- भाग – १५
( मागच्या भागात आपण बघितले- नेहा शरदला भेटायला तयार होते - आता पुढे )
नेहा शरदला फोन करते तर शरद हाय बोलून बोलायला सुरवात करतो, काय करता तुम्ही, नोकरी कुठे आहे, ओवी किती वर्षाची आहे अशी सगळी चौकशी करून तो बोलतो - आईला पण तुम्हाला भेटायचं आहे, आईला पण तुमच्याशी बोलायचं आहे आणि शरद त्याच्या आईकडे मोबाईल देतो- त्याची आई- सरलाबाई अगदी छान असते, ती म्हणते नेहा तू बाहेर भेटण्यापेक्षा घरी ये ना, म्हणजे तुला घर पण बघता येईल आणि मुलांना पण भेटता येईल, त्याची आई अगदी नेहाबरोबर जुनी ओळख असल्या सारखी बोलते.
त्या एवढ्या गोड आवाजात नेहाला विनवत होत्या कि नेहाला त्यांना नाही बोलताच आले नाही ती म्हणाली मी ह्या रविवारी ओवीला घेऊन येते, हो चालेल त्या निम्मिताने मुलांची पण भेट होईल ये तू नक्की ये मी वाट बघतेय असं बोलून त्यांनी फोन ठेवला.
नेहा विचार करू लागली. एवढं चांगल कसं असू शकत कुणी, किती गोड बोलत होत्या सरलाबाई, त्यांच आणि आपलं खरच जमेल ना, त्या तर स्वभावाने अगदीचं छान वाटल्या, शरद जास्त बोलला नाही, पण जेवढं बोलला त्यात त्याचा स्वभाव शांत वाटला. हुशार वाटला, त्याच्या आईने मोबाईलवर फोटो पाठवला आहे खरंतर, दिसायला एकदम हँडसम आहे तो, उंचपुरा, सुंदर आहे.
शरदची मुलं कशी आहेत स्वभावाने काय माहित, त्यांचं आईपण पेलणं मला जमेल ना, मी मुलांशी जुळवून घेऊ शकेन ना, त्यात मी बरेच वर्ष एकटी राहिल्याने मला आता एकत्र एवढ्या सगळ्यांबरोबर ऍडजस्ट होईल ना आणि कुंदाताई बरेच वर्ष माझ्याबरोबर राहात आहेत, त्या कुठे जातील, त्यांना जवळचं असं कोणीच नाही आहे त्यांना सोबत आणू का हे पण शरदला विचारायचं होत पण त्याने फोन लगेचच आईकडे दिला.
नेहाने घरी येऊन सगळं कुंदाताईना सांगितलं, त्या हे ऐकून खूपचं खुश झाल्या आणि बोलू लागल्या, मॅडम तुम्ही हो म्हणा ह्या स्थळाला - तुम्हाला कायमचं हक्काचं घर मिळेल, जोडीदार मिळेल, ओवीला बाबा मिळतील, जोडीदार असणं खुप महत्वाच असतं अहो, दुनिया वाईट नजरेने बघत नाही मग, स्वतःचा संसार, घर, मुलं, सुखी कुटुंब मिळेल तुम्हाला. आई आणि वहिनी सांगतायत ते ऐका - खरंच भलं होईल तुमचं. ओवीला पण समाजात मानाचं स्थान मिळेल, तुम्ही श्रीमंत घरात जातं आहात, आर्थिक स्थिती पण चांगली आहे त्यांची, त्यांच्या मुलांना पण आई मिळेल. तुम्ही विचार करा ह्यावर्, नेहा म्हणाली - रविवारी त्यांच्या आईने ओवीला घेऊन भेटायला बोलावलं आहे.
नेहाने ओवीला सांगितलं आपल्याला ह्या रविवारी एका आजींना आणि काकांना भेटायला जायचं आहे, ओवीला नवीन बाबा मिळणार आहेत हे तीला कसं सांगू असं नेहाला झालं होतं.
नेहा ओवीला घेऊन रविवारी शरदच्या घरी पोचली, शरदचं घर खुप मोठं होतं, सुंदर इंटिरियर केलेलं, सजवलेलं सुंदर घर होतं, सरलाताईनी नेहाला पूर्ण घर दाखवलं, शरद गप्प गप्पचं होता. नेहाबरोबर त्याची आईच जास्त बोलत होती.
शरदच्या बेडरूममध्ये त्याचे आणि बायकोचे दोन - तीन फोटो लावलेले होते, ते नेहा बघतच राहिली, तेवढ्यात सरलाताई बोलल्या मी नोकरांना सांगून ते फोटो काढून ठेवते, नेहाने त्यावर काहीच उत्तर दिलं नाही, त्याची मुलं पण बुजल्यासारखी वाटतं होती, बोलतंच नव्हती, मुलगी तर नेहाला बघून हसली पण नाही, मुलगा स्वरूप थोड्यावेळाने ओवीजवळ जाऊन तीला त्याची खेळणी दाखवू लागला.
घरात दोन कामवाल्या मावशी होत्या, त्यांना सरलाताईनी ही नेहा अशी ओळख करून दिली. नंतर त्या म्हणाल्या तू आणि शरद बेडरूममध्ये बोलत बसा मी चहा - नाश्ता पाठवते, शरद आधीचं बेडरूममध्येच बसला होता - नेहा तिथे गेली, त्याने स्मित हास्य केलं ते बघून नेहाने बोलायला सुरवात केली, तुम्हाला ओवीबद्दल सर्व माहित आहे ना म्हणजे तिचा जन्म कसा झाला वैगरे.
शरद बोलू लागला - हो तुमच्या आईने माझ्या आईला सगळं सांगितलं आहे मला काहीच हरकत नाही आहे. भूतकाळ पुन्हा पुन्हा उगाळण्यात अर्थ नाही, आपण आत्ताच बोलू - तुम्ही शिक्षिका आहात ते मात्र उत्तम झालं हा, मुलांचा अभ्यास घेऊ शकाल तुम्ही, शिवानी जरा तिची आई लवकर वारल्यामुळे उद्धट झाली आहे, आणि स्वरूप गोड आहे अगदीच तुम्हाला आवडेल तो, शिवानी तशी मोठी आहे त्यामुळे नवीन आई येतेय हे ती पटकन स्वीकारणार नाही पण तुमचा लळा लागला कि बोलेल ती नीट.
तुम्हाला इथे कसलीच कमी भासणार नाही आणि काम सुद्धा करावे लागणार नाही, घरात आधीपासून घरकामाला दोन मावशी आहेत त्या सगळं करतात, तुम्ही तुमची नोकरी करू शकता.
नेहा मध्येच बोलली - एक बोलायचं होतं - माझ्याकडे एक ताई आहेत घरी सोबतीला, त्यांचा घटस्फोट झाला आहे, त्यांचं कोणीच नाही आहे, त्यांची तुम्ही काही सोय करू शकता कां, कारण त्या बरेच वर्ष माझ्याबरोबर राहून ओवीला सांभाळत आहेत.
शरद म्हणाला एवढंच ना, अहो खुप खोल्याचं मोठं घर आहे हे, तुमच्या कुंदाताई घरी आमच्या दोन मावशी आहेत ना त्यांच्याबरोबर काम करून त्यांच्या रूममध्ये आरामात राहतील, तीन - तीन मुलं घरात असतील आता त्यांना संभाळायला कोणीतरी हवेचं, आमच्या एक मावशी - स्वयंपाकाच बघतात, एक मावशी - कपडे, लादी, साफसफाई अशी कामं करतात, आणि आता तुमच्या ताई मुलांना बघतील आपण त्यांना त्याचा पगार पण देऊया. अजून काही शंका आहेत कां तुम्हांला, काही अडचण आहे कां अजून असं विचारल्यावर नेहा नाही अहो काही नाही अजून असं हसून बोलली.
शरदचं मनमोकळेपणाने बोलणं नेहाला खुप आवडलं, ती निश्चिन्त झाली. शरद आणि ओवी बाहेर आले, सरलाताई बोलल्या- काय शरद नेहा आवडली ना तुला, जमवून घेशील ना तिच्याशी... ह्या वाक्यावर शरद हलकासा हसला... आणि नेहा - शरद आवडला कां गं - असं बोलल्यावर नेहा लाजली, सरळताईनी तीला जवळ घेतलं आणि बोलल्या, तुझ्या माहेरी फोन करून आपण लग्नाची तारीख काढूया... त्यांनी जाऊन लगेचच देवापुढे साखर ठेवली.
ओवीचं पण बाहेर स्वरूपबरोबर चांगल जमलं होतं, दोघं कॅरम खेळत होती. शिवानी अजून गप्पच होती. सरलाताई बोलल्या - ओवी कसं वाटलं घर, लवकरच इथे राहायला यायचंय तुला, ओवीने नेहाकडे बघून हो कां गं आई असं विचारलं, हो बाळा असं हसत नेहा बोलली.
नेहा सर्वांशी बोलून दोन तासाने निघाली, ओवी तर मोठ्या घरी राहायला मिळणार म्हणून खुप खुश होती, नेहाने आईला कॉल करून सगळं तिथे घडलेलं सांगितलं आणि तिचा होकार आहे हे ही सांगितलं. आई आणि शुभ्रा खुप खुश झाल्या...
इकडे शरदच्या घरी मात्र नेहा आणि ओवी निघून गेल्यावर शिवानी रडू लागली, बाबा तुम्ही नवीन आई कां आणणार आहात - असं विचारु लागली - बाबा माझ्या मैत्रिणी बोलतात - सावत्र आई त्रास देते खुप, हाल करते, मारते पण...
सरलाताई बोलल्या, शिवानी बाळा मी तुला समजावलं आहे ना तरी तुझं अजून तेच चालू आहे - शिवानी रडतं बोलू लागली तसं आजी बोलली आहे - नवीन आई आली शहाण्यासारखं वागायचं, भांडायचं नाही, बाबांना त्रास द्यायचा नाही, पण तरीही बाबा मला खूप भीती वाटतेय....
ह्या शिवानीच्या प्रश्नाने शरदच्या डोळ्यात पाणी आलं, तो म्हणाला अगं सावत्र आई नसतं म्हणायचं असं, नेहा तुला काहीच त्रास देणार नाही प्रॉमिस देतो मी असं बोलून शरद अस्वस्थ झाला...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शिवानी नेहाला आई म्हणून स्वीकारते कां ते आणि शरद तीला साथ देतो कि नाही ते )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा