Login

प्रेमाचे घरटे (भाग १)

जलदकथा

प्रेमाचे घरटे

"आई, आई... हे बघ काय झालं?"
आराध्या घरात धावत आली. तिचे डोळे भरून आले होते. हातात काहीतरी धरलेलं होतं – एक अंड्याचा तुकडा."

"अगं आराध्या काय झालं ओरडायला आणि रडायला?"

"आई, हे बघ अंड कसं फुटलं आणि त्यातलं बाळ मेल ग. त्याची आई बघ कशी शांत बसून आहे. किती दुःख झाले आहे त्या पक्षाला? काहीच हालचाल सुध्दा करत नाही. मला वाटत तो पक्षी रडत आहे ग."

अंगणात असलेले मोठ्या कडुनिंबाच्या झाडाची फांदी त्यांच्या वरच्या खोलीतल्या बाल्कनीत आलेली होती. त्यामुळे खूप छान शुध्द हवा मिळत होती. त्याच झाडाच्या फांदीवर बसून फुटलेल्या अंड्याकडे तो पक्षी एकटक बघत होता. मरून पडलेल्या आपल्या पिल्लाला बघून तो हतबल झाला होता. करूणा आणि अश्रुंनी जणु त्याच्या ह्दयावर घाव घातला होता.

"आराध्या, रडू नको बर. इकडे ये."

स्मिताने तिला जवळ घेतले. समजावून सांगितले.

"आई, आपण गॅलरीत पाणी आणि धान्य ठेवू या का? म्हणजे कसं त्या पक्षाला जरा बरं वाटेल."

दोघींनी मिळून दाणे आणि वाटीत पाणी आणून ठेवले. पण आराध्याचे मन चलबिचल झाले होते. स्वतः च्या बाळाच्या मृत्यू मुळे आई किती कासावीस होते ना! किती प्रेम असतं दोघांचं एकमेकांवर !

"आई, त्याचे बाबा कुठे असेल ग? त्यांना नसेल झाले का दुःख."

"होत ना दुःख. अग हे निसर्गाचे चक्रच आहे. जिथे मनुष्यच नाही तर सगळेच जीव त्यात असतात.'

खरंतर आज आराध्याच्या बोलण्याने स्मिता भारावलेली होती. किती तरी वेळ आराध्या आत बाहेर करत होती. तो पक्षी सावरला असेल की नाही. त्याने पाणी पिले की नाही? दाणे खाल्ले की नाही? सतत त्याच विचारात होती. हळूहळू संध्याकाळ झाली. आराध्या आता तिच्या वडीलांची वाट बघत होती. कधी एकदाची हि गोष्ट तिच्या बाबांना सांगते असे तिला झाले होते.

या घटनेमुळे स्मिताला अचानक तिच्या आयुष्यातली केलेली एक चूक प्रकर्षाने जाणवली. संपूर्ण दिवस गत काळातल्या स्मृतीत पुरती अडकून गेली. आराध्याचा प्रत्येक शब्द तिच्या जिव्हारी लागत होता. स्मिताने ते पिल्लू उचलले आणि छोटासा खड्डा करून त्यात पुरले. तिचे हात थरथरत होते. डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते. याच हातांनी तिने तिच्या बाळाला पुरले होते. ही गोष्ट ती कधीही विसरू शकत नव्हती.

"आराध्या आत आत बाहेर करणे थांबव बर. चल तू जेऊन घे. मग अभ्यास पण करायचा आहे ना !"

"आई, मी बाबांसोबतच जेवण करणार.
तेवढ्यात अनिकेत आला.

"आई , बाबा आले."

तिघांनी मिळून आधी जेवण केले. जेवण होताच आराध्याने दिवसभरात घडलेल्या घटनांचा वृतांत कथन केला. आराध्या त्या रात्री अनिकेतच्या कुशीत विश्वासाने झोपी गेली होती.
स्मिता मात्र अस्वस्थ झाली होती. तो क्षण, तो दिवस ती कधीच विसरू शकत नव्हती. खिडकीतून बाहेर बघतांना तिचं लक्ष त्या पक्षाकडे गेले. तर तो सुद्धा अजुनही अस्वस्थपणे झाडावर बसला होता. अंधाराचे साम्राज्य पसरले होते. तरीही त्याच्या नजरेत एक आशा जाणवत होती. त्यांची सैरभैर नजर स्मिताला स्वस्थ बसू देत नव्हती. आपली पहिली आठवण, आपलं प्रेमाच प्रतिक असलेल आपलं बाळ... तो पक्षी माझ्या प्रमाणेच त्याच्यात एक हरवलेली आई शोधत होता. हृदयाची धडधड वाढली होती. तेवढ्यात अनिकेत उठून तिच्या जवळ आला.

"स्मिता, विसर आता तो भुतकाळ. नव्या उमेदीने जग. अग एवढ्याशा घटनेने तू इतकी हतबल का झाली आहेस? आता आराध्याच आपलं जग आहे."

तो तिला स्वतः च्या जवळ घेतो आणि मोठ्या विश्वासाने तिला दिलासा देतो.

"अग माणसाने कोणत्याही गोष्टीत इतकं गुंतून पडू नये. "

"हो कळतंय मला."