प्रेमाचा रंग एक असाही भाग ९

मनात खुप साचलं असेल तर जगणं मुश्कील होतं. अशावेळी कोणीतरी हवं असतं मनमोकळे करण्यासाठी ती हक्काची व्यक्ती किशनच्या रूपात अंतराला भेटली होती.
प्रेमाचा रंग एक असाही भाग ९

" हा बोल ना." किशन देखील शांत झाला.

" तशी आता आपली ओळख बऱ्यापैकी चांगली झाली आहे, म्हणून तुला मनातलं सांगायला काही वाटत नाही. आणि खरं सांगू का किशन, मनात खूप काही साचलं आहे रे. मनातल्या मनात असं सगळं काही दाबून ठेवले आहे. त्या सगळ्यात जीव गुदमरतोय आता माझा. नेहमी मला असं वाटायचं की कोणाजवळ तरी मन हलकं करावं. मनातल्या सगळ्या सल, दुःख, त्रास त्याला सांगून मन कसं रिक्त करावं पण असं कोणी, कधी भेटलेच नाही रे मला. पण आता तू आहेस ना माझ्या जवळ तर मला असं माझ्या हक्काचं माणूस भेटल्या सारखं वाटतं आहे. म्हणून आज तुला सगळं काही सांगते. सूर्यवंशी हे माझे जन्मदाते वडील नाहीत. आणि मी सावत्र वडील देखील त्यांना मानत नाही. कारण ते जे वागले ना आमच्या सोबत तसं कोणी वैरी देखील आपल्या शत्रू सोबत असं वागणार नाही. माझं हसतखेळत कुटूंब त्यांच्यामुळे उध्वस्त झाले. दोन वर्षांपूर्वी माझं कुटुंब म्हणजे मी, आई बाबा आणि माझा मोठा भाऊ अभय. खुप आनंदात आयुष्य घालवत होतो रे आम्ही. माझे बाबा, सदाशिव कोळपे हाडाचा शेतकरी माणूस. आयुष्यभर गर्वाने त्यांनी शेती केली. जेमतेम शिक्षण झालेले असताना फक्त कुतूहलापोटी सर्व नवे आधुनिक तंत्रज्ञान वापरून जास्तीचे पीक घेण्यात ते पारंगत झाले होते. सरकारी योजना ज्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील त्या आवर्जून ते इतर गावकऱ्यांना ते सांगत असायचे. मुळात मृदू आणि हळवा स्वभाव असलेले माझे बाबा कायम इतरांना मदत करत असायचे. कोणी जर याचना घेऊन त्यांच्याजवळ आला तर स्वतःकडून जितकी होईल तितकी मदत ते करायचे. ती ही अगदी निःस्वार्थ भावनेने. मात्र एका रात्रीत आमचे आयुष्य पालटले. ती रात्र अजूनही मला जशीच्या तशी आठवते. मी आणि अभय अभ्यास करून झोपलो होतो. आई मात्र बाबांची वाट बघत दरवाजाजवळ बसली होती. बाबा जर कोणाला मदत करण्यासाठी घराबाहेर पडले तर त्यांचे परत येण्याची काही वेळ ठरलेली नसायची. सर्व काही विसरून, घरदार, मुले, बायको सगळं विसरून ते आधी काम पूर्ण करायचे. आम्हाला देखील सवय झाली होती त्याची. त्या दिवशी मात्र आईला बरे वाटत नव्हते. बाबा न जेवताच घराबाहेर पडले तेव्हा पासून तीच्या मनाला हुरहूर लागून राहिली होती. बाबा त्यांच्या मित्राला तालुक्याच्या गावाला घेऊन गेले होते. तिथे त्या मित्राची आई हॉस्पिटलमध्ये दाखल होती. बाबा त्याला सोडून माघारी येणार होते. परंतु खुप वेळ झाला तरी बाबा काही येत नव्हते. आम्ही सकाळपर्यंत वाट पाहीली. शेवटी संपूर्ण गावात शोधायला सुरुवात केली. परंतु बाबा किंवा बाबांचा तो मित्र यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. बाबा कोणत्या मित्रासोबत गेले ते देखील इतर कोणाला माहीत नव्हते. दिवसभर शोध घेऊन देखील बाबा सापडले न म्हणता आम्ही तिसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार केली. बाबांची माहिती देत असताना त्यांनी आम्हाला गावातील सरकारी दवाखान्यात जायला सांगितले. तिथे गेल्यावर आम्हाला डायरेक्ट आमच्या बाबांची बॉडी देण्यात आली. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. आईला भोवळ आली. तिचा तोल गेला आणि ती जमिनीवर निपचित पडली. अभय जोरजोरात रडू लागला. मला तर काहीच समजत नव्हते. आजुबाजूचा परिसर मला मुक झाल्याप्रमाणे भासत होता
मेंदू सुन्न पडला. काहीच काम करत नव्हता. बाबा आम्हाला सोडून गेले यावर विश्वासच बसत नव्हता माझा. ' मी लवकर घरी येतो गं बबडे ' असे म्हणणारे बाबा आता काहीच, एक शब्द देखील बोलणार नाही हे सत्यच मला मान्य करायचे नव्हते. पोरके पणाची भावना काय असते ना ते मी त्यावेळी पाहीले. एका रात्रीत माझं संपूर्ण कुटुंब विस्कळीत झाले."

अंतरा रडायला लागली. तिचे दुखः ऐकून किशनला देखील अश्रू अनावर झाले. त्याने तीच्या खांद्यावर हात ठेवून तिचे सांत्वन केले.

" अभयने बाबांचे सर्व सोपस्कार पार पाडले. मी आणि आई भावनाशून्य होऊन घरात बसलो होतो. त्याच वेळी आमच्या घरात पहिल्यांदाच त्या नराधमाचे पाऊल पडले. प्रतापराव सूर्यवंशी. त्यांनी घरी येऊन आईचे सांत्वन केले. अभयला चांगली नोकरी मिळवून देण्याचे, बाबा शेतकरी होते याचा फायदा उचलत सरकारकडून विम्याच्या पैसे, सर्व सरकारी योजना मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तसं आम्हाला सरकारी पैशाची काहीच गरज नव्हती. बाबांनी आम्हां दोघा भावंडांना पुरेल इतकं मागे ठेवून गेले होते. आम्हाला कुठलाही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी बाबांनी आधीच घेतली होती. परंतु बाबांनी ज्या माणसांच्या भरवश्यावर आम्हाला मागे ठेवले तीच माणसे मतलबी निघाली. ज्यांना ज्यांना बाबांनी सढळ हस्ताने मदत केली तीच माणसे बाबा गेल्यावर आमच्याकडे पाठ फिरवून निघून गेली. फक्त पैसे सोडले तर नातेवाईक किंवा जवळची माणसे म्हणून आमच्या सोबत कोणीच नव्हते. याच संधीचा फायदा घेत सूर्यवंशीनी आईला अगदी लाचार केले. आधीच आईला पाहून त्यांची नियत फिरली होती. त्यात सूर्यवंशीनी भिती घालून तिला त्यांच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. आणि आई देखील तयार झाली त्यासाठी. म्हणून मला तिचा देखील राग येतो. किशन सोपं असतं का रे एखाद्या जवळच्या माणसाला पटकन विसरणे? माझी आई खरंच विसरली का माझ्या बाबांना? तिने लग्न केले प्रतापराव सूर्यवंशी सोबत आणि आम्हाला घेऊन गेली सूर्यवंशी निवासस्थानी राहायला. सूर्यवंशी यांचे पहिले लग्न आधीच झाले होते. त्यांची पहिली बायको खुप वर्षांपुर्वी वारली होती. त्यांना तीन मुले होती. दोन मुलगे आणि एक मुलगी. त्यांची मुलगी खुप सुंदर होती दिसायला. सूर्यवंशी घराण्यांत तिच एक अशी व्यक्ती होती जी सर्वांना प्रेमाने बांधून ठेवायची. कोणीही असो त्याला क्षणभरात आपलसं करायची. अक्षरा, अक्षरा नाव तिचे. अगदी नक्षत्रासारखी दिसायला आणि स्वभाव तर पहाटेच्या वेळी हिरवेगार असणाऱ्या गवतावर पडलेल्या दवबिंदू प्रमाणे तेजस्वी, मोहक आणि नाजूक होता. त्यांच्या घरात तिच्या सोबतच आमचे चांगले ऋणानुबंध जुळले होते. परंतु ते बंध फार काळ टिकले नाही. तिला पाहताच क्षणी अभय तिच्या प्रेमात पडला होता. कालांतराने ती देखील त्याच्या प्रेमात पडली. त्यांच्या प्रेमाची भनक जेव्हा सूर्यवंशीना लागली तेव्हा....." अंतरा ते आठवून पुन्हा रडू लागली.

काय झाले असेल अक्षरा आणि अभय सोबत? काय होईल जेव्हा किशन आणि अंतराच्या मैत्री बद्दल सूर्यवंशीना कळाले ते?

क्रमशः

🎭 Series Post

View all