Login

प्रेममय गाथा

अन्वयाच्या लेखणीतून
आकाश जिथे धरणीला
भेटाया खाली झुकते
ती रेष सांगते त्यांचे
असीम अद्भुत नाते

कधी डोंगर माथा बनुनी
मुद् अवखळ गगनी जाते
कधी धारातून झरणारी
गगनाची माया स्मरते

कधी निरोप घेऊन येते
इंद्रचाप धरणीपाशी
कधी बाष्प होऊनी अश्रू
गगनात मेघांपाशी

ऋतू येती आणिक जाती
कधी बहर कधी अंगार
कधी काळोख दाटूनी येतो
कधी दाटून येती मेघ

थकून गगनही केव्हा
टेकते धरणीवर माथा
धरणीची ओली माया
अदृश्य प्रेममय गाथा