Login

प्रेमाची वीण - भाग -12

Premachi Vin

भाग - 12


( मागच्या भागात आपण बघितले - अनिकेत नेहाला प्रपोज करतो आता पुढे )


     नेहा सिंगल मदर होती, ओवी तिच्या जगण्याचा केंद्रबिंदू होती, ती शिक्षिका होती त्यामुळे ती मुलांना शिकवण्याचा आनंद घेत असे. शाळेतील तिचे विद्यार्थी तिच्यावर खूप प्रेम करत. मात्र, ती आतून खूप एकटी होती. पण ओवी तिच्या आनंदी असण्याचं कारण होतं त्यामुळे ती ओवीकडे बघून तात्पुरता मनात आलेला प्रेमाचा विचार झटकून टाकत असे.


      ओवीच्या भविष्याचा विचार करत तिने आपल्या आयुष्यात कोणालाही स्थान दिलं नव्हतं. पण प्रेम हे नियतीने लिहिलेलं आहे कां, असा ती विचार करू लागली.


      अनिकेत पण खूप हसमुख आणि संवेदनशील होता. त्याला मुलांच्या सोबत वेळ घालवायला खूप आवडत असे.  पण हा मुलगा ओवीला तिचे वडील ह्या नात्याने स्वीकारेल कां असा प्रशन नेहाला कालपासून सतावत होता.
     

     नेहाने ही थोडासा काळ कां होईना पण अनिकेतच्या साधेपणात एक वेगळं आकर्षण अनुभवलं. कामाच्या निम्मिताने दोघांचं एकत्र सतत बोलणं सुरु असायचं, ही मैत्री हळू हळू घट्ट होतेय हे असं वेगळं काहीतरी आहे ह्या नात्यात, त्यांच्यातली ही मैत्री हळूहळू एका वेगळ्या नात्यात परिवर्तित झाली आहे असं तिलाही हल्ली वाटू लागलं होतं.


     ती इतकी वर्षं फक्त ओवीच्याच भविष्याचा विचार करत होती, पण तिचं स्वतःचं आयुष्यही महत्त्वाचं होतं हे समजायला तिला वेळ लागला,  अनिकेतनेने तिच्या जीवनात एक नवीन आशा आणि उमेद निर्माण केली होती.


      अखेर काल अनिकेतने त्याच्या भावना नेहा समोर मांडल्या आणि ठरवलं की आता त्यांच्या नात्याला एक नाव द्यायचं आहे. पण नेहा त्याचं प्रेमाचं बोलणं ऐकून निशब्द झाली होती, काय उत्तर द्यावं ह्याला अशा विचारात ती अडकली होती.


    एक मन सांगत होतं, कि माझ्यावर ह्याचं एवढं प्रेम आहे असं हा म्हणतोय तर हा मला ओवीसकट स्वीकारेल ही आणि एक मन सांगत होतं कि हा कदाचित प्रेमापोटी स्वीकार करेल ही पण ह्याच्या घरचे त्याला माझ्याशी लग्न करू देणार नाहीत, कोण अशा मुलीला स्वीकारेल कि जिला लग्नाआधीच आईपण मिळालं आहे.


       तिच्या मनातल्या रिकाम्या जागेची आठवण तीला नेहमीच व्हायची,  नऊ वर्ष ओवीच्या पालनपोषणात, कामात ती एवढी गुंतली होती कि स्वतःच सुख कशात आहे हे ही विसरली होती.

   

    अनिकेतच्या ह्या प्रशनाने तीला अंतर्मुख केलं, त्याच्या उपस्थितीत तीला एक नवा विश्वास वाटू लागला कि ती अजूनही प्रेम अनुभवू शकते, तीला आनंदी होण्याचा अधिकार आहे.तिच्या मैत्रिणींसारखा काळजी करणारा आपल्याला एक नवरा असावा असं तीला कायम वाटतं असायचं.
   

       एका निर्णयामुळे सगळेच दुरावले होते, पण आता आई - भाऊ निदान बोलतायत तरी, नियतीच काय नियोजन आहे माझ्यासाठी, काय आहे माझ्या नशिबात असा ती विचार करू लागली.


    दुसऱ्या दिवशी ती शाळेत गेली तर अनिकेतने तिच्याकडे बघून स्मित हास्य केलं आणि जवळ येऊन बोलला आज आपण शाळा सुटल्यावर इथल्या एका जवळच्या कॅफेमध्ये बसून बोलूया, मला तुझं उत्तर ऐकायची घाई आहे, बरं चालेल असं बोलून नेहा तिच्या वर्गावर निघून गेली.


        शाळा सुटल्यावर अनिकेत समोर तिची वाट बघतच उभा होता, तीला चल आपण कॅफेमध्ये जाऊ असं तो बोलल्यावर ती सरळ त्याच्याबरोबर चालू लागली. कॅफेमध्ये गेल्यावर अनिकेत बोलला हा नेहा आता बोल काय प्रॉब्लेम आहे तुझा, कां तू मला होकार देऊ शकत नाहीस...


         नेहा सांगू लागली - अनिकेत मी मूळची मुंबईची आहे, मी इथे माझ्या फॅमिलीबरोबर राहत नाही तर मी माझ्या मुलीबरोबर राहते, काय - असं अनिकेत अचंबित होऊन बोलला. तुला मुलगी आहे, काहीही काय सांगतेस...


       नेहा बोलली हा हेच खरं आहे आणि मला लग्नाआधी झालेली माझी मुलगी आहे, तिचं नाव ओवी आहे ती नऊ वर्षाची आहे. कदाचित तुला माझ्या राहणीमानावरून माझं वय जास्त वाटलं नसेल पण माझं वय पस्तीस आहे आता. माझ्या आयुष्यात माझ्याकडून एक चूक घडली होती आणि त्यातून ओवीचा जन्म झाला आहे, मी ओवीबरोबर इथे पुण्यात राहते आहे.


         हे सगळं ऐकून अनिकेत स्तब्ध झाला होता, नेहा त्याच्याकडे बघून बोलत होती त्याचा चेहरा बदलत होता, तो हे ऐकून घाबरला आहे हे ही तीला वाटू लागले. तुला मला माझ्या मुलीसकट स्वीकारावे लागेल हे बोलल्यावर तर अनिकेतच्या चेहऱ्याचा रंग चं उडाला. आणि ते नेहाने हेरलं... अनिकेत एक ही शब्द बोलत नव्हता हे बघून नेहाचं बोलली खरं कारण ऐकलंस ना आता अजूनही तुला माझ्याशी लग्न करायचं आहे कां...


         अनिकेत तिच्या प्रशनाने गंगारला आणि बोलला, आई - बाबा ह्या नात्याला कधीच संमती देणार नाहीत, तरीही मी त्यांना विचारतो. पण त्याचा चेहरा नेहाला समजत होता तो तीला उत्तर द्यायला टाळून बोलत होता हे तीला जाणवलं आणि ती बोलली चल खरं समजलं ना आता निघू मला घरी जायचं आहे ओवी वाट बघत असेल. तो स्थिरवला आणि बोलला हा चल निघूया, नेहा त्याला कॅफेमधून बाहेर पडताना बोलली कि हे तु शाळेत कोणालाच बोलणार नाही आहेस नाहीतर उगाच चर्चेला विषय होईल.. हा ओके एवढंच अनिकेत बोलला आणि निघाला.


       नेहा घरी आली, ओवी आणि कुंदाताई तीला उशीर झाला म्हणून तिचीचं वाट बघत होत्या. नेहाने  फ्रेश होऊन कॉफ़ी मग मध्ये ओतून घेतली घेतली आणि ती गॅलरीमध्ये जाऊन बसली आणि विचार करू लागली. आता ह्या वयात मला लग्न न झालेला जोडीदार मिळणं कठीणचं आहे, आणि मिळालाच तरी तो अनिकेत सारखं हे सगळं ऐकून मला दूर करेल, अनिकेत आज माझं सत्य ऐकून हादरला होता तो पुन्हा मला जवळ करणारचं नाही. चला जाऊंदेत लग्न हा विषयच नको असं ठरवून मूड चेंज करण्यासाठी ती गॅलरीमधून उठून ओवी आणि कुंदाताईना बोलते आज आपण बाहेर जेवायला जाऊया, ओवी खुश होते, आणि बोलते चालेल आई, मी पटकन माझा अभ्यास पूर्ण करून घेते.


      नेहा दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर तीला अनिकेतचं वागणं बदललेलं जाणवलं, अनिकेत तिच्यापासून दुरावा राखून बोलत होता, आणि तीला ते असह्य झालं. तीने मनात विचार केला आता कदाचित नोकरीं तरी बदलावी, दुसऱ्या शाळेत नोकरीं बघते कारण अनिकेतला सामोरं जाणं तीला जड वाटू लागलं.
    

     असेच दिवस जातं होते आणि तीन महिन्यांनी नेहाला दुसऱ्या चांगल्या मोठ्या शाळेत नोकरीं मिळाली तीने जुनी शाळा सोडण्याचा विचार केला, अनिकेतपासून पण दूर जाता येईल आणि पगार पहिल्यापेक्षा आठ हजार जास्त होता म्हणून ती नवीन ठिकाणी रुजू झाली.


      बाबांना जाऊन सहा महिने झाले होते, आई - भाऊ अधून - मधून कॉल करत असतं. एके दिवशी भाऊ कॉल करून बोलला कि ताई माझ्या लग्नाची बोलणी करायची आहेत तु मुंबईला येशील कां, नेहा बोलली अरे पण त्या लोकांना ओवीबद्दल कसं सांगणार आहेस, त्यावर भाऊ बोलला सध्या तरी माझ्या होणाऱ्या बायकोला सगळं माहित आहे पण तिच्या घरच्यांना मी सांगितलं आहे कि ताईचे मिस्टर वारले आहेत, ताई आणि ताईची मुलगी पुण्यात असते. खरं सांगून उगाच तुझ्यावर प्रशन उठले असते म्हणून मी खरं बोललो नाही... नेहा बरं ठीक आहे कधी यायचं ते कळवं मी येते दोन दिवसासाठीएवढंच फोनवर बोलू शकली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - नेहाच्या भावाची बायको तिचं सत्य ऐकून तिच्याबरोबर कशी वागत असते ते )


🎭 Series Post

View all