भाग -19
( मागच्या भागात आपण बघितले - सरलाताई नेहाला बोलतात त्यांचा काळ जवळ आला आहे - आता पुढे )
सरलाताई नेहाला बोलतात कां कळत नाही पण तू मला अस्मितापेक्षा जास्त जवळची वाटतेस, तू पहिल्यांदा आम्हाला घरी भेटायला आलीस ना तेव्हाचं तुझं साधं राहणीमान बघून मी मनोमन म्हंटल होतं ही मुलगी सुखाचा संसार करेल..
त्यात तू शिक्षिका - म्हणजे मुलांना घडवण्याचं कामं करतं होतीस, म्हणजे तू मुलांमध्ये रमणारी असणार आणि शिवानी आणि स्वरूपला जीव लावशीलच असं मला वाटलं, तुझं शिक्षण पण चांगल होतं तू शिकलेली त्यात कोणाच्याही विरोधाला नं जुमानता एकटीला मुलीला समर्थपणे वाढवणारी मुलगी आहेस हे समजल्यावर तर मी खुप आनंदी होते. धीट मुली मला आवडतात...
कदाचित तू माझ्यासारखीचं मिडल क्लास कुटुंबातून आलेली आहेस म्हणून ही असेल. माझी व्यथा, माझं जीवन, मी कोण होते इथे कशी आले आणि ह्या सुखवस्तू घरात कशी आले ह्या सगळयांची उत्तर तुला माझी डायरी वाचलीस कि तुला कळतील ही.. मी ही तुझ्यासारखीचं सर्वसामान्य घरातली होते...
आता वयाच्या सत्तरीमध्ये असून पण दर एक - दोन दिवसाआड डायरी लिहीत होते, मला जणु तो छंदचं जडला होता, स्वतःच्या व्यथा मला डायरीत उतरवल्या कि हलक्या वाटू लागत. आता तू बोलशील एवढं काय होतं लिहण्यासारखं, पण बरंच होतं अगं. ह्या कॅन्सरने जरा मला आजारी पाडलं म्हणून पण मी खंबीर होते असो जे झालं ते झालं.
अस्मिता अतिश्रीमंत घराण्यातील होती, त्यामुळे तिचं राहणीमान पण मॉर्डन होतं, आणि तू मस्त पंजाबी ड्रेस घालतेस, छान टिकली वैगेरे लावून शाळेत जातेस, ओवीवर पण छान संस्कार केले आहेस हो, ती आमच्या शिवानी सारखी रागवून बसत नाही, ओवी दररोज आंघोळ झाल्यावर माझ्या आवर्जून पाया पडते ते मला खुप आवडतं ...
शरदला पण बाबा आवडीने बोलते, त्याला अभ्यासात काही अडलं तर विचारायला जाते आणि त्याच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करते आणि बऱ्यापैकी स्वतःची कामे स्वतः करते, स्कुलची बॅग भरते, वॉटर बॉटल भरते, स्वतःच छान आवरून शाळेत जाते.
तुझ्या माहेरचे पण चांगले आहेत, वहिनी तर तुला अगदी ताई, ताई करत असते. आई पण साधी आहे तुझी, नात्यांची जाण असलेली माणसं आहेत सगळीच. ओवीला एकटीने वाढवलंस पण मुलगी गुणी आहे, कुटुंब मिळाल्यावर आनंदी आहे अगदी.
स्वरूपला पण ओवी दीदी खुप आवडली आहे, तो पण खुप गुणी आहे, तो तुला पटकन मम्मी पण बोलू लागला बघ, तो तुला भविष्यात खरंच सांभाळेल बघ, पण शिवानी हट्टी आहे, पटकन उलटून बोलते. मी बघितलं आहे ती तुझा आणि ओवीचा दुस्वास करते, पण मी ही अशी आजारी त्यामुळे तीला ओरडू शकले नाही, आणि शरद तीला तिच्या गेलेल्या आईच खुप दुःख आहे असं समजून तिचे अजूनच लाड करतो.
अस्मिता टिकली कधीतरीच लावत असे, पण माझा स्वभाव कोणालाच टोकण्याचा नाही त्यामुळे मी तीला कधीच काही बोलले नाही. तीने घरी नियमित ते शॉर्ट्स वैगरे घालणं मला पटत नसलं तरी शरदला चालतंय म्हंटल्यावर मी कां बोलू असं मला वाटे. कायम पिकनिकला जाणं, मित्र- मैत्रिणीबरोबर हिंडण मला रुचत नसे, पण असूदेत आजकालची पिढी अशीच आहे असं बोलून मी शांत बसे.
पण माझ्याशी अगदी चांगली वागत असे, बाहेर जाताना मला हे जेवण करून द्या, काळजी घ्या आईची असं सगळं कामवाल्या मावशींना सांगूनच बाहेर पडत असे. आमच्या दोघीत कधी भांडण असं झालं नाही कारण मी कधी ते घरात होऊच दिलं नाही.
मला सुखी क्लेश नसलेलं घर खुप आवडतं. तू पण माझ्या पाठीमागे मुलांची मन जपण्याचा प्रयत्न कर ही एवढीच माझी इच्छा आहे, आणि एवढं बोलून सरलाताईच्या डोळ्यात पाणी आलं, नेहा म्हणाली आई तुम्ही ठीक व्हाल, काळजी करू नका. माझ्या शरदला संभाळून घे, तेवढ्यात शरद हॉस्पिटलला आला.
आईच्या डोळ्यातलं पाणी बघून तो पण भावुक झाला, आणि नेहाला बोलला तू घरी जा, मी आहे आईजवळ, नेहा आई मी उदया येते बोलून निघतच होती तेवढ्यात सरळताईनी नेहाचा हात पकडला आणि बोलल्या, सांभाळ सगळं... माझ्या तिन्ही नातवंडांची काळजी घे.
शरद बोलला आई असं कां बोलतेस, काही होणार नाही तुला, डॉक्टर त्यांचे प्रयत्न करतायत, तू बरी होशील बघ, घरी येशील लवकरच... नेहा पण बोलली आई मी येते उदया, नेहा ड्राइव्हरबरोबर घरी गेली.
ती पोचून एक तास झाला, रात्रीचे नऊ वाजले होते आणि शरदचा आई गेली सांगायला कॉल आला. नेहा रडायलाचं लागली आणि बोलू लागली, अहो आई मी निघाली तेव्हा तशा बऱ्या होत्या..
शरद बोलला आम्ही प्रेत घेऊन दोन तासात घरी पोचतोयं...मी आईच्या बहिणींना कळवतोय.. तुझ्या भावाला कळवं असं बोलून शरदने फोन ठेवला.
नेहाने तिच्या माहेरच्यांना कळवलं, भाऊ आणि आई पुण्याला यायला अर्ध्या तासात निघाले. मुल जोरजोरात रडायला लागली, नेहाने तिघांना पण जवळ घेतलं... शिवानी खुप रडतं होती तीला तिच्या आईनंतर आजीनेच सांभाळलं होतं.
कामवाल्या मावशींनी नेहाला सावरलं, बाजूच्या बंगल्यातल्या बायका घरी येऊ लागल्या, लोक जमू लागले. शरद आणि त्याचे दोन मित्र अडीज तासाने प्रेत घेऊन घरी आले, सरलाताईच्या बहिणी आणि नेहाच्या माहेरचे पण सकाळपर्यंत पोचणार होते म्हणून प्रेत सकाळी न्यायचं ठरलं...
सकाळपर्यंत सगळी पाहुणेमंडळी आली, शिवानी खुप रडतं होती, शरद तीला जवळ घेऊन उभा होता, आणि मग नऊ वाजता प्रेत नेण्यात आलं... एक - एक करून सगळे पाहुणे बारा वाजेपर्यंत आपापल्या घरी गेले.
शुभ्रा घरी एकटीच त्यात ती प्रेग्नेंट म्हणून नेहाच्या माहेरचे पण संध्याकाळी पाच वाजता निघाले. भाऊ, आई आम्ही पुन्हा बाराव्याच्या कार्याला येतो असं सांगून नेहाला धीर देऊन, मुलांना भेटून निघाले.
दहा दिवस पटकन गेले, दहावं झालं, त्यानंतर बारावं, तेरावं ही दोन्ही कार्य झाली, नेहाचा भाऊ कार्याला आला होता. पंधराव्या दिवसापासून शरद ऑफिसला जायला लागला, पण नेहाचा मुलांना सोडून शाळेत जायला धीरच होईना, अजून दोन दिवस थांबून तीने शरदला सासूबाई नोकरी सोडण्याबद्दल काय बोलल्या ते सांगितलं.
शरद म्हणाला तुझी मर्जी हा माझी काही जबरदस्ती नाही... तशीही तू नोकरी नाही केलीस तरी चालणार आहे... मुलं नोकरांच्या हाती सांभाळायला देऊन आपण दोघे पण बाहेर असणार आहोत, आधी आई असल्यामुळे काळजी नव्हती तशी पण आता अवघड होईल...
नेहाने खुप विचारांती नोकरीं सोडण्याचा निर्णय घेतला, आता ती घरीच असे, सासूबाईना वीस दिवस झाल्यावर मुलं शाळेत गेल्यावर तीने त्यांचं कपाट उघडून चिट्ठी आणि डायरी बाहेर काढली...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - डायरी आणि चिट्ठीमध्ये असं काय सत्य लिहिले होते ते )