प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग १८ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                          प्रेम काहीही न बोलता तसाच कितीतरी वेळ उभा होता. तिच्याच चेहऱ्याकडे पाहत होता. बहुतेक ती त्याच्या उत्तराच्या प्रतिक्षेत असावी. तो काहीच न बोलता फक्त तिच्याकडे पाहत होता, तेव्हा कुठे ती भानावर आली. आपण आत्ता त्याच्याशी काय बोललो हे लक्षात आल्यानंतर तिने लाजून मान खाली घातली. त्या अंधुकश्या उजेडातही तिच्या चेहऱ्यावर असलेली लाली त्याला स्पष्ट दिसत होती , पण तो मात्र त्याच्या मनाच्या युद्धातच अडकलेला होता.

" मी तुम्हाला आत्ता जे काही सांगितलं ते खरं आहे. माहित नाही कधी झालं? कसं झालं? पण झालं हे नक्की. " सिया मान खाली घालून बोलत होती, आणि तो मात्र एकही शब्द न बोलता तिच्याकडेच पाहत होता.

कितीतरी वेळा त्याच्या मनात आलं की तिला आत्ताच आपलं सत्य सांगून द्यावं, पण पुन्हा त्याच मनाने त्याला कितीतरी वेळा अडवलं असेल. तिचं ऐकण्याशिवाय तो काहीच करत नव्हता. तिच्याकडे पाहतच मनात नेमकं काय करू आणि काय नको या प्रश्नांमध्ये अडकला होता. शेवटी त्याने एकदा तिच्याकडे बोलण्याचं ठरवलं. आपलं सत्य सांगून त्यावर तिचं काय मत आहे हे जाणून घ्यायचं होतं त्याला.

" मॅडम, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. " शेवटी तो बोललाच. तिने वर मान करून त्याच्याकडे पाहिलं.

" बोला ना! " तिला वाटलं की तो त्याच्या भावना तिच्यासमोर व्यक्त करेल, पण त्याला तर वेगळंच काहीतरी बोलायचं होतं.

" मला तुम्हाला माझं एक सत्य सांगायचं आहे. " तो दीर्घ श्वास घेऊन म्हणाला.

" कसलं सत्य? " तिने त्याच्या चेहऱ्यावर असलेले निर्विकार भाव पाहून न समजून विचारलं.

" मॅडम मी... " तो काही बोलणारच होता की तेवढ्यात पुन्हा लिफ्टला हादरा बसला. पुन्हा एकदा ती त्याला बिलगली आणि लिफ्ट थोडी वेगानेच खालच्या दिशेने जाऊ लागली.

सध्या झालेल्या या प्रकरणाने ती पुन्हा घाबरली होती आणि त्याचं बोलणं अर्धवट राहिलं होतं. ते तरी बरं होतं की लिफ्ट फक्त दोन मजली खाली जाणार होती.

' थांब प्रेम, सध्या तिला सांगणं योग्य नाही. अजून तुझं काम अपूर्ण आहे. ते काम पूर्ण झाल्याशिवाय तुझी खरी ओळख कोणालाही समजली नाही पाहिजे. सध्या काही दिवस अजून. त्यानंतर जे होईल ते पाहता येईल. '

त्याचं आगाऊ मन पुन्हा मध्ये बोललंच. पुन्हा त्या मनासमोर तो अबोल, निःशब्द झाला. इतक्या कमी वेळात आपल्या स्वतःच्या मनाशीच तो संवाद साधत होता.

खाली जाऊन लिफ्ट हळुवारपणे थांबली, त्यामुळे आत अडकलेल्या दोघांना काहीच इजा झाली नव्हती. नंतर लिफ्टचा दरवाजा उघडला गेला, तर समोर कितीतरी लोक त्यांच्याकडे घाबरून पाहत होते.

" आर यू ओके सर अँड मॅडम? " त्यांच्यातल्या एकाने घाबरून त्या दोघांना विचारलं, त्यावर त्या दोघांनी किंचित हसून होकारार्थी मान हलवली.

ते दोघेजण बाहेर आल्यानंतर पुन्हा सर्वजण त्यांच्याभोवती घोळका करून उभे राहिले होते. मसीरा पुढे आली आणि ती काळजीने त्या दोघांची विचारपूस करू लागली.

" मिस्टर प्रेम, मॅडम तुम्ही ठीक आहात ना? " मसीराने घाबरून त्या दोघांना विचारलं.

" आम्ही ठीक आहोत मसीरा. काही काळजी करू नकोस. " सिया हसून म्हणाली, त्यावर तिने छातीवर हात ठेवून श्वास घेऊन सोडला.

" बरं झालं तुम्ही दोघे ठीक आहात. आणि त्या माणसाचं देखील भलं व्हावं ज्याने लिफ्ट अडकली अशी आम्हाला माहिती दिली. त्यामुळेच आम्ही लवकर काम करू शकलो. " मसीरा रिलॅक्स होत म्हणाली.

तिला ज्या माणसाने लिफ्टबद्दल माहिती दिली होती तो रॉबर्ट होता.

' मी नेमका वरून खाली आलो, पण मला लिफ्टमध्ये काहीतरी खराबी जाणवली. लवकरात लवकर चेक करून घ्या, नाहीतर कोणीतरी अडकण्याची शक्यता आहे. '

अशी त्याने तिला थोडक्यात माहिती दिली होती, जेणेकरून ती तिच्या स्टाफला गोळा करेल आणि लवकरात लवकर लिफ्टचं काम सुरू करेल. इथे त्याला काही करता येणार नव्हतं कारण हे एक हॉटेल होतं. तिला माहिती मिळाल्याबरोबर ती काही लोकांना घेऊन तिथे चेक करण्यासाठी गेली, तर खरंच लिफ्ट बंद झालेली होती. आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरा चेक केल्यानंतर समजलं की त्यात शेवटला जाणारे सिया आणि प्रेम दोघेच होते. मसीराने लवकरात लवकर काम करून घेतलं होतं. लिफ्ट एक दीड तासाने सुरू होण्याऐवजी अर्ध्या तासातच सुरू झाली होती.


**************************



देवांश त्याच्या रूममध्ये सर्व वस्तूंची तोडफोड करत होता. आज पुन्हा एकदा तो हरला होता. दरवेळी होणारी हार त्याला सहन होत नव्हती. यावेळी त्याने स्वतः तयारी केलेली होती. तरीही आज तो हरला होता.

" यावेळीही तेच झालं. असं वारंवार होत राहिलं तर कसं होईल? आणि दरवेळी तिला वाचवणारा व्यक्ती एकच आहे. कोण आहे तो प्रेम? कुठून आला? त्याची संपूर्ण कुंडली काढावी लागेल. दरवेळी एका देवदूताप्रमाणे तिला वाचवायला येतो. आता बास झालं. पुढच्या वेळी मी असं होऊ देणार नाही. त्यासाठी आधी त्या प्रेमचाच निकाल लावावा लागेल. " देवांश रागाने वस्तूंची तोडफोड करत स्वतःशीच बोलत होता. सिया आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या व्यक्तीचं नाव त्याला समजलं होतं. आता तो तिच्या आधी त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करणार होता.

" गार्ड्स...! " त्याने रूममधूनच मोठ्याने बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या अंगरक्षकांना आवाज दिला. त्याच्या एका हाकेवर ते सर्वजण पळत त्याच्या रूममध्ये आले.

" येस बॉस! " ते सर्वजण आत आल्याबरोबर आपली मान खाली घालून म्हणाले.

" सियाच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या त्या प्रेमची कुंडली काढा. आज संध्याकाळपर्यंतच मला त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती समजली पाहिजेत. हे एक काम तरी तुम्ही सर्वजण व्यवस्थित करू शकाल ना? " देवांश दात ओठ खात त्या लोकांकडे पाहत म्हणाला.

" येस बॉस... " त्या सर्वांनी मोठ्या आवाजातच होकार दिला.

" लिव्ह नाउ! " त्याचं सांगून झाल्यानंतर त्याने सर्वांना तिथून जायला सांगितलं. त्याने सांगितल्याबरोबर सर्व अंगरक्षक बाहेर निघून गेले आणि आपापल्या कामाला लागले.



बरोबर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत देवांशकडे प्रेमची सर्व डिटेल पोहोचली. त्याने ती दोन पानी असलेली फाईल भरभर वाचायला सुरुवात केली. प्रेमबद्दल त्यात बरीच माहिती होती. त्याचं शिक्षण, त्याच्या घरची परिस्थिती, त्याचे आईवडील, सर्व काही त्या फाईलमध्ये होतं. तो मात्र पूर्ण फाईल वाचून वारंवार त्याच्या फोटोवर येऊन थांबत होता.

" याला मी कुठेतरी पाहिलं आहे. " देवांश त्याच्या फोटोकडे पाहत विचार करत होता. त्याने त्याला कुठेतरी पाहिलं होतं पण आठवत नव्हतं.

बराच वेळ विचार केल्यानंतर, डोक्यावर ताण दिल्यानंतर प्रेमला कुठे पाहिलं होतं ते त्याला आठवलं.

" ओह येस येस! आत्ता आठवलं. हा असा नाव वगैरे बदलून राहील असं वाटलं नव्हतं. याच्यासारख्या धूर्त, कपटी आणि क्रूर माणसाकडून अशी अपेक्षा देखील नव्हती. कशासाठी केली असेल याने एवढी खटपट? " देवांशला जेव्हा प्रेमचा चेहरा आठवला तेव्हा तो विचार करत स्वतःशीच म्हणाला, पण त्याचे ते शब्द माहिती आणून दिलेल्या अंगरक्षकाने ऐकले.

" बॉस, अजून एक महत्त्वाची बातमी अशी की, आजच सिया धर्माधिकारी ने त्याच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. आणि बहुतेक प्रेमचं तुम्हाला माहित असलेलं सत्य तिला माहित नाही. " अंगरक्षकाने माहिती दिली, तसं त्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य पसरलं.

" वाह, दॅट्स ग्रेट! अशाने तर आपलं काम आणखीनच सोपं झालं. रखरखत्या उन्हात सावली मिळाल्यासारखी वाटत आहे. नाही या दोघांना त्या तप्त लाव्हा सोसायला लावल्या, तर नावाचा देवांश सरंजामे नाही मी. " देवांश आपल्या हाती लागलेल्या माहितीमुळे स्वतःवरच खुश होत म्हणाला. अंततः त्याला प्रत्यक्षात न जिंकताही जिंकल्याचा आनंद होत होता.



क्रमशः


🎭 Series Post

View all