प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग १५ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                              सिया बंगल्यावर पोहोचली तेव्हा शौर्य तिची वाटच पाहत होता. पहाटेचे सहा वाजून गेले होते तेव्हा सिया घरी आली होती. रात्रभर तोही तिच्या काळजीने झोपला नव्हता. सत्येंद्र यांनी ती सुखरूप असल्याचं सांगितलं होतं म्हणून त्याने तिकडे जाण्याचं टाळलं होतं. सत्येंद्र यांच्या बंगल्यावर त्यांचे व्यवसाय संबंधित लोक सोडले तर इतर कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती. तो जरी बहिणीच्या काळजीने तिथे गेला असता तरी त्याला आत सोडलं गेलं नसतं. सर्व गोष्टींची माहिती त्याला आधीच होती त्यामुळे त्यानेही तिथे जाण्याचा विचार त्यागला होता. सिया घरी आल्यानंतर मात्र त्याने तिला एक दीड तास तरी स्वतःपासून वेगळं केलं नव्हतं. ज्यावेळी एक भाऊ म्हणून तिला त्याच्या आधाराची गरज होती त्यावेळी तो सोबत नव्हता, पण आता जेव्हा ती घरी आली तेव्हा तो तिला उराशी कवटाळून बसलेला होता.

आजच ती पुन्हा काम जॉईन करण्याचं ठरवत होती, पण शौर्यने सौम्य शब्दांत तिला धमकीच दिली होती जणू.

' अजिबात असा विचार करायचा नाही, नाहीतर कायमची घरात बसवून ठेवेन. ' ही अशी धमकी होती, पण आवाज बराच सौम्य होता.

तिलाही मग त्याचं ऐकावंच लागलं होतं. मग त्याने तिला व्यवस्थित रूममध्ये झोपावलं आणि डॉक्टरांना फोन करून तिची कंडीशन कळवली. डॉक्टरही दुपारी १२ वाजेपर्यंत तिथे येणार म्हणाले होते. शौर्य मात्र घरी थांबू शकणार नव्हता. ती नसणार तर त्याला हॉटेलमध्ये जावंच लागणार होतं. प्रेमलाही दुखापत झाल्याची माहिती सियाने त्याला दिली होती, तर त्याचं काम मसीरावर सोपवावं लागणार होतं. काही दिवस त्यालाच तिथे लक्ष द्यावं लागणार होतं.

सिया रूममध्ये बसल्या बसल्या प्रेमचाच विचार करत होती. तो काल तिच्यासाठी त्याचा काहीच संबंध नसलेल्या व्यक्ती विरोधात उभा राहिला होता, ते तिला खूपच भावलं होतं. असं तर तिला वाटत होतं, पण तिला काय माहित होतं की त्याचीही देवांशशी शत्रूता होती. आत्ताच नाही तर जुनी ओळख आणि शत्रूचं नातं होतं. देवांशने प्रेमसोबत जे केलं होतं, ते कधीही न विसरण्यासारखं होतं. असो, तो अजूनही प्रेमसमोर आलेला नव्हता.


**********************



" धाडऽऽऽऽऽ! धाडऽऽऽऽऽ! " असा एकामागून एक चार पाच वेळा आवाज आला.

जमिनीवर लाल रंगाचा पदार्थ सांडल्यासारखा दिसत होता. त्या पदार्थावर पाच जणांचे शरीर पडलेले दिसत होते, अर्थातच ते त्या पाच जणांचं रक्त होतं. त्यांच्यासमोर तो दोन्ही हातांमध्ये चाकू घेऊन उभा होता. ते चाकूही रक्ताने माखलेले होते.

" एकही चूक चालणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं. मग ती सिया वाचलीच कशी? माझी आज्ञा या पाच जणांनी मोडलीच कशी? " तो म्हणजेच देवांश भयंकर रागाने त्या खाली पडलेल्या मृतदेहांकडे पाहून बोलत होता.

" सॉरी सर! आम्ही बेस्ट टीम या कामासाठी निवडली होती, पण ती मुलगी कशी काय वाचली आम्हाला समजलंच नाही. " त्यादिवशी देवांशने ज्या दोन माणसांशी याबद्दल बोलणं केलं होतं, ती दोन माणसे थरथरत त्याच्यासमोरच उभी होती. त्यांच्यातला एक जण त्याला स्पष्टीकरण देत होता. काल सियाला मारण्यासाठी आलेल्या लोकांपैकी जे घाबरून तिथून पळाले होते, आज त्यांना देवांशने देवाघरी पाठवलं होतं.

" अशी कारणे तुम्ही देऊच कसे शकता? ही बेस्ट टीम होती का तुमची? ही? नाही, याची शिक्षा तुम्हा दोघांना भोगावीच लागेल. " देवांश त्या दोघांवर आपली क्रूर नजर टाकत म्हणाला.

" प्लीज माफ करा सर! आम्हाला आणखी एक संधी द्या. यावेळी आम्ही तुम्हाला निराश करणार नाही. " ते दोघेजण त्याच्या पायाशी बसून हात जोडत बोलत होते, पण देवांशचा राग काही कमी होत नव्हता.

" मागेही तुम्ही असेच म्हणाला होतात. आता मी रिस्क नाही घेऊ शकत. ती सिया वाचली, पण पुढच्या वेळी मी स्वतःहून वार करणार. त्यासाठी मला तुमची गरज नाही. " असं म्हणत देवांशने हातात असलेले ते दोन चाकू सरकन त्या दोघांच्या गळ्यावर फिरवले. जसे ते पाच जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते तसेच हे दोघेही तडफडले.

" यावेळी तर वाचलीस तू माझ्या हातून. पुढच्या वेळी मी तुला पळण्याची संधी देणार नाही. " देवांश रागाने थरथरत जणू तिला वचनच देत होता. पुढची खेळी त्याने स्वतः खेळायची ठरवली होती.

" गार्ड्सऽऽऽऽऽ! " त्याने जोरात ओरडून त्याच्या अंगरक्षकांना आवाज दिला. लगेच ते लोक आत पळत आले आणि त्याच्या आज्ञेची वाट पाहू लागले.

" ही घाण लवकरात लवकर साफ करा. एक थेंबही मला रक्ताचा दिसला नाही पाहिजे. " त्याने सर्व साफसफाई करायला सांगितली, त्याप्रमाणे ते लोक कामाला लागले आणि देवांश प्लॅनच्या पुढच्या आखणीसाठी तिथून निघून गेला.


*************************



सकाळी दहा वाजेच्या आसपास प्रेमला जाग आली. सिया निघून गेल्यानंतर त्याने मालतींशी थोड्याफार गप्पा मारल्या आणि त्यानंतर झोपला होता. नेमकाच तो जागा झाला होता. त्याने त्याच्या आजूबाजूला पाहिलं तर बेडवर त्याच्या शेजारीच मालती झोपलेल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून तो गालातल्या गालात हसला. रात्रभर त्याला काही त्रास होईल की काय म्हणून त्या त्याच्या शेजारीच झोपलेल्या होत्या. तो काही क्षण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. लगेच त्याचे डोळे भरून आले. त्यांच्याकडे पाहत तो काहीतरी विचार करतच होता की तेवढ्यात मालतींनी डोळे उघडले. डोळे उघडल्यावर त्याच्याकडे नजर गेली तर तो त्यांना रडताना दिसला. त्याच्या डोळ्यांतून पाणी आलेलं पाहून त्या खडबडून उठल्या आणि त्याच्या गालाला हात लावला.

" काय झालं बाळा? काही त्रास होत आहे का? " मालती काळजीने झटकन उठल्या आणि त्याचे डोळे पुसत विचारत होत्या.

" किती प्रेम करतेस तू आई माझ्यावर? " त्याने पहिल्यांदाच त्यांना हा प्रश्न विचारला होता. तो ऐकून मालती आश्चर्यचकित झाल्या, तरीही हसून त्याला उत्तर देऊ लागल्या.

" आकाश माहित आहे तुला कुठपर्यंत आहे ते? नाही ना? मग जशी आकाशाला सीमा नसते, तशीच आईच्या प्रेमालाही नसते. जोपर्यंत तिच्या शरीरात जीव आहे, तोपर्यंत ती निरंतर आपल्या लेकरांवर प्रेम करत असते. माझंही प्रेम असंच आहे. तुझ्यावर किती प्रेम करते ते नाही शब्दांत सांगू शकणार आणि नाही सिद्ध करू शकणार. " मालती प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाल्या, पण त्यांचं उत्तर ऐकून त्याचे अश्रू थांबण्याऐवजी आणखीच वाहू लागले.

" आई, जर तुला कळालं की मी तुझ्यापासून काहीतरी लपवलं आहे, तर तू मला कुठली शिक्षा देशील? " प्रेमने पुन्हा विचारलं, पण तो आज अचानक असं का विचारत आहे तेच त्यांना समजत नव्हतं.

" अरे, असा काय विचारत आहेस आज? " त्यांनी पुन्हा त्याचे डोळे पुसले.

" तू मला तुझ्यापासून लांब तर नाही ना करणार आई? " त्याचे एकावर एक असे विचित्र प्रश्न ऐकून मालती काळजीत पडल्या, आणि आत्ताचा हा प्रश्न ऐकून तर जास्तच. त्या ज्याची कल्पनाही करू शकत नव्हत्या, तो प्रश्न त्याने त्यांना विचारला होता. त्यांनी पटकन त्याचं डोकं उचलून आपल्या छातीशी घट्ट आवळून धरलं.

" नाही रे सोन्या, मी असं का करेन? मी माझ्या काळजाच्या तुकड्याला माझ्यापासून विलग नाही करू शकत. " त्याच्यासोबत मालतीही आता रडायला लागल्या होत्या. त्याच्याकडून शेवटचा प्रश्न ऐकून त्यांना भरून आलं होतं. मुळात तो असा का बोलत आहे ते न समजल्याने त्यांनाच त्रास व्हायला लागला होता.

काहीवेळाने त्यांनी त्याला आपल्यापासून बाजूला केलं. त्याचा चेहरा आपल्या साडीच्या पदराने पुसला आणि त्याच्याकडे पाहून हसल्या.

" तू आराम कर हा. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवून आणते. मी तुझ्या बाबांना तुझ्या अपघाताबद्दल काही सांगितलं नाहीय, तर तू पण काही सांगू नकोस. उगाचंच जास्त काळजी करत बसतील. ठीक आहे? आलेच हा मी. " मालती त्याला आराम करायला सांगून किचनमध्ये निघून गेल्या आणि तो तसाच विचार करत पडून राहिला.

त्यालाही कालच्या विषयावर रॉबर्ट आणि प्रीतमशी बोलायचं होतं. त्याने किचनचा थोडा कानोसा घेतला आणि मग प्रीतमच्या फोनवर फोन केला. तिकडून लगेच फोन उचलला गेला.

" हॅलो, काही अपडेट? " प्रेमने प्रीतमला विचारलं.

" हो बॉस, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही काल त्या लोकांपैकी एकाला पकडून आणलं होतं. त्याच्याकडून रात्रभर हाणून मारून माहिती काढली. आपण जी माहिती शोधत होतो, ती सिया मॅडमच्या बंगल्यातच आहे. हे नुकतंच देवांश सरंजामेलाही समजलं आहे. " प्रीतमने त्याला माहिती दिली, तशा त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

रात्री सत्येंद्र तिथे पोहोचण्याआधी आणि सिया बेशुद्ध होण्याच्या मार्गावर असताना, प्रेमने प्रीतम आणि रॉबर्टला त्या लोकांमधून एकाला किडनॅप करायला सांगितलं होतं. त्या दोघांनी एकाला पकडून त्यांच्या गुप्त ठिकाणी नेऊन सर्व माहिती मिळवली होती. इतके दिवस प्रेम आणि ते दोघे जी माहिती शोधत होते, ती सियाकडे असलेल्या वस्तूचीच होती. ती वस्तू सियाकडेच आहे ते त्यांना माहित होतं, पण नेमकी कुठे लपवलेली असेल ते माहित नव्हतं म्हणून ते तिघेजण सियाच्या प्रत्येक ओळखीच्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना आज कळालं की ती वस्तू सियाच्या घरातच आहे. सियावर कुठलंही संकट येऊ न देण्यासाठी आणि देवांशकडून ' पुरानी दुश्मनी का बदला ' घेण्यासाठी तो ती माहिती मिळवत होता. आता तर तो घरात कुठे असणार ते शोधूनच राहणार होता.

" ठीक आहे, घरात नेमक्या कोणत्या ठिकाणी ठेवलेली असेल त्याची माहिती मला सियाकडून मिळू शकते. त्या माणसाचं काही काम नाही आता आपल्यासाठी. " प्रेम म्हणाला आणि तिकडे लगेच गोळी चालवण्याचा आवाज आला. अर्थातच रॉबर्टने प्रेमची आज्ञा मिळाल्याबरोबर त्या माणसाला आराम दिला होता.

" डन बॉस! " प्रीतम म्हणाला, इकडे प्रेमचे ओठ रूंद झाले आणि त्याने फोन ठेवला.


आश्चर्य! अहो आश्चर्य! जो प्रेम साध्या वादावादींनाही घाबरत होता, त्याने आज चक्क कोणालातरी मारून टाकण्याचे आदेश दिले होते? आणि तोही हसला त्यावर? हे भगवान! यह हो क्या रहा है? कोण आहे हा प्रेम?




क्रमशः


🎭 Series Post

View all