प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग १० )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                            प्रेमने रॉबर्ट आणि प्रीतमला मेसेज करून आपला मोबाईल खिशात ठेवलाच होता की, तेवढ्यात एकदम स्फोट झाल्याचा आवाज आला. त्या आवाजाने सियाने घाबरून पटकन प्रेमचा हात पकडला. त्याचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. तिने त्याचा हात पकडला होता तर त्यानेही घट्ट पकडून घेतला होता. सियाच्या कारसमोर जी अंगरक्षकांची कार होती, ती अचानक स्फोट होऊन तिला आग लागली होती. आत बसलेले अंगरक्षक क्षणात त्या आगीच्या झपाट्यात आले होते. सिया घाबरून डोळे मोठे करून त्या जळत असलेल्या गाडीकडे पाहत होती. सियाच्या कार ड्रायव्हरने गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला, तर मागची अंगरक्षकांची गाडी सुद्धा तशीच ब्लास्ट झाली आणि तिलाही आग लागली. सियाच्या कारच्या पुढे आणि मागे फक्त आता आगीचे लोट उठत होते. त्या किर्रर्र अंधारात जळत असलेल्या या दोन गाड्यांच्या आगीने प्रकाश पडला होता. सियाचे जेवढे अंगरक्षक तिच्यासोबत होते ते सर्व मारले गेले होते.

" काय होतं हेऽऽऽऽऽ? " सियाने ओरडून कार ड्रायव्हरला विचारलं.

तो ड्रायव्हर काही बोलायला तोंड उघडणारच होता की, एकाएकी तो निपचित पडला. प्रेम आणि सियाला काय झालं ते कळालंच नाही. प्रेमने पुढे वाकून पाहिलं तर त्या ड्रायव्हरच्या डोक्यात गोळी आरपार गेलेली दिसली. त्याच्या डोक्यातून रक्त वाहताना दिसत होतं. सिया मात्र आता खूपच घाबरली होती. ड्रायव्हर सीटच्या बाजूची खिडकी उघडी होती आणि त्या खिडकीतूनच सायलेन्सर असलेल्या गणने त्याच्यावर गोळी झाडली गेली होती. ते दोघे घाबरून मागे पुढे वळून जळणाऱ्या गाड्यांकडे पाहत होते. तितक्यात सियाचा फोन वाजला. तिने पटकन मोबाईल काढून त्यावर नाव पाहिलं. स्क्रीनवर अनोळखी नंबर झळकत होता. त्यावरून तिला फोन कोणाचा असणार याचा अंदाज आला. त्याच बरोबर आत्ता घडलेल्या घटनेमागे कोणाचा हात असणार हेही लक्षात आलं. तिने लक्षात आल्यानंतर रागातच फोन उचलला आणि कानाला लावला.

" मिस मिस मिस... काय चालू आहे तिथे? " त्याने तीन वेळा तिला मिस म्हणून आवाज दिला आणि अगदी शांतपणे प्रश्न विचारला.

" होळी चालू असेल, हो ना? " त्याने गालातल्या गालात हसत तिला विचारलं, पण ती इकडे रागाने धुसफुसत होती.

" खूप मजा आली आज. दोन दोन होळ्या एकाच वेळेला पेटवण्याची मजा काही औरच असते. " फक्त तोच बोलत होता. सिया अजूनही एक शब्द देखील बोलली नव्हती. आता मात्र तिने बोलण्यासाठी तोंड उघडलं.

" ही अशी नीच कामं फक्त तुमच्यासारखे नीच लोकच करू शकतात. नाही का? " तिनेही त्याच्याच भाषेत त्याच्याशी बोलायचं ठरवलं. तिने त्याच्यासाठी जो शब्द वापरला, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं.

" मिस्टर देवांश सरंजामे, तुम्हाला काय वाटलं? तुमच्या या खेळामुळे मी घाबरून जाईन? " सिया आता क्रूर हसत होती.

तिच्या तशा बोलण्याने त्याच्या कपाळावर आठ्या पडत होत्या. प्रेम शांतपणे ऐकण्याचं काम करत होता. देवांशचा फोन आहे समजताच त्यालाही राग आला होता.

" अजिबात नाही, एवढ्याशा घटनेने तुम्ही घाबरणाऱ्यातील नाही आहात. मुळात तुम्हाला घाबरवण्यासाठी हा प्रयत्न केलेला नाही. ट्रायल अजिबात नाहीय हे. खरंतर मी आधी तुमचीच गाडी उडवायला सांगितली होती, पण आधी तुमची गाडी उडवली असती तर एवढी मज्जा आलीच नसती. शिवाय शेवटचं तुमच्याशी बोलायचं राहून गेलं असतं म्हणून फोन केला. " आपला राग लपवण्याचा प्रयत्न करत देवांश बोलत होता.

" हे असे चिरकुट हल्ले तुमच्यासारखे लोकच करू शकतात. स्वतःहून पुढे येण्याची हिंमत नसते तुमच्यासारख्या लोकांमध्ये. तोंड दाखवण्याची भीती वाटते तुम्हाला, म्हणूनच तर हे असे भाड्याने विकत घेतलेले लोक माझ्या मागावर पाठवले आहेत. " सिया जराही न डगमगता बोलत होती.

मघाशी जी भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत होती ती आता नाहीशी झाली होती. तिच्या शेजारी बसलेला प्रेम देखील तिच्यात झालेला हा बदल न्याहाळत होता. तेवढ्यात काही आठ दहा लोक सियाच्या गाडीला घेरून उभे राहिले. आत बसलेल्या तिच्याकडे ते रागाने पाहू लागले. त्यावरूनच तिला समजलं की ती देवांशचीच माणसं आहेत. 

" बरं, मी ठेवू का फोन? बाहेर काही कुत्र्यांची टोळी उभी राहिली आहे. जरा त्यांना हाड टाकून येते. " असं म्हणत सियाने त्याच्या उत्तराची वाट न पाहता फोन कट केला आणि गाडीचा दरवाजा उघडू लागली.

" मॅडम, काय करत आहात? बाहेर नका जाऊ. " सियाला गाडीचा दरवाजा उघडताना पाहून प्रेमने तिचा हात धरला.

तिने त्याच्याकडे वळून पाहिलं, तर त्याच्या डोळ्यांमध्ये तिच्यासाठी काळजी दिसत होती. तिला मागच्या वेळेची घटना आठवली जेव्हा हॉटेलमध्ये एका माणसाने त्याच्यासोबत दंगा केला होता. तेव्हाही तो असाच घाबरलेला होता. नक्कीच त्याला दंगा वगैरे या गोष्टींची भीती वाटत असणार हे तिच्या लक्षात आलं. तिला आता त्याची काळजी वाटू लागली होती. ती तर फायटिंग वगैरे करू शकत होती. मागच्या काही महिन्यांपासून शौर्यने तिच्यावर बरीच मेहनत घेतली होती. ती त्याच्यासोबत त्याच्या फिल्डमध्ये जॉईन झाली होती आणि असंच रात्री रात्रीपर्यंत तिला बाहेर राहावं लागणार होतं, म्हणून शौर्य तिला सेल्फ डिफेन्सचे धडे शिकवत होता. अंगरक्षकही तिच्यासोबत असायचेच, पण ' तिला स्वतःला शिकणं सुद्धा महत्त्वाचं आहे ' , असं त्याचं मत होतं. सध्या ती स्वतःचं रक्षण स्वतः करू शकत होती, पण ती एकाच वेळी दोघांचं रक्षण करण्यात तरबेज नव्हती. अजून तिला शौर्यकडून खूप काही शिकायचं होतं.

" मिस्टर प्रेम, काहीही झालं तरी गाडीतून खाली उतरू नका. गाडीला व्यवस्थित आतून लॉक करा. " अशी म्हणत सिया गाडीच्या सर्व खिडक्या बंद करू लागली. प्रेम फक्त तिच्याकडे एकटक पाहत होता.

" नाही मॅडम, मी एक पुरुष असून असा घाबरून बसू शकत नाही. मी सुद्धा बाहेर यायला हवं. " प्रेम आत बसण्यासाठी नकार देत म्हणाला, तसं तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं.

" तुम्हाला या सर्व गोष्टींची भीती वाटते हे मला मागेच समजलं होतं. प्लीज तुम्ही काळजी करू नका. गाडीतच थांबा. " अशी म्हणत सिया पटकन गाडीतून खाली उतरली आणि तिने ऑटोमॅटिकली गाडी लॉक केली, जेणेकरून बाहेर उभ्या असलेल्या लोकांना गाडीचा दरवाजा उघडता येऊ नये आणि प्रेमपर्यंत पोहोचता येऊ नये.

आता तिला असं वाटायला लागलं होतं की उगाच आपण प्रेमला आपल्यासोबत येण्यासाठी फोर्स केला होता.

ती गाडीतून खाली उतरल्यानंतर प्रेमने आतूनच इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. दूर कुठेतरी त्याला एक गाडी उभी असलेली दिसली. त्या गाडीमध्ये प्रीतम आणि रॉबर्ट होते. ते लांबूनच यांच्यावर लक्ष ठेवून होते. प्रेमने इकडे काहीतरी मेसेज केला आणि रिलॅक्स होऊन बसला.

सिया गाडीतून खाली उतरल्यानंतर समोर असलेल्या लोकांनी तिच्यावर धावून यायला सुरुवात केली. तिने अलर्ट पोझिशन घेतली आणि लढण्यासाठी सज्ज झाली. ती एक स्त्री आहे, कमजोर आहे असं समजून ते लोक एकदम न येता एक एक करून येऊ लागले. सिया त्या सर्वांवर भारी पडत होती. यामुळे प्रेमला तिचं विशेष कौतुक वाटत होतं. एक स्त्री असून सुद्धा ती एखाद्या पुरुषासारखी लढत असताना दिसत होती. मनातूनच तो तिच्यावर खूप खुश झाला होता. निम्म्यापेक्षा जास्त लोकांना तिने जमिनीवर लोळवलं होतं, पण राहिलेल्या लोकांवर वार करणार तेवढ्यात कोणीतरी तिच्या पायावर जोरात काठी मारली.

" आहऽऽऽऽऽ! " तो वार गुडघ्याच्या थोडा खाली बसल्यामुळे तिचा पाय गुडघ्यात वाकला गेला.

तिच्या तोंडून विव्हळण्याचा आवाज आला आणि इकडे प्रेम अस्वस्थ झाला. त्याने आतूनच पटपट गाडीचे लॉक उघडले आणि गाडीतून बाहेर आला. तिकडून रॉबर्ट आणि प्रीतम सुद्धा इकडे धावले. त्याला बाहेर येण्याआधीच त्या माणसाने सियाच्या पाठीवर अजून एक वार केला होता, ज्यामुळे सिया खाली पडली आणि तिचं डोकं जमिनीवर आदळलं गेलं.

तिने महात्प्रयासाने स्वतःचे डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला होता, कारण डोकं जमिनीवर आदळलं गेल्याने डोक्याला थोडा मार लागला होता आणि त्यामुळे तिच्या डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली होती. काही अदृश्य चित्रे तिला डोळ्यांसमोर दिसत होती. जणूकाही कोणीतरी आपल्या शत्रूंना एखाद्या जनावरासारखं धरून धरून आपटत होतं.

समोरची व्यक्ती कोण आहे ते पाहण्यासाठी तिच्यामध्ये शक्ती उरली नव्हती. वेदनेने त्या लोकांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता, पण तिच्या कानांना तो मोठा असलेला आवाज अगदी बारीक ऐकू येत होता. तिच्या अंधुक डोळ्यांना आणखी एक सूटबूट घातलेली व्यक्ती दिसत होती. स्पष्ट दिसत नसल्याने ती व्यक्ती कोण असणार काहीच कळण्याचा मार्ग नव्हता. काहीच वेळात तिची शुद्ध हरपली आणि ती निपचित पडून राहिली.



सूटबूट घातलेली व्यक्ती कोण असेल? आणि या प्रेमचं काय? क्षणात घाबरलेला क्षणात रागीट दिसत होता, नेमका कोण होता तो?



क्रमशः

🎭 Series Post

View all