प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग १३ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
सिया लंगडत लंगडत कशीबशी नर्ससोबत प्रेमच्या रूममध्ये पोहोचली. तो शुद्धीवर आलेला होता आणि वर छताच्या दिशेने एकटक पाहत होता. त्याला शुद्धीवर आलेलं पाहून तिला खूप म्हणजे खूप आनंद झाला, पण तेवढ्यात तिचा चेहरा उतरला. त्याच्या हाताला, डोक्याला आणि पायाला बांधलेली पट्टी पाहून तिच्या काळजात धडकी भरली. तिच्यापेक्षा त्याला जास्त जखम झालेली आहे असं वाटत होतं.

" मिस्टर प्रेम... " तिने थरथरत्या आवाजात त्याला हाक मारली. तिचा आवाज ऐकून त्याने भानावर येत तिच्याकडे पाहिलं.

" मॅडम... " तिला अशा अवस्थेत पाहून त्यालाही तिची काळजी वाटली आणि तो उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला. नर्स पुढे गेली आणि त्याला उठून बसायला मदत केली. सिया त्याच्याजवळ आली आणि बेडवर त्याच्या शेजारी बसली.

" कसे आहात तुम्ही? बरं वाटत आहे ना? जास्त लागलं आहे का? " सियाने काळजीने एकामागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा तो तिच्या पायाकडे आणि डोक्याकडे पाहू लागला.

" मॅडम तुम्हाला जास्त लागलं तर नाही ना? त्रास तर होत नाही ना? " तिला आपल्या काळजीने लंगडत रूममध्ये येताना पाहून, तिच्या डोक्याला पट्टी बांधलेली पाहून त्याने सुद्धा काळजीने विचारलं.

" आता दोघेजण एकमेकांची काळजी करण्यातच गुंतून बसाल की पुढे सुद्धा काही बोलाल? " सत्येंद्र त्या दोघांना उत्तर न देता फक्त एकमेकांची चौकशी करताना पाहून म्हणाले.

" खूप खूप आभार सर! जर तुम्ही मदत केली नसती तर कदाचित... " सिया अचानक हळवी होऊन सत्येंद्र यांना म्हणाली. पुढे बोलता बोलता ती अचानक थांबली आणि एक आवंढा गिळला.

" आमचे आभार मानण्यापेक्षा तुमच्या या मिस्टर प्रेमचे माना. आम्हाला तिथे पोहोचण्याआधीच त्यांनी जोरदार लढा दिला होता. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला, पण त्या लोकांना तुमच्याजवळ येण्याची संधी सुद्धा दिली नाही प्रेमने. ही इज अ रियली ब्रेव मॅन! " सत्येंद्र प्रेमचं कौतुक करत म्हणाले. त्यांच्या बोलण्यावर सियाने प्रेमकडे पाहिलं.

" एवढं सगळं करण्याची काय गरज होती मिस्टर प्रेम? तुम्हाला स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची काय गरज होती? " सिया त्याच्याकडे तक्रार करत होती. तेवढीच तिच्या आवाजामध्ये त्याच्याबद्दलची काळजी सुद्धा झळकत होती.

" मिस सिया बरोबर बोलत आहेत मिस्टर प्रेम. तुम्ही एवढं सगळं करण्याची काही गरज नव्हती. उगाच तुम्ही हातपाय चालवले. आता पुढच्या वेळी लक्षात ठेवा. हातपाय चालवण्याची गरज नाही पडली पाहिजे. तलवारी आणि बंदुकी सोबत ठेवायच्या. " सत्येंद्र प्रेमकडे पाहून बोलत होते आणि इकडे सियाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं.

" हे काय बोलत आहात सर? मी त्यांना या प्रकरणापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही त्यांना पुढच्या वेळी तलवारी, बंदुकीसह सज्ज व्हायला सांगत आहात? " सिया आश्चर्याने त्यांनाच प्रश्न विचारत होती, तेव्हा सत्येंद्र तिच्याकडे पाहून हसले.

" हे प्रकरण तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही मिस सिया. जर त्यावेळी प्रेम तुमच्यासोबत उपस्थित नसते तर तुम्ही आत्ता जिवंत नसतात. आम्ही योगायोगाने तिथे पोहोचलो होतो. आम्हाला यायला थोडा जरी उशीर झाला असता तरी प्रेमच्या जीवाला धोका झाला असता, पण ते त्या लोकांशी लढत राहिले. फक्त आणि फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी. अशा ब्रेव मुलाला आम्ही डरपोकांसारखं लपून राहायला का सांगणार? ते आमच्या तत्वात बसत नाही. " सत्येंद्र बोलत होते आणि इकडे सिया तोंड, डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहत होती. प्रेम शांतपणे फक्त ऐकण्याचं काम करत होता.

" हा सल्ला मी तुमच्याकडून स्वीकारू शकत नाही, कारण माझ्यामुळे मी त्यांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. त्यांनी कितीही हिंमत दाखवली असली तरी मी त्यांना या प्रकरणापासून लांब ठेवू इच्छिते. " खरंतर सियाला त्यांच्या या सल्ल्याचा राग आला होता, पण उगाच शांत असलेल्या व्यक्तीला खवळून देण्याचा तिला प्रयत्न करायचा नव्हता.

सत्येंद्र अग्निहोत्री काय आहे हे तिला चांगलंच माहित होतं. ते जोपर्यंत शांत तोपर्यंतच ठीक, नाहीतर मग विध्वंसच असतो हे माहित असल्याने तिने आपल्या रागाला आवर घातला होता. शांतपणे तिने तिचा निर्णय सांगितला होता, तरीही आवाजात थोडी का होईना चीड जाणवतच होती. तिचा तो प्रयत्न सत्येंद्र यांना सुद्धा समजला होता, त्यामुळे ते गालातल्या गालात हसले होते.

" मला असं वाटतं की आम्ही इथून निघायला हवं. " सिया पुढे म्हणाली.

" नक्कीच तुम्ही जाऊ शकता. आम्ही बाहेर ड्रायव्हरला सांगून गाडी तयार ठेवायला सांगतो. तो तुम्हाला व्यवस्थित तुमच्या घरी पोहोचवून देईल. " सत्येंद्र म्हणाले, पण सियाला त्यांची मदत घ्यावी की नाही ते कळत नव्हतं. ती तशीच विचार करत बसलेली होती. विचार करता करताच तिला आठवलं की तिची गाडी तिच्यासोबतच होती. आठवल्यानंतर ती पुढे बोलू लागली.

" त्याची काही गरज नाही सर. रात्री माझी जी गाडी होती ती गाडी इथे असेल तर आम्ही त्यातच जाऊ शकतो. " त्यांची मदत घेणं तिच्या मनाला पटलं नसेल म्हणून ती अशी म्हणाली होती.

" तुमची गाडी तुमच्या घरी पाठवली गेली आहे. तुमच्या भावाला सुद्धा या घटनेची माहिती दिली आहे. त्यांना न सांगणं आम्हाला योग्य वाटलं नव्हतं. त्यांना सांगून त्यांना निश्चिंत राहायला सांगितलं होतं. तुम्ही पाहुणे म्हणून सध्या आमच्याकडे होतात तर तुमची इथून सुखरूप घरी पोहोचण्याची जबाबदारी सुद्धा आमचीच. " सत्येंद्र नेहमीप्रमाणे हसूनच बोलत होते.

" धन्यवाद सर! आणि माफी सुद्धा मागते. मगाशी तुमच्याशी बोलणं जरा उद्धटच झालं. त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी! " आपण त्यांच्याशी असं बोललो तरी ते आपल्याशी हसून बोलत होते, त्यामुळे तिच्या मनात गिल्ट निर्माण झाला होता. त्याची जाणीव झाल्यानंतर तिने स्वतःहून त्यांची मनापासून माफी मागितली.

" तुमचं कुठलंही बोलणं उद्धट नव्हतं मिस सिया. मिस्टर प्रेम साठीची तुमची काळजी त्यातून झळकत होती. आणि आम्ही त्यांना यासाठी लढायला सांगत होतो कारण देवांश सरंजामेने एका स्त्रीवर हल्ला केला आहे. आमच्याकडे एका कर्तृत्ववान स्त्रीवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा असते. आम्ही तर फक्त मिस्टर प्रेमना पुढच्या वेळी तुमच्यासाठी तलवारी आणि बंदूक घेऊन तयार व्हायला सांगितलं आहे. " सत्येंद्र म्हणाले, तशी ती त्यांच्या तोंडून कर्तृत्ववान शब्द आणि देवांशचं नाव ऐकून चमकून त्यांच्याकडे पाहू लागली.

" तुमच्याबद्दल आम्हाला सर्वकाही माहिती आहे, त्यामुळे आम्हाला कसं कळालं वगैरे हे सर्व प्रश्न डोक्यातून काढून टाका. " कदाचित तिच्या मनातला प्रश्न त्यांना समजला असेल, त्यामुळे तिने विचारण्याआधीच त्यांनी तिला त्याचं उत्तर दिलं. तिने हसतच मान खाली घातली.

" मिस्टर प्रेम, तुमच्या आईंशी एकदा बोलून घ्याल. शेकडो मिस कॉल पडले आहेत त्यांचे तुमच्या मोबाईलवर. सॉरी आम्ही पाहायला नव्हतं पाहिजे, पण तुमच्या आई तुमची काळजी करत असतील, या विचाराने कितीतरी वेळा फोन उचलावा असं वाटत होतं म्हणून तुमचा मोबाईल हातात घेतला होता. आम्ही फोन काही उचलला नव्हता, फक्त उचलावा असा विचार केला होता. " सत्येंद्र टेबलवर ठेवलेल्या त्याच्या मोबाईलकडे इशारा करत म्हणाले.

त्यांना वाटलं की त्याला आपण त्याच्या मोबाईलला हात लावलेला सांगितलं तर आवडणार नाही, म्हणून ते त्याला पूर्ण माहिती देत होते. तेव्हा प्रेमला त्याच्या आईची काळजी वाटली आणि त्याने लगेच मोबाईल हातात घेतला. चेक केलं तर त्यावर खरंच दीडशे दोनशे मिस कॉल होते. त्या आई होत्या आणि इतका उशीर झाला तरी प्रेम घरी परतला नव्हता म्हणून त्यांना त्याची काळजी वाटत होती. काळजीनेच त्यांनी त्याला लगातार फोन केले होते.

" आता फोन केल्यापेक्षा लवकरात लवकर घरी जावं असं मला वाटतं. " प्रेम थोड्या हळू आवाजात म्हणाला. कदाचित त्याला अशक्तपणा जाणवत असावा. त्याचा आवाज बराच खोल गेलेला वाटत होता.

" आम्ही गाडी तयार ठेवायला सांगितली आहे. " सत्येंद्र म्हणाले, तेवढ्यात दोन महिला आणि दोन पुरुष रूममध्ये आले.

" यांना त्यांच्या त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवून द्या. " सत्येंद्र यांनी त्या चौघांना सांगितलं.

" येस बॉस! " ते चौघेही एका सुरात म्हणाले आणि त्यांची आज्ञा पाळत त्या दोघांना घेऊन तिथून निघाले.




क्रमशः

🎭 Series Post

View all