प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग १४ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                        पहाटेचे साडेचार वाजले होते. मालती रात्रभरापासून बाहेरच्या अंगणातच इकडून तिकडे फेऱ्या मारत होत्या. प्रेम आणि मालती राहत असलेला फ्लॅट ग्राउंड फ्लोअर वरच होता आणि समोर लहान लहान मुलांना खेळण्यासाठी सुंदर असं अंगण होतं. त्या अंगणातच त्या चकरा मारत होत्या. रात्रीची सकाळ झाली तरी प्रेम घरी आला नव्हता, म्हणून त्यांचा जीव लागला होता. असा तर तो कधीच करत नव्हता. आजच कसा आला नाही म्हणून काळजीत पडल्या होत्या. एका क्षणासाठीही घराच्या आत गेल्या नव्हत्या. बाहेरच आपल्या लेकराची वाट पाहत रात्रभर जागी होत्या.

रघुवीर यांना त्यांनी फोन करून सांगितलं नव्हतं. ' माहिती पडताच त्यांना जास्त त्रास झाला तर? ' , या काळजीनेच त्यांनी रघुवीर यांना फोन करून सांगायचं टाळलं. दोघा नवरा बायकोचा प्रेमवर जास्त जीव होता. त्या तर इथे होत्या पण रघुवीर लांब होते म्हणून त्यांना त्रास द्यायला नको वाटत होता. अन्नाचा एक घासही त्यांनी खाल्ला नव्हता. रात्री तो आल्यावर त्याच्या सोबतच जेवण करत असायच्या आणि आज तो आलाच नव्हता म्हणून जेवण काही त्यांना गेलं नव्हतं.

काळजीने फिरत असताना अचानक एक गाडी अंगणात येऊन उभी राहिली. आपल्या घराच्या दिशेने गाडी येताना पाहून मालती एकाच जागेवर उभ्या राहिल्या आणि तिकडे पाहू लागल्या. प्रेमकडे गाडी नव्हती, तो रात्रीपासून घरीही आला नव्हता आणि आता अचानक एक मोठी गाडी दारासमोर येऊन उभी राहिली, म्हणून त्यांचा जीव खालीवर व्हायला लागला होता. गाडीतून आधी एक पुरुष बाहेर आला आणि त्याने प्रेमला गाडीतून खाली उतरवलं. त्याला दुसऱ्या बाजूने धरत दुसरा पुरुषही गाडीतून खाली उतरला. गाडीच्या दुसऱ्या बाजूने सिया सुद्धा खाली उतरली. ती त्याला घरी पोहोचवण्यासाठी आली होती. नंतर ती त्यांच्या बंगल्यावर जाणार होती.

" प्रेमऽऽऽऽऽ! " त्याच्या डोक्याला, हाताला, पायाला पट्टी पाहून मालती यांचा श्वासच अडकला. घाबरून रडत त्यांनी त्याच्याकडे धाव घेतली. आपल्या आईचा आवाज ऐकून त्याने पुढे पाहिलं.

" काय झालं माझ्या लेकराला? काय झालं सोन्या? एवढं कसं लागलं तुला? हा! बोल ना! " मालती एवढ्या घाबरल्या होत्या की प्रेम जणू एक छोटा मुलगा आहे अशा त्याच्या तोंडावरून हात फिरवत विचारत होत्या.

" आई... आई... अगं घाबरू नकोस. मला काहीच झालेलं नाही. मी एकदम ठीक आहे. " दुसरा जो व्यवस्थित हात होता त्याने त्या हाताने त्यांना जवळ घेतलं आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला.

" काही झालं नाही म्हणतोस. हे बघ किती लागलं आहे. " मालतींचा घाबरलेला आवाज काही कमी होत नव्हता. त्या वारंवार त्याच्या जखमी हाताला आणि पायाला चाचपडत होत्या.

" आई आपण आतमध्ये जाऊन बोलूयात. " तो म्हणाला, त्यावर मालतींनी होकारार्थी मान हलवली. डोळ्यांतून अश्रू वाहण्याचे मात्र बंद झाले नव्हते.

त्या दोन पुरुषांनी पुन्हा प्रेमच्या दोन्ही हातांना व्यवस्थित धरलं आणि घराकडे घेऊन जाऊ लागले. त्यांच्यामागे बाकीचेही येऊ लागले. मालती तर त्याला सोडायलाच तयार नव्हत्या. प्रेमला आत आणलं गेलं आणि बेडवर त्याला आराम वाटेल असं बसवलं गेलं. त्याच्या शेजारी मालती येऊन बसल्या. सिया येऊन बेडशेजारी बेडच्या आधारे एका पायावर उभी राहिली होती. अजून तिला घरी सोडायचं होतं, म्हणून सोबत असलेले दोन पुरुष आणि दोन महिला घराच्या बाहेर जाऊन उभे राहिले.

" हा, आता सांग. रात्रभरापासून तू घरी आला नाहीस. आणि मध्येच हे सर्व काय... " त्याला अशा अवस्थेत पाहून मालतींच्या तोंडून शब्द निघत नव्हते. हुंदके देत देत रडत आणि बोलत होत्या. त्यांची ती अवस्था सिया आणि प्रेमला पहावली जात नव्हती.

" आई, एवढं टेन्शन नको घेऊस. मी खरंच ठीक आहे. छोटासा अपघात झाला त्यामुळे थोडं लागलं आहे. " प्रेम त्यांना अजूनही समजावून शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या आई होत्या. तो छोटा अपघात असेल की मोठा अपघात, हे न कळण्या इतपत त्या अडाणी नव्हत्या.

" छोटाऽऽऽऽऽ! हा छोटा अपघात वाटतो तुला? " त्याचे ते शब्द ऐकून मालती चिडल्या होत्या.

" काकू, प्रेम खरं सांगत आहेत. तो छोटासा अपघात होता. " यावेळी सिया बोलली, तेव्हा त्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. त्यांनी तिला खालून वरपर्यंत पाहिलं आणि मग प्रेमकडे पाहिलं. तो त्यांच्याकडे पाहून किंचित हसला आणि नजर खाली केली, तेव्हा त्यांना ती सिया आहे हे समजलं.

" मॅडम, तुम्हालाही बरंच लागलेलं दिसत आहे. तुम्ही इथे बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. " प्रेमच्या मालकिण बाई असल्याने मालती सुद्धा त्यांना मॅडमच म्हणाल्या.

मागे कितीही पोर, पोरगी केलं तरी तोंडावर त्या तशा बोलू शकणार नव्हत्या. ' उगाचंच आपण एकेरी बोललो आणि तिला राग आला तर? ' , असा विचार करून त्या सरळ सरळ तिला मॅडम म्हणाल्या होत्या.

" काकू, माझं नाव सिया आहे. मी तुमच्या मुलीसारखीच आहे. मला एकेरी बोललात तरी चालेल. " कदाचित त्यांच्याकडून तिला मॅडम ऐकून घेणं आवडलं नसेल त्यामुळे ती त्यांना म्हणाली.

ते ऐकून मालती हसल्या आणि आपल्या जागेवरून उठल्या. त्यांच्या हसण्यावरून त्या बऱ्याच रिलॅक्स झाल्या आहेत असं वाटत होतं. काही वेळापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं टेन्शन आणि रडणं आता दिसत नव्हतं.

" बरं ठीक आहे, तू बस मी पाणी घेऊन येते. " मालती तिला बसायला सांगून किचनमध्ये निघून गेल्या. त्या गेल्यानंतर सिया प्रेमजवळ येऊन बसली.

" खूप प्रेम करतात तुमच्या आई तुमच्यावर. " सिया किंचित हसून त्याच्याकडे पाहत म्हणाली, तसा तोही मान हलवत हसला.

" किती छान वाटतं ना, जेव्हा आपली आई आपली काळजी करत असते. " सिया चेहऱ्यावर हसू ठेवूनच बोलत होती, पण कंठ दाटलेला होता.

आजपर्यंत तिच्या आईवडिलांकडून काळजी असलेलं प्रेम जास्त मिळालंच नव्हतं. सतत आपला व्यवसाय व्यवसाय एवढंच काय ते त्यांना जमत होतं. आत्ता तिच्यावर हल्ला झाला हे सुद्धा तिच्या आईवडिलांना समजलं नसेल. तिचा जड झालेला आवाज प्रेमलाही जाणवला.

अचानक तिच्या हातावर त्याचा हात विसावला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो तिला एकटक तिच्याकडे पाहताना दिसला. तीही त्याच्या डोळ्यांत पाहत होती. आज नाही तो स्वतःची नजर फिरवून घेत होता आणि नाही ती. दोघांनाही असं वाटत होतं की या नजरेच्या गुंफणातून बाहेर पडूच नये. तिच्याही नकळत तिचा दुसरा हात त्याने ठेवलेल्या हातावर गेला.

" अंहं अंहं... " घसा खाकरण्याचा आवाज आला, तेव्हा दोघेजण ते गुंफण तोडून बाहेर पडले आणि हातावर ठेवलेले हात सुद्धा सोडवून घेतले.

मालती किचनमधून बाहेर आल्या होत्या, तेव्हा त्यांनी त्या दोघांना असं एकमेकांत गुंतलेलं पाहिलं होतं. त्या तरी किती वेळ तशाच थांबणार होत्या, म्हणून त्यांनी हसतच स्वतःचा घसा खाकरला आणि त्यांना भानावर आणलं.

" पाणी घ्या. " त्यांनी आपल्या दोन्ही हातात आणलेले ग्लास त्या दोघांसमोर धरले.

" धन्यवाद काकू! " पाणी दिल्याबद्दल सियाने त्यांचे आभार मानले. पाणी पिऊन झाल्यानंतर ती तिथून उठली.

" काकू, मला आता निघायला हवं. घरी दादा वाट पाहत असेल. " सिया मालतींकडे पाहत म्हणाली.

" ठीक आहे, पण व्यवस्थित जा हा! प्रेमसाठी इथपर्यंत आलीस त्याबद्दल... " मालतीही आपल्या जागेवरून उठत म्हणाल्या, पण पुढचं वाक्य पूर्ण करण्याआधीच सिया बोलू लागली.

" नाही काकू, त्याबद्दल प्लीज आभार मानू नका. आज जर कोणी आभार मानायला हवेत तर ते मी मानायला हवेत काकू. मिस्टर प्रेम मुळेच मी आज सुरक्षित आहे. सो, मी त्यांचे आभार मानायला हवेत. " सिया त्यांच्याकडे पाहून म्हणाली आणि प्रेमकडे वळली. तिच्या बोलण्यावर तो तिच्याकडे पाहू लागला.

" थँक्यू सो मच मिस्टर प्रेम! जर तुम्ही नसता तर खरंच मी आज जिवंत... " सिया पुढे काही बोलणार तोच त्याने तिला अडवलं.

" मॅडम प्लीज, तसं काही बोलू नका. " तिला पुढे काही बोलण्याच्या आधीच प्रेम म्हणाला. तिचं पूर्ण वाक्य ऐकण्याची त्याची इच्छा नव्हती. मग तीही शांत बसली.

" मला जास्त काही लागलेलं नाही, पण तुम्ही प्लीज स्वतःची व्यवस्थित काळजी घ्या. जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत हॉटेलला येण्याची काही गरज नाही. मी अधून मधून तुम्हाला भेटायला येईन. हॉटेलमधील तुमचं काम मी हँडल करून घेईन. तुम्ही पूर्णतः ठीक होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. " सिया शेवटचं वाक्य स्वतःसाठी म्हणाली होती, पण जेव्हा मालती तिथेच उभ्या आहेत हे आठवलं तेव्हा ती सावरासावर करू लागली. तिचं ते वाक्य ऐकून दोघेही डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत होते.

" म्ह... म्हणजे... ते... काम... माझं काम अपूर्ण आहे, असं म्हणायचं होतं मला. " त्या दोघांना आपल्याकडे पाहताना पाहून ती कशीबशी अडखळत म्हणाली.

मालती तिच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत होत्या, तर प्रेम मान वळवून घेत दुसरीकडे पाहत हसत होता. आता तर त्याला कन्फर्म झालं होतं की ज्याप्रमाणे तो तिला पसंत करत होता, त्याचप्रमाणे ती सुद्धा त्याला पसंत करू लागली होती. खात्री होताच खुश झाला तो. त्यानंतर तिने त्या दोघांचा निरोप घेतला आणि तिथून घरी जायला निघाली. मालती बाहेर तिला सोडवायला आल्या होत्या. घराबाहेर उभ्या असलेल्या दोन महिलांनी तिला व्यवस्थित गाडीत बसवलं आणि तिथून निघाले.

' मी खरंच अपूर्ण आहे तुमच्याशिवाय मिस्टर प्रेम. आता तर माझ्या मनालाही पक्की खात्री झाली की मी तुमच्याशिवाय काहीच नाही. मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही हॉटेल पुन्हा जॉईन करणार, त्याच दिवशी मी तुमच्यासमोर तुमच्यावर असलेल्या माझ्या प्रेमाची स्वीकृती देईन. ' गाडी रस्त्याला लागल्यानंतर ती आनंदाने स्वतःच्या मनातच म्हणाली.

अजून एक महिनाही झाला नव्हता त्याला हॉटेल जॉईन करून. त्याची पर्सनॅलिटी, बौद्धिक क्षमता सर्वकाही तिला एकदम परफेक्ट वाटत होतं. ' तोच आपल्यासाठी योग्य आहे ' , असा कौल तिच्या हृदयाने तिला दिला होता. तो ठीक होऊन हॉटेलला जॉईन झाल्यानंतर ती त्याला स्वतःच्या प्रेमाची कबुली देणार होती.



क्रमशः

🎭 Series Post

View all