प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग ५ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                      वेळ : - दुसऱ्या दिवशी सकाळी
                 ठिकाण : - सियाची हॉटेलमधील केबिन


                          सियाने देवांशसोबत काल बोलणं झाल्यानंतर तो विषय तिथेच सोडून दिला होता. त्याच्या बोलण्याचा जास्त विचार न करता ती आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली होती. मसीराला देवांशसोबत असलेली सियाची शत्रुता माहित होती. ती देखील जाणून होती की जी वस्तू सियाकडे आहे, ती देवांशला मिळाल्यानंतर किती मोठा अनर्थ घडणार होता. त्या अनर्थ होण्याच्या भितीनंतर तिला सियाच्या जीवाची देखील भीती वाटत होती. देवांश काही साधासुधा व्यक्ती नव्हता, त्यामुळे भीती साहजिक होती. सर्व नकारात्मक गोष्टी बाजूला सारून सिया तिच्या केबिनमधून बाहेर जायला निघणार, तेवढ्यात आपल्या मनातलं बोलण्यासाठी मसीराने तिला अडवलं.

" मॅडम, मी एक बोलू का? " मसीरा एकदम हळू आवाजात विचारत होती, कारण आपण बोलल्यानंतर सियाला ते पटेल की नाही याची भीती वाटायला लागली होती. काल त्याच वेळी मध्ये बोलायला तिला जमलं नव्हतं आणि तिला ते योग्यही वाटलं नव्हतं, म्हणून ती आज तिच्याशी बोलत होती.

" काय झालं मसीरा? काही अडचण आहे का? " सिया एकदम नॉर्मली बोलत होती. सियाच्या बोलण्यावरून असंच वाटत होतं की काही वेळापूर्वी जे झालं ते ती पूर्णपणे विसरली होती.

" मॅडम, मला असं वाटतं की तुम्ही देवांश सरंजामेच्या धमकीला दुर्लक्ष न करावं. ती वस्तू तुम्ही तुमच्या घरात न ठेवता दुसरीकडे कुठेतरी ठेवून द्यावी. देवांश सरंजामे खूपच पोहोचलेला व्यक्ती आहे. त्याला जर समजलं की ती वस्तू तुमच्या घरात आहे, तर तो तुमच्या घरात घुसायला अजिबात मागे पुढे पाहणार नाही. " मसीरा शंका आणि भीतीयुक्त आवाजात सियाला सांगत होती. तिने ती वस्तू स्वतःच्या घरात ठेवू नये अशी तिची इच्छा होती.

" मलाही आधी तसंच वाटलं होतं मसीरा. तो अजून माझ्या घरापर्यंत पोहोचलेला नाही, आणि मी त्याच्या अशा धमक्यांना अजिबात घाबरणार नाही. घरी एकतर कोणी नसतं आणि मी नसताना त्याला अगदी सोपं गेलं असतं ती वस्तू मिळवायला. पण ती वस्तू मी अशा ठिकाणी ठेवली आहे, ज्याबद्दल शौर्य दादा सोडले तर माझ्या आईवडिलांना सुद्धा माहित नाही. म्हणूनच मी जरा निर्धास्त आहे. " सिया तिच्याकडे पाहून म्हणाली. तिच्या या बोलण्यावरून मसीराला समजलं की ती पुढची काळजी करत नाहीय, पण जर तिथली सिक्युरिटी मजबूत असेल तर तिलाही पुढे बोलण्याची काही गरज वाटली नाही.

" ठीक आहे मॅडम, तशी त्याची काही हालचाल जाणवल्यानंतर तरी काळजी घ्याल. ती वस्तू खूप धोकादायक आहे. " मसीरा अजूनही काळजी करत होती, त्यामुळे सिया तिच्याकडे पाहून किंचित हसली.

" काही काळजी करू नकोस. तो तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. चला, काम खूप बाकी आहे. लग्नाची मंडळी लग्न लावायला तर गेली आहेत, पण रात्री आणि उद्या सकाळी ते इथेच थांबणार आहेत. एकदा बाहेर जाऊन नजर टाकून येऊ. " सिया पुढे चालत म्हणाली आणि केबिनच्या बाहेर निघाली. मसीरा तिच्यामागेच गेली आणि मग दोघीही आपल्या कामामध्ये गुंतल्या. 


***********************


                     जेवणाची सुट्टी झाली होती, तेव्हा नेहमीप्रमाणे प्रेम स्टाफला सांगून तिथून बाहेर पडला. एकदा त्याने आपल्या आजूबाजूला नजर फिरवली आणि मग कोणाला संशय येऊ नये म्हणून एक रिक्षा पकडून त्यात बसून निघून गेला. दहाच मिनिटांत तो त्याच्या ऐच्छिक स्थळाच्या काही अंतर अलीकडेच उतरला. मुद्दाम रिक्षा त्याने एका दुकानासमोर थांबवली होती. त्यानंतर तो दोन मिनिटे तिथेच थांबला आणि मग नंतर इकडे तिकडे पाहत तिथून निघाला. तो एका निर्जन स्थळी पोहोचला. आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं, फक्त एक छोटी खोली दिसत होती. दुपारची वेळ असल्याने आणि आजूबाजूला कुठेही घरे नसल्याने तिथे लोकांची रहदारी नव्हती. तो पळतच त्या खोलीकडे गेला आणि दरवाजा उघडून त्यात प्रवेश केला. तिथे आधीच दोन जण उपस्थित होते. रॉबर्ट आणि प्रीतम अशी त्या दोघांची नावे होती. त्याला तिथे पाहून दोघेही आपापल्या जागेवरून उठून उभे राहिले आणि अदबीने त्याच्यासमोर मान झुकवली.

" काही अपडेट? " प्रेमने वेळ न दवडता मुद्द्याचं बोलायला सुरुवात केली.

" काही विशेष हालचाल दिसत नाहीय सर. " प्रीतम माहिती देत होता, तेव्हा प्रेमने आपली दोन बोटे कपाळावर रगडली आणि वैतागून इकडे तिकडे पाहू लागला.

" अजून कशी काही माहिती मिळाली नाही? आपल्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. " प्रेम वैतागून त्या दोघांकडे पाहून म्हणाला. त्यावर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि पुन्हा आपली मान खाली झुकवली.

" काहीच क्लू मिळण्याचे मार्ग नाहीत सर. प्रत्येक मार्ग अवलंबून पाहिला, पण काहीच मिळत नाहीय. " रॉबर्ट खाली मान झुकवूनच म्हणाला.

कितीतरी दिवसांपासून ते लोक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. अजूनही त्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं म्हणून प्रेमसमोर त्यांना अपराधीपणा जाणवत होता. याआधी कुठल्याही कामांमध्ये त्यांना विलंब झाला नव्हता. हे पहिलंच काम असं होतं ज्यात त्यांना जागोजागी अपयश मिळत होतं. बऱ्याच नवीन पद्धती वापरून पाहिल्या पण त्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं.

" ठीक आहे. तरीही तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. कुठेही थांबता कामा नये आणि काहीही सोडता कामा नये. ही माहिती आपल्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. " प्रेम पुन्हा एकदा त्यांना सूचना देत म्हणाला, आणि तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने खिशातून मोबाईल काढून नाव पाहिलं तर त्यावर मसीराचं नाव झळकत होतं.

" माझं फोनवर बोलणं होईपर्यंत कोणीही काहीही बोलू नका. " प्रेम म्हणाला आणि पटकन फोन उचलला. त्यावर त्याने बोलणं केलं. नंतर फोन ठेवून त्याने त्या दोघांकडे पाहिलं.

" मी निघतो. जशी काही माहिती हाती लागेल तसा लगेच मला फोन करून कळवाल. माझा फोन माझ्याजवळच असतो. " प्रेम जाता जाता म्हणाला आणि त्या दोघांनी हो म्हणून सांगितलं.

तो लगेच तिथून जायला निघाला. लग्नाची मंडळी लग्न लावायला निघून गेली होती. रात्री तर ते येताना जेवूनच येणार होते, पण उद्या सकाळची त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायची होती. त्यानंतरच ते तिथून माघारी जायला निघणार होते.


************************



" भाई, अजूनही ती वस्तू तुम्ही माझ्या हातात दिलेली नाही. किती दिवस झाले मी तुम्हाला मागत आहे? अजून सापडली कशी नाही? " एक मुलगी रागाने ओरडत तिच्या भावाला विचारत होती.

तिचा भाई म्हणजेच, देवांश सोनाजी सरंजामे होता, आणि ती त्याची बहीण काव्या सोनाजी सरंजामे होती. तो नेमकाच त्याच्या ऑफिसमधून घरी आलेला होता, आणि बसलाच होता की त्याच्या बहिणीने त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली होती.

" काव्या, अगं एखाद्या गोष्टीसाठी वेळ लागतो की नाही. मी आत्ताच ऑफिसमधून आलो आहे. मला थोडावेळ बसू तरी दे. " देवांश चिडून तिच्याकडे पाहत म्हणाला. ती त्याचं काहीच न ऐकता त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसली आणि रागाने त्याच्याकडे पाहू लागली.

" तुम्हाला चांगलंच माहित आहे भाई, की मला ती वस्तू खूप आवडली होती. जर ती वस्तू मला नाही मिळाली तर मी या पूर्ण बंगल्याला आग लावेन. " काव्या पुन्हा चिडून म्हणाली. एक प्रकारे ती त्याला धमकीच देत आहे असं वाटत होतं.

" तू मला धमकी देत आहेस? एवढी हिंमत कशी झाली तुझी! " देवांश सुद्धा आता चिडला होता. त्याच्याशी कोणीही वरच्या आवाजात बोललेलं त्याला आवडत नव्हतं. मग ती बाहेरची व्यक्ती असो किंवा घरातली.

" तसंच समजा. " तीही निर्लज्जपणे म्हणाली.

आपल्या भावाला त्याचा राग येईल वगैरे याचा तिने काही विचारच केला नव्हता. प्रत्येक वेळी त्याला उलट बोलत होती. तिच्या अशा बोलण्यावर तो सोफ्यावर मागे रेलून बसला. आपला एक पाय दुसऱ्या पायावर आडवा ठेवला. उजवा हात सोफ्याच्या आर्मरेस्टवर ठेवला आणि रोखून तिच्याकडे पाहू लागला.

" आत्ताच्या आत्ता इथून निघ... नाहीतर मुडदे पडण्याची सुरुवात तुझ्यापासूनच होईल. " देवांश त्या स्थितीत बसत नजर रोखून थंड पण धारदार आवाजात तिला म्हणाला. तेव्हा कुठे तिच्या शरीरात भीतीची लहर पसरली आणि ती घाबरून त्याच्याकडे पाहू लागली.

आत्ता कुठे ती तिच्या रागातून वास्तवात आली. आपला भाऊ राग आल्यानंतर काय करू शकतो याची जाणीव झाली. तिचा राग क्षणात गळून पडला आणि ती आपल्या जागेवर उठून उभी राहिली.

" आय... आय... एम... स्... " ती भानावर आल्यानंतर त्याची माफी मागणारच होती की तेवढ्यात तो पुन्हा गरजला.

" निघ इथूनऽऽऽऽऽ! " तो जोरात तिच्यावर ओरडला, तशी ती घाबरून तिथून पळून गेली.

ती गेल्यानंतर तो डोळे मिटून बसला होता. स्वतःचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. आता तर त्याने मनात पक्क केलं होतं की ती वस्तू तो सियाकडून कुठल्याही परिस्थितीत मिळवूनच राहणार. त्यासाठी साम दाम दंड भेद जो कुठलाही मार्ग अवलंबण्याची गरज पडेल त्यासाठी मागे हटणार नव्हता.

" सिया, जळत्या अंगाऱ्यावर हात टाकला आहेस तू तर चटका तुला लागणारच. फक्त आता वाट बघ माझी. " देवांश चिडून आपला जबडा घट्ट करत स्वतःशीच म्हणाला.



हा प्रेम नेमका आहे तरी कोण? तो कोणी मोठी हस्ती आहे की वेगळंच काही?



क्रमशः




🎭 Series Post

View all