Login

प्रेमाची वीण - भाग - 34

Premachi Vin

भाग - 34


( मागच्या भागात आपण बघितले - शिवानी अडचणीत अनिशचा हात सोडून निघून जाते आणी आसावरी त्याला सावरते आता पुढे )


      अनिश आणी आसावरी आता चांगले फ्रेंड्स बनले होते, वेळ मिळाला तर एकत्र बसून कधीतरी दोघे छान गप्पा मारत असतं, प्रेरणाताई आणी प्रतापराव त्यांच्यातलं नातं हळूहळू बहरतंय हे बघून खुप खुश होते. प्रेरणाताई तर शिवानी आपली सून म्हणून आता येणार नाही म्हणून पण खुशीत होत्या.


एके दिवशी अनिश आसावरीला म्हणाला मला खुप भीती वाटतेय, मी भविष्यात चालू शकेन ना गं...


त्यावर आसावरी म्हणाली.... अनिश मी खुप वेळा तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही कायमचे अपंग नाही झाले आहात, तुमच्या पायातले त्राण गेले आहेत, हळू हळू ट्रीटमेंटने नीट होतील तुमचे पाय, तुम्ही पुन्हा नीट चालू शकणार आहात, हा माझा आत्मविश्वास आहे, लवकरच सगळं सुरळीत होईलं बघा...


अनिश म्हणाला कां कोण जाणे पण तुझ्या ह्या अशा आशावादी बोलण्यानेच मला उभारी येते अगं, पुन्हा उत्साह वाटतो तुझ्या बोलण्यात नक्कीच जादु आहे बघ...


ह्या वाक्यावर आसावरी हसली आणी मनातल्या मनात विचार करू लागली, माझ्या माणसासाठीचं तर करतेय सगळं, जेव्हा पहिल्यांदा अनिशचा फोटो बघितला होता तेव्हापासूनचं तो मनात भरला होता, त्याला बघण्यासाठी इकडे येणं, मला तो आवडणं, मी त्याच्या हळूहळू प्रेमात पडणं, हे सर्व नियतीच्याच मनात होतं.


       अनिशचा अपघात होणं मी त्यासाठी इथे अजून एक महिना राहणं, त्याची सेवा करणं, हे सर्व नशिबाचेच फासे असतात. माझी आई एवढी कडक असूनपण तीने मला इथे राहू देणं, माझ्या बाबांनी मुलीच्या मनातलं ओळखुन प्रेमासाठी मला इथे ठेवून जाणं, अनिशच्या घरच्यांना मी आवडणं, काकीनी तर मला अगदीचं सुनेसारखं वागवणं, अनिशची मैत्रीण शिवानी अपघातामुळे त्याच्यापासून दुरावणं आणी त्याची आणी माझी जवळीक वाढणं, हे सर्व तो गणपती बाप्पाचं घडवून आणतोय, तीने मनोमन देवाचे आभार मानले...


          अनिश आता तसा बरा झाला होता पण त्याच्या पायात अजूनही तेवढी ताकद नव्हती, पण तो कुबड्या घेवून चालत असे, आसावरी चित्रकार होती, ती चित्रकलेचे क्लास तिच्या घरी घेत असे, ती पेटिंगस काढत असे. आणी कधीकधी तीची चित्र प्रदर्शनसाठी पण देत असे.


      आसावरीला आता दोन महिने होतं आल्यामुळे आणी अनिश आता बऱ्यापैकी सावरल्यामुळे आसावरीची आई तिचं काहीच ऐकेना आणी ती तीला तिच्या घरी ये, म्हणून तगादा लावू लागली होती.


       त्यामुळे आसावरी पण आता नाइलाजाने कां होईना पण घरी जाण्यासाठी निघाली होती. पण त्याआधी तिचं एक पुण्यात चित्रांचं प्रदर्शन होतं तिथे तीला जायचं होतं तिच्या पेन्टिंग्स सादर करायच्या होत्या आणी अनिशचा आठ दिवसांनी वाढदिवस पण होता म्हणून प्रेरणाताई प्लिज अजून आठ दिवस रहा अशी तीला विनंती करत होत्या.


    हो, नाही करता करता आसावरी अजून आठ दिवस राहायला तयार झाली, आणी मग ती आणी प्रेरणाताई मिळून अनिशचा वाढदिवस कुठेतरी छान हॉटेलमध्ये करू म्हणून प्लॅनिंग करू लागल्या... त्यांनी त्यांच्या मदतीला अनिशच्या मित्राला पारसला पण घेतले होते, सगळे मिळून अनिशला सरप्राईज देणार होते...


     त्याआधी आपलं अनिशवर मनापासून आणी खुप प्रेम आहे हे त्याला सांगून टाकावं असं आसावरीला वाटतं होतं, आणी म्हणून एके दिवशी तीने अनिशला तीला काही खरेदी करायची आहे असं सांगून मी आज ऑफिसला येते आणि मग आपण दोघे छान खरेदी करून बाहेरचं जेवून घरी येऊ असं अनिशला सांगितलं.


        ठरल्याप्रमाणे ती ऑफिसला गेली आणी मग संध्याकाळी सात वाजता दोघे खरेदीला बाहेर पडले, दोन - तीन दुकानात कपडे घेतल्यावर आसावरी अनिशला म्हणाली मला जायच्याआधी माझ्याकडून तुम्हाला एक छानसा शर्ट - पॅन्ट घ्यायचा होता.


     अनिश नको नको म्हणत असताना आसावरी त्याला एका मोठ्या शोरूममध्ये घेऊन गेली, तिथे खरेदी करत असताना अनिशला शिवानी एका मुलाबरोबर हातात हात घालून दिसली, त्याने शिवानीला हाक मारली तीने वळून पाहिलं, आणी हाय अनिश, कसा आहेस असं विचारलं,


      अनिश बरा आहे थोडा आता असं बोलला, ती पटकन म्हणाली मीट माय फियान्सी, अमेरिकेत असतो, चार दिवसांनी साखरपुडा आहे, आणी नेक्स्ट मंथ लग्न करून आम्ही अमेरिकेत जाणार... तिच्या चेहऱ्यावरवरची ख़ुशी बघून अनिशला एकदम आश्चर्य वाटलं... त्याने तिचं अभिनंदन केलं, ओह थँक्स असं म्हणून ती त्या मुलाचा हात धरून पटकन निघून पण गेली...


       अनिश तिच्या वागण्याचा विचार करत राहिला, ही शिवानी माझ्या बरोबर लग्न करायला सांगितलं तर एवढ्या लवकर नको, अजून वेळ आहे असं बोलून वेळ मारून नेत होती, माझ्या घरातल्याना भेटून ते अशेच आहेत तसेच आहेत असं मला भडकवत राहिली, आणी मी हिच्या वरच्या प्रेमासाठी माझ्या घरच्यांना पण दुखावत होतो, पण हिला कोणाचीच पडलेली नाही आहे, माझ्यापेक्षा अजून श्रीमंत मुलगा मिळाला ही लग्न करायला निघाली लगेचच त्याच्याबरोबर... नशीब देवाने मला वेळीच अद्दल घडवली नाहीतर हिने कसा संसार केला असता माझ्याबरोबर... माझ्या घरातल्याना पण त्रासच दिला असता हिने...


    आसावरी गप्पपणे बाजूला उभी होती तीने अनिशला हलवलं, अनिश कसला विचार करताय, चला शॉपिंग करूयाना असं बोलून तीने अनिशला दुसरीकडे नेलं...


       खरेदीनंतर दोघे जेवायला एका हॉटेलमध्ये पोचले, आसावरी सांगू लागली, माझं चित्र एका प्रदर्शनसाठी सिलेक्ट झालं आहे, दोन दिवसांनी प्रदर्शन आहे... अरे वा खुप छान बातमी दिलीस अनिश खुशीने बोलला... अनिश मला अजून काहीतरी सांगायचं आहे - हा बोल ना काय... अनिश तिच्याकडे बघत बोलला....


      अनिश... माझं तुमच्यावर खुप प्रेम आहे, आणी मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, मला तुम्ही खुप आवडता... तुमच्यावरच्या प्रेमाखातरचं मी इकडे एवढे दिवस राहू शकले, तुमच्या आई - बाबांना तर मी कधीपासून मनात सासू - सासऱ्याचं स्थान दिलंय, तुमच्या घरात मी छान रूळली आहे ते घरं मला आपलंस वाटू लागलं आहे.. तुम्ही आजारी आहात मान्य आहे मला पण मला माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्याशिवाय राहवत नव्हतं...


   अनिश म्हणाला - हे बघ आसावरी माझ्याबरोबर लग्न करून स्वतःचं आयुष्य असं वाया घालवू नकोस, माझ्या पायाची ट्रीटमेंट कधीपर्यंत चालेल किंवा मी कधी नीट चालेन हे आपल्याला माहीत नाही आहे कितीही कालावधी लागू शकतो, प्लिज तू माझ्यात अडकून पडू नकोस... तुला कोणीतरी चांगला धडधाकट मुलगा नक्कीच मिळेल...


   
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - आसावरी तिच्या घरी निघून गेल्यावर तरी अनिशला तिच्या ओढीने तीला स्वीकारावंस वाटतं कि नाही ते )