Login

प्रेमाचे घरटे (भाग२)

जलद कथा

प्रेमाचे घरटे

तेवढ्यात अनिकेत उठून तिच्या जवळ आला.

"स्मिता झोप येत नाही का? की अजुनही तू तोच विचार करत आहे. नव्या उमेदीने जग. अग एवढ्याशा घटनेने तू इतकी हतबल का झाली आहेस? आता आराध्याच आपलं जग आहे."

तो तिला स्वतः च्या जवळ घेतो आणि मोठ्या विश्वासाने तिला दिलासा देतो.

"अग माणसाने कोणत्याही गोष्टीत इतकं गुंतून पडू नये. "

पाहुया पुढे.....

"स्मिता तुझ्या मनात काही तरी सलतय. इतके दिवस मी याच दिवसाची वाट बघत होतो. बोलून मोकळी हो."

"अहो, कसा विसरू तो दिवस. ज्या दिवशी दवाखान्यातून आपण रिकाम्या हाताने परतलो. तो दिवस ... ते माझं इवलसं बाळ ... ज्याला मी उराशी सुध्दा घेतलं नव्हतं. माझं बाळ मी गमावलं होतं. नऊ महिने खूप काळजी घेतली. सगळ्यांनी माझी खूप हौस मौज केली. पण दवाखान्यात जाण्याची तयारी करत असतांनाच ऐनवेळी माझा पाय सटकला आणि मी पोटावर पडले. जेव्हा शुध्दीवर आले तेव्हा माझं बाळ.... देवाने एवढी मोठी शिक्षा मला दिली होती."

"अग असं का बोलतेस. जे झालं ते आपला भुतकाळ होता. आता आराध्याच्या रुपाने आपण परत आई बाबा झालो आहोत. अगं या वेदना तू एकटीच नाही तर मी सुद्धा भोगतोय."

"पण, आज या पिल्लाला असं पुरतांना माझे हात थरथरत होते. मन आक्रंदन करत होते. मी आराध्या समोर काहीच बोलले नाही. पण आता मात्र माझा संयम सुटला होता. ते बघीतलस का ? तो पक्षी अजुनही झाडावरच बसलेला आहे. फार दुःखी, कष्टी झाला आहे."

"स्मिता, जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचे चक्रच आहे. त्याला सामोरे गेलेच पाहिजे. तू आता झोप बर. आराध्याच्या चिवचिवाटाने आपली सकाळ प्रसन्न होते ना मग आपल्याला अजून काय हवं आहे. तो पक्षी त्याच्या वाटेने निघून जाईल. तू नको काळजी करू."

तेवढ्यात "आई, ते पिल्लू खाली पडलं ग. त्याची आई रडत आहे ग." असं म्हणत तीन चार वर्षीची आराध्या झोपेतच रडू लागली.

"आराध्या, काय झालं बाळा?"

"बघ स्मिता एवढी भावनिक गुंतागुंत नको ग. अशाने तुलाच त्रास होईल."

स्मिताने आराध्याला जवळ घेतले आणि थोपटून तिला झोपवू लागली.

"साॅरी,"

"अग झोप आता शांत पणे. आपल्या प्रमाणे तो पक्षीही मनाने कणखर होईल बघ."

मनाने अस्वस्थ झालेल्या स्मिताला बऱ्याच वेळा नंतर डोळा लागला. सकाळी सकाळी जागा आली ते त्यांच्या छकुलीच्या म्हणजेच आराध्याच्या आवाजाने.