथून तडक निघून गेली.

किशन थोडा वेळ तिथेच बसून नंतर घरी परतला. काही केल्या त्याच्या डोक्यातून अंतराचा विचार जातच नव्हता. तो तिच्या प्रेमात पडलाय याची जाणीव एव्हाना त्याला चांगलीच झाली होती. दोघामंधील अंतर देखील त्याला चांगलेच माहित होते. परंतु भावनेवर कोणाचा कधी ताबा राहिला आहे का जो त्याचा राहील. दिवस रात्र तो फक्त अंतराचाच विचार करू लागला होता.

" ऐक ना अंतरा." आज किशन घरातूनच मनात पक्कं ठरवून आला होता की अंतराला आपल्या मनातल्या भावना सांगायच्या म्हणजे सांगायच्याच असे. लायब्ररीमध्ये बसल्यावर त्याने हळूच तिला खुणवले.

" हा बोला ना." अंतराने देखील हळूच त्याला विचारले.

" इथे नको. आपण बाहेर जाऊ या का प्लिज?" किशनच्या बोलण्यावर अंतरा त्याच्याकडे प्रश्नारार्थ नजरेने पाहू लागली.

" प्लिज, तू चुकीचं नको समजू, मला फक्त बोलायचं आहे तुझ्या सोबत थोडं खाजगी आणि त्यासाठी ही जागा योग्य नाही. हवं तर आपण इथेच कॉलेजच्या ग्राउंडवर जाऊ या. प्लिज चल ना थोडा वेळ." लायब्ररीमध्ये सगळीकडे नजर फिरवत त्याने आजूबाजूला बसलेले इतर विद्यार्थ्यांकडे पाहिले. अंतराच्या मनाची अवस्था आणि तिच्या डोळ्यांतील शंका पाहता त्याने स्वतःच्या बोलण्याचे लगेच तिला स्पष्टीकरण दिले.

" ठीक आहे. तुम्ही व्हा पुढे. मी आधी हे बुक सबमिट करून नंतर तिथे येते." अंतराचा होकार मिळताच किशन आनंदातच बाहेर निघून गेला.

थोड्या वेळात अंतरा कॉलेज ग्राऊंडवर आली. किशन तिथेच एका बाजूला ग्राउंडच्या कंपाऊंडला टेकून उभा होता. अंतरा त्याच्या जवळ गेली.

" हम्म, बोला." अंतरा त्याच्या बाजूलाच कॅम्पाउंडला टेकून उभी राहिली.

" तू रागावणार नाहीस ना?" किशनने तिच्याकडे पाहिले.

" रागावण्यासारखं काही आहे का?" अंतराने बोलल्यावर बोलू की नको या संभ्रमात किशन तसाच शांत उभा राहिला.

खूप वेळ झाला तरी किशन काहीच बोलत नव्हता.

" तुम्हाला बोलायचं होतं ना, मग आता का गप्प आहात? बोला काय बोलायचं आहे ते?" वाट पाहून शेवटी अंतरानेच त्याला विचारले.

" अंतरा, तू रागावलीस तरी चालेल, पण मी जे सांगतोय ते आधी शांत डोक्याने ऐकून घे. तुला पटलं तरच बोल नाही तर." किशन हिंमत करून बोलू लागला. शेवटचा निर्णय जो असेल तो अंतराचं घेईल असा विश्वास तिला देऊन तो त्याच्या भावना मांडू लागला.

" हम्म, ठीक आहे." अंतराने होकार देताच किशनने दीर्घ श्वास घेत बोलायला सुरुवात केली.

" अंतरा, माहित नाही कसे पण मला तू आवडतेस." किशन म्हणाला तसं अंतरा त्याच्याकडे शॉक होऊन पाहू लागली.

" म्हणजे, आता आवडू लागली असं नाही. तर ज्या दिवशी मी आलो इथे राहायला त्याच दिवशी, मी पहिल्यांदा तुझा आवाज ऐकला होता, तू बाहेर बागेत असताना बोलत होतीस; तेव्हा पासून तुला पाहण्याचे, तुझ्याशी बोलण्याचे जणू वेधच मला लागले होते. जसं जशी तुझ्या सोबत ओळख वाढत गेली तसं तू अजून जास्तच मला आवडू लागली. अंतरा, माझं प्रेम आहे तुझ्यावर. हो, खरंच मी तुझ्या प्रेमात पडलोय. माहित नाही कसं पण, माझं मन तुझ्याकडेच धाव घेत. माझी अशी अजिबात इच्छा नाही की तू आता लगेच यावर मला काही उत्तर द्यावे. मला फक्त माझं मन तुझ्याजवळ मोकळं करायचं होतं, जे मी केलं. माझ्या भावना तुला सांगायच्या होत्या. अंतरा, तुझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे मला माहित नाही पण, मी तुझ्या सोबत कायम असेन ह्याची तू खात्री बाळग. मी वचन देतो तुला अंतरा जेव्हा कधी तुला माझी गरज लागेल मी तुझ्यासाठी तिथे कायम हजर असेन." 

किशनने त्याच्या मनातील भावना अंतरा समोर मांडल्या. त्याच्या बोलण्यावर तिच्याकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता. बोलून झाल्यावर किशन तसाच एकटक तिच्याकडे पाहून तिच्या मनाचा ठाव घेऊ लागला. 


काय असेल उत्तर अंतराचे? 

क्रमश:


🎭 Series Post

View all