प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग १७ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                   सिया जशी लिफ्टमध्ये शिरली तसे तिचे डोळे आणि तोंड मोठे झाले, कारण तिच्यासमोर प्रेम अगदी हसतमुखाने तिच्याकडे पाहत उभा होता. तिने तो आपल्या आधी इथे येऊन पोहोचेल अशी कल्पनाच केली नव्हती. ती काही रिऍक्ट करणार त्या आधीच लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट सुरू झाली.

" मिस्टर प्रेम, तुम्ही इथे इतक्या लवकर कसे काय आलात? " त्याला पाहून बिचारीला एवढा मोठा धक्का बसला होता, की आपण काय विचारत आहोत याचं तिला भान सुद्धा नव्हतं.

" मॅडम मला उशीरच झाला असता, पण माझा एक मित्र याच रस्त्याने चालला होता तर त्याने मला त्याच्या गाडीवरून लिफ्ट देऊन लवकर हॉटेलसमोर सोडून दिलं. " प्रेमने सांगितलं आणि तिने मनातल्या मनातच कपाळावर हात मारून घेतला.

त्याला येण्याआधीच तिला भरपूर तयारी करायची होती, पण आता ती तयारी काही होताना दिसत नव्हती.

" तुम्ही येणार नव्हतात ना मॅडम? " प्रेमने हळू आवाजात तिला विचारलं. हा प्रश्न तिला आवडेल की नाही म्हणून त्याला धाकधूक होत होती.

" हो ते... जरा अर्जंट काम आलं. " तिने आपली नजर चोरत अडखळत उत्तर दिलं, त्यावर त्याने ठीक आहे अशी मान हलवली.

" पण तुम्ही लिफ्टने कुठे चालला आहात? " ठीक आहे, तो इथे लवकर येण्याचं कारण तर तिला समजलं, पण तो लिफ्टने कुठे चालला होता हे समजलं नव्हतं. प्रेमचं सर्व काम ग्राउंड फ्लोअर वरच असायचं, मग आता तो लिफ्टने कुठे जात आहे ते तिला समजलं नव्हतं, म्हणून तिने त्याला विचारलं.

" मॅडम थर्ड फ्लोअरवर कोणाला काहीतरी अडचण आली आहे. खाण्यासंबंधितच काहीतरी बोलायचं होतं, असं सांगून मला वर जायला सांगितलं होतं. तिकडेच चाललो होतो. " प्रेमने वर जाण्याचं कारण सांगितलं आणि थर्ड फ्लोअर ऐकून सिया विचारात पडली.

' एकाच वेळी, एकाच दिवशी खाण्याची आणि पाण्याची अडचण थर्ड फ्लोअरवर कशी काय आली? ' सिया विचार करत होती आणि प्रेमला काही वेळापूर्वीचा प्रसंग आठवला.


                          *• काही वेळापूर्वीचा प्रसंग •*


  

               प्रेम हॉटेलकडे जाण्यासाठी घरातून बाहेर निघालाच होता की तेवढ्यात त्याच्या फोनवर प्रीतमचा फोन आला. अशा न ठरलेल्या वेळेत प्रीतमचा फोन आलेला पाहून प्रेमला काहीतरी धोक्याची घंटा जाणवली आणि त्याने पटकन फोन उचलला.

" हा बोल प्रीतम. " प्रेमने फोन उचलल्या उचलल्या काळजीने विचारलं.

" बॉस, माहिती मिळाली आहे की आज देवांश सरंजामे पुन्हा सिया मॅडमवर हमला करणार आहे. दोन दिवसांपूर्वी देवांश सरंजामेची खेळी लक्षात आल्यानंतर, तो ज्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल त्या सर्वांना गाठून संधी साधून आम्ही त्यांचे सिम कार्ड्स क्लोन केले होते. त्यातीलच एका रेकॉर्डिंगमध्ये असं समजलं आहे की तो हॉटेलमध्ये असलेल्या लिफ्टमध्ये काही छेडछाड करणार आहे. जेणेकरून लिफ्ट दीड दोन तास मध्येच बंद होईल आणि मॅडमचा श्वास गुदमरला जाईल. " प्रीतमने कॉल रेकॉर्डिंगबद्दल माहिती दिली, तशा इकडे प्रेमच्या हातांच्या मुठी रागाने गच्च आवळल्या गेल्या.

" ठीक आहे, लवकरात लवकर तुम्हा दोघांपैकी कोणीतरी एकाने मला हॉटेलमध्ये पोहोचवण्यासाठी गाडी घेऊन तयार रहा. " प्रेम म्हणाला आणि वेळ न दवडता तिथून जायला निघाला.

तो मेन रोडपर्यंत पोहोचलाही नसेल की रॉबर्ट गाडी घेऊन तिथे उभा असलेला दिसला. प्रेम पटकन गाडीवर बसला आणि हवेच्या वेगाने गाडी पळवायला सुरुवात केली. सिया नेमकी हॉटेलच्या गेटजवळ पोहोचलेली दिसत होती. तिथे पोहोचल्यानंतर प्रेमने हॉटेलच्या मागच्या गेटमधून आत प्रवेश केला होता आणि तिला लिफ्टपर्यंत पोहोचण्याच्या काही वेळा अगोदरच लिफ्टमध्ये जाऊन उभा राहिला होता.


                          *• सध्याची वेळ •*


प्रेम तो प्रसंग आठवत गालातल्या गालात हसत होता आणि सिया एकाच वेळी दोन अडचणी कशा आल्या असतील याचा विचार करत होती. अचानक लिफ्टमध्ये जोराचा हादरा बसला. तो हादरा एवढा मोठा होता की सिया प्रेमला जाऊन बिलगली. त्यानेही एका हाताने तिला जवळ घेतलं होतं. असं काही होणार याची पूर्वकल्पना असल्याने प्रेमला तिला सांभाळणं सोपं जात होतं. ती मात्र खूपच घाबरली होती. ती वरवर जरी निडर असल्यासारखी वागत होती, तरी ती अचानक होणाऱ्या अशा घटनांमुळे घाबरत होती.

लिफ्ट हादरा बसून अचानक मध्येच बंद झाली होती. लिफ्टमध्ये काळोख पसरल्याने प्रेमने मोबाईलची टॉर्च सुरू केली. त्याचा उजेड वर पडेल असा उलटा करून मोबाईल खाली ठेवून दिला. आता लिफ्टमध्ये बराच उजेड पडलेला होता.

" हे अचानक काय झालं? " सियाने घाबरून त्याला विचारलं, पण तो तिला खरं काही सांगू शकणार नव्हता.

" मॅडम, घाबरू नका. काहीतरी बिघाड झाला असेल. काही वेळाने लिफ्ट आपोआप सुरू होईल. " प्रेम तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावर तिने फक्त होकारार्थी मान हलवली आणि तशीच त्याला बिलगून उभी राहिली.

ती तशीच घाबरून उभी होती. तिच्या अंगाची थरथर त्यालाही जाणवत होती. तिच्या मनातली भीती काही कमी होत नव्हती. शेवटी प्रेमने तिचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरला. अगदी प्रेमाने तो तिच्या डोळ्यात पाहत होता. ती घाबरलेली असल्याने तिला काही सुचत नव्हतं, पण त्याच्या एकटक पाहण्याने तीही त्याच्या डोळ्यांमध्ये हरवत चालली होती.

" तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? " त्याने तिच्या डोळ्यांमध्ये पाहतच विचारलं.

तिने तो प्रश्न ऐकून होकारार्थी मान हलवली. तिच्या मान हलवण्याने तो खुश झाला. तिने आपला एक हात हळूहळू उचलून त्याच्या गालाला लावला, तर तो न समजून तिच्याकडे पाहू लागला.

" माझं तुमच्यावर प्रेम आहे. " तिने तिच्याही नकळत आपल्या मनातली भावना व्यक्त केली, आणि तिचं असं बेधडक बोलणं ऐकून त्याला धक्का बसला.

" प्रेमाच्या नात्यामध्ये अगोदर विश्वास हवा असतो. माझा तुमच्यावर विश्वासही आहे आणि प्रेमही आहे. " त्याच्या नजरेच्या डोहामध्ये बुडत तिने मनापासून आपलं प्रेम व्यक्त केलं. तोही खुश होऊन आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करणारच होता, पण त्याच्या मनाने त्याला थांबवलं.

' थांब प्रेम, हे काय करत आहेस? तुला माहित आहे ना तू कोण आहेस ते? तू कोण आहेस हे सत्य अजूनही सियाला समजलेलं नाही. पण विचार कर, ज्या क्षणी तिला ते सत्य समजेल त्या क्षणी ती तुला स्वीकारेल का? त्यावेळी तू तुझ्या तुटलेल्या हृदयाला सांभाळू शकशील का? थांब... इथेच थांब, आणि शांत डोक्याने विचार कर. उत्तर देण्याची घाई करू नकोस. नंतर पस्तावशील. '

प्रेमच्या मनाने त्याला आता वेगळ्याच संभ्रमात टाकलं होतं. तो तिच्यावर अगदी निस्वार्थपणे प्रेम करत होता, पण त्याचं एक सत्य अजूनही कोणासमोर आलेलं नव्हतं. मागेही तो याच सत्याबद्दल मालतींना विचारत होता. आज त्याच्या मनाने तोच प्रश्न उभा करून सियाबद्दलही शंका उपस्थित केली होती.



करेल प्रेम आपलं प्रेम व्यक्त की हरेल त्याच्या त्या दुष्ट मनासमोर?



क्रमशः


🎭 Series Post

View all