Login

प्रेमाचा सरळ मार्ग..! भाग -१

जे लोकं माणसांपेक्षा पैश्यांना किंमत देतात.. त्यांचे डोळे कशे उघडतात. या कथेत बघू.
पुण्यातल्या एका मोठ्या आयटी कंपनीत सकाळी आठ वाजता हलकीशी धांदल सुरू होती. कोणी कॉफी घेत होतं, कोणी हेडफोनमध्ये मिटिंग घेत होतं, तर काहींनी लॅपटॉपसमोर ‘Monday blues’ चे मीम्स शेअर केले होते.

पूजा देशमुख, वय वर्षे २९, प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून तिथं काम करत होती. शांत, प्रॅक्टिकल आणि कामात गुंतलेली. तिच्या टीममधले सगळे तिचा आदर करायचे, पण ती थोडी ‘रिझर्व्हड’ म्हणून ओळखली जायची.

त्या सकाळी लॅपटॉप उघडून ती ईमेल्स तपासत असताना एक नवीन मेल दिसला —
From: anonymous@xyzmail.com
Subject: “For your smile.”

पूजा थोडी गोंधळली. उघडून पाहिलं तर आत फक्त एक छोटं वाक्य होतं –

“कधी कधी तुमचं शांत राहणंही खूप काही सांगतं. Keep smiling.”

With Love, A.


ती भुवया उंचावून हसली. “कोण आहे हा ‘A’?” — मनात विचार आला. पण लगेच ती पुढच्या ईमेलकडे वळली.




पुढच्या काही दिवसांत पूजा ते विसरली होती. पण बुधवार सकाळी पुन्हा एक मेल –

“मी रोज तुला ऑफिस कॅफेटेरियात पाहतो, कॉफी घेताना तू नेहमी जास्त साखर घालतेस, पण तरीही चेहऱ्यावर गोडवा नाही का?”

With Love, A.


यावेळी तिचं हसू थांबत नव्हतं. कोणीतरी तिचं इतकं बारकाईनं निरीक्षण करतंय? ती थोडी अस्वस्थही झाली, पण मेलमध्ये एक वेगळी सभ्यता होती — कुठेही अश्लीलता, चावटपणा नव्हता. फक्त एक सूचक भावना.

तिने ठरवलं, पुढच्यावेळी ऑफिस कॅफेटेरियात कोण कोण तिला बघतंय, ते पाहायचं.



कॅफेटेरियात बसलेली पूजा तिची कॉफी घेत होती. तिच्या आजूबाजूला अनेक लोक — काही जुनियर, काही सीनियर, काही अनोळखी चेहेरे.
ती नजर फिरवत होती, पण कोणाच्याही चेहऱ्यावर “तोच” असा संकेत नव्हता.

त्याच दिवशी दुपारी पुन्हा एक मेल —

“आज तू निळ्या रंगात होतीस. तुझं हसू थोडं नकली वाटलं. काही त्रास आहे का?”

With Love, A.


आता तर पूजा थोडी थक्क झाली. हा व्यक्ती तिला बघतोय, तिची भावना ओळखतोय — पण कुठे? कोण? कसा?

संध्याकाळी ती तिच्या जवळच्या मैत्रिणी नेहाला सांगते.
“नेहा, कोणीतरी मला रोज ईमेल पाठवतोय... पण फार गोड शब्दात. असं वाटतं, जणू ओळखतो मला.”

नेहा हसली — “कदाचित तुझा सिक्रेट ऍडमाइरर असेल. कधी कधी लोक सांगू शकत नाहीत, म्हणून मेलचा आधार घेतात.”

पूजाने डोळे मिटले. मनात एक छोटा ठिणगीचा प्रकाश पसरला — कोणी माझ्याकडे मनापासून बघतंय.
पण तो कोण?



पुढच्या आठवड्यात मेल्स अधिक कवितासदृश झाल्या.

“तुझं चालणं म्हणजे एखाद्या संथ रागाचं संगीत.
आवाज न करता तू जग हलवतेस.”

With Love, A.


तीन दिवसांनी पूजा एका मिटिंगमध्ये होती. तिथं नव्याने आलेला तिचा जुनिअर अभिषेक दाते — प्रोजेक्ट टीममध्ये होता.
त्याने एक प्रेझेंटेशन दिलं आणि शेवटी शांतपणे तिच्याकडे पाहिलं.
ती नजर एका क्षणासाठी अडकली. “A...” तिच्या डोक्यात नाव झळकलं.

पण लगेच मन म्हणालं — “इतकं सरळ नसतं आयुष्य.”




पूजा आता रोज सकाळी ईमेल उघडत असताना थोडं धडधडत असे.
कधी मेल असे –

“आज ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये तू थोडी गोंधळलेली वाटलीस. काही बोलावंसं वाटतंय का?”

तर कधी कविता —

"तुला पाहिलं की कामही कविता होतं,
आणि ऑफिस एक छोटंसं स्वप्नासारखं जग वाटतं."


तर कधी फक्त एक ओळ –

“कधी तरी स्वतःकडे पाहा, तू किती सुंदर आहेस.”


ती या मेल्समुळे हळूहळू हसणं शिकू लागली.
तिचं मन हलकं झालं. ती एकटी नसल्याची जाणीव तिला होत होती — जरी समोर कोणी नसलं तरी.



एका संध्याकाळी नेहा म्हणाली, “जर तुला खरंच जाणून घ्यायचं असेल, तर त्या ईमेलला उत्तर दे. काही साधं लिही — बघ तो काय लिहितो.”

पूजाने ठरवलं.
तिने उत्तर दिलं —

“मला माहित नाही तू कोण आहेस. पण तुझ्या मेल्समुळे मी विचार करायला लागले आहे. का?”


त्याचं उत्तर काही तासांत आलं —

“कारण तू तसं वाटावंसं पात्र आहेस.”

With Love, A.


त्या रात्री पूजा झोपू शकली नाही.



हळूहळू संवाद वाढू लागला.
आता मेल्स फक्त एकतर्फी नव्हते.
ती त्याला तिचे विचार सांगत होती —
कामाचं प्रेशर, शहराचं एकटेपण, तिच्या आईबाबांची काळजी , छोट्या आनंदांची गोष्ट.

तो उत्तर देई —

“तू थकली असशील, पण हार मानू नकोस.
थोडं संगीत लाव आणि स्वतःला मिठी मार.”


“कधी कधी जग बदलण्यासाठी नाही, तर स्वतःला समजण्यासाठी जगावं लागतं.”


अशा मेल्समध्ये एक वेगळं, शांत, भावनिक नातं तयार होत होतं.


एक दिवस पूजाने विचारलं —

“मी तुला भेटू शकते का?”


उत्तर आलं —

“आता नाही. अजून थोडं वेळ जाऊ दे. काही गोष्टी शब्दांत जास्त सुंदर वाटतात.”

With Love, A.


ती थोडी दुखावली, पण कुठेतरी त्याचं न बोलणंही अर्थपूर्ण वाटलं.

त्यानंतर काही दिवस मेल येणं बंद झालं.
ती रोज लॅपटॉप उघडे, पण काहीच नाही.
रिकामं इनबॉक्स आणि जड मन.


पंधराव्या दिवशी एक नवीन मेल आलं –
Subject: “शेवटचं पत्र”

“प्रिय पूजा,
तू विचार करत असशील, मी अचानक का नाहीसा झालो.
खरं सांगायचं तर मी तुझ्या आसपासच आहे.
तू मला पाहतेस रोज – कधी मिटिंगमध्ये, कधी कॅफेटेरियात, कधी लिफ्टमध्ये.
पण मी स्वतःला तुझ्यासमोर आणू शकत नाही.
कारण मला माहित नाही, माझं नाव ऐकल्यावर तू काय म्हणशील.
तरीही, हे शब्द तुला नेहमी आठवतील अशी माझी इच्छा आहे –
तू सुंदर आहेस, तुझं मन सोन्यासारखं आहे,
आणि मी तुझ्या हसण्यात जगलो आहे.

With Love, A.”


पूजाचं हृदय जोरात धडकत होतं.
ती मेल पुन्हा पुन्हा वाचत होती.



दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ती शांत होती. मिटिंग संपल्यावर अभिषेकने विचारलं, “तू ठीक आहेस का?”
ती थोडी घाबरली, पण म्हणाली, “हो, का विचारलंस?”
तो हलक्या आवाजात म्हणाला —
"तुला पहिलं की कामही कविता होतं,
आणि ऑफिस एक छोटंसं स्वप्नासारखं जग वाटतं."

ती क्षणभर थबकली.
तो पुढे म्हणाला, “हो, मीच तो ‘A’ आहे.”

तिच्या डोळ्यांत पाणी आलं, पण ती काही बोलू शकली नाही.
तो म्हणाला—“मी पहिल्या दिवसापासून तुझं निरीक्षण केलं, पण कधी धाडस नाही झालं.कारण मीं तुझा जुनिअर आहे.भीती वाटायची मला खूप.
तुझं काम, तुझं एकटेपण — सगळं दिसायचं. म्हणून मेल्स पाठवू लागलो. तू हसावीस म्हणून.”

ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली.
आणि तिने लगेच त्याला मिठी मारली.


पुढच्या काही आठवड्यांत अभिषेक आणि पूजा हळूहळू जवळ आले.
ते मेल्स थांबले, पण त्यांची जागा घेतली खरी भेट, खरी बोलणी आणि एक हळुवार स्नेह.

एका दिवस तिच्या टेबलावर एक छोटं नोट पडलं –

“कधी तरी काहीही लिहायचं राहिलं तर, मी इथेच आहे.

With Love, A.”


ती नोट वाचून पूजा हसली.
मनात विचार आला —
“कधी कधी प्रेम बोलून नाही, लिहून येतं. आणि त्या शब्दांत आयुष्यभराचं मौन दडलेलं असतं.”
0

🎭 Series Post

View all