( मागच्या भागात आपण बघितलं - सरलाचे वडील आत्महत्या करतात आता पुढे )
मी घरी पोचले , आईच्या जवळ जाऊन बसले. गर्दीतलं कोणीतरी म्हणाल सरू बघ तुझ्या बाबांनी काय करून घेतलं ते, संपवलं स्वतःला, कंटाळला होता बिचारा त्याच्या आजारपणाला...
आत बाबांना झोपवलं होतं..... आई धाय मोकलून हंबरडा फोडत होती. आसपासच्या बायका तीला समजावत होत्या, तिच्या बाजूला बसल्या होत्या, तिला शांत करायचा प्रयत्न करत होत्या....
हे दृश्य पाहून माझ्या अंगातली उरलीसुरली शक्ती संपली. मला काहीच कळत नव्हतं. सारखं सारखं वाटत होतं, की बाबा आता उठतील, मला हाक मारतील, मायेने जवळ घेतील...
बाबा अचानक आम्हाला पोरकं करून गेले होते, मनाला हे काही केल्या पटत नव्हतं...
आई साधारण संध्याकाळी साडे - सहा सुमारास परतली होती, दरवाजा ढकलताच दार उघडताच तिला बाबा पंख्याला लटकलेले दिसलें, तिने ते बघून हंबरडा फोडला होता. तिच्या आवाजाने आजुबाजूचे सर्वजण धावत आले होते..
बाबांना नीट चालता येत नव्हतं, ते धरून धरून आता थोडं चालायला लागले होते... त्यांनी एवढं टोकाचं पाऊल उचलावं... आई निसंध बडबड करत होती, मी सकाळी दारुवरून बोलले म्हणून असं केलंत कां तुम्ही, पण मी तुम्हाला दोष देत नव्हती, आपल्याचं नशिबाला दोष देत होती... .
असे कसे मला एकटीला सोडून गेलात, आम्हाला पोरके करून गेलात, असं आई रडतं रडतं बोलत होती..
शोककळा पसरली होती.
रात्री आजी आजोबा- आईचे पण आईवडील आले. त्यांना आईचा आक्रोश पाहवत नव्हता, सगळे तीला सावरत होते...
सकाळी बाबांना अग्नी दिला. लहानपणी मला खेळवणारे, माझं कौतुक करणारे बाबा सारखे नजरेसमोर येत होते. राहून राहुन बाबांचे सकाळचे पाणावलेले डोळे आठवत होते.
आयुष्यात आलेल्या अपयशांमुळे बाबांनी कंटाळून जीव दिला, यात दोष कुणाचा नव्हता, दोष होता परिस्थितीचा, बाबा आतून पूर्णपणे एकटे पडले होते...
बाबा आम्हाला कायमचे सोडून गेले होते. उरल्या होत्या बाबांच्या आठवणी आठवणी आणि वर्तमान.
बाबा गेल्यापासून आई सैरभैर झाली होती. तिला असं वाटत होतं, की बाबांनी तिच्यामुळेच आत्महत्या केली असावी...याने तिच्या मनावर खोलवर परिणाम केला होता.
बाबांचं कार्य झालं, आणि चारचं दिवसांत ती आजारी पडली. तीला सतत ताप भरायचा, तापात काहीतरी बडबडायची, मीच कारणीभूत आहे सगळ्याला, मी गुन्हा केलाय, मी तुमची दोषी आहे, अशाप्रकारचं काहीही पुटपुटायची.... पंधरा दिवसांत ती फारच अशक्त झाली होती. पार रया गेली होती तिची. मी तिची फार काळजी घ्यायचे तिचं एवढं वाढलेलं आजारपण पाहून मी घाबरून जायचे... डॉक्टरानी औषधं दिली होती पण तिला बरं व्हायला बरेच दिवस गेले.
बाबांच्या जाण्यानंतर जवळपास एक महिना आई आजारीच होती.. आजी-आजोबा राहिले होते थोडे दिवस दोन आठवड्यात परत गेले.. आजी आम्हाला तिच्याबरोबर गावी घेऊन जातं होती पण रम्याभाईचे
फिटायचे पैसे आठवून मी त्यांना सारखा नकार देत होते, शेवटी काहीशा अनिच्छेनेच ते दोघे परत गेले.
आता घरी फक्त मी आणि आई उरलो होतो. आई आजारी असल्यामुळे ती कारखान्यात महिनाभर गेली नव्हती..त्यामुळे पैसे संपले होते..नाही म्हणायला अंगावर सारखी धावून येणारी गरिबीची परिस्थिती तेवढी होती जोडीला.
मीही जवळपास तीन आठवडे हाॅटेलमध्ये गेले नव्हते... त्यामुळे मालक हे पैसे देणारच नव्हता. आता जायला लागले , पण पगार महिन्याशेवटी मिळणार होता. बाबांच्या कार्याला पैसे लागले होते...
मी पण बारीक झाले होते, आईची सतत काळजी असायची, वजन कमी झालं होतं माझं, हातापायांच्या अगदी काड्या झाल्या होत्या. चेहरा काळवंडला होता. अगदी निस्तेज झाला होता. चालताना झेप जाऊन मी पडतेय की काय असं वाटायचं..
खाल्लेलं जणू अंगाला लागतच नव्हतं. पण तरीही मी कष्ट करायचे , काही दिवस गेले, एके दिवशी संध्याकाळी रम्याभाई आमच्याकडे आला. आल्या आल्या तो माझ्यावर डाफरायला लागला.
काय तू हल्ली नीट काम करत नाहीत असं म्हणतात बाकीची माणसं,... बाबा गेलेत पण तुझे पैसे अजून फिटले नाहीत समजलं ना तुला....
रम्याभाईने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. आता त्याचा आमच्या एकटं राहण्यावर नजर आहे असं मला वाटून गेलं . याचे पैसे कधी एकदाचे फिटतील, असंच मला राहून राहून वाटत होतं. खरंतर ते कधी फिटतील, हे मलाही माहीत नव्हतं. किती पैसे फेडायचे आहेत, किती फिटले आहेत, आम्हाला काहीच माहीत नव्हतं आणि भाई सांगतही नव्हता. त्याला विचारायचीही सोय नव्हती. त्याची भीती वाटत होती.
दोन महिन्यांनी आई बरी झाली होती, पण ती अगदीच शांत झाली होती. खूपच मोठा धसका घेतला होता तीने ती अद्याप सावरली नव्हती. कशातच लक्ष नसायचं तिचं..... हल्ली ती कारखान्यात पण जायला लागली, तिच्याबद्दल खूप वाईट वाटायचं.
नकळत मी फारच जबाबदार झाल्यासारखं वागायला लागले होते . मिळकत, घरचा खर्च, उरणारे पैसे यांचा ताळमेळ घालून पैसे योग्य ठिकाणीच वापरायला त्या काळात शिकले होते..
नशीबात जे आलंय, त्याच्यातच जगण्यात धन्यता मानत होते . शाळा कायमचीच सुटलीय, हे मनाला सतत पटवून देऊन पोटासाठी धडपडत होतो. पण जेव्हा शाळेत जाणारी मुलं पहायचे तेव्हा खुप रडावसं वाटायचं....
असेच काही दिवस गेले. आई आता बऱ्यापैकी सावरली होती म्हणतात ना, काळ सर्व दुखाःवरचं औषध असतं.
मला सतत म्हणायची बाबांना काय दुर्बद्धी सुचली आणि ते दारू पियायला लागले, तू शाळेत गेली असतीस, सुखी असतीस तर किती आनंदी असतो आपण, तुझ्यासाठी जीव तुटतो बघ, तुझी पुरी जिंदगी बाकी आहे, शिक्षण नसून कसं होणार तुझं...
ऑगस्टचा महिना असावा तो. हाॅटेलच्या मागे असलेल्या इमारतीत एक नवीन शाळा सुरू झाली होती. मी त्या शाळेकडे बघत राहात असे, तिथे प्रार्थना सुरु झाली कि माझ्यात स्फूरण चढत असे... मी खुश होतं असे...
आणि असंच एके दिवशी मी प्रार्थना ऐकत उभी राहात असताना रम्याभाईने मला बघितलं, आणि माझ्या पाठीत एक धपाटा घातला, आणि ओरडून बोलला - मी रोज बघतोय तुला काम सोडून हे करायचं आहे कां आता तुला...
अहो कशाला मारताय बिचाऱ्या पोरीला, सोडा तीला आधी...
मी वर पाहिलं. एक गोरा माणूस मालकाला बोलत होता. त्याचं ऐकून मालक म्हणाला हीच रोजचंच आहे काम टाळते ती.
तेव्हा त्या माणसाने मला त्याच्याकडे ओढून घेतलं. आणि मालकाला म्हणाला, ही मुलगी आजारी पण वाटतेय, मी हिला उपचार करायला माझ्या दवाखान्यात घेऊन जातोय, अडवलेत तर पोलिसात देईन तुम्हाला...
तो माणूस - लागलेय तुला बाळा, असं बोलून मला घेऊन निघाला...मी निमूटपणे त्याच्याबरोबर चालू लागले...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सरूला वाचवण्यासाठी आलेला देवमाणूस कोण होता आणि सरू कशी शिकली ते )
,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा