प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग १२ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                        सियाच्या डोळ्यांच्या पापण्यांमध्ये किंचित हालचाल होत होती. माहित नाही किती वेळापासून बेशुद्ध होती. तिला डोळे उघडण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागत होता. डोळे उघडता येत नव्हते म्हणून तिने स्वतःचा हात हलवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नांनंतर ती हात उचलू शकली होती. थोडी थोडी शुद्धीवर येत होती तर डोकं ठणकायला लागलं होतं. उचललेला हात तिने डोक्याजवळ नेला आणि जिथे दुखत होतं तिथे ठेवला. तिच्या हाताला डोक्याला बांधलेल्या पट्टीचा स्पर्श झाला. हळूहळू कळवळत तिने पुन्हा डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात ती यशस्वी सुद्धा झाली होती.

डोळ्यांवर तीव्र प्रकाश पडला म्हणून आपोआप किंचित उघडले गेलेले डोळे पुन्हा मिटले गेले. तत्क्षणी तिला घडलेली घटना आठवली आणि तिने खाडकन आपले डोळे उघडले. घटना आठवताच डोळे उघडण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न सफल झाला होता. हृदयाची धडधड जलद गतीने सुरू झाली होती. डोळे उघडल्याबरोबर घाबरून तिने इकडे तिकडे आपली नजर फिरवली. पाठीवर वार झाला होता म्हणून तिला उठण्यासाठी प्रयत्न करावा लागला होता. कशीबशी ती उठून बसली आणि पुन्हा आजूबाजूचं निरीक्षण करू लागली.

" मी... मी इथे कशी? मी तर तिकडे रस्त्यावर... " ती सध्या एका प्रशस्त अशा बेडरूममध्ये होती.

तिला समजत नव्हतं की ती इथे कशी आली? सध्या कुठे आहे? आणि तिला इथे कोणी आणलं? एक ना अनेक प्रश्न तिच्या डोक्यात निर्माण होत होते. तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडला गेला आणि एक नर्स आत आली. आल्या आल्या तिची नजर सियाकडे गेली. तिला शुद्ध आलेली पाहून नर्स हसतच तिच्याजवळ गेली.

" हॅलो मॅडम, कसं वाटत आहे आता तुम्हाला? " नर्सने हसून तिची विचारपूस केली.

" थोडी पाठ आणि हा पाय दुखत आहे, पण मी इथे कशी आले? कोणाचं घर आहे हे? बेशुद्ध पडल्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. " सियाने अनोळखी जागा दिसत असल्यामुळे विचारलं.

" हॅलो मिस सिया, कशा आहात? " नर्स काही बोलणारच होती की, तितक्यात एक पांढरं शुभ्र सूटबूट घातलेली व्यक्ती आतमध्ये आली.

आवाजामुळे तिची नजर नर्सवरून हटली आणि त्या व्यक्तीवर गेली. आधी तर तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. जेव्हा काही वेळ ती त्यांच्याकडे पाहत राहिली, तेव्हा मात्र तिचे डोळे मोठे झाले.

" मिस्टर सत्येंद्र अग्निहोत्री? " सिया डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहत होती. त्यांना तिला आपल्याकडे तसं पाहताना पाहून हसूच आलं होतं.

" हो, आम्हीच. सध्या तुम्ही आमच्याच बंगल्यात आहात. " सत्येंद्र हसून तिच्याकडे पाहत म्हणाले.

" पण मी इथे कशी? " सियाने तरीही त्यांना प्रश्न विचारला. आपण सुप्रीम डॉनच्या घरात कसे आलो हे तिला जाणून घ्यायचं होतं.

" आम्ही आमची रात्रीची मीटिंग संपवून त्याच रस्त्याने घरी यायला निघालो होतो. तेव्हा घडत असलेला प्रकार दिसला. तुम्ही बेशुद्ध पडल्यानंतर तुमचे एम्पलोयी मिस्टर प्रेम त्या लोकांशी लढताना दिसले. त्यांना त्या लोकांशी लढताना त्रास होत होता, म्हणून मग आम्ही त्यांची मदत केली. " सत्येंद्र यांनी तिला माहिती दिली, तेव्हा कुठे तिला प्रेम तिच्यासोबत होता हे आठवलं. त्याचं नाव ऐकूनच ती अस्वस्थ झाली.

" प्रेम कुठे आहेत? त्यांना त्या लोकांनी जास्त मारलं तर नाही ना? " सियाने त्याच्या काळजीने सत्येंद्र यांना विचारलं.

" काही काळजी करू नका. प्रेम सुरक्षित आहेत आणि इथेच या बंगल्यात आहेत. तुमच्यासारखेच ते मार लागल्याने बेशुद्ध झाले होते. त्यांच्यावर दुसऱ्या रूममध्ये ट्रीटमेंट सुरू आहे. तुम्ही घाबरण्याची गरज नाही. " सत्येंद्र प्रेमची माहिती देत होते, आणि त्याला मार लागला हे ऐकूनच तिच्या काळजीत भर पडली.

" जास्त मार लागला का त्यांना? मी त्यांना पाहून येते. " ती आपल्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली, पण पायाला आणि पाठीला लागलेलं असल्यामुळे तिला बेडवरून खाली उतरायला त्रास होत होता.

" अरे अरे! बसून राहा तुम्ही. आम्ही सांगितलं ना, काळजी करण्याची काही गरज नाही. प्रेम सुरक्षित आहेत. काही दिवस आराम केल्यावर त्यांनाही बरं वाटेल. " तिला घाईत उठताना पाहून सत्येंद्र म्हणाले. त्यांनी सांगितल्यामुळे ती पुन्हा जशी होती तशीच बसली.

" ठीक आहे, पण त्यांना शुद्ध आल्यानंतर प्लीज मला कळवाल. " सिया अजूनही त्याची काळजी करत होती, ते पाहून सत्येंद्र किंचित हसले आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली.

काही वेळ तिच्याशी बोलून सत्येंद्र तिथून निघून गेले. नर्सचं सुद्धा काम झालं होतं म्हणून ती रूममधून बाहेर पडली होती. इकडे सियाचा मात्र अजिबातच जीव लागत नव्हता. प्रेम ठीक असेल ना? याचाच विचार करत बसून होती. तिने भिंतीवर असलेल्या घड्याळाकडे पाहिलं, तर मध्यरात्रीचे तीन वाजलेले दिसत होते. नंतर तिला रहावलं नाही म्हणून त्रास सहन करत कशीबशी तिथून उठली. हाताची सलाईन काढून टाकलेली होती, त्यामुळे तिला तिथून बाहेर पडणं सोपं झालं होतं.

सिया रूममधून बाहेर आली. तिने आजूबाजूला नजर फिरवली, पण नोकर माणसे सोडलीत तर इतर कोणीही घरातील सदस्य असल्यासारखा वाटत नव्हता. ती तशीच हळूहळू चालत जाऊन एक एक करून रूम चेक करत होती. ती घरात आलेली पाहुणी आहे हे सत्येंद्र यांनी आधीच सांगितलेलं होतं, त्यामुळे नोकर माणसांनीही तिला अडवलं नव्हतं.

तशीच चालत ती एका रूमजवळ पोहोचली. तिने अलगद त्या रूमचा दरवाजा उघडला आणि आत डोकावून पाहिलं. रूम खूपच मोठी आणि आकर्षक होती. त्या रूममधील सर्व वस्तू महागड्या वाटत होत्या. कोणालाही भुलवून टाकणारी मनमोहक अशी रूम होती ती. रूममध्ये किंग साइज बेडच्या मागे असलेल्या भिंतीवर एक मोठा फोटो फ्रेम दिसत होता. त्या फोटोकडे पाहतच ती रूमच्या मधोमध येऊन उभी राहिली होती. त्या फोटोतील सत्येंद्र यांना तर तिने ओळखलं होतं, पण त्यांच्यासोबत असलेला मुलगा तिला ओळखता आला नव्हता. कितीतरी वेळ ती त्या मुलाचं निरीक्षण करत होती.

" आमचे चिरंजीव आहेत ते. सूर्यांश सत्येंद्र अग्निहोत्री. " मागून सत्येंद्र यांचा आवाज आला, तशी ती दचकून मागे वळाली. ते पाहून सत्येंद्र किंचित हसले. नंतर ती नॉर्मल होत पुढे बोलू लागली.

" मिस्टर सूर्यांश यांचं नाव बऱ्याच वेळा ऐकलं होतं, पण आज पहिल्यांदाच त्यांचा चेहरा पाहिला. " सिया पुन्हा त्या फोटोकडे पाहत त्यांना म्हणाली.

" हो, त्यांनी आजपर्यंत कोणालाही आपला चेहरा दाखवलेला नाही. जे कोणी या बंगल्यात येतील, फक्त त्यांनाच फोटोद्वारे त्यांचा चेहरा दिसतो. त्या व्यतिरिक्त त्यांचे फोटो सोशल मीडिया असो किंवा न्यूज चॅनेल्स कुठेच दिसणार नाहीत. " सत्येंद्र यांनी सांगितलं, आणि ते ऐकून सियाला आश्चर्य झालं.

" मग जो कोणी इथे येऊन त्यांचा फोटो पाहील, त्यांच्यापैकी कोणी या फोटोंचा फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केला तर? " सियाने तिच्या मनातला प्रश्न विचारला.

" तशी हिंमत कोणी करू शकत नाही, आणि कोणी तसा प्रयत्न केलाच तर ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही. " सत्येंद्र क्रूर हसत म्हणाले, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ तिला समजला नव्हता.

" म्हणजे? " तिने न समजून विचारलं.

" म्हणजे जो कोणी असा दुःसाहस करेल, त्याच्यावर त्याचवेळी आमच्या खुफिया हत्यारांद्वारे हल्ला होतो. तो व्यक्ती तिथेच मारला जातो, मग तो आणि त्याची कुठलीही वस्तू या बंगल्यातून बाहेर जात नाही. आमच्या सिक्रेट जागेवरच त्यांचं अंतिमकार्य पार पाडलं जातं. त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं अंतिम दर्शन सुद्धा घेता येत नाही. " सत्येंद्र भिंतीवरच्या फोटोकडेच पाहत बोलत होते, आणि सिया ते ऐकून घाबरलीच होती.

" पण एवढं सगळं कशासाठी? म्हणजे... मिस्टर सूर्यांश एक नावाजलेले माफिया आहेत, मग असं करण्याचं काय कारण आहे? " सिया त्यांना एकावर एक प्रश्न विचारत होती, आणि ते हसून तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते.

बहुतेक त्यांना तिच्यावर विश्वास होता. ती कोण आहे हे त्यांना माहित होतं. तिचं हॉटेल व्यतिरिक्त सेकंड प्रोफेशन लाईफ सुद्धा त्यांना माहित होती, तरीही ते तिच्यावर विश्वास ठेवत होते. आयुष्यात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे त्यांना आत्तापर्यंत समजलं होतं.

" लहानपणी त्यांच्यावर एकदा हल्ला झाला होता, पण जसे जसे ते मोठे होऊ लागले तसं तसं आम्ही त्यांना जास्तच जपू लागलो. त्यांना या फिल्डमध्ये आम्हीच उतरवलं, पण जगासमोर त्यांचा चेहरा येणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली. ते सुद्धा बाहेर कुठे मीटिंग वगैरे असेल तर स्वतःचा चेहरा झाकूनच जातात. " सत्येंद्र लहानपणी त्याच्यावर जो हल्ला झाला होता ते आठवत सांगत होते.

ते सांगताना सुद्धा त्यांच्यातील बापाचं काळीज थरथरत होतं. त्याच्यावर झालेला हल्ला त्यांना कधीही विसरता येणं शक्य नव्हतं. अंगरक्षकांमध्ये फेरबदल करून त्याच्यावर हल्ला केला गेला होता, आणि अंगरक्षक असल्यामुळे सत्येंद्र अगदी निश्चिंत राहत होते. त्यांना अंगरक्षक बदलले गेले आहेत हे सुद्धा लक्षात आलं नव्हतं. तिथेच ते फसले होते आणि सूर्यांश वर हल्ला झाला होता.

त्यांचा क्षीण होत गेलेला आवाज ऐकून तिलाही त्यांची काळजी समजली. ती पुढे काही बोलणार तोच कोणीतरी दरवाजावर नॉक केलं. सत्येंद्र यांनी भूतकाळातून बाहेर येऊन दरवाजाकडे पाहिलं. दारात एक नर्स उभी होती.

" येस? " सत्येंद्र यांनी तिच्याकडे पाहून विचारलं.

" सर, मिस्टर प्रेम यांना शुद्ध आली आहे. " नर्सने माहिती दिली, तशी सिया काहीही विचार न करता लंगडत लंगडत रूमच्या बाहेर पळू लागली.

तिला असं पळताना पाहून सत्येंद्र किंचित हसले. तिची ती काळजी पाहून त्यांनी एक अंदाज लावला आणि तिच्यामागेच जायला निघाले.



क्रमशः


🎭 Series Post

View all