Login

प्रेमाचे बंध (भाग/३)

कथा मालिका


भाग/३

दोघांनीही एकमेकांना धीर दिला.

पुढे...

मालतीताई फुलदाणीचे तुकडे उचलून केराच्या टोपलीत टाकत होत्या. तेवढ्यात नुपूर आणि दोन्ही नातवंडे आली. तिने सासुबाईंना केराच्या टोपलीत काहीतरी टाकतांना बघीतले. मालतीताई आत गेल्यावर केराच्या टोपलीत काय फेकले हे बघण्यासाठी ती गेली. तर फ्लॉवर पॉट बघून तिला राग आला.

तडक आत गेली आणि जी काही तोंडाची तोफ सुरू केली की थांबायचे नावच घेत नव्हती.
" तुम्हांला इथे आणून किती मोठी चूक केली आम्ही. तरी राजेशला सांगत होते. अरे, नको आणू गावाकडून यांना म्हणून. एकतर सगळं राहणं गावठी, ना कुठले मॅनर्स,ना एटीकेट. मुलांवर देखील वाईट संस्कार टाकतात. एकतर घर एवढं, त्यात यांना वेगळी खोली पाहिजे. कधी टि.व्ही ,तर कधी वर्तमान पेपर हवा. दोन घास खाऊन चुपचाप पडून रहावे तर तेही जमत नाही."

मालतीबाईंचा संयम सुटला होता.

"अगं, तू रोज काय करते आमच्यासाठी स्वयंपाक. ना चटणी,लोणचे,पापड ते तर सोड साधा वरणभात सुध्दा करता येत नाही तुला. वाटीभर भाजी आणि चार पोळ्या ठेवतेस करून. आम्ही रोज पाण्यात भिजवून खातो. कळतं का तुला.
बरं आपण स्वतः च्या हाताने करावं तर काही सापडत पण नाही आणि तुला आवडत देखील नाही. एक फ्लाॅवर पाॅट फुटला तर एवढा आकांडतांडव करू लागली. हे घे पाचशे रुपये आणि घेऊन ये फ्लाॅवर पाॅट. तुला जो पाहिजे तो."

मालतीबाई चुप बसा आता चला येथून.

तिच्या बोलण्यातून जो राग जाणवत होता त्यामुळे दोघांचेही डोळे भरून आले होते.
ते दोघेही निमूटपणे आपल्या खोलीत निघून गेले.

तेवढ्यात त्यात राजेश आणि त्याचे सर कधी येऊन उभे राहिले हे देखील तिला कळले नाही.

नुपूर... थांब जरा.

राजेशच्या आवाजाने ती मागे वळली. तर राजेश सोबत त्याचे सर होते. ते पाहून तिला जरा ओशाळल्यासारखे झाले.

"साॅरी राजेश. मला कळलंच नाही तुम्ही कधी आलात ते."

या ना सर. या आत या.

राजेश ज्या घरात आई वडीलांचा अशा प्रकारे अपमान केला जातो. तिथे पाय टाकायची इच्छा होत नाही. आपण भेटू ऑफीसला. अप्पा,माई काहीही मदत लागली तर मला नक्की सांगा. हे माझं कार्ड. बिनधास्त फोन करा. येतो मी. नमस्कार करून सुशांत देशमुख निघून गेले.

"सर, थांबा ना सर."

पण ,ते निघून गेले.

"नुपुरू काय केलं हे? तू माई अप्पांना का बोलत होती एवढं. अगं, त्यांच्या वयाचा तर मान ठेवायचा ना आणि मुलांवर ते नाही तू वाईट संस्कार करते आहेस‌. माई काय बोलली आता. चार पोळ्या आणि वाटीभर भाजी. अगं थोडी तरी माणुसकी शिल्लक आहे की ती विकून खाल्ली."

"हे‌ बघ राजेश, तू मला का बोलतो आहे एवढा. ते माझ्या घरात राहात आहे. त्यामुळे ते माझ्या मर्जीनेच वागतील. तू यात पडू नकोस. एकतर तू घरी नसतोस. वेळी अवेळी घरी येतोस आणि जातोस. त्यामुळे सगळं मला बघावं लागतं. आता तू सुद्धा माझ्याशी असा वागायला लागला तर तू..."

"हे बघा आता तुम्ही दोघं भांडू नका. राजेश गावाकडच्या घराची किल्ली दे. आम्ही दोघं परत जातो. आम्ही आमचं जीवन सुखाने जगतो आणि तुम्ही सुद्धा आनंदाने जगा."

"बाबा मला माफ करा. मी नुपूरच्या वतीने क्षमा मागतो. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका."

राजेशचे त्याच्या आई वडीलांविषयी नितांत प्रेम होते. त्यामुळे मुलाच्या आग्रहामुळे त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला.

"राजेश आतापर्यंत खूपदा आमचा अपमान झाला आहे आणि तो सहन केला, पण आता यापुढे आम्ही सहन करणार नाही."

"बाबा तुम्ही काळजी नका करू. आरामात रहा."

पण, त्या दिवसांपासून नुपूर आणि राजेशचे संबंध बिघडले. मनापासून स्वीकारलेल्या नात्यांना वाळवी लागली.

माई आणि अप्पा हे सगळं बघत होते. त्यांना फार वाईट वाटत होते की आपल्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली.म्हणून त्यांनी काही तरी ठरविले.

काय ठरविले असेल. पाहुया पुढच्या भागात

©® आश्विनी मिश्रीकोटकर


🎭 Series Post

View all