प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग ४ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
              प्रेम अगदी मन लावून त्याचं काम करत होता. त्याच्या टीम मेंबर्स सोबतच सिया आणि शौर्य देखील त्याच्या कामावर खुश होत होते. कामामध्ये तो अजिबात हलगर्जीपणा करत नाही, हे त्यांना जाणवलं होतं. प्रेम मधल्या वेळेमध्ये बाहेर कुठेतरी जात होता. अर्धा तास बाहेर राहून तो पुन्हा इकडे येत होता. त्याच्या टीम मेंबर्सना वाटत होतं की तो जेवण्यासाठी घरी वगैरे जात असेल, पण हे फक्त त्यांना वाटत होतं. प्रेम मात्र दुसरीकडेच कुठेतरी जात होता.

आज हॉटेलमध्ये लग्नाची मंडळी येणार होती. त्यांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय उत्तम नाही तर उत्कृष्ट व्हावी म्हणून सिया स्वतः सगळीकडे लक्ष ठेवत होती. कुठल्याही कामांमध्ये गैरजबाबदारपणा तिला अजिबात पटत नव्हता. प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक हेड होता, पण त्यांच्याकडूनही व्यवस्थित काम करून घेणं हे तिचं काम होतं. ती आपल्या त्याच कामांमध्ये मागच्या दोन दिवसांपासून दिवसरात्र एक करत होती. मुलाकडची मंडळी होती आणि त्यांनी पैसाही खूप खर्च केला होता. त्यांच्या मागण्या खूप होत्या. त्यावरून सियाला कळत नव्हतं की ते आज रात्रीसाठी थांबत आहेत की परतीच्या मार्गाला लागल्यानंतर पुन्हा इथे येणार आहेत. त्या लोकांनी तसं काही अजून कन्फर्म सांगितलेलं नव्हतं. फक्त शौर्यशी मीटिंग करून त्यांनी हॉटेल बुक करून घेतलं होतं.

" मसीरा, आज आलेल्या पाहुण्यांच्या मागण्यांमध्ये आणखी काही भर पडली तर मला लवकरात लवकर कळवशील. " सिया दिवसभर पाहुण्यांच्या मागे पळून पळून शेवटी संध्याकाळी आपल्या केबिनमध्ये विश्रांतीसाठी आणि तेव्हा मसीराला म्हणाली.

तिची या सर्वांमध्ये जास्त धावपळ होत होती हे मसीरा पाहत होती. आता तिची जबाबदारी होती सियाला आराम देऊन पाहुण्यांची उर्वरित सेवा करण्याची. जेव्हा सिया केबिनमध्ये यायला निघाली होती तेव्हा ती सुद्धा तिच्यामागे आली होती.

" मी लक्ष ठेवेन मॅम. तुम्ही प्लीज थोडा वेळ आराम करा. तुम्हाला आरामाची सक्त गरज आहे. " मसीरा टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलून तिच्या हातात देत म्हणाली.

सियाने एकाच दमात संपूर्ण ग्लास रिक्त करून टेबलवर ठेवला. कितीतरी वेळ फक्त इकडून तिकडे पळत होती त्यामुळे थकवा तर जाणवतच होता, पण तिने दुपारपासून साधं पाणी सुद्धा पिलेलं नव्हतं.

" तसं काही नाही गं. फक्त थोडा वेळ लक्ष ठेवशील. त्यांना विचारावं लागेल की लग्न झाल्यानंतर पुन्हा माघारी इथे थांबणार आहेत की नाही. लांबचा प्रवास असल्याने बहुतेक त्यांना थांबावंच लागेल. शौर्य सर बहुतेक बोलले आहेत त्यांच्याशी या विषयावर. थोड्यावेळाने जाऊन त्यांच्याशी बोलून घेऊ. " सिया बसल्या बसल्याच खुर्चीवर मागे मान टेकवून, डोळे मिटून म्हणाली.

" तुम्ही आराम करा मॅम. मी जाऊन बोलून येते. " अशी म्हणत मसीरा तिथून जायला निघणार की तेवढ्यात दरवाजावर कोणीतरी नॉक केलं.

" येस, कम इन! " दरवाजावर टकटक झाल्यामुळे सिया व्यवस्थित बसून म्हणाली. तिने बोलावल्यानंतर बाहेरून प्रेमने अलगद दरवाजा उघडला आणि आत आला.

" सॉरी मॅडम, मला माहित नव्हतं तुम्ही आराम करत आहात ते. महत्त्वाची माहिती द्यायची होती म्हणून लगेच इकडे आलो होतो. " प्रेम तिचे जड झालेले डोळे पाहून म्हणाला, त्यावर सिया हलकी हसली. आपण उगाच तिला डिस्टर्ब केलं असं त्याला वाटलं होतं.

" तसं काही नाही मिस्टर प्रेम. तुम्ही सांगा, काय महत्त्वाचं काम होतं? " सिया म्हणाली तसा तो पुढे बोलू लागला.

" मॅडम, माफी असावी, मी तुमची वाट न पाहताच शौर्य सरांकडे गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं की पाहुणे उद्या लग्न लागल्यानंतर इथे थांबण्यासाठी माघारी येणार आहेत. " प्रेम तिच्याकडे पाहत म्हणाला आणि त्या दोघीजणी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागल्या.

" माफ करा मॅडम, पण पाहुण्यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी ही माझी आहे. त्यांच्या पाहुणचारामध्ये काही कमी राहू नये म्हणून उद्या सकाळपासूनच तयारी करावी लागणार होती. पूर्वतयारी करता यावी यासाठीच मी शौर्य सरांकडे गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला ही माहिती दिली. " प्रेम त्या दोघींना आपल्याकडे पाहताना पाहून त्यांची माफी मागत म्हणाला. तेव्हा कुठे त्या दोघीजणी भानावर आल्या.

" खूप खूप छान मिस्टर प्रेम! तुम्ही खूप छान केलं स्वतः जाऊन विचारलं ते. आत्ता मसीरा जाणारच होती, पण तुम्ही आम्हा दोघींचं काम हलकं केलं त्याबद्दल धन्यवाद. " सिया त्याच्याकडे पाहून हसून म्हणाली, तेव्हा त्यानेही आपला अडकलेला श्वास सोडला आणि हसला.

" हो ना, आजपर्यंत कोणीही अशी स्वतःहून जबाबदारी घेतलेली नव्हती. जो तो फक्त ऑर्डर्स आल्यानंतरच आपापला डिपार्टमेंट सांभाळण्याचा प्रयत्न करत होता, पण तुम्ही पूर्वतयारी केलीत ते खूप छान केलं. " मसीराही त्याच्या कामावर खुश झाली होती. तीही हसून त्याचं कौतुक करत होती.

" धन्यवाद मॅडम! मी पुढच्या तयारीला लागतो. आज रात्रीची सोय झाली आहे सर्वांची. उद्या सकाळी काय करायचं ते ठरवतो. येऊ का मॅडम? " प्रेम हसूनच त्या दोघींचे आभार मानत म्हणाला, आणि सियाने परवानगी दिल्यानंतर तिथून निघून गेला.

" मिस्टर प्रेम खूपच हुशार आहेत. त्यांना काहीच सूचना देण्याची गरज पडत नाही. " मसीरा सियाजवळ त्याची प्रशंसा करत म्हणाली.

त्यावर सियानेही होकारार्थी मान हलवली आणि काही बोलणार तेवढ्यात तिच्या केबिनमधील लँडलाईनवर फोन आला. तिला वाटलं की हॉटेलमधूनच कोणाचातरी फोन असेल म्हणून तिने वेळ न दवडता लगेच फोन उचलून कानाला लावला.

" हॅलो... " सिया फोन उचलून कानाला लावत म्हणाली.

" ओळखलं का मॅडम? " पलीकडून एक पुरुषी आवाज आला, पण अचानक अशा विचारल्या गेलेल्या प्रश्नाने सियाच्या भुवया आकसल्या गेल्या.

" कोण बोलत आहात? " सियाने इकडून उत्तर न देता प्रश्न विचारला, तेव्हा त्या माणसाचा किंचित हसण्याचा आवाज आला.

" इतक्यात विसरलात वाटतं मॅडम. तुमची आणि माझी ओळख तर खूप जुनी आहे. आपल्यात मित्रत्वाचं नातं नसलं तरी शत्रुत्वाचं नातं नक्की आहे. आता तरी आपल्या या शत्रूला ओळखलं की नाही? " त्या माणसाने तिला आपण कोण आहोत हे नाव न सांगता ओळख करून दिली, तशा आता सियाच्या कपाळावर आठ्या पडल्या.

" ओह! तुम्ही आहात होय. तुम्हाला कशी विसरणार मी? बोला, काय काम काढलं आपल्या या शत्रूकडे? " सिया देखील त्याच्याच टोनमध्ये म्हणाली.

" सहजच आठवण आली होती तुमची. इतक्या दिवसांपासून तुमची काही हालचाल दिसली नाही, म्हणून म्हटलं आपणच फोन करून काय चाललं आहे ते विचारावं. तुमची काळजी वाटली ओ, बाकी काही नाही. " तो व्यक्ती असुरी हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाला.

" आम्हाला काय हालचाल करायची आहे ती आम्ही करूच. तुमचं काय काम आहे ते बोला. जर काही काम नसेल तर फालतू गप्पा मारण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीय. " सिया कपाळाला हात लावून वैतागत म्हणाली. मसीरा तिच्याजवळच उभी राहून ऐकत होती. तिलाही अंदाज आलाच होता तो फोन कोणाचा असणार.

" तुमच्याकडे जी वस्तू आहे ती आम्हाला हवी होती. उगाच त्या वस्तूमुळे आपल्यामध्ये असलेलं शत्रुत्वाचं नातं घनिष्ट होऊ नये असं आम्हाला वाटतं. तुमचीच काळजी वाटली आम्हाला, म्हणून स्वतःहून फोन केला. ती वस्तू आमच्याकडे नक्की सुरक्षित राहील. " तो व्यक्ती इकडे तिकडे फिरत, एक हात खिशात घालत म्हणाला. दुसऱ्या हाताने त्याने फोन कानाला लावलेला होता.

" तुम्हाला चांगलंच माहित आहे की ती वस्तू तुम्हाला अजिबात मिळणार नाही. ती वस्तू माझ्याकडे अगदी सुरक्षित आहे, त्यामुळे तुम्ही काळजी न केलेलीच बरी. आता मी ठेवू का? रिकामा वेळ नाहीय माझ्याकडे. " सिया असं म्हणत कानाचा फोन काढणारच होती की तेवढ्यात त्याचा आवाज आला.

" काय हा हट्टीपणा करत आहात मॅडम. स्वतःचा जीव नकोसा वाटत आहे का तुम्हाला? त्याची किंमत नाही का तुम्हाला? नसेल तुम्हाला काही किंमत तर... माझी काहीच हरकत नाही. एखाद्या शार्प शूटरला पाठवून तुम्हाला शूट करायला सांगू का? " ती ऐकत नाही पाहून तो तिला शांत शब्दांमध्ये धमकी देऊ पाहत होता. जेणेकरून ती घाबरेल आणि आपल्याला हवी ती वस्तू आपल्याला माघारी देईल.

" नक्कीच तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता मिस्टर. तरीही थोडा विचार करा, मी मेल्यानंतर तरी तुम्हाला ती वस्तू मिळेल का? ती वस्तू कुठे आहे? कशी आहे? या प्रश्नांची उत्तरे फक्त मला माहित आहेत. मग जर मी मेले तर ती वस्तू तुम्हाला मिळण्याची शक्यता देखील कमीच असणार. नाही का? " सिया सडेतोड न घाबरता त्याच्याशी बोलत होती. हे ऐकून मात्र त्याच्या चेहऱ्यावरचं क्रूर हसू मावळलं. ती घाबरेल असं त्याला वाटलं होतं, पण ती तर निडरपणे बोलत होती.

" मला इथून पुढे तुमची बडबड ऐकण्यामध्ये काडीचा इंटरेस्ट नाही मिस्टर. जर तुम्हाला ती वस्तू हवीच असेल तर माझ्याकडे न मागता तुम्ही स्वतः शोध घ्या. काय करायचं ते तुम्हीच ठरवा. इथून पुढे मला फोन करण्याची अजिबात गरज नाही. गुड बाय! " त्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग सियाला डोळ्यांनी न पाहताही दिसला होता. त्याच्या शांत राहण्यावर हसत ती बोलली आणि लगेच फोन ठेवून दिला.

" खूप मोठी चूक करत आहेस तू मिस सिया श्रीकांत धर्माधिकारी. तुला माहित नाही मी काय करू शकतो ते. आमना सामना झाल्यानंतर नाही तू स्वतःच्या जीवाची भीक मागितलीस, तर नाव नाही लावणार... 'देवांश सरंजामे' म्हणून. " तो, म्हणजेच देवांश दातांवर दात घासत रागाने म्हणाला.

            देवांश सोनाजी सरंजामे, असं त्याचं नाव होतं. गर्भ श्रीमंत असलेला तो तसाच गर्भ गर्विष्ठ देखील होता. राक्षसी वृत्ती त्याच्यामध्ये ठासून ठासून भरलेली होती. आपल्यासाठी हानिकारक असलेल्या लोकांना तो कधीच सोडत नव्हता. आजपर्यंत त्याला जी हवी ती वस्तू जागेवर आणि हातात मिळत गेली होती. आज त्याची एक महत्त्वाची वस्तू सियाकडे होती. ती वस्तू जर त्याला नाही मिळाली तर त्याला स्वतःला देखील कळणार नव्हतं तो काय करणार ते. सिया एक मुलगी आहे आणि तिचा आपल्या हातून जीव जाऊ नये याचा तो प्रयत्न करत होता, पण सिया देखील काही कमी नव्हती. हेच तर तिचं वेगळं प्रोफेशन होतं. ज्या वस्तू घातक आहेत त्या वस्तूंना ती त्या व्यक्तीपासून दूर करत होती. जी वस्तू सध्या तिच्याकडे होती ती पुन्हा त्याच्या हाती लागल्यावर तो पूर्ण शहराला बरबाद करणार हे नक्की होतं, म्हणूनच तिने ती वस्तू कोणाच्याही नजरेत न येता शिताफीने चोरून आणली होती. जेव्हा देवांशला समजलं होतं तेव्हापासून तो दोन तीन दिवसांआड तिला फोन करून असाच परेशान करत होता, पण ती काही त्याच्यापुढे हरली नव्हती. आता ती वस्तू पुन्हा त्याच्या हाती लागू द्यायची नव्हती, याची तिला काळजी घ्यायची होती.



प्रेम मधल्या वेळेत नेमका कुठे गायब होत असेल? अशी कोणती वस्तू असेल सियाजवळ ज्यामुळे ती देवांशची शत्रू बनली होती?