Login

प्रेमाची वीण - 25

Premachi Vin
भाग - 25


( मागच्या भागात आपण बघितले - हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या एका माणसाला सरुची दया येते आणि तो माणूस तीला आपल्या दवाखान्यात नेतो आता पुढे )



       या माणसाने मला आधार दिला. मला कुठेतरी घेऊन जाऊ लागला.  मला म्हणाला बाय तू अशी अशक्त कां दिसते आहेस, काय झालं आहे... मी चालत चालत बाबा कसे वारले आणि मी इथे कां काम करतेय ते जमेल तसं सांगितलं...


     त्यांनी मला दवाखान्यात नेलं. डाॅक्टरसाहेब असं बोलून एक नर्स बाहेर आली. आणि त्यांना ते बोलले ह्या मुलीला खायला द्या तो पर्यंत मी दहा मिनिटात आलोच.. नर्सने मला चपाती - भाजी आणून दिली,  मी पटापट खाऊ लागले, खाऊन झालं होतं,तेवढ्यात डॉक्टर आले आणि बोलले.. आता मला हळूहळू सगळं नीट सांग बघू...


      मी त्यांना सगळं सांगितलं. अगदी आधीपासून बाबांच्या जेलमध्ये जाण्यापासून ते अगदी मुंबईत येऊन त्यांचं दारू पिऊन त्रास देणं ,बाबांचं आजारपण, त्यांचा मृत्यू, माझी दबलेली शिकण्याची इच्छा, सगळं काही मी सांगितलं, डोळ्यांतून आसवं वाहत होती. त्या व्यक्तीचे डोळेही पाणावले होते. माझं बोलून संपलं, तसा त्यांनी माझ्या पाठीवरून मायेने हात फिरवला.


     ते मला म्हणाले बाळा - मी अशोक रानडे, हा दवाखाना माझा आहे, मी डॉक्टर आहे...तुला शिकण्याची ओढ आहे, हे ऐकून खुप छान वाटलं बघ....! मी शिकवेन तुला बाळ!


      'मी शिकवेन तुला बाळ.....असं ठाम आश्वासन देणारं कोणी मला पहिल्यांदाच भेटलं होतं. मला खुप आनंद झाला,  जे घडतंय त्यावर विश्वासच बसत नव्हता.


     पण अचानक मला रम्याभाईचा चेहरा आठवला. त्याचे देणं आठवलं,  चेहर्‍यावरचं हसू अचानक लोप पावलं.  ते लागलीच मला म्हणाले, काय झालं, काही अडचण आहे का? मोकळेपणानं सांग, आपण उपाय शोधू! "


       तसं मी त्यांना रम्याभाईच्या पैशांबद्दल सांगितलं, ते म्हणाले,काहीतरी करु आपण याबाबतही, आता हाॅटेलात जाऊ नकोस, ते मी बघतो....  तू घरी जा, आणि तुझ्या आईला हे सांग, उदया सकाळी दहा वाजता मला दवाखान्यात आईला सोबत घेऊन भेटायला ये...


       मला खूप आनंद झाला होता. शाळेचं स्वप्न पूर्ण होणार, या आशेने मी खुप खुप खुश झाले होते....  दिसत होती ती फक्त शाळा, वह्या-पुस्तकं, गणवेश...पण तरीही रम्याभाईबद्दल मनात भीती वाटत होती. जेव्हा त्याला हे कळेल, तेव्हा तो काय करेल, याचाच विचार राहून राहून मनात येत होता.


        एक मन शिकण्याचा ध्यास पूर्ण होणार, या विचाराने आनंदाने डोलत होतं, तर दुसरं मन रम्याभाई, घरची ढासळलेली आर्थिक परिस्थिती यामुळे हा निर्णय मानायला तयार नव्हतं. घर की शिक्षण, पैसे कमवणं की शिक्षण अशा मनस्थितीत मी पडले होते..


    विचारातंच घरी आले, मी खुश असलेलं पाहून आई बोलली काय आज खुश कां.... मी  तिला आज जे काय झालं, ते सारं सांगितलं. तिच्या चेहर्‍यावरले भाव क्षणाक्षणाला बदलत होते.


      माझं सगळं सांगून झालं, तसं मी आईच्या प्रतिक्रियेसाठी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत क्षणात चमक दिसली. काहीतरी निर्धार दिसला.


     अचानक ती बोलली, सरू तू शाळा शिक्, मी आहे तुझ्यासोबत... काही घाबरू नकोस त्या रम्याभाईला... तेव्हा बाबांमुळे तुझी शाळा बुडली पण मी आता तसं होऊ देणार नाही, मी डबल काम करेन पण तू आता शिकायचंचं...


      आई अशी सहजासहजी तयार होईल, असं मला वाटलंच नव्हतं. तिचा त्या क्षणी खूप गर्व वाटत होता,  शिक्षणाचं महत्त्व ती जाणतं होती...

    

     सुखी- समाधानी संसाराला एकाएकी नजर लागणं, नवऱ्यावर चोरीचा आळ येणं, त्याला झालेली शिक्षा, स्वतःच्या कुटुंबाची परवड डोळ्यांनी पाहणं,  घरातल्या सर्वांची पोटं फक्त स्वतःच्या बळावर भरणं, राबराब राबणं, नवऱ्याचं अकाली निधन, या सर्व भोगांतही आई आज माझ्या पाठीशी खंबीर उभी होती ह्याचं मला अप्रूप वाटलं.
आईशी गप्पा मारत मारत, स्वप्नं रंगवत रंगवत मी जेवले आणि झोपले, स्वप्नात शाळा दिसत होती...


     दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि आई डॉक्टरांच्या दवाखान्यात निघालो, सकाळी फार प्रसन्न वाटत होतं.  मी तयार झाले , त्यातल्या त्यात बरे कपडे घातले, आणि दोघी निघालो. 


    डॉक्टरांनी त्यांच्या ओळखीने एका शाळेत माझं ऍडमिशन केलं होतं, तिथे गेल्यावर त्यांनी माझ्या हातात, गणवेश, पुस्तकं, दप्तर असं सगळं दिल्यावर आई तर त्यांच्या पायाचं पडली....


    डॉक्टर बोलले ताई मला मोठा भाऊ समजा आणि ही माझी भाची आहे असं समजा आणि एका मुलीला मी आयुष्यात पुढे जायला मदत केली याच मला खुप समाधान आहे, सरू आता खुप शिकायचं... मोठं व्हायचं असं बोलून त्यांनी माझ्या पाठीवरून मायेने हात फिरवला...
     


    रम्याभाईचे पैसे डॉक्टरांनी फेडले होते, त्यामुळे मला ती चिंता उरली नव्हती, दुसऱ्या दिवशी मी शाळेत जायला निघाल्यावर आई रडली मला म्हणाली पोरी देव आहे बघ, डॉक्टरांच्या रूपाने पाठीशी उभा राहिला....


    मी शाळेत गेले, खुप खुश होते -  सर्व मुलांनी एकत्र राष्ट्रगीत गायला सुरुवात केली.  कानावर पडणारे शब्द नवं अस्तित्व देत होते. नवं विश्व बहाल करत होते. असं मला वाटून गेलं...


       प्रार्थना संपली तितक्यात एक सर माझ्याकडे आले आणि बोलले, सरला आजच तुझं नाव शाळेत घातलं आहे ना, मी हो म्हणाले ते मला माझ्या वर्गात घेऊन गेले...ते मला सर्व विद्यार्थ्यांच्या समोर घेऊन गेले, आणि संपूर्ण वर्गाला उद्देशून ते म्हणाले, " मुलांनो, ही सरला..... तुमच्यासाठी शाळेत येणं, हा दिवसाचा रोजचा एक कंटाळवाणा भाग आहे, पण हिच्यासाठी ते एक अपूर्ण स्वप्न होतं, जे आज आकाराला आलंय.


       हिच्या संघर्षाला आज एक नवी किनार प्राप्त झालीय,  तर आजपासून तुम्ही सर्वांनी हिला सांभाळून घ्यायचं. अभ्यास शिकवायचा...तुमच्यात सामील करून घ्यायचं.. सगळी मुलं एका सुरात हो म्हणाली...
      


     आज शाळेचं वातावरण कितीतरी वर्षांनी अनुभवून माझ्यातला मलाच नवी संजीवनी मिळाली होती. शाळा सुटली. मी आज खूप खुश होते...माझं शाळेचं स्वप्न साकार झालं होतं आज. शाळा सुटली मला कधी एकदाची घरी जाऊन आईला सगळं सांगते असं झालं होतं...दिवसभरात माझ्याकडे मोठा आत्मविश्वास आला होता. मी खुशीतच घरी पोचले..


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सरूला शिकवणाऱ्या डॉक्टरकाकांनी सरूला मोठी झाल्यावर त्यांची सून म्हणून अजून कोणता मान दिला )

🎭 Series Post

View all