Login

प्रेमाची वीण - 27

Premachi Vin

भाग - 27


( मागच्या भागात आपण बघितले - नेहाला सासूबाईची डायरी वाचून हळवं व्हायला होतं आता पुढे )


     सासूबाई गेल्यावर नेहाने घरची सर्व जबाबदारी घेतली,  तीची शिवानी आणि स्वरूपच्या बाबतीत दृष्टी स्वच्छ होती, आणि दुस्वास करायचे काही कारणचं नव्हते... तीला ओवीसारखीच ही दोन्ही मुलं होती.


      मुलांची नैतिक जबाबदारी आपलीच आहे, त्यांचं पालनपोषण, शिक्षण, त्यांच्या आवडी - निवडी सांभाळून घेणं हे आपलंच काम आहे असं समजून ती शिवानी आणि स्वरूपला त्यांच्या गेलेल्या आईची उणीव भासू नये याबाबतीत नेहा सतत जागरूक असे.


         शिवानी अभ्यासात हुशार होती, नवीन आई येण्याचं दुःख हळू हळू शमत चाललं होतं, स्वरूप शाळेत जातं होता, हुशार होता, ओवी आणि स्वरूप छान खेळत असतं, सगळंच सुरळीत चाललं होतं. विरुद्ध टोकाच्या शिवानीशी जुळवून घेणं, तिचे राग - रुसवे हसतमुखाने सहन करणं कधी कधी नेहाला तारेवरची कसरत वाटे.


     पण तिचं कितीही प्रेमाने करा ती नेहाबरोबर अंतर राखूनच वागत असे, जाऊंदेत मुलांचंही मन असतं, ते त्यांच्या कुवतीप्रमाणेच विचार करत असतात. तीला मी आवडत नसेन असं वाटून नेहा शांत राहत असे.


      अभ्यास नाही केला, तिच्या हातून पडून फुटले तरीही तीला न ओरडणे, आणि ती म्हणेल ती वस्तू तीला लगेचच आणून देऊन तिचे हट्ट पुरवले जाणे, हे शरदच वागणं नेहाला खटकत असे,  कां नेहमीच तीची हांजी हांजी करत बसायचे अशाने ती बिघडेल, डोक्यावर बसेल, असं वाटून नेहा तिच्या विरोधात काही बोलायला गेली कि ती सावत्रपणा दाखवते , चहाडी करतेय असं त्याला वाटे.


    वास्तविक नेहाने आश्वासन दिल्याप्रमाणे ती मुलांशी, मायेने आणि प्रेमाने वागे, तिचा तक्रारीचा सूर तसाही विनाकारण नव्हताचं.


      त्यामुळे वाढत्या वयात शिवानी कानात वार शिरल्यासारखी शेफारली होती. हट्टी झाली होती, नेहावर चिडून, रागवून बसू लागली. नेहा तिच्या बावरलेल्या स्वभावाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागली, गप्पा मारून तिचे ओठ हसरे करण्याचा प्रयत्न करू लागली.


          नेहाने घेतलेला वसा टाकला नव्हता, ती मन संकुचित न करता मुलांचं आपल्या परीने करतंच राहिली, आणि स्वच्छ प्रसन्न टापटीपीचे घरं, घरगुती जेवणाचे विविध प्रकार, शृंगाराचे नवे पर्व ती स्वतः सजून राहून साजर करत असे, मुलांना वेगळेपण भासू द्यायचे नाही ते तर तीने अट्टाहासाने घेतलेले व्रत होते, मुलांवर न रागावता शरदला खुश ठेवण्याची कसरत करताना, कधी कधी तिचा तोल जायचा, तिच्या सहनशक्तीला मर्यादा होत्याच ना आणि मग ती चिडायची...


        तीची संसारातली तत्परता, तीची शिवानीशी बोलण्यासाठी केलेली धडपड शरद बघतच होता त्यामुळे कधीतरी नेहाचं ऐकून जर चुकून शरद शिवानीला ओरडलाच तर त्याला दिवसभर वाईट वाटे, आपण दुसरं लग्न करून मुलांवर अन्याय तर नाही ना केला असं त्याला अपराधी वाटू लागे.


     पण नेहा म्हणे सक्खी आई पण प्रसंगी चिडते, आपल्या मुलाला मारतेच ना... शरद शिवानीच्या बाबतीत नेहाचं ऐकत नसे, त्यामुळे नेहा स्वतः वरचं करवादून त्याच्याशी हुज्जत घालत राही. त्यातून ती चिडचिडी होऊ लागली होती.


     मुलांनी तुझ्या अपरोक्ष चांगलाच कौल शरदला दिला पाहिजे, त्यांच करताना तू कधीच दुजाभाव करायचा नाहीस असं तिच्या आईने तीला आधीचं सांगून ठेवलं होतं.

   
    शरदला ही याबाबतीत जेवढं समाधान देता येईल तेवढेच आपण सुखी होऊ असं तीला वाटे, मुलांना जपलं, तर आपलेच त्यात हित आहे, हे जाणून नेहा मुलांचं सगळं आपलेपणाने करत राही.


     शरदचं प्रेम तीला भरभरून मिळत असल्यामुळे ती सध्या खुश असे, संसारात गुंतून गेली होती, शरदला नवीन नवीन पदार्थ करून, खायला घालून ती त्याला खुश करत राहिली, कधी नव्हे ते शरदही तिच्याबरोबर सिनेमा बघायला जाऊ लागला. आनंदाचे, हर्षाचे दिवस जातं होते, दोन वर्ष अगदी खुशीत गेली , शिवानी दूर दूरच राही, पण उलटून बोलत नसे...


       नाही म्हणायला अस्मिताचा संसार हातात घेऊन तीला कधीतरी कसतरीचं वाटे....तीला पण तिच्या मनाप्रमाणे घरं सजवावे असे वाटे, एकदा ती अशीच पडदे बदलायला गेली तर शिवानी ओरडून बोलली, आईने हौशीने ते पडदे तिच्या आवडीने शिवून घेतले होते, ते तशेच राहुदेत, नेहाला वाईट वाटलं..


      माहेरी मध्यंतरी वहिनीची डिलिव्हरी झाली, तीला गोंडस मुलगी झाली, नेहा एक दिवसासाठी बारशाला जाऊन आली होती... माहेरी सगळं छान चाललं होतं, छोटीला सहा महिने झाल्यावर गणपतीच्या सणात वहिनी बोलली ताई मी आणि छोटी दोन दिवसासाठी राहायला येतो, मग आपण पुण्यात मोठे, मोठे गणपती असतात ते पण बघूया, नेहा खुप खुश झाली.


       वहिनी आली नेहाने टापटीप ठेवलेल घरं बघून खुश झाली, रंगीत काचेच्या बरण्या, सुंदर स्वच्छ किचन, दार - खिडक्या सजवलेल्या, पुस्तकांचे सुंदर कपाट, चकचकित घरं, आणि त्यातली गृहिणी नेहा पाहून तीला खुप समाधान वाटलं... नेहा खुश होती नोकरीं सोडल्याचा तीला कसलाही पच्छाताप नव्हता, ती संसारात रमली होती.


       संसार सुखाचा चालला होता, आणि वयाच्या           बेचाळीसाव्या वर्षी नेहाची पाळी चुकली, तीने शरदला सांगितल्यावर तो म्हणाला अबोर्शन करून ये, घरात आधीचं तीन मुलं आहेत. शिवानी आता मोठी झाली आहे तिच्या दुसऱ्या आईला मुलं होतंय ऐकून ती कशी रिऍक्ट करेल...


     पण नेहाला मनातून वाटे पहिल्या वेळी ओवीच्या वेळी गरोदरपणात माझे हाल झाले, कोणीच नव्हतं माझे लाड करायला, डोहाळे पुरवयला, मी एकटीनेचं सगळं सोसलं, पण आता सर्व सुखं पायाशी आहेत तर अजून एक मुलं सुखात छान होऊदेत कि...घरात सगळ्या कामाला बायका आहेत, मला काहीच अवघड जाणार नाही...


       छोटा शरद अंकुरायची स्वप्ने तिच्या मनी रुजत होती, बाळाची चाहूल तिच्या उदरपोकळीत स्थिरावली होती... पोटात नवबीज अंकुरत होतं, ती नवलाई आईला सांगावी असं ही तीला वाटतं होतं. पण शरद तयार नव्हता, शरदला प्रेमाने अजून उदया समजावून बघूया असं तीने मनाशी ठरवलं...शरदच्या आधीच्या मुलांची मी रेडिमेड आई आहे  आता त्याच्या हक्काच्या मुलाची आई होण्याचं सुखं मला मिळावं असं तीला वाटू लागलं होतं.


       नेहा संसारात पडली असली तरी केवळ अस्मिताच्या मुलांची देखभाल करण्यात आपलं आयुष्य जाऊ नये, आणि ओवीला पण सक्खी भावंड असावीत असं तीला वाटे, शिवानी आणि स्वरूप सावत्र भावंड आहेत ती भविष्यात माझ्या मुलीला विचारतील कि नाही असं तीला सध्या वाटतं असे.


       तीची आई पण तीला म्हणाली तुम्हाला एक मुलं होऊदेत अगं... आणि चार मुलं घरात असली तरी काहीच अडचण नव्हती, आर्थिक परिस्थिती उत्तमच होती त्यामुळे कसलाच प्रशन नव्हता...


     ( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शरद नेहाला मुलं होऊ देण्याबद्दल काय निर्णय घेतो ते )

🎭 Series Post

View all