Login

प्रेमाची आस....

फसवे प्रेम आणि निखळ मैत्री याची कहाणी...
प्रेमाची आस

भाग 2:

शुभदा घरी आली खरी, पण थोडी हरवल्या हरवल्यासारखी होती. मुलींनी ,सासू-सासर्‍यांनी तिचे कौतुक केले, पण शुभदाचे लक्षच नव्हते. ती स्वतःच हरवली होती. सभागृहाच्या बाहेर निघाल्यापासून तिच्या नजरेसमोर सारखा तोच तोच चेहरा येत होता. त्याची बोलण्याची पद्धत, त्याने दिलेला तो आदर, तो सन्मान तिला सुखावून गेला होता. तिच्या मनातल्या 'कृष्ण सख्या ' सोबत या चेहऱ्याची तुलना तिच्या मनात सुरू झाली होती.

शुभदा म्हणजे एक सर्वसामान्य घरामध्ये जन्मलेली मुलगी. वडील एका मोठ्या दुकानात हिशोबाचे काम करत तर आई स्वयंपाकाची कामे करत होती. दोघी बहिणी आणि एक भाऊ यांचा उदरनिर्वाह आई-वडिलांच्या कमाईवर भागत असे. शुभदाला जन्मजातच गोड गळ्याचे वरदान लाभले होते.


पण जेमतेम परिस्थिती असल्यामुळे तिला संगीताचे शिक्षण घेता आले नाही. बारावीपर्यंत शिक्षण झाले आणि आई-वडिलांनी साधन परिस्थिती असलेल्या एका किराणा दुकानदारासोबत तिचे लग्न लावून दिले. शुभदाची स्वप्ने मात्र खूप मोठी होती.

' कोणी राजकुमार आपल्याला घेऊन जाईल. आपले सगळे हट्ट पुरवेल. महागड्या भेटवस्तू, भरपूर दागिने, आणि एशोआरामात जीवन! '

पण प्रत्यक्षात मात्र यातलं काहीच घडलं नाही. छोट्या दुकानातून मिळणाऱ्या कमाई वरच तिला घर खर्च भागवावा लागे. सासुबाई आणि सासरे घर घरच्यांसाठी थोडा हातभार लावत, पण तिचे स्वप्न मात्र हवेतच विरून गेले होते. बाकी हट्ट तर सोडाच, पण ती तिची कला सुद्धा जोपासू शकली नाही.

आज लग्नाच्या 18 / 19 वर्षानंतर तिला परत एकदा कलेची साधना करायला मिळाली होती. भरभरून कौतुक ही झाले होते, पण इतके वर्ष तिच्या मनातल्या कृष्ण सख्या सोबत बोलत असे, सुखदुःख वाटून घेत असे, तोच तिच्यासमोर आला होता. पण शंतनूच्या रागीट स्वभावामुळे ती त्याचे आभार देखील मानू शकली नव्हती.

'काय असेल बरे त्याचे नाव? पुन्हा भेटेल का तो मला?' या तळमळीतच कसातरी पहाटे पहाटे तिचा डोळ्याला डोळा लागला.

सात आठ दिवसांनी भाजी घेण्यासाठी शुभदा मंडईत आली होती. भाजीवाल्या सोबत घासघीस करताना अचानक एक आवाज तिच्या कानावर पडला. तोच आवाज तिला आदराने बोलणारा, तिला आश्वस्त करणारा, लाघवी प्रेमळ आवाज.....
तिने मागे वळून पहिले. स्पोर्ट्स शूज, ट्रॅक पॅन्ट, काळ्या रंगाचा टी शर्ट, घातलेला राहूल त्याच्या मित्रांसोबत मॉर्निंग वॉक साठी जात होता. काळासावळा रंग, भेदक डोळे, उत्तम शरीरयष्टी, चेहऱ्यावर मिश्किल भाव आणि चेहऱ्याला साजेशी मिशी असणाऱ्या राहुलला पाहताच तिचे हृदय धडधड करू लागले.

राहुल तिला पाहताच थांबला. शुभदाच्या आवाजाचा तो चाहता होता. लांबलचक केस, भरपूर उंची, सतेज चेहरा, असं शुभदाचं व्यक्तिमत्व! शुभदाच्या नजरेतलं वेगळेपण त्याच्या लक्षात आले. शुभदाच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज राहुलला आला.

स्त्रीच्या डोळ्यातले भाव बघून तिच्या अंतरंगात उतरणे पुरुषांना मिळालेली दैवी शक्ती आहे. राहुल ने तिचे अंतरंग सहज टिपले.

त्याने स्वतःहून शुभदा सोबत गप्पागोष्टी केल्या. एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाण-घेवाण झाली. तिच्या गायनाचे त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. तो तिला ते पाठवणार होता.

दुर्दैवाने म्हणा किंवा कर्मधर्म संयोगाने, दोघेही एकाच शहरात एकाच भागात राहत होती.

गाण्याचे रेकॉर्डिंग पाठवण्याच्या उद्देशाने घेतलेल्या मोबाईल नंबर वर कधी इतर गप्पागोष्टी चालू झाल्या , ते दोघांनाही कळले नाही. गुड मॉर्निंग , हाय वगैरे पासून सुरू झालेले मेसेजेस मिस यु ...... लव यू पर्यंत पोहोचले. घरच्यांपासून मोबाईल लपू लागले. चोरून मेसेजेस, चोरून बोलणे, मोबाईलचा पासवर्ड बदलले, या गोष्टी सुरू झाल्या.

प्रियाला राहुलचे हे वागणे खटकत होते. कोणासोबत बोलताना बदलणारा आवाज, मेसेजेस करताना चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव काही वेगळेच सांगत होते.

नवरा चुकीचा वागत असेल, तर त्याची जाणीव तात्काळ होते. त्याचे डोळे , हृदयाची धडधड, हाताचा स्पर्श बायकोला खरं खरं सांगून जातो.

प्रियाला हे सगळं जाणवत होतं. काही चुकीचे समाजमान्य नसलेले घडते आहे हे तिला समजले. वयाच्या या टप्प्यावर,
मुले तरुण होत असताना, घडते आहे, आणि हे कुठेतरी थांबायला हवं. प्रियाने मनाशी पक्के केले.

फक्त राहून राहून तिच्या मनात एकच प्रश्न सतावत होता,
" माझ्या मध्ये काय कमी आहे? मी कुठे कमी पडले? आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात, या टप्प्यावर दुसरी स्त्री येणं, म्हणजे पत्नीसाठी जिवंतपणीचा नरक!! विचार करून करून प्रियाचे मानसिक संतुलन बिघडत चालले होते.

राहूल आणि शुभदा मात्र या फसव्या, अनैतिक जगात बेधुंदपणे वावरत होते. नवीन आणभाका, चोरून फिरणे त्यांना गैर वाटत नव्हते. महागडे गिफ्ट्स, सतत मिळणारे अटेंशन याने शुभदा सुखावून गेली होती.
तर 'आपण या वळणावर देखील असे नाते तयार करू शकतो.' हा पुरुषी अहंकार राहुलला सुखावत होता. या सगळ्यात प्रियाचा बळी जातो आहे, हे राहुलच्या लक्षात येत नव्हते.

शुभदासाठी तिच्या स्वप्नातला " कृष्णसखा " तिला मिळाला होता. नैतिक, अनैतिकतेची चाड तिला राहिली नव्हती. खोटी स्तुती, उथळ प्रेम, जाणीवपूर्वक केले जाणारे कौतुक याला ति भाळली होती.

एका स्त्री चं प्रेम स्वच्छ, निर्मळ, वासनाराहीत असेलही, पण पुरुषाला मात्र या पुढे जाऊन काहीतरी हवं असतं. लग्नानंतर ही आपल्याला " गर्ल फ्रेंड " आहे, हा त्याच्यासाठी स्टेटस सिम्बॉल होऊन जातो. राहुलचा इगो देखील याच आभिमानाने फुलला होता.


भांडण करून, संशय घेऊन, आरडा ओरडा करून काही होणार नाही, हे प्रियाच्या लक्षात आले.

तिच्या सद्गुरुनी सांगितलेले एक वाक्य तिने मनात कोरून ठेवले होते. " ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही., त्या बदलण्याच्या फंदात न पडता, आपण स्वतः त बदल करून घ्यावा.. "

तिने तो सल्ला तंतोतंत पाळला. रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच शुभदासोबत ओळख वाढवून घेतली. निखळ मैत्रीला प्रेमाला आसुसलेल्या शुभदाला प्रियाने स्वच्छ मनाने ,निस्वार्थी मैत्रिणी जिंकले. शुभदाला एव्हाना खऱ्या प्रेमाचा अर्थ समजला होता.

आज सकाळीच राहुलच्या मोबाईलचा मेसेज टोन वाजला. त्यांनी गडबडीने मोबाईल बघितला, शुभदा चा मेसेज होता,........

" प्रेम आणि निखळ मैत्री या दोन्हीत मी मैत्रीची निवड करते आहे. ज्याच्या शेवट फक्त सर्वनाश आहे त्या नात्याला सोडून, मी प्रियाच्या निखळ, निर्मळ ,मैत्रीला जास्त प्राधान्य देते. त्यामुळे आजपासून आपल्यात असलेले नाते संपले.


गुड बाय........ "