प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग ३ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                   अर्धा तास तरी त्या सर्वांना बाहेर बसवलं गेलं होतं. बरोबर अर्ध्या तासानंतर सिया आपल्या केबिनमधून बाहेर आली आणि त्या सर्वांसमोर येऊन उभी राहिली. ती बाहेर आली ते पाहून सर्वजण आपापल्या जागेवर उठून उभे राहिले आणि आता ती काय सांगणार म्हणून विचार करत होते. सर्वजण आपापलं सिलेक्शन व्हावं अशी देवाकडे प्रार्थना करत होते. सियाने आधी बाहेर आल्यानंतर एक फाईल मसीराच्या हातामध्ये दिली आणि तिच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं. मसीराने ती फाईल पाहिली आणि सियाला 'ठीक आहे' असा इशारा केला. त्यानंतर सियाने त्या सर्वांकडे पाहून बोलायला सुरुवात केली.

" सर्वांचे इंटरव्ह्यू खूप छान झाले, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन! तर तुमच्यापैकी एका जणाची फूड अँड बेव्हरेज या डिपार्टमेंटच्या हेडसाठी निवड करण्यात आली आहे. तुम्हा सर्वांपैकी कोणा एकाची निवड करणं खरंच अवघड होतं. सर्वांनी इंटरव्ह्यू छानरित्या पार पाडलं होतं, आणि आता मी त्या निवड झालेल्या व्यक्तीचं नाव सांगणार आहे. " सिया म्हणाली आणि हसून त्या सर्वांकडे पाहू लागली.

तिच्या शेवटच्या वाक्यावर मात्र सर्वांच्या मनामध्ये धडधड व्हायला सुरुवात झाली होती. ती काय निर्णय देणार याकडे सर्वांचे कान टवकारले गेले होते.

" तर, फूड अँड बेव्हरेज या डिपार्टमेंटसाठी ज्या व्यक्तीची निवड झाली आहे, त्यांचं नाव आहे... " सिया सर्वांवर नजर फिरवत हळुवारपणे बोलत होती. एवढं बोलून ती काहीवेळ थांबली. सध्या त्या सर्वांची अवस्था काय असेल याचा ती अंदाज लावू शकत होती.

" मिस्टर प्रेम रघुवीर सरदेसाई. " सियाने एक मोठा श्वास घेऊन डिपार्टमेंटसाठी निवडल्या गेलेल्या हेडचं नाव सांगितलं, तसा प्रेम खुश झाला.

" अभिनंदन मिस्टर प्रेम! " मसीरा टाळ्या वाजवत म्हणाली, तसे बाकीचेही टाळ्या वाजवू लागले. काहींनी खुश होऊन तर काहींनी खुश होण्याचा दिखावा करत सर्वांनीच त्याचं अभिनंदन केलं.

" सर्वांना खूप खूप धन्यवाद! " प्रेमनेही हसून सर्वांचे आभार मानले.

" बाकी सर्वांसाठी वाईट वाटत आहे, पण नक्कीच तुम्हा सर्वांना कुठे ना कुठे चांगल्या पगाराची नोकरी मिळेल याची खात्री ठेवा. तुम्ही सर्वजण आपला बहुमूल्य वेळ देऊन इथे आलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. तुम्ही सर्वजण आता येऊ शकता. धन्यवाद! " सिया हसून सर्वांकडे पाहून म्हणाली आणि नंतर तिने त्यांचे आभार मानून त्यांना जायला सांगितलं.

सर्वजण तिला धन्यवाद करून तिथून निघून गेले. प्रेम तिथेच उभा होता, तशी सिया त्याच्याजवळ आली.

" मिस्टर प्रेम, तुम्हाला हॉटेलच्या ओनरची भेट घ्यावी लागेल. तुम्ही माझ्यासोबत चला. " सिया त्याच्याजवळ येत म्हणाली. त्याने लगेच होकारार्थी मान हलवली.

" मसीरा, मी काहीच वेळात माघारी येते. तोपर्यंत तीन दिवसांनी होणाऱ्या लग्नासाठी इथे सर्व व्यवस्था व्यवस्थित झाली आहे का ते चेक करून घेशील. त्यानंतर काही राहिलं असेल तर त्यावर आपण चर्चा करूयात. आत्ता मी तुझ्याकडे दिलेल्या त्या फाईलमध्ये किती लोक असणार आणि काय काय करावं लागणार याची थोडक्यात माहिती आहे. एकदा डोळ्यांखालून घालशील. " सिया जाण्याआधी मसीराला म्हणाली, तशी तीही होकारार्थी मान हलवून तिथून निघून गेली.

सिया प्रेमला घेऊन शौर्यच्या केबिनकडे निघाली होती. काही मिनिटांनी दोघेजण शौर्यच्या केबिनसमोर जाऊन उभे राहिले. तिथे गेल्यानंतर शौर्यचा पी. ए. बाहेरच उभा असलेला दिसला. त्याने तिला पाहून अदबीने मान झुकवली.

" मला सरांना भेटायचं होतं. सर फ्री आहेत का? " सिया त्याच्याजवळ येऊन उभी राहत म्हणाली.

" ठीक आहे मॅडम, पण सर सध्या एका ऑनलाइन मीटिंगमध्ये व्यस्त आहेत. कोणी मध्येच दरवाजा वाजवून डिस्टर्ब करू नये म्हणून त्यांनी मला बाहेरच थांबायला सांगितलं आहे. पाच एक मिनिटांनी त्यांची मीटिंग संपेल तेव्हा तुम्ही त्यांना भेटू शकता. " पी. ए. ने शौर्यच्या शेड्युलची माहिती दिली.

" चालेल, काही हरकत नाही. तोपर्यंत आम्ही इथेच बसतो. " शौर्य मीटिंगमध्ये असल्यानंतर कधीच कोणाला भेटत नव्हता हे तिला चांगलंच माहित होतं.

जरी ते दोघेजण सख्खे भाऊ बहीण असले तरी ऑफिसमध्ये तो तिच्यासाठी हॉटेल मालक होता आणि ती त्याच्यासाठी व्यवस्थापक होती. त्याला मध्येच कुठलंही काम सोडणं आवडत नसायचं, म्हणून तिनेही हसून पी. ए. चं बोलणं मान्य केलं आणि तिथेच असलेल्या एका सोफ्यावर बसली. प्रेम तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला होता. त्याला तिच्याजवळ बसणं योग्य वाटत नव्हतं म्हणून तो तसाच उभा राहिला होता.

" मिस्टर प्रेम, तुम्ही बसू शकता. काही अडचण नाही. तुमच्याप्रमाणे मी सुद्धा इथे वर्करच आहे. " सिया हसून त्याला बसण्याचा इशारा करत म्हणाली, तसा तो कसाबसा हसला आणि तिच्यापासून थोडं अंतर राखून बसला. वेळ होता म्हणून सियाने पुन्हा एकदा त्याची फाईल मागितली.

" फॅमिलीमध्ये कोण कोण आहे तुमच्या? " सियाने त्याची फाईल पाहतच त्याला विचारलं.

" इथे माझी आई आणि मी आम्ही दोघेच असतो मॅडम. वडील कामानिमित्त बाहेरगावी असतात. " प्रेमने सांगितलं, तेव्हा ती त्याच्याकडे पाहू लागली.

" वडील बाहेरगावी आणि तुम्ही इथे असं का? तिकडे चांगल्या नोकरीवर आहेत का? परिस्थिती जास्तच हालाखीची आहे का तुमची? " सियाने त्याच्याकडे पाहत विचारलं. त्यावर तो हलका हसला.

" परिस्थिती आमची जास्तही खराब नाही मॅडम. गावाकडे आमची स्वतःची जमीन आहे. तिथे बाबांनी पोल्ट्री फार्म सुरू केलेलं आहे. तिथेच आमचं स्वतःचं घर सुद्धा आहे. बाबा तिथेच राहतात. हॉटेल क्षेत्रामध्ये मला कामाची आवड आहे म्हणून मी पोल्ट्री फार्ममध्ये कंटिन्यू न करता इथे येऊन प्रयत्न केला. माझी आवड पाहता बाबांनी सुद्धा मला काही जबरदस्ती केली नव्हती. दोन ठिकाणी अपयश मिळाल्यानंतर मी बाबांना घडलेला सर्व प्रकार सांगितला, तेव्हा मला चांगल्या हॉटेलमध्ये नोकरी मिळावी म्हणून त्यांनीच मला या हॉटेलबद्दल माहिती दिली होती. माझ्या देखरेखीसाठी त्यांनी आईला सुद्धा माझ्यासोबत पाठवलं. काही स्वतःची बचत आणि बाबांनी दिलेल्या पैशांनी मी आणि माझी आई इथेच एक छोटा फ्लॅट घेऊन राहत आहोत. " प्रेम किंचित हसून म्हणाला.

" चांगली गोष्ट आहे. तुमच्या बाबांनी तुम्हाला जबरदस्ती न करता तुमचं क्षेत्र निवडायला तुम्हाला स्वातंत्र्य दिलं खरंच खूप छान आहे. कोणाकोणाला एवढं स्वातंत्र्य नाही मिळत. ते स्वातंत्र्य हिसकावून घ्यावं लागतं. " सिया विचार करत बोलत होती.

तिला आणि शौर्यला आपलं हे आवडीचं क्षेत्र मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले होते हे त्यांनाच माहित. तेवढ्यात शौर्यच्या केबिनमधून बेल वाजवण्याचा आवाज आला आणि पी. ए. लगेच आतमध्ये निघून गेला.

" सरांची मीटिंग संपली वाटतं. " सिया उभी राहत म्हणाली. तिच्यासोबत प्रेम सुद्धा उठून आपल्या जागेवर उभा राहिला. थोड्यावेळाने पी. ए. बाहेर आला.

" मॅडम तुम्ही आत जाऊ शकता. " पी. ए. बाहेर येऊन म्हणाला. सिया आणि प्रेम लगेच आत गेले.

" येस मिस सिया, बोला! " शौर्य तिच्याकडे पाहून म्हणाला. तिच्यासोबत प्रेमला पाहून त्याला समजलं की त्याचं सिलेक्शन तिने केलं आहे.

" सर हे मिस्टर प्रेम रघुवीर सरदेसाई आहेत. आपल्या फूड अँड बेव्हरेज डिपार्टमेंटसाठी यांचं सिलेक्शन केलं आहे. " सिया शौर्यकडे प्रेमची फाईल देत म्हणाली.

त्याने फाईल घेऊन पाहायला सुरुवात केली. कधी फाईलमध्ये तर कधी तो प्रेमकडे पाहत होता. प्रेम त्याच्या तशा पाहण्याने न गडबडता तटस्थ उभा होता.

" हम्म! तर, अभिनंदन मिस्टर प्रेम! तुम्ही सर्व व्यवस्थित सांभाळाल अशी आशा आहे. " शौर्य किंचित हसून आणि हात मिळवण्यासाठी आपला हात पुढे करत म्हणाला. प्रेमनेही लगेच त्याच्या हातात हात दिला आणि हसून आभार मानले.

" खूप खूप धन्यवाद सर! आणि मी नक्कीच सर्व व्यवस्थित सांभाळेन. माझ्याकडून आपल्याला तक्रारीची संधी मिळणार नाही. " प्रेम हसून आभार मानत म्हणाला, मग दोघांनीही आपले हात सोडवून घेतले.

" छान आहे, हा आत्मविश्वास कायम ठेवा. या आत्मविश्वासाची आपल्या हॉटेलला आणि आम्हाला खूप गरज आहे. आजपासून तुम्ही काम सुरू करू शकता. " शौर्यने पुढे आपलं बोलणं पूर्ण केलं. त्यावर प्रेमने होकारार्थी मान हलवली.

" मिस सिया, मिस्टर प्रेमना त्यांच्या टीमची ओळख करून द्या. तीन दिवसांनंतर एका लग्नाची ऑर्डर आहे. त्याची तयारी कुठपर्यंत आली आहे ते चेक करून घ्या. कामात कसलीही कसर राहायला नको. " शौर्य सियाकडे पाहून म्हणाला, त्यावर तिनेही होकारार्थी मान हलवली.

" हो सर. येतो आम्ही. " सिया होकार देत म्हणाली आणि प्रेमला घेऊन तिथून निघून गेली.

तिथून निघून आल्यानंतर तिने फूड अँड बेव्हरेज डिपार्टमेंटमध्ये जी टीम कार्यरत होती त्यांच्याशी प्रेमची ओळख करून दिली. आजपासून तो त्यांचा प्रमुख असणार होता. त्यांच्याशी ओळख झाल्यानंतर प्रेमने सर्व सूत्र आपल्या हाती घेतले आणि कोणाला काय काय करायचं ते समजावून सांगितलं. पहिल्याच दिवशी त्याने पूर्ण टीमवर आपली छाप सोडली होती. पहिल्याच भेटीत त्याच्या स्वभावामुळे तो सर्व कर्मचाऱ्यांना आवडायला लागला होता. त्याची समजावून सांगण्याची आणि काम करवून घेण्याची पद्धत एवढी सोपी आणि छान होती की कोणालाही कामामध्ये आळस वाटत नव्हता.

मधल्या वेळेत जेव्हा त्यांची जेवण्याची वेळ झाली तेव्हा प्रेम तिथून जरा बाजूला गेला आणि कोणाला तरी फोन लावला. पहिली रिंग वाजली तसा पटकन समोरून फोन उचलला गेला.

" इथे सर्व सेट झालं आहे. मी माझं काम व्यवस्थित करत आहे. पुढची अपडेट मी लवकरात लवकर कळवेन. सर्वांनी व्यवस्थित लक्ष ठेवा आणि आपला संपर्क तुटू देऊ नका. " प्रेम कोणाशी तरी फोनवर बोलला.

बोलून त्याने फोन ठेवला आणि एक रहस्यमयी हसू त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. नंतर तो पुन्हा त्याचं काम करायला निघून गेला.




काय कारण असेल प्रेमच्या चेहऱ्यावर आलेल्या त्या हास्याचं? काय हेतू असेल त्याचा इथे येण्यामागचा?



क्रमशः


🎭 Series Post

View all