प्रेमाचा रंग एक असाही भाग ८

मैत्री करणं सोपं असते परंतु एखाद्याचा जिवलग होणे हे नशीबाने होते. आयुष्यात जिवलग मित्र एक तरी असावा.
प्रेमाचा रंग एक असाही भाग ८ 


" सॉरी, म्हणजे मला माहित आहे कदाचित तुम्हाला माझ्या उत्तराची अपेक्षा असेल किंवा मी काही बोलेन यावर असं वाटत असेल पण, खरं सांगू का किशन, माझ्या मनात असं कधीच काही आले नाही. तुमच्यासाठी काय तर मी इतर कोणाचा विचार देखील या परिस्थितीत करू शकत नाही. माझंच आयुष्य मला नकोसं झाले आहे, त्यात अजून कोणाला तरी आणून त्यालाही त्रास द्यायचा नाही मला." अंतराला अश्रू अनावर झाले होते. तिच्या चेहऱ्यावर काळजी युक्त भीती स्पष्टपणे दिसून येत होती.

" ठीक आहे अंतरा. इट्स ओके. मी तुला फोर्स करणार नाही आणि नाही माझी तुझ्याकडून कोणतीच, कसलीच अपेक्षा आहे. मी प्रेम करतो याचा अर्थ तू देखील माझ्यावर प्रेम करावे असं काही नाही. आणि हो, आपलं बोलणं हे आपल्यातच राहील तू त्यांच टेन्शन नको घेऊस. मला माहितेय तुझ्या बाबांचा या गावात खूप मान आहे, आदर आहे, त्यांचे नाव किंवा तुझे नाव गावात खराब होईल असं मला काहीच करायचे नाही. आणि नाही मी कधी ते करणार. हा विषय मी पुन्हा कधीच काढणार नाही तुझ्या समोर सो डोन्ट वरी." किशन तिला कुठलाही त्रास होणार नाही किंवा कुठलाही दबाव येऊ नये म्हणून आश्वासन देत होता.

" बाबा!" अंतराने तिस्काराने तोंड फिरवले.

" का? काय झाले? असं का रिऍक्ट केलेस तू?" किशनला तिची प्रतिक्रिया समजली नव्हती.

" पहिली गोष्ट तुम्हाला सांगणं महत्वाचे नाही तरी देखील सांगते. प्रतापराव सूर्यवंशी हे माझे वडील नाहीत. आणि त्यांचं नाव, त्यांचा दरारा आहे या गावात म्हणून मी माझी ओळख इथे कॉलेजमध्ये लपवत आहे असं जर का तुम्हाला वाटत असेल तर आधीच क्लिअर सांगते असं काहीच नाही. ते इथे न सांगण्याचे माझं वैयक्तिक कारण आहे." अंतरा बोलताना तिच्या डोळ्यांतील आग आणि बोलण्यातला कडवटपणा किशनला चांगलाच समजत होता.

" ओके ओके. प्लिज तू शांत हो. आपण काही तरी खाऊन येऊया का. सॉरी, म्हणजे मला एकट्याने खाणं तसं बरं दिसत नाही. तू पण चल ना सोबत माझ्या." किशनने तिला शांत करण्यासाठी विषय बदलला.

" नाही नको. तुम्ही जा. मी निघते." अंतरा तिथून निघाली. 

" अगं अगं, थांब ना जरा. ते काय आहे ना, मला कॉलेजमधील कॅन्टीन माहित नाही ना, म्हणून म्हटलं तू पण चल माझ्यासोबत म्हणजे मला एकटं वाटणार नाही तिथे."  

किशन तिला थांबवून मनवू लागला. अंतराने थोडा विचार केला आणि त्याला होकार दिला दोघेही कॉलेज कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसले. एकत्र थोडंसं खाऊन त्यांनी मस्त चहा घेतला.

किशनचा स्वभाव तसा शांत असला तरी मित्र मैत्रिणींना हसवण्यात तो पारंगत होता. अंतराला देखील त्याच्या रूपात एक जिवलग मित्र भेटला होता.

किशनने पुन्हा प्रेमाचा किंवा घराचा कोणताच विषय अंतरा जवळ काढला नाही. तिच्या सोबत फक्त एक मित्र म्हणूनच तो बोलत असायचा. ती देखील त्याच्या सोबत छान रूळली होती. एक निःस्वार्थ मैत्रीचे नाते त्यांच्यात निर्माण झाले होते. असेच दिवस सरत होते. अंतरा आणि किशनची मैत्री दिवसेंदिवस अधिक घट्ट होत गेली. किशन तिला स्टेशनरीमधून लागणारे साहित्य कधीही आणून देत असायचा आणि ती देखील तिला वेळ मिळेल तसं अभ्यासात त्याला मदत करायची. अंतराला किशनचा स्वभाव आवडू लागला होता. त्याचा सहवास तिला हवाहवासा वाटत होता. किशन जितका शांत तितका तिच्यासाठी मस्तीखोर झाला होता. दोघांचे बॉन्डिग देखील छान जुळले होते. मानपान सोडून अंतरा आता त्याला एकेरी नावाने बोलवायची. तो देखील तिची थट्टा मस्करी बिनधास्तपणे करू लागला होता. रागावणं, चिडणं, चिडवणे, भांडण, रूसणं, मनवणं त्यांच्यात आता सहजरीत्या होऊ लागले होते.

" किशन, स्टेशनरी बंद केल्यावर मला भेटायला कॉलेज ग्राऊंडवर ये. थोडं काम आहे तुझ्याकडे?"

अंतरा दुपारच्या वेळी दुकानात येऊन किशनला हळूच म्हणाली.

" खुप महत्वाचे काम आहे का गं? आता सांग ना मग, लगेच करतो. त्यासाठी संध्याकाळची वाट कशाला बघायची? बोल." किशन तिच्याजवळ येऊन उभा राहिला.

" नाही रे; इतकं ही महत्त्वाचे नाही, पण महत्त्वाचे नसेल तर करणार नाहीस का माझं काम तू?"

अंतरा क्यूट फेस करून त्याच्याकडे पाहू लागली. तिचा तो फेस आणि तिचे हावभाव बघून किशनला हसू येत होते. त्याहून जास्त तो तिच्या त्या अवतारला भाळला होता. त्याक्षणी त्याला जगातील सर्वांत गोड अशी मुलगी ती भासत होती.

" नाही गं राणी. असं कसं? तुझं काम आहे मग ते व्हायलाच पाहिजे. ठिक आहे ना, येतो मी संध्याकाळी ग्राऊंडवर." किशन म्हणाला तसं तिने आनंदाने त्याला मिठी मारली.

" थँक्यू थँक्यू, लवकर ये मी वाट बघते तुझी. बाय." अंतरा निघून गेली तरी तो तसाच सुन्न होऊन तिथेच एकाच जागी उभा होता. अजूनही तिच्या स्पर्शात हरवलेला तसाच. जणू काही अजूनही तिची ती मिठी त्याला जाणवत असावी त्याच्या भोवताली असा एकाएकी शांत झाला होता तो.

दुकानातील सर्व कामे पटापट उरकून, येणाऱ्या मुलामुलींना लागणाऱ्या वस्तू देऊन किशन संध्याकाळी ठरलेल्या वेळी, आणि ठरलेल्या ठिकाणी आला. अंतरा त्याच्या आधीच येऊन तिथे उभी होती.

" लवकर आलीस तू? खुप वेळ झाला का इथे येऊन तुला?" तिला पाहून किशन धावतच तिच्याजवळ आला.

" लवकर आलीस काय? इथेच उभी आहे मी दुपारपासून आणि तू मात्र निवांत आता आलास?"

अंतरा लटका राग चेहऱ्यावर दाखवत चिडून बोलली.

" ओह्ह! सॉरी. मला वाटलं संध्याकाळी भेटायचं आहे आपल्याला म्हणून उशीरा आलो. खरंच सॉरी. म्हणजे मला नव्हते माहीत आपण दुपारीच भेटणार होते ते. माझ्या ऐकण्यात गफलत झाली असेल बहुधा." तिला रागावलेले पाहून किशनला खुप वाईट वाटले.

तिचे म्हणणे नीट ऐकले नव्हते वाटतं आपण हाच विचार करत तो तिची माफी मागू लागला.

" मी भले तुला संध्याकाळी बोलावले असेल तुला नाही का वाटलं आपण दुपारीच जाऊन अंतराची वाट बघत बसावं असं. कोणत्याही मुलीला बरं वाटतं जेव्हा एखादा मुलगा भेटण्याच्या ठिकाणी तिच्या आधी येऊन आतुरतेने तिची वाट पाहत उभा असलेला दिसतो ते." अंतरा स्वतःचे हसू ओठांत दाबत बोलली.

किशनला काही क्षण लागले तिने केलेली मस्करी समजायला. परंतु जेव्हा तिच्या बोलण्याचा अर्थ आणि हेतू त्याच्या लक्षात आला तसा तो तिला मारायला तिच्या मागे धावला. ती पुढे आणि तो मागे असाच टॉम ऍण्ड जेरीचा खेळ कॉलेजच्या संपूर्ण ग्राऊंडवर चालू झाला.

" तू थांब जरा अंतरा. तुला ना मी आता चांगले फटकेच देतो. तुझ्या मस्ती मध्ये जीव गेला असता माझ्या कोवळ्या मनाचा." किशन तिला पकडायला तिच्या मागे जोरात धावत होता.

" जा रे जा! म्हणे जीव गेला असता. कोवळं मन आणि तुझं? तुझं कोवळे मन इतक्या सहजासहजी कोमेजून देणार नाही मी. मी असेपर्यंत ते शक्यच नाही." जोरजोरात हसत, पुढे पळत अंतरा त्याला चिडवून दाखवू लागली.

शेवटी अथक परिश्रमाने किशनने अंतराला अडवलेच. दोन्ही हात बाजूला पसरून त्याने तिच्या भोवताली भिंत उभी केली. त्या खटाटोप मध्ये देखील तिच्या शरीराला कोणताही स्पर्श होणार नाही याची दक्षता त्याने घेतली. शेवटी अंतराने माघार घेतली. दोघेही हसत पुन्हा त्यांच्या आधीच्या जागेवर म्हणजे ग्राउंडच्या कोपऱ्यात येऊन उभे राहिले.

" ऐक ना किशन, मला ना तुला खूप महत्त्वाचे असं सांगायचे आहे. प्लीज ऐकशील का?" अंतरा धापा टाकत गंभीर झाली.

काय सांगायचे आहे अंतराला आता? ती देखील प्रेमात पडली का किशनच्या?

क्रमशः

🎭 Series Post

View all