प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग ६ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                           पूर्णपणे काळोख असलेल्या मोठ्या रूममध्ये एका व्यक्तीला खुर्चीवर पक्क बांधून ठेवलेलं होतं. संपूर्ण रूममध्ये काळोख जरी असला तरी फक्त त्या व्यक्तीच्या डोक्यावर छोटा लाईट लावून उजेड केलेला होता. त्याच्या आजूबाजूला दोन काळ्या कपड्यांमध्ये हट्टे कट्टे माणसं उभी होती. दिसण्यावरून ते कोणाचे तरी बॉडीगार्ड वाटत होते. खुर्चीवर बांधून ठेवलेल्या व्यक्तीला बहुतेक बेशुद्ध केलेलं होतं. नाही तो सुटण्याची धडपड करत होता, आणि नाही त्याचे डोळे उघडे होते. त्याची मान खाली लटकलेली होती आणि तो खुर्चीला बांधलेला होता.

काहीवेळाने त्याला शुद्ध येऊ लागली. तो हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न करत मान झटकत होता. त्याला त्याचं संपूर्ण अंग जखडलेलं वाटत होतं. डोळ्यांसमोर अंधार असूनही त्याला आपण भयंकर परिस्थितीमध्ये अडकलेलो आहोत याची जाणीव झाली. आता तो पूर्णपणे शुद्धीवर यायला लागला होता आणि स्वतःला सोडवून घेण्याची धडपड करत होता. तोंड बांधलेलं असल्यामुळे त्याला काही बोलताही येत नव्हतं. तेवढ्यात तिथे बुटांचा आवाज येऊ लागला. कोणीतरी चालत याच दिशेला येत आहे हे त्याला जाणवलं. त्याने सुटण्याची धडपड थांबवत समोर पाहायला सुरुवात केली. रूममध्ये पूर्णपणे काळोख आणि फक्त त्याच्या डोक्यावर उजेड असल्याने त्याला समोर कोण आहे ते व्यवस्थित दिसत नव्हतं. जशी जशी ती आकृती जवळ येत होती तसे तसे त्या माणसाचे डोळे घाबरून मोठे होत होते. पेहरावावरून ती व्यक्ती कोणीतरी मोठी हस्ती असणार याचा अंदाज येत होता आणि बांधून ठेवलेल्या त्या व्यक्तीने समोरून आलेल्या व्यक्तीला ओळखलं होतं. त्यांच्या समोरच एक सुंदर सिंहासन तयार होतं. ती प्रशस्त व्यक्ती त्याच्यासमोर आली आणि त्यांच्या सिंहासनावर विराजमान झाली.

ती प्रशस्त व्यक्ती म्हणजे संपूर्ण शहराचे एकुलते एक सुप्रीम डॉन श्री. सत्येंद्र नागेश्वर अग्निहोत्री. ५५ वर्षांचे असूनही सुदृढ व्यक्तिमत्व दिसत होतं. वयामानानुसार केस आणि मिशी पांढरी झाली होती, पण ताकत अजूनही एवढी होती की दहा ते वीस जणांना एकाच प्रहारात देवाघरी पाठवू शकत होते. जेवढे क्रूर होते तेवढेच दयाळू सुद्धा होते. समप्रमाणात स्वभाव होता त्यांचा. त्यांच्या सीमेअंतर्गत जेवढे गाव येतील त्या सर्वांसाठी ते देवमाणूस होते. काळा पैसा तर त्यांनी कमावला होता, पण काळ्या हृदयाचे ते अजिबातच नव्हते. हो पण... जो त्यांच्याशी नडत होता त्याला मात्र ते सोडणारे नव्हते. त्याचं उदाहरण म्हणजे त्यांच्यासमोर बांधलेला तो माणूस होता. सध्या ते बांधलेल्या माणसाच्या समोर बसून एकटक त्याला न्याहाळत होते. तो माणूस घाबरून अजूनही त्यांच्याकडेच पाहत होता.

" तोंड सोडा याचं. " थोड्यावेळाने त्याच्याकडे पाहून झाल्यानंतर सत्येंद्र यांनी त्यांच्या बॉडीगार्ड्सना त्याच्या तोंडाचा रुमाला सोडण्याचा आदेश दिला.

एका बॉडीगार्डने लगेच पुढे येऊन त्याचं तोंड सोडलं. जसं तोंड सोडलं तसा त्याच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.

" मला माफ करा साहेब... मी चुकलो साहेब... तुम्ही रक्षणकर्ते आहात साहेब. खूप खूप दयाळू आहात. माझ्यावर दया करा साहेब. मला माफ करा... " घाबरून तो सत्येंद्र यांच्याकडे आपल्या जीवाची भीक मागत होता. जसा त्याचा आवाज सुरू झाला, तसे त्यांनी वैतागून आपले डोळे मिटले आणि पुन्हा उघडले.

" सत्येंद्र अग्निहोत्री माफिया असूनही दयाळू आहेत. आपण कितीही चुका केल्या तरी आपल्याला माफ करतील, असं समजून चूक केली होतीस का तू? " सत्येंद्र वैतागून त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले. 

" न... नाही... नाही साहेब. चुकून झालं माझ्याकडून. " तो माणूस पुन्हा गयावया करत होता. आपल्यासमोर बसलेला तो ५५ वर्षांचा माणूस वेळप्रसंगी क्रूरतेची पातळी सुद्धा गाठतो हे त्याला माहित होतं. तरीही अनावधानाने त्याच्याकडून चूक झाली होती.

" ७०० करोड... ७०० करोड रुपयांचं नुकसान केलं आहेस तू आमचं. आमच्या ७०० करोड रुपयांच्या बिझनेसच्या फ्युचर प्लॅनिंगची किंमत तू फक्त ५ करोडमध्ये विकलीस? विश्वासघात केला आहेस तू आमचा. आमच्याकडे काम करण्याची सॅलरी सुद्धा तुला त्याच्यापेक्षा जास्त मिळत होती. " सत्येंद्र चिडून त्याच्याकडे पाहत बोलत होते.

समोर बसलेला माणूस त्यांच्या हाताखाली काम करणारा होता. त्यांच्या सर्व व्यवसायाची माहिती त्याला तोंडपाठ होती. त्याचाच फायदा घेत त्याने त्यांच्या नवीन व्यवसायाची आखणी विदेशी कंपनीला विकली होती. त्याची किंमत त्याला फारच कमी मिळाली होती, पण जे मिळालं त्यात तो समाधानी होता. सत्येंद्र यांना कळाल्यानंतर लगेच आपलं पितळ उघडं पडेल याची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती.

" या चुकीची शिक्षा तुला फार भयंकर पद्धतीने भोगावी लागणार. " सत्येंद्र आपल्या सिंहासनावरून उठत म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर तो माणूस थरथर कापायला लागला होता. त्यांच्याकडे चुकीला कशी शिक्षा असते हे त्यांच्यासोबत काम केल्यामुळे त्याला माहित होतं.

" घ्या याला बाहेर. " सत्येंद्र त्या दोन्ही अंगरक्षकांना म्हणाले आणि तिथून बाहेर जायला निघाले.

" नाही साहेबऽऽऽऽऽ! प्लीज माफ करा. " अंगरक्षकांना दिलेली आज्ञा ऐकून तो मरणार हे कन्फर्म झालं होतं. त्या दोघांनी त्याला उचललं आणि सत्येंद्र यांच्या मागे बाहेर घेऊन जाऊ लागले.


**************************


                      समोर एक मोकळं पटांगण होतं. जणूकाही लहान लहान मुलांना खेळण्यासाठी बनवलेली ती जागा असावी, अशी स्वच्छ आणि निर्मळ जागा होती. सत्येंद्र तिथेही आपल्या सिंहासनावर बसलेले होते. त्यांच्यासमोर काही अंतरावर त्यांच्यासोबत दगाबाजी केलेल्या त्या माणसाला गुडघ्यांवर बसवलेलं होतं. आता आपण मरणार याची त्याला खात्री होती, म्हणून तो खाली मान घालूनच मोठमोठ्याने रडत होता. पैशांच्या लालसेने त्याने जो गुन्हा केला होता त्याची शिक्षा त्याला आत्ता मिळणारच होती.

" गार्ड्स, किती वेळ झाला? " सत्येंद्र यांनी त्यांच्या अंगरक्षकाला विचारलं. तो लगेच पुढे आला आणि आपली मान खाली घालून उभा राहिला.

" बॉस, बारा तास झाले आहेत. " अंगरक्षकाने माहिती दिली आणि सत्येंद्र यांच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य पसरलं.

" हम्म... जरा यालाही तो नजारा दाखवा. " सत्येंद्र रडत असलेल्या त्या माणसाकडे पाहून अंगरक्षकाला म्हणाले, तसा तो रडता रडता अचानक त्यांच्याकडे पाहू लागला.

" येस बॉस. " अंगरक्षक आज्ञाधारकपणे म्हणाला आणि इशारा करून त्याने आपल्या एका मित्राला एक मोठा टेम्पो तिथे आणायला सांगितला.

कुठेतरी दूर उभा असलेला तो टेम्पो त्या मोकळ्या पटांगणात येऊन उभा राहिला. सत्येंद्र यांचा गुन्हेगार न समजून कधी त्या टेम्पोकडे तर कधी त्यांच्याकडे पाहत होता. तेवढ्यात झटकन टेम्पोच्या मागचं शटर उघडलं गेलं. जसं ते शटर उघडलं गेलं, तशी आतून एक मोठी डरकाळी सर्वांच्या कानांवर पडली. ती डरकाळी ऐकून त्या माणसाच्या हृदयात धडकी भरली आणि तो आणखीच जास्त घाबरला.

" टायगर बारा तासांपासून उपाशी आहे. " सत्येंद्र त्या घाबरलेल्या माणसाकडे पाहत म्हणाले.

टायगर हा सत्येंद्र यांचा एक अंगरक्षकच होता जणू. होता जंगली वाघ, पण सत्येंद्र यांच्या जीवावर कोणी उठलं की त्याला तो फाडून खात होता. आता तो आपल्याला सुद्धा फाडून खाणार या भीतीने तो माणूस गुडघ्यांवरच रांगत सत्येंद्र यांच्या पायाजवळ येऊन बसला.

" न... नाही... नको साहेब, ही शिक्षा नको. तुम्ही मला विहिरीत ढकलून द्या, वाळवंटात सोडून द्या किंवा दरीवरून खाली फेकून द्या, पण ही इतकी भयंकर शिक्षा नको. " तो सत्येंद्र यांच्या पायाशी लोळत या भयंकर शिक्षेपासून वाचण्याचा प्रयत्न करत होता, पण आता खूपच उशीर झालेला होता. त्याने जो गुन्हा केला होता त्यासाठी सत्येंद्र यांना हीच शिक्षा योग्य वाटत होती.

" अरे आम्ही आहोत म्हणून तुला एवढी हलकी शिक्षा देत आहोत. जर सूर्या इथे असते तर काय झालं असतं? " सत्येंद्र किंचित ओठांवर हसू आणत त्याला म्हणाले, तेव्हा लगेच त्याच्या डोळ्यांसमोरून सत्येंद्र यांच्या मुलाचा, म्हणजेच 'सूर्यांश उर्फ सूर्या सत्येंद्र अग्निहोत्री' याचा चेहरा आला.

" आता तूच निर्णय घे, या भुकेल्या टायगरचा भक्ष्य बनायचं, की सूर्याचा. " सत्येंद्र यांनी त्याच्यासमोर दोन पर्याय ठेवले, पण त्या दोन्ही पर्यायांमध्ये त्याचा जीव जाणार हे नक्की होतं.

तो तसाच हतबल झाल्यासारखा खाली मान घालून बसला होता. तेवढ्यात त्याच्या पाठीमागून अगदी हळू आवाजात गुरगुरण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून पुन्हा त्याचे डोळे मोठे झाले आणि तो घाबरून सत्येंद्र यांच्याकडे पाहू लागला.

" तुझ्या डोळ्यांत तुझी चॉईस दिसली. नक्कीच तू सूर्याच्या हातून मरणं पसंत करणार नाही हे आम्हाला माहित होतं, त्यामुळे बिचारा टायगरच तयार झाला. तो तरी जास्त वेळ कसा उपाशी राहणार ना! " सत्येंद्र बोलत होते आणि इकडे क्षणात टायगरने त्या माणसाच्या अंगावर झडप घातली.

सत्येंद्र तसेच समोर टायगरचं पोट भरताना पाहत होते. तो माणूस जिवाच्या आकांताने ओरडत होता, पण सत्येंद्र आणि त्यांचे अंगरक्षक तिथे काही घडतच नाहीय असे दाखवत होते. त्यांच्यासोबत जो कोणी शत्रुता घेणार त्याचे असेच हाल होणार होते. काहीवेळाने त्या माणसाचा आवाज बंद झाला, तसे सत्येंद्र आपल्या सिंहासनावरून उठले आणि गाडीत जाऊन बसले. त्यांच्या गाडीच्या पुढे आणि मागे दोन दोन गाड्या त्यांची रक्षा करत निघाल्या होत्या.



क्रमशः


🎭 Series Post

View all