Login

प्रेमाची वीण - भाग -23

Premachi Vin


( मागच्या भागात आपण बघितले - सरूला नाईलाजाने त्या हॉटेलमध्ये काम करावंच लागतं आता पुढे )



        मी रोज सकाळी तयार होऊन हॉटेलला जायचे, तिकडे माझ्यासोबत काम करणारे सगळे तसें माझ्यापेक्षा दोन, चार वर्षांनी मोठे होते, मी छोटी असल्यामुळे मला सगळे मुन्नी म्हणायचे, मला ते अजिबात आवडायचं नाही...


     एक दादा कायम मला ओरडत असायचे, त्यात रम्या भाई पण माझ्यावर मेहरबानी केल्यासारखा ऑर्डर द्यायचा, सुरुवातीला हे सगळं मनाला खूप लागायचं. कोणी ओरडलं कि डोळ्यातून पाणी यायचं, पण नंतर जणू सवयच झाली...


     माझी घुसमट होत होती.  हा मानसिक त्रास तर होताच. पण दिवसाचे बारा तास तिथे राब राब राबून अंग अगदी दुखून यायचं. कधीकधी अंगातली शक्तीही संपलीय, आपण उभेही राहू शकत नाही, असं वाटायचं,


      पण तिथे जेवताना बसायला मिळेल तेवढंच, बाकी दिवसभरात बसायलाच मिळत नसे, हॉटेलमध्ये गर्दी असे, तिथला तो मोठ्या मोठ्या भांड्याचा ढीग घासून घासून हात दुखायचे, कधी एकदाची घरी जातेय आणि आराम करतेय असं व्हायचं.


      आईला घरी गेल्यावर सुरुवातीला मी हे सगळं सांगायचे, ती मला जवळ घेऊन समजवायची, कि हार मानू नकोस होईल सगळं नीट.... जर कधी तीच वैतागलेली असली तर तीही चिडायची, एकतर बाबांना चालता येत नसे त्यामुळे ती त्यांना धरून - इथे ने तिथे ने करून कंटाळून गेलेली होती... पण हळुहळू माझा त्रास सांगणं मीच कमी केलं.


      बघता बघता तीन महिने गेले .मी आता हे सगळं सहन करू लागले होते पण निमूटपणे,  आपल्याला कितीही त्रास झाला, तरी तो डोळे मिटून निमुटपणे सहन करायचा,हेच शिकली होती मी त्या काळात...


      माझ्या स्वप्नांना, शाळेत जाण्याच्या विषयाला आवाहन द्यावं, असं वाटू लगे, वर या सहन करण्यामुळे मी अबोल झाले होते, शांत झाले होते..पण बाबांची हतबल अवस्था, आणि त्या रम्याभाईचे घेतलेले पैसे आठवायचे, आणि मग सरळ पुन्हा हॉटेलमध्ये जायला तयार व्हायचे...


       पण मला पुन्हा शाळेत जायचं होतं, खुप शिकायचं होतं, खुप मोठं व्हायचं होतं....पण माझ्या वाट्याला काय आलं होतं - हे हॉटेलमधलं काम, उष्टी भांडी घासणं, टेबलं पुसणे.


     मला हल्ली हल्ली वाटायचं, की आता आपली शाळा सुटली ती कायमचीच. आपण कधीही शाळेत शिकू शकणार नाही. आयुष्य असचं रडतं खडतं काढावं लागतंय बहुदा...


    घरची स्थिती अजून बिघडतच चालली होती. बाबा पूर्णतः परावलंबी झालेच होते, त्यांनी आता दारू सोडली होती. पण त्यबेत खराब होतं चालली होती, ते हतबल होते, खुप वाईट वाटत होतं. आईला आणि मला त्यांचं सर्वकाही करावं लागत होतं. जास्तकरून आईच त्यांचं सगळं करत असे, त्यामुळे तीही सतत चिडचिड करत असे.


     बाबांच्या औषधंचा खर्च, त्यांची सेवा करणं, त्यात कारखान्यात पण जावे लागे, पैसे कमवताना तिची तारांबळ होत होती. तीची दगदग होतं असे, पण मी ही काहीच करू शकत नव्हते.... मीही स्वतःच्या स्वप्नांना कायमचं मागे ठेवून पोटासाठी काम करतच होते.


       सहा महिने गेले, बाबा हल्ली खुश असायचे, सरू तुझे बाबा बरे होणार बघ असं सतत म्हणू लागले, तुला शाळेत जायला मिळणार बघ तू असंही बोलू लागले होते... त्यांची  ईच्छाशक्ती पाहून वाटायचं, बाबा बोलतायत तर सगळं नीट होईल ही...


     एके दिवशी सकाळी आई उठल्यापासूनच जरा वैतागलेली वाटत होती. तीची पाळी आली होती आणि त्यामुळे तीला जरा त्रास होतं होता, आणि बाबा काहीतरी तीला बोलले त्यावरून त्या दोघांचं वाजलं,हल़्ली या दोघांत नेहमीच अशी भांडणं व्हायची. मग बाबाही तीला बडबडत राहायचे...


      पण ह्यावेळीच भांडण वेगळं होतं, आई खूपचं चिडली होती, दारुमुळे माझ्या आयुष्याची तुम्ही वाट लावली, लग्न करून आयुष्य बरबाद झालं माझं, तुमच्या ह्या दारूपायी माझ्या एकुलत्या एक मुलीची शाळा सुटली त्याचं दुःख खुप आहे... असं सगळं बडबडत होती...


    त्यात तुम्ही घरीच बसला आहात, मला सगळं करावे लागतंय तुमचं, तुम्ही आम्हाला पोसायचं तर आम्ही माय लेकी तुम्हांला पोसतोय, दुसऱ्याच्या जीवावर जगण्यापेक्षा मरत कां नाही तुम्ही...


    ती बोलण्याच्या ओघात हे वाक्य बोलून गेली, पण बाबांच्या आणि माझ्या खूप मनाला ते वाक्य खुप लागलं, बाबा तिचं वाक्य ऐकून सुन्न चं झाले होते... एवढं टोकाचं वाक्य ऐकून बाबा शांतच झाले होते....

  

      आईच्या पण थोड्या वेळाने लक्षात आलं, की ती बोलताना काहीतरी चुकीचं बोलून गेलीये, पण ती बाबांसाठी दुपारच्या जेवणाला भाजी - चपाती बनवून काहीच न बोलता कारखान्यात  निघून गेली.


    थोड्यावेळाने मी ही हॉटेलला जायला निघाले, पण
बाबा मी निघते असं बोलायला गेल्यावर त्यांचे डोळे पाणावले, मला तिथून जाणं अस्वस्थ करत होतं, का कोण जाणे पण त्यांना एकटं सोडून आज जावंसंच वाटत नव्हतं,  पण रम्याभाईचे घेतलेले पैसे आठवून -  बाबा मी लवकरच येते असं बोलून मी निघाले...कारण न सांगता जर मी दांडी मारली, तर मला कामावरून काढून टाकतील अशी मला भीती होती...


    पण चालताना सतत मनात विचार येत होता, बाबांना त्यांचं मन माझ्याकडे मोकळं करायचं असेल, आई जे काही बोलली होती ते खूप चुकीचं होतं. बाबांना खुप वाईट वाटलं असणार त्याचं आणि त्यांनी हे फार मनाला लावून घेतलेलं वाटत होतं.  पण मी काहीही करू शकत नव्हते...


    एका बाजूला आईचा राग आला होता, तर दुसऱ्या मनाला आईबद्दल सहानुभूती वाटत होती, तिचा बिचारीचा ह्या सगळ्यात काय दोष होता ती पण गावातून नाईलाजाने इथे आली होती, संसारासाठी धडपडत होती...सगळयात तिचा कोंडमारा होत होता ...


       मला शिक्षण सोडावं लागल्याचं आणि हे असं लहान वयातच हॉटेलात काम करावं लागण्याचं दुःख तिच्या मनात ठसठसत होतं... बाबांमुळे ही परिस्थिती आज ओढवली होती म्हणून ती रागात बोलून गेली असेल...


    मी दिवसभर बेचैनचं होते मला बाबांची काळजी वाटतं होती त्यात आज हॉटेलमध्ये पण गर्दी होती, भांडी पण जास्तच घासायला पडत होती... शेवटी सगळी भांडी घासायचं काम आटोपलं मी झपाझप घरी जायला निघाले...


     काही वेळात मी आमच्या एरियामध्ये पोहोचले.... मला बाबांची काळजी वाटतं होती, मला आमचं घरं दिसलं, पण घराजवळ लोकांची गर्दी जमली होती.


      मी खुप घाबरले....आई जोरजोरात रडतं होती... मी धावतच घरात गेले, बाबांनी फास लावून आत्महत्या केली होती...


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - ह्या सगळ्या परिस्थितीतुन सरू कशी बाहेर येते आणि शिकते ते )

🎭 Series Post

View all