भाग -30
( मागच्या भागात आपण बघितलं - शिवानी अनिशला हो बोलते आता पुढे )
शिवानीचा दहावीचा निकाल लागला, तीला बहात्तर टक्के मिळतात, आणि अनिशला नव्वद टक्के पडतात, शरदला वाटतं असतं तीला जास्त टक्के मिळतील, पण त्याचा अपेक्षाभंग होतो, नेहा पण तिचे मार्क्स बघून नाराज होते, शिवानी आणि अनिश एकाच कॉलेजला ऍडमिशन घेतात.
दोघे एकाच कॉलेजला म्हंटल्यावर रोज भेट होतं असे, त्यामुळे हळू हळू अनिशाला शिवानीचा स्वभाव समजू लागला होता, शिवानी प्रत्येक गोष्टीत आपलं तेच खरं करायची. अनिशचे खास मित्र पारस आणि अनमोल त्याला नेहमी सांगायचे, ती तुझ्या योग्यतेची नाही आहे, ती खुप हट्टी आहे. पण अनिश शिवानीच्या प्रेमात आंधळा झाला होता.
अनिश एकदम सुसंस्कारी मुलगा, दिसायला राजबिंडा, स्वभावाने मनमिळाऊ, अनिश साने हा प्रताप साने ह्यांचा मुलगा, एक मोठे प्रस्थ, स्वतःचा बिजनेस असणारे प्रतापराव तसें स्वभावाने कडक होते, त्यांची पत्नी प्रेरणा गृहिणी होती.. एवढ्या मोठ्या कुटूंबातील असून पण अनिशला अजून गर्वाने स्पर्श केला नव्हता, तो एकदम छान, सगळ्या नोकरांशी पण प्रेमाने असा वागणारा मुलगा होता.
नवीन कॉलेज, नवीन चेहरे, नवीन आव्हाने, शिवानी आणि अनिश , दोघंही आपापल्या स्वप्नांनी भारलेले होते, कॉलेजमध्ये प्रवेश घेत होते. अनिशला एक साधा, शांत आणि अभ्यासू मुलगा म्हणून ओळखलं जातं. तर शिवानी स्वतःलाच कोणतरी मोठी समजणारी अशी ह्या दोघांची जोडी अल्पवधीतच कॉलेजमध्ये चर्चेचा विषय बनली होती.
शिवानी कायम स्वतः ला वरच्या टप्प्यात बघायची, एकदा एका स्पर्धेत तिचा पराभव झाला, तेव्हा ती चिडली होती, अनिशने तीला धीर दिला आणि सांगितलं की पराभव यशाची पायरी असते. अनिशला तीला रागात असल्यावर तीला कसं सावरायचं तीला कसं हॅन्डल करायचं, तेही न चिडता हे सगळं आता जमू लागलं होतं, त्याचं ते प्रेमळ समजावणं आणि त्याच्या शब्दांनी ती सुखावली जाणं हे नेहमीचंच असे.
तसें हे दोघेही श्रीमंत कुटुंबातून आलेले आणि शहरातील सर्वात प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकत होते. अनिश नेहमीच लक्षवेधी असायचा - महागडी गाडी, स्टायलिश कपडे, आणि त्याच्या मित्रांच्या घोळक्यात तो कॉलेजच्या स्टार सारखा वावरायचा.
शिवानी सुद्धा कॉलेजमध्ये चर्चेचा विषय होती. सुंदर, बुद्धिमान आणि आत्मविश्वासाने भरलेली होती, स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून आपलं प्रेम पण जपत होती.
अनिश शिवानीच्या आवडीनिवडींमध्ये रस दाखवू लागला, तिच्या वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांचे एकमेकांबद्दलचे मतभेद कधी स्टेटससाठी, तर कधी पसंती-नापसंतीवरून असायचे. मात्र, या संघर्षांवर ते प्रेमाने मात करायचे.
खरंतर दोघें अगदी वेगळ्या स्वभावाचे होते पण एकमेकांना सांभाळून घ्यायचे. त्यांचं नातं एका सुंदर फुलासारखं हळूहळू फुलत गेलं. एकमेकांच्या सहवासात त्यांना स्वतःमध्ये बदल जाणवू लागला.
दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. त्यांचं प्रेम कॉलेजपासून फुललं होतं, आणि दोघांचं नातं खूपच गोड आणि सुंदर होतं. एकमेकांसोबत भविष्याचं स्वप्न बघत, ते आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याची स्वप्ने पाहू लागले.
दोघांच्याही घरी अजून काहीच माहिती नव्हतं, शिवानी दोनदा अनिशच्या वाढदिवसाला बाकीच्या मित्र- मैत्रिणींबरोबर त्याच्या घरी गेली होती.
शिवानीच्या घरी नेहाला तिच्यावर संशय होता पण शिवानीचे सगळे मित्र- मैत्रिणी कधीतरी प्रोग्रामला घरी येत असतं, सतत फोनवर बोलत असतं त्यामुळे काही कळत नव्हतं.
कॉलेजची पाच वर्ष पूर्ण झाली, शिवानीने फॅशन डिझाईनला ऍडमिशन घेतले आणि अनिशने त्यांची कंपनी जॉईन केली. दोघांचंही प्रचंड बिजी लाईफ सुरु झालं.
तरीही ते एकमेकांना वेळ देत असतं, एकमेकांना वेळ देणं, मूवी बघणं, पिकनिकला जाणे चालू असे, लंच, डिनरला अधून मधून जातं असतं. त्यात शिवानीचे रुसवे - फुगवे सांभाळून घेणं चालूच असे.
नेहमी भेटायचं ठरवून ऐनवेळी प्लॅन कॅन्सल करणं हे शिवानीच नेहमीचंच असे, अनिश त्याच्या मिटिंग कॅन्सल करून शिवानीला वेळात वेळ काढून भेटायचं ठरवत असे पण ती तिच्या मुडनुसार मध्येच दुसरं काम आहे असं सांगून येतच नसे.
अनिशचे खास मित्र पारस आणि अनमोल शिवानी त्याच्या टाईपची नाही आहे असं सांगून सांगून कंटाळून गेले होते, अनिश त्यांना म्हणतं असे, अरे माझं प्रेम आहे तिच्यावर, कधीतरी टोकाचे वाद होतात पण मी आहे तिचे मूड संभाळून घ्यायला...
पारस त्याला एकदा बोलला पण तुझे बाबा तीला स्वीकारतील कां, तोच प्रशन अनिशला पण हल्ली सतत पडत असे, त्यामुळे त्याने पारसला भेटायला बोलावलं होतं.
पारसला अनिश म्हणाला, आज सकाळीच आई - बाबांना काहीतरी माझ्या लग्नाचं म्हणत होती. . मला खुप टेन्शन आलंयं रे, शिवानीचा स्वभाव तसा पटकन कुणाशी जुळवून घेण्याचा नाही आहे... ती आई - बाबांना प्रेम लावेल ना....
पारस म्हणाला शिवानी काय म्हणतेय यावर,अनिश म्हणाला- तीला लग्न करायला प्रॉब्लेम नाही पण एवढ्यात नको असं पण आहे तिचं , पण लग्नानंतर वेगळं राहायचं म्हणते ती. तीला आई - बाबांबरोबर नाही राहायचं,
काय सांगतोस काय, तू एकुलता एक मुलगा, एवढा मोठा बिजनेस आणि आई - बाबांना सोडून वेगळं काय राहणार, पारस अचंबित होऊन बोलला....
अनिश म्हणाला मी तीला सांगितलं आहे मी वेगळं राहणार नाही असं.. पण ती ऐकत नाही आहे, माझी अवस्था वाईट झाली आहे एकीकडे शिवानी आणि दुसरीकडे आई - बाबा..
.
त्यात बाबा कडक आहेत, शिस्तीचे आहेत, आणि शिवानीच वागणं म्हणजे बेफिकीर आहे कोणाबद्दल तीला तशी काळजी नसते, तीला आस्था कमी आहे तशी. तीला जमवून घेता येईल असं वाटतं नाही आहे मला. त्यात शिवानी एक - दोनदा घरी आली होती तेव्हा आईशी पण खास अशी प्रेमाने वागली नाही अरे...
आणि काकांनी तीला पसंत नाही केलं तर, तू काय करणार आहेस?”
पारसने मुद्द्द्यालाच हात घातला.
पारसने मुद्द्द्यालाच हात घातला.
अनिश म्हणाला, तेच ना रे, बाबा शिवानीला स्वीकार करणं कठीणचं आहे त्यात शिवानी पहिल्यापासून स्वतःच खरं करणारी आहे, तीला तिचे निर्णय घ्यायची सवय आहे, मी जरी नाही बोललो तरी ती चिडचिड करते अरे..
मी असं करतो उदया सकाळी आईला बोलून बघतो ती काय म्हणते ते बघतो, तिचं काही नसतं अरे मी तिचा लाडका आहे, माझ्या खुशीसाठी ती शिवानीला स्वीकारेल...
पण आयुष्यात सगळं असंच सोपं नसतं.
अनिशची आई अगदी मृदु स्वभावाची गोड अशी बाई होती, पण वडील तितकेच कडक होते, त्यामुळे शिवानीबद्दल अनिशच्या घरी तो कसं सांगणार आणि त्यानंतर काय घडणार ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत...