Login

प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग १९ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
 

                                  मागील भागात



बरोबर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत देवांशकडे प्रेमची सर्व डिटेल पोहोचली. त्याने ती दोन पानी असलेली फाईल भरभर वाचायला सुरुवात केली. प्रेमबद्दल त्यात बरीच माहिती होती. त्याचं शिक्षण, त्याच्या घरची परिस्थिती, त्याचे आईवडील, सर्व काही त्या फाईलमध्ये होतं. तो मात्र पूर्ण फाईल वाचून वारंवार त्याच्या फोटोवर येऊन थांबत होता.

" याला मी कुठेतरी पाहिलं आहे. " देवांश त्याच्या फोटोकडे पाहत विचार करत होता. त्याने त्याला कुठेतरी पाहिलं होतं पण आठवत नव्हतं.

बराच वेळ विचार केल्यानंतर, डोक्यावर ताण दिल्यानंतर प्रेमला कुठे पाहिलं होतं ते त्याला आठवलं.

" ओह येस येस! आत्ता आठवलं. हा असा नाव वगैरे बदलून राहील असं वाटलं नव्हतं. याच्यासारख्या धूर्त, कपटी आणि क्रूर माणसाकडून अशी अपेक्षा देखील नव्हती. कशासाठी केली असेल याने एवढी खटपट? " देवांशला जेव्हा प्रेमचा चेहरा आठवला तेव्हा तो विचार करत स्वतःशीच म्हणाला, पण त्याचे ते शब्द माहिती आणून दिलेल्या अंगरक्षकाने ऐकले.

" बॉस, अजून एक महत्त्वाची बातमी अशी की, आजच सिया धर्माधिकारी ने त्याच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. आणि बहुतेक प्रेमचं तुम्हाला माहित असलेलं सत्य तिला माहित नाही. " अंगरक्षकाने माहिती दिली, तसं त्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य पसरलं.

" वाह, दॅट्स ग्रेट! अशाने तर आपलं काम आणखीनच सोपं झालं. रखरखत्या उन्हात सावली मिळाल्यासारखी वाटत आहे. नाही या दोघांना त्या तप्त लाव्हा सोसायला लावल्या, तर नावाचा देवांश सरंजामे नाही मी. " देवांश आपल्या हाती लागलेल्या माहितीमुळे स्वतःवरच खुश होत म्हणाला. अंततः त्याला प्रत्यक्षात न जिंकताही जिंकल्याचा आनंद होत होता.





आता पुढे





" नाही, मला सोडा प्लीज! मी स्वतःच्या मनाने असं काहीच केलं नाही. मला तशी ऑर्डर मिळाली होती म्हणून मी पैशांसाठी काम केलं होतं. प्लीज मला जाऊ द्या. " सकाळी सियाला भेटलेला माणूस रात्री त्याच्यासमोर आपल्या जिवाची भीक मागत होता. त्याला एका खुर्चीला पक्क बांधून ठेवलेलं होतं.


" ते काहीही का असेना, पण प्रयत्न तर केलाच ना. जर मी वेळेवर पोहोचलो नसतो तर तू तुझ्या प्रयत्नामध्ये सफल झाला असता. फोन कर त्या देवांश सरंजामेला. आत्ता... इथेच... माझ्यासमोर. " तो म्हणजेच प्रेम त्या बांधून ठेवलेल्या माणसासमोर मोबाईल धरत म्हणाला.


प्रीतमने पुढे येऊन त्याचा उजवा हात सोडला. हात सोडल्याबरोबर त्या माणसाने प्रेमच्या हातातून मोबाईल घेतला आणि देवांशचा नंबर डायल करू लागला.


" हॅलो... " पलीकडून त्याचा झोपाळलेला आवाज आला.


" हॅलो बॉस, या लोकांनी मला पकडून ठेवलं आहे. प्लीज मला इथून सोडवा. " तो माणूस देवांशने फोन उचलल्या उचलल्या त्याला स्वतःला सोडवण्याची विनंती करू लागला.


फक्त आवाज ऐकून तिकडे देवांशने खाडकन आपले डोळे उघडले, पण लगेच नॉर्मलही झाला. तसाच त्या माणसाचा रागही आला होता.


" काही उपयोग नाही तुझा. तो जो कोणी आहे तुला मारणार असेल तर मारून टाक म्हणावं. जर त्याने तुला सोडलं तर मला तुला मारावं लागेल. पण त्याने मारलं तर माझं एक काम कमी होईल. छान झोप लागली होती मला. तुझ्या या फोनमुळे माझी झोपमोड झाली. मर आरामात जा. " देवांश झोपेत असल्यामुळे वैतागत म्हणाला आणि फोन ठेवायला जाणार की प्रेम मध्येच बोलला.


" मिस्टर देवांश सरंजामे, तुम्ही छान प्रयत्न केलात सियाला मारण्याचा. पण... पण नशीब मात्र तुमच्यासोबत नव्हतं. " प्रेम किंचित आपल्या ओठांचा कोपरा वर करत हसत म्हणाला, आणि देवांश त्याचा आवाज ऐकून बेडवर उठून बसला.


" ओह, मिस्टर प्रेम आहात का? अहो शंभर वर्षे जगणार तुम्ही. संध्याकाळी तुमचीच आठवण काढली होती, आणि आता तुमचा फोन आला. बाकी माझे कारनामे सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या आतमध्ये वाकून पाहायला हवं. ती म्हण तुम्हाला लागू होते. कुठली आहे ती? ते... ते... हा आठवलं, स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्यांचं पहावं वाकून! अशीच काहीशी म्हण आहे ना ती? " देवांश त्याला टोमणा मारत होता.


संध्याकाळीच त्याला प्रेमबद्दल माहिती मिळालेली होती, आणि रात्री त्याचा फोन आला म्हणजे कन्फर्म तो शंभर वर्षे जगणार.


" शब्दांमध्ये अडकवण्याची तुमची सवय अजूनही गेलेली दिसत नाही. माझी माहिती काढली म्हणजे नक्कीच तुम्हाला मी कोण आहे हे समजलं असणार. बाय द वे, मागे तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं होतं, ते विसरलो नाही बरं मी. अजूनही चांगलंच लक्षात आहे माझ्या. त्याचा हिशोब कधी करायचा सांगा? " प्रेम त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला. अर्थातच तो काहीसा सियाचा विषय बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता.


" हो तर, अगदी व्यवस्थित समजलं आहे मला तुम्ही कोण आहात ते. एक दिवस नक्की भेटूयात आपण. मलाही तुम्हाला भेटण्याची उत्सुकता लागली आहे, पण तो दिवस इतक्यात नाही येऊ द्यायचा मला. असं ऐकलं आहे की सिया धर्माधिकारी, तुमच्या लाईफ पार्टनर म्हणून तुमच्या आयुष्यात येणार आहेत. हे खरं आहे का? " देवांश त्याच्या त्यावेळीच्या परिस्थितीवर हसत बोलत होता. फिरून फिरून तो विषय सियावर आणत होता. ते ऐकून प्रेमलाही राग आला.


" सियाच्या आसपास भटकण्याचा विचार सुद्धा करायचा नाही. जर तिच्या केसालाही धक्का लागला, तर लक्षात ठेवायचं की तुला हवी असलेली वस्तू तिच्याजवळच आहे. ती वस्तू काहीच दिवसांत माझ्या हातात असेल. जर सियाला काही झालं, तर ती वस्तू उभ्या आयुष्यात तुला कधीच मिळणार नाही. हे वचन आहे तुला माझं. " पुन्हा सियाचा विषय निघाल्यामुळे प्रेम भडकला होता.


तिला काहीही करून या प्रकरणापासून त्याला लांब ठेवायचं होतं. तिच्याकडून ती वस्तू मिळवून तिला यातून सुरक्षित करायचं होतं. त्यासाठी तो काहीही करायला तयार होता.


" ओह अच्छा! म्हणजे साहेबांचंही प्रेम आहे मॅडमवर. चांगली गोष्ट आहे. पण वचन नक्की कोण देत आहे? प्रेम रघुवीर सरदेसाई? की...  " देवांश बोलता बोलता मध्येच थांबला होता. त्याला चिडवण्यामध्ये देवांशला भारी मज्जा येत होती.


" तुला जे समजायचं ते समजू शकतोस. आता बोलायची वेळ संपली आहे. बाय! " प्रेम देखील क्रूर हसत म्हणाला आणि त्याचं उत्तर न ऐकता फोन ठेवून दिला.


" किल हिम! " प्रेमने खुर्चीवर बांधलेल्या त्या माणसाला मारण्याची ऑर्डर दिली आणि तिथून निघून गेला. काहीच सेकंदात तो माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.



**************************



                      दोन दिवस झाले होते, प्रेम सियाशी तुटक वागायला लागला होता. त्याच्यातला हा बदल तिला सुद्धा जाणवत होता. त्यामागचं कारण मात्र तिला कळत नव्हतं. ती कितीतरी वेळा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तो फक्त कामापुरतं बोलत होता. तिसऱ्या दिवशी मात्र ती या सर्वांना पुरती वैतागली होती. त्याच्या अशा वागण्यामागचं कारण तिला जाणून घ्यायचं होतं. त्यासाठी तिने लंच ब्रेकमध्ये त्याला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं.


" मिस्टर प्रेम, जाणून घेऊ शकते का तुमच्या अशा वागण्यामागचं कारण? " सियाने तो केबिनमध्ये आल्या आल्या थेट मुद्द्याला हात घातला.


" मला समजलं नाही मॅडम. तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी काही चुकीचं वागत आहे का? तसं असेल तर सांगा मी माझी चूक सुधारतो. " प्रेमला कळत होतं ती कशाबद्दल बोलत आहे ते, पण त्याला काहीही करून तो विषय टाळायचा होता म्हणून मुद्दाम वेगळं बोलत होता.


" तुम्हाला चांगलंच समजलं आहे मला काय म्हणायचं आहे ते. आज तीन दिवस झाले तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही आहात. मी बोलले की कामापुरतं बोलता. याचं कारण सांगू शकता का? " सियाने थोड्या कडक शब्दांत त्याला विचारलं.


" मी नीटच बोलत आहे मॅडम. तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. " प्रेम आपली नजर चोरत इकडे तिकडे पाहत म्हणाला.


त्याच्या बोलण्यामध्ये तिला काहीच अर्थ दिसला नव्हता, म्हणून मग तिने स्वतःच स्पष्ट बोलण्याचं ठरवलं.


" हे बघा मिस्टर प्रेम, त्यादिवशी माझ्या मनात जे आलं ते मी तुमच्यासमोर बोलून दाखवलं होतं. माझ्या भावना मी तुमच्यासमोर व्यक्त केल्या होत्या. माणसाने आपल्या मनात काय आहे ते पटकन बोलून मोकळं व्हावं, अशा मताची आहे मी. न राहवून त्यादिवशी मी माझं प्रेम व्यक्त केलं होतं, पण तुम्ही तर माझ्यासोबत बोलणं कमी केलं आहे. " सिया एवढं बोलून थांबली आणि त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागली.


" तसं काही नाही मॅडम. त्यादिवशी तुम्ही काय बोललात ते कदाचित मी नीट ऐकलं नसेल. " यावेळीही त्याची नजर खालीच होती. तिच्या डोळ्यांत पाहून बोलण्याची त्याची हिंमत होत नव्हती.


" मग हेच तुम्ही माझ्याकडे पाहून बोलू शकता ना. मला चांगलंच माहित आहे की तुम्ही त्यादिवशी मी काय बोलले ते स्पष्ट ऐकलं होतं. तुम्ही तुमच्या कुठल्या सत्याबद्दल देखील मला सांगणार होतात. त्या सर्व गोष्टी त्यादिवशी अर्थवट राहिल्या. " सिया त्याचे त्यावेळी होते ते हावभाव आणि शब्द आठवत बोलत होती. त्यावर त्याने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि तिच्याकडे पाहिलं.


" ठीक आहे मॅडम, मीही जरा स्पष्टच सांगतो. मला असं वाटतं की तुम्ही हा विषय डोक्यातून काढून टाकावा. आपण जसे आधी नॉर्मल वागत होतो तसंच वागायला हवं. आणि डेफिनेटली तुम्ही माझं सत्य जाणून घेतल्यानंतर माझा तिरस्कार कराल. त्यानंतर मन तुटल्यापेक्षा आत्ताच न जोडलेलं बरं. " प्रेम तिच्याकडे नजर स्थिर ठेवत म्हणाला, पण त्याचे ते शब्द ऐकून तिचं तोंड उघडंच राहिलं.


" असं कोणतं सत्य आहे तुमचं मिस्टर प्रेम? आणि मी प्रेम करते तुमच्यावर, प्रेमामध्ये पार्टनरच्या चुका माफ करायला सुद्धा जमल्या पाहिजेत. तुम्ही एकदा मला सांगून तर पहा, मी पुरेपूर प्रयत्न करेन स्वीकारण्याचा. " सिया तिच्या खुर्चीवरून उठून त्याच्यासमोर उभी राहत म्हणाली. तिच्या बोलण्यात, वागण्यात आणि तिच्या डोळ्यांत त्याला त्याच्यासाठी असलेलं प्रेम स्पष्ट दिसत होतं.


" नाही मॅडम, मला तुम्हाला दुःखाने भरलेल्या आयुष्यामध्ये ओढायला आवडणार नाही. तुम्ही आता जशा आहात तशाच ठीक आहात. माझ्या आयुष्यामध्ये येऊन तुम्हाला त्रास आणि दुःखाशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. " प्रेम फक्त एवढंच म्हणाला आणि तिथून निघून गेला. सिया मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली.


" नका दूर लोटू मला प्रेम. मी नाही राहू शकणार तुमच्याशिवाय. जोपर्यंत मी माझं प्रेम तुमच्यासमोर व्यक्त केलं नव्हतं तोपर्यंत मला काही वाटलं नव्हतं, पण आता जेव्हा प्रेम व्यक्त झालं आहे तर तुमचं असं वागणं मला सहन होणार नाही. प्लीज... विनंती आहे तुमच्याकडे. " तो निघून गेल्यानंतर सिया त्याच दिशेला पाहत हळू आवाजात म्हणाली. तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले होते.



प्रेमचं असं वागणं सिया सहन करू शकेल का? तो स्वतः तिला आपलं सत्य सांगेल की देवांश काही खेळ रचणार?


सर्वांची मनापासून माफी मागते. मधल्या वेळेमध्ये तब्येतही बरी नव्हती आणि घरगुती वैयक्तिक प्रॉब्लेम्सही चालू होते, त्यामुळे कथेला वेळ देता येत नव्हता. समजून घ्याल अशी आशा आहे.