प्रेमबंध भाग १०८
मागील भागाचा सारांश: शौर्यने बाईक घेतली होती. त्याच्या बाईकची पुजा मृणालने केली. शौर्यने स्वराला लग्नाबद्दल समजावून सांगितले. स्वरा तिच्या आईशी त्या विषयावर बोलली तेव्हा आईने तिला खूप छान समजावले. स्वराने आईची माफी मागितली. सागर मोहितेला तिने लग्नासाठी होकार दिला.
आता बघूया पुढे….
शौर्य बेडवर पडला, पण त्याला झोप लागत नव्हती. त्याच्या डोक्यात गेल्या दिवसांपासून जे काही घडलं त्याचे विचार सुरू होते. स्वरा, आई, बाबा, मृणाल, निरंजन आणि बाकीचे सगळेच.
झोप लागत नसल्याने त्याने मोबाईल हातात घेतला व आज बाईक सोबत काढलेले फोटो बघण्यात तो मग्न झाला. बाईकचे फोटो बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली.
मृणाल बाईकची पुजा करत असताना त्याने फोटो काढला होता. तो फोटो त्याने झूम करून बघितला. शौर्य मृणालकडे कितीतरी वेळ टक लावून बघत होता.
‘मृणाल, तू किती मस्त आहेस यार. माझा किती विचार करत असते. मी तुझं प्रेम नाकारलं तरी तू माझ्यावर अजूनही प्रेम करत आहेस, ते तुझ्या डोळ्यात दिसतंय. तू मला समजून घेतेस. माझी बाईक बघून तुला झालेला आनंद तुझ्या डोळ्यात दिसत होता.
मृणाल, तू पण मला आवडायला लागली आहेस. तू नाईट ड्रेस मद्धे असली ना तरी मला जगातील सगळ्यात सुंदर मुलगी तू वाटतेस. मला समजत नाहीये, तुला प्रपोज करू का? तुला माझ्या मनातील भावना सांगू का?
नाही आता लगेच नको. पुढच्या आठवड्यात व्हॅलेंटाईन विक आहे तेव्हाच मी माझ्या मनातील प्रेम तुझ्याकडे व्यक्त करतो. आपल्या दोघांनाही या क्षणाची आठवण राहील.’
शौर्यने सगळं काही मनोमन ठरवून टाकलं होतं. मृणालच्या साथीने आयुष्याचे स्वप्न बघत त्याला झोप लागली.
सकाळी उठल्यावर त्याच नेहमीप्रमाणे रुटीन सुरू झालं होतं. निरंजन गाणं गुणगुणत आवरत होता.
“निरंजन, आज एकदमच खुश दिसतोय.” शौर्य लॅपटॉप वर काम करत म्हणाला.
“मी दररोजच खुश असतो.” निरंजन.
“तू आज पहिल्यांदा गाणं गुणगुणत आहेस.” शौर्य.
निरंजन त्याच्या समोर येऊन बसला.
“शौर्य, स्वाती माझ्या आयुष्यात परत आल्यापासून माझं आयुष्यच बदलून गेल आहे. जगण्यासाठी दिशा मिळाली आहे.
मी आधी कितीही म्हणायचो की, मी एकटा आहे तरी सुखी आहे तर अस काही नव्हतं रे. मी मनातून कायम एकटा होतो.
आता दररोज आईचा जेवण केल का? हा फोन येतो. माझी काळजी घे अस सांगायला ही माणसं आहेत. स्वातीच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला एक वेगळंच समाधान देऊन जातो.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रेम देणारी माणसं आवश्यक आहेत. एकटा माणूस कधीच खुश राहू शकत नाही.”
निरंजनला बोलताना भरून आलं होतं.
“मित्रा, आता ही सगळी माणसं जपून ठेव. असाच नेहमी आनंदी रहा.” शौर्य.
“तू तुझं काम कर. मलाही लवकर निघायचं आहे.” निरंजन त्याच्या रुममध्ये निघून गेला.
शौर्यला त्याच्या बाबांचा फोन आला. बाबांनी त्याला रात्री झालेल्या चर्चेबद्दल सांगितलं. स्वराने मनापासून दिलेला होकार ऐकून शौर्यला सुद्धा छान वाटले. बाबा व शौर्य मध्ये विषयाला धरून चर्चा झाली.
कंपनीत जाण्याची वेळ झाल्यावर शौर्य आपलं आवरून घराबाहेर पडला. बाईकवर बसून कंपनीत जाण्याचा आनंद काहीतरी वेगळाच त्याला वाटत होता. बाबांनी लहानपणी सायकल घेऊन दिली होती तेव्हाही एवढा आनंद त्याला झाला नव्हता.
कंपनीत गेल्यावर त्याच ठरलेलं रुटीन सुरू झालं. लंच ब्रेकमध्ये मृणाल सोबत जेवण करता याव यासाठी शौर्य त्याच काम आटोपून पटकन कॅन्टीन मध्ये गेला. मृणालला बघितल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल आली. सायलीने ते नोटीस केलं होतं.
“शौर्य, बाईक घेतलीस आणि मला पार्टी सुद्धा दिली नाही.” सायली म्हणाली.
“या विकेंडला तुम्हाला दोघींना पार्टी देतो.” शौर्य म्हणाला.
“सागर मोहितेच पुढे काय झालं?” सायलीने विचारले.
“स्वराने लग्नासाठी होकार दिला आहे. आता बाबा पुढील फॉर्मलिटीज करणार आहेत.” शौर्यने उत्तर दिले.
सायली व शौर्य दोघेच बोलत होते. मृणाल शांतपणे जेवण करत होती.
“मृणाल, तू कुठे हरवली आहेस?” शौर्यच्या डोळ्यात तिच्या बद्दल काळजी दिसत होती.
“काही नाही.” मृणाल.
“मग तू अशी शांत का?” शौर्यने विचारले.
“माझ्या मावशीला काल रात्री हार्ट अटॅक आलाय, तर तिचीच काळजी वाटत आहे.” मृणाल.
“मावशी कुठे असते?” शौर्य.
“नाशिक.” मृणाल.
“मावशी ठीक होतील, तू काळजी करू नकोस.” शौर्य.
“लहानपणी तिने माझा खूप सांभाळ केला आहे. आईकडे काही मागितलं की मावशी ते घेऊन हजर व्हायची. अजूनही ती माझे खूप लाड करते. रात्री तिचं ऐकल्यापासून डोक्यात सतत वाईट विचार येत आहेत.” मृणाल.
“मृणाल, तू काहीच वाईट विचार मनात आणू नकोस. मावशी ठणठणीत बऱ्या होतील. तुझी इच्छा असेल तर सुट्टी घेऊन त्यांना भेटायला जाऊन ये.” शौर्यने मृणालला समजून सांगितल्यावर ती थोडी रिलॅक्स झाली होती.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe